चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला
स्पेन संघाने महिला वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा जिंकली आणि संपूर्ण पाठीराख्यांमध्ये जल्लोष झाला. स्पेनच्या फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ल्युईस रुबियल्स यांचा तर आनंद गगनात मावेना. त्यांनी सर्व खेळाडूंना आलिंगन देत कौतुक केलं इथपर्यंत तर ठीक होतं. जेव्हा संघाची आघाडीची स्टार खेळाडू जेन्नी हर्मोसा आली, तेव्हा तिला आलिंगन दिलं. तिच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि उत्साहाच्या भरात तिच्या ओठाचंही चुंबन घेतलं. ही धक्कादायक घटना घडली २० ऑगस्ट २०२३ रोजी.
हर्मोसाला तर हे अनपेक्षित होतं. मात्र, जगज्जेतेपदाच्या आनंदात तिने सर्व पाठीराख्यांना अभिवादन केलं. प्रशिक्षकाचं चुंबन कॅमेऱ्यात बंदिस्त झालं नि जगभर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. हर्मोसाला जगज्जेतेपदावर प्रतिक्रिया देण्याऐवजी चुंबनावर प्रतिक्रिया द्यावी लागली. मात्र, हर्मोसाचा यात दोष नव्हता. टीकेचा धनी झाला प्रशिक्षक रुबियल्स. आता जोपर्यंत रुबियल्स स्पेन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत आम्ही स्पेनकडून खेळणार नाही, असा पवित्राच वर्ल्ड कप विजेत्या स्पेनच्या संघातील खेळाडूंनी घेतला.
रुबियल्स यांना मात्र यात गैर काही वाटलं नाही. मात्र, एखाद्या महिलेच्या ओठांचं चुंबन घेणं ही रुबियल्स यांना सहजभावना कशी वाटू शकते. त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्टच नकार दिला. स्पेनने विजेतेपदाचे बक्षीस स्वीकारल्यानंतर रुबियल्स यांनी हर्मोसाचे चुंबन घेतले. ते सहमतीने होते, असा दावा रुबियल्स यांनी केला. मात्र, रुबियल्स यांचं हे वक्तव्य धक्कादायक होतं. हर्मोसाने तर असं काहीही म्हंटलं नाही. तिने या वक्तव्यावर स्पष्टच सांगितलं, रुबियल्स यांच्या वक्तव्यात काहीही तथ्य नाही.
“माझ्या शब्दांवर कोणी विश्वास ठेवत नसेल, तर ते मी सहन करणार नाही. मी जे बोललेच नाही, ते माझ्या नावावर खपवू नये. मी आक्रमकतेची बळी ठरली आहे. माझा सन्मानच केला जात नाही,” अशी प्रतिक्रिया हर्मोसाने व्यक्त केली.
रुबियल्स यांच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. कित्येक वर्षे आम्ही अन्यायाला सामोरे जात आहोत. या कृत्याने तर याचे टोक गाठले गेले, अशी जळजळीत टीकाही हर्मोसाने केली.
अखेर या प्रकारावर चौफेर टीका झाल्यानंतर स्पेन फुटबॉल संघटनेच्या कार्यकारिणीला शुक्रवारी, २५ ऑगस्ट २०२३ रोजी बैठक घ्यावी लागली. त्यात रुबियल्स राजीनामा देतील, अशी अटकळे होती. मात्र, रुबियल्स यांना चुंबनाचं फारसं विशेष वाटतच नव्हतं. त्यामुळे त्यांनी राजीनाम्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, “माझ्याविरुद्ध खोटे आरोप करीत मला बळीचा बकरा केला जात आहे. चुंबन आम्हा दोघांच्या सहमतीनं घडलं आहे. त्याबद्दल मी राजीनामा का द्यायचा?”
रुबियल्स कुणाचंही ऐकून घेत नव्हते. मात्र, त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत गेला. महिला फुटबॉलपटूंना, हर्मोसाला क्रीडा मंत्रालयाने साथ द्यावी, असा सूर स्पेनमधून निघू लागला. स्पेनमधील कामगारमंत्री योलांदा दियाझ यांनीही या रुबियल्स यांच्या कृतीवर टीका केली. रुबियल्स यांना हटविण्याचीही मागणी त्यांनी केली. स्पेन सरकारमधूनही रुबियल्स विरोधाचे सूर आळवण्यात आले. एवढेच नाही, तर ‘फिफा’नेही रुबियल्स यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
स्पेन सरकार जरी रुबियल्स यांच्याविरुद्ध असलं तरी त्यांचा थेट राजीनामा घेता येणार नाही. कारण स्पेनचा कायद्यानुसार, क्रीडा संघटनांवरील प्रमुखांना दूर करण्याचा अधिकार स्पेनच्या सरकारला अजिबात नाही. त्यांना निलंबित करायचेच असेल, तर क्रीडा लवादासमोर रुबियल्स यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येऊ शकेल. महिला खेळाडूचे सहमतीने चुंबन घेतले नव्हते, हे सिद्ध झाले तरच रुबियल्स यांच्यावर कारवाई होऊ शकेल. हर्मोसाने तर चुंबन सहमतीने नसल्याचे स्पष्टच केल्याने रुबियल्स यांची चांगलीच कोंडी झाली.
तसंही स्पेनमध्ये महिलांवरील अत्याचार नवे नाहीत. स्पेनमधील महिलांवरील अत्याचार वाढत असल्याच्या तक्रारी तर सातत्याने होतच आहेत. त्याविरोधात अनेकदा आंदोलनेही झाली. देशात समान वेतनासह अन्य हक्कांसाठीही मागणी होत आहे. आता रुबियल्स यांच्या प्रकरणानंतर समस्त महिलांच्याच सुरक्षेबाबत सांगोपांग चर्चा झडू लागल्या आहेत.
स्पेनच्या पुरुष संघातील काही खेळाडूंनीही महिला खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. रुबियल्स हे युरोपिय महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे युएफाने रुबियल्स यांची चौकशी करावी, असे ‘फिफा’ने सुचवले आहे; मात्र याबाबत युरोपीय महासंघाने कोणतीही टिप्पणी केलेली नाही. केवळ स्पेनच्या फुटबॉल संघटनेतील महिला विभागाचे प्रमुख राएफेल देल अमो यांनीच राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=JJWvypmKYlo” column_width=”4″]काय घडले, कसे घडले?
- 20 ऑगस्ट : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर झालेल्या सोहळ्यात स्पॅनिश फॉरवर्ड जेनी हर्मोसो हिला आधी आलिंगन दिले आणि नंतर लुइस रुबियल्स यांनी तिच्या ओठांचं चुंबन घेतलं. हर्मोसो हिने नंतर एका कार्यक्रमात चुंबनावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, की “त्यामुळे मला आनंद झाला नव्हता.”
- 21 ऑगस्ट : अन्य फुटबॉलपटू, मीडिया, एवढेच नाही, तर स्पेनच्या पंतप्रधानांनी यावर तिखट शब्दांत टीका करीत रुबियल्स यांना राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर रुबियल्स माफी मागत म्हणाले, “जे नाराज आहेत त्या लोकांबद्दल मला खेद आहे.”
- 24 ऑगस्ट : चुंबनाच्या घटनेनंतर ‘फीफा’ने रुबियल्स यांची चौकशी सुरू केली.
- 25 ऑगस्ट : ‘आरएफईएफ’च्या बैठकीत उद्दाम रुबियल्स यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर सहमतीने चुंबन घेतल्याचेही ते म्हणाले.
- 25 ऑगस्ट : स्पेनच्या सरकारनेही या घटनेवर कडक पावले उचलली. सरकारने सांगितलं, की रुबियल्स यांना निलंबित करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. स्पेनच्या क्रीडा सचिवांनी सांगितले, की “हा स्पॅनिश फुटबॉलसाठी ‘मीटू’ क्षण आहे.”
- 25 ऑगस्ट : रुबियल्स यांनी केलेल्या दाव्याचं खंडन करीत हर्मोसो हिने इन्स्टाग्रामवर नमूद केले, की “कोणत्याही क्षणी… त्याचं चुंबन कधीच माझ्या सहमतीनं झालं नव्हतं.” महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 23 खेळाडूंसह स्पेनच्या 81 खेळाडूंनी जाहीर केले, की जोपर्यंत रुबियल्स यांना हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत स्पेनच्या महिला संघासाठी आम्ही खेळणार नाही.
- 26 ऑगस्ट : स्पेन फुटबॉल महासंघाचं म्हणणं आहे, की हर्मोसोच्या ‘खोटे’पणावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘फिफा’ने जाहीर केले, की जोपर्यंत शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा निकाल हाती येत नाही, तोपर्यंत रुबियल्स यांना निलंबित केले जात आहे.
“हे एक उत्स्फूर्त चुंबन होते. उत्साहपूर्ण आणि सहमतीने. हीच मुख्य गोष्ट आहे. जे सहमतीने घडलं आहे, त्यासाठी मी राजीनामा का द्यावा?”
– लुईस रुबियल्स, अध्यक्ष, स्पेन फुटबॉल महासंघ
चुंबनानंतर काय म्हणाली हर्मोसा?
स्पेन फुटबॉल संघटनेचे लुईस रुबियल्स यांनी म्हटलं होतं, की ‘ते चुंबन उत्स्फूर्त आणि सहमतीने झालं होतं.’ मात्र, जेन्नी हर्मोसा हिने रुबियल्स यांच्या वक्तव्याचं स्पष्ट शब्दांत खंडन केलं. इन्स्टाग्रामवर तिने यावर दीर्घ पोस्ट लिहिली. त्यात तिने म्हटले आहे, की रुबियल्स खोटे बोलत आहेत.
“मला या घटनेवर स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते. मला माहिती आहे, की कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही कामाच्या ठिकाणी, खेळाच्या मैदानावर किंवा सार्वजनिक ठिकाणी संमतीशिवाय अशा वर्तनाचे शिकार होऊ नये. मला स्वत:ला असुरक्षित वाटत आहे, की मी आवेगपूर्ण कामुकतेच्या व्यवहाराची शिकार झाले आहे. माझ्याकडून या वर्तनाची संमती अजिबात नव्हती.” असे हर्मोसाने म्हटले आहे.
“स्पष्टच सांगायचे, तर त्याने माझा आदर केला नाही.”
हर्मोसा पुढे असेही म्हणते, की रुबियल्सने वर्तनाचे समर्थन करताना संमती असल्याचे नमूद केल्याने मी प्रचंड दबावाखाली आले आहे. त्याचप्रमाणे कुटुंब, मित्र आणि संघ सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.
फिफाच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड संघाची खेळाडूंनीही या प्रकरणी निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी ही घटना स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे. ‘आम्ही हर्मोसाच्या पाठीशी आहोत,’ असेही या खेळाडूंनी म्हटले आहे.
“मी हे स्पष्ट करू इच्छिते, की लुइस रुबियल्स यांनी ज्या सहमतीचा उल्लेख केला ते कधीच नव्हते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांचं हे चुंबन कधी सहमतीने झालं होतं का?”
– जेन्नी हर्मोसा, कर्णधार, स्पेन फुटबॉल महासंघ
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_filter_category=”63″]
One Comment