जॅकी जॉयनर : मैदान गाजविणारी ‘फर्स्ट लेडी’
जॅकी जॉयनर : मैदान गाजविणारी ‘फर्स्ट लेडी’
जॅकी जॉयनरची (Jackie Joyner) आजी एवलीन यांच्यावर जॅकलीन केनेडी (Jacqueline Kennedy) यांचा प्रभाव होता. या जॅकलीनबाई म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या पत्नी. अर्थात, एवढीच ओळख नाही, तर त्या उत्तम लेखिका होत्या, छायाचित्रकार होत्या. समाजवादी विचारसरणीच्या होत्या. जॉयनरच्या आजीला या गुणविशेषांचं कौतुक होतं की माहीत नाही, पण त्या अमेरिकेच्या अध्यक्षाची पत्नी होत्या, याचं विशेष कौतुक वाटायचं.
जॅकलीन अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ होत्या. जॉयनरच्या आजीलाही वाटायचं, ही आपली नातही कधी तरी ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ओळखली जाईल. म्हणूनच जॉयनरचं नाव ‘जॅकलीन’ (Jacqueline) असं ठेवण्यात आलं. जसं जॅकलीन यांना ‘जॅकी’ नावाने ओळखले जात होते, तसेच जॉयनरलाही ‘जॅकी’ नावानेच ओळखले जाऊ लागले.
आजीचं म्हणणं खरं ठरलं. जॅकी ‘फर्स्ट लेडी’ ठरली, पण कुणा अध्यक्षाची पत्नी म्हणून नाही, तर मैदानावर फर्स्ट नंबर मिळवूनच.
जॅकलीन जॉयनर-कर्सी (Jacqueline Joyner-Kersee) अमेरिकेची एकेकाळची ट्रॅक अँड फिल्डची सर्वोत्तम खेळाडू आज ५९ व्या वर्षी निवृत्तीचं जीवन जगत आहे. हेप्टॅथलॉनवर हुकूमत गाजविणारी जॅकी लांब उडीतही तितकीच उत्तम खेळाडू. जॅकी चार ऑलिम्पिक खेळली. त्यात तिने तीन सुवर्णपदके, एक रौप्य, तर वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये दोन कांस्यपदके अशी बक्षिसांची लयलूट केली आहे.
अशा खेळाडूचं निवृत्तीचं जीवन स्वस्थ कधी बसू देणार नाही. ती आता मुलांच्या शिक्षणासाठी झटतेय, वांशिक समानतेसाठी लढतेय. महिलांच्या हक्कांसाठी ती आता एक सक्रिय कार्यकर्ती आहे.
जॅकीचा प्रवास खाचखळग्यांचा आहे. तो उलगडताना तिच्यासारखंच त्या रस्त्याने धक्के सोसतच जावं लागतं. तिला अस्थमा होता, तरीही ती एक सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू ठरली. विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे.
Jackie Joyner: The First Lady to dominate the playground |
जॅकीचा जन्म ३ मार्च १९६२ चा. इलिनॉइसच्या पूर्व सेंट लुइसमध्ये (East St. Louis, Illinois) तिने जन्म घेतला. तिने ईस्ट सेंट लुइस लिंकन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. शाळेत असतानाच तिने १९८० च्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत लांब उडीत अव्वल ठरली. अमेरिकेची आघाडीची खेळाडू कॅरोल लेविसनंतर (Carol Lewis) अशी कामगिरी करणारी जॅकी आठवी खेळाडू होती. ट्रॅक अँड फिल्डवर अतुलनीय कामगिरी करणारी जॅकीला प्रेरणा मिळाली ती बेब डिड्रिक्सन झहारियाजमुळे (Babe Didrikson Zaharias).
१९७५ मध्ये टीव्हीवर बेबवर चित्रपट लागला होता. तो पाहून जॅकीला प्रेरणा मिळाली. २० व्या शतकातल्या बेबला सर्वोत्तम महिला खेळाडूचा सन्मान मिळाला होता. त्याच्या पंधरा वर्षांनी स्पोर्टस इलस्ट्रेटेड फॉर वुमेन या मासिकाने जॅकीलाही सर्वोत्कृष्ट महिला अॅथलीट म्हणून गौरविले. जॅकीचा भाऊ अल (Al Joyner) हा तिहेरी उडीत ऑलिम्पिक चॅम्पियन होता. त्याने ऑलिम्पिक ट्रॅक चॅम्पियन फ्लोरेन्स ग्रिफिथशी विवाह केला.
जॅकीच्या क्रीडाकौशल्याला पैलू पाडणारे मार्गदर्शक, प्रशिक्षक बॉब कर्सी हा नंतर तिचा जीवनसाथी झाला. १९८६ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. १९८८ मध्ये जॅकी जॉयनर-कर्सी फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देते.
२००७ मध्ये जॅकीसह आंद्रे आगासी, मुहंमद अली, लान्स आर्मस्ट्राँग, वारिक डन, मिया हाम, जेफ गॉर्डन, टोनी हॉक, आंद्रिया जेगर, मारियो लीमिअक्स, अलोंझो मोर्निंग आणि कॅल रिपकेन या वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांनी एकत्र येत अॅथलीट्स फॉर होप नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था खेळाडू, बिगरखेळाडूंना मदत करते. जॅकीचं आयुष्य कसं होतं, याची एक झलक तिने एका मुलाखतीत मांडली होती. जॅकी कशी होती, तिचा संघर्ष काय होता हे तिनेच सांगितलेल्या काही प्रसंगांवरून अंगावर शहारे येतात…
जॅकीने खून पाहिला नि चकित झाली…!
एक घटना जॅकी कधीही विसरू शकलेली नाही. तिच्या घराशेजारी गुन्हेगारी घटना घडणे अगदी सामान्य होते. रोजच ड्रग्स आणि गुन्ह्यांच्या घटनांनी ती अधिक मजबूत झाली होती, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. जॅकी अवघ्या अकरा वर्षांची होती. जॅकी बहीण देबोराहसोबत (Deborah) दारूच्या दुकानावर मिठाई आणि चिप्स खरेदी करण्यासाठी गेली होती. आपल्याकडे दारूच्या दुकानावर चिप्स (चखना) मिळतात, पण अमेरिकेत मिठाईही मिळते! झालं काय, की तिथे दोन माणसांमध्ये वाद झाला. एकाने लगेच बंदूक काढली आणि धडाधड गोळ्या झाडल्या. हे पाहताच जॅकी आणि देबोराह तिथून पळाल्या. तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सगळीकडे रक्तच रक्त वाहत होतं. जॅकीची आई ओरडली, लवकर घरात जा, घरात जा… या घटना तशा नव्या नव्हत्याच. हिंसक घटना तर सामान्य बाबच झाली होती. त्यामुळे त्या घटनेच्या क्षणी जॅकीला भीतीपेक्षा आश्चर्यच अधिक वाटलं.
आजीचा खून
Jackie Joyner: The First Lady to dominate the playground | वयाच्या चौदाव्या वर्षी जॅकीने आजीचा मृत्यू पाहिला. तिचा खून झाला होता. तिची आजी मित्रासोबत राहत होती. एकदा सायंकाळी तो घरी आला. तो मद्यपी आणि ड्रग्सचा नशा करायचा. आजी झोपलेली होती, त्या वेळी त्याने तिचे डोके फोडले. जॅकीच्या वडिलांसाठी हा कठीण प्रसंग होता. ते त्या मुलाला मारणार होते; पण जॅकीसह कुटुंबाने त्यांची समजूत काढली, की तुम्ही त्याला मारून जेलमध्ये जाल आणि अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकणार नाही. ती घटना तेथे थांबली. जॅकीला आजीचा मृत्यू अजूनही आठवतोय.
आईच्या मृत्यूने धक्का
1976 च्या माँट्रियल ऑलिम्पिकने जॅकीला प्रेरणा मिळाली. त्या क्षणापासून जॅकीच्या आयुष्यात ना नृत्य, ना मित्र. फक्त जीवतोड मेहनत आणि ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्या वेळी जॅकी लॉस एंजिल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात पहिल्या वर्षात शिकत होती. एकदा सकाळी सकाळी जॅकीला चुलतीचा फोन आला, मेरी गेली… मेरी गेली! तिने टाहो फोडला होता. जॅकीने तडक फ्लाइट पकडली आणि रुग्णालयात पोहोचली. आईला विलगीकरणात (quarantine) ठेवण्यात आलं होतं. कारण ती मेंदुज्वराच्या अत्यंत संसर्गजन्य आजाराने पीडित होती. जॅकीने आईला लांबूनच पाहिलं. तिची चॉकलेटी त्वचा गडद झाली होती. डोकं सुजलेलं होतं. व्हेंटिलेटरवर तिचा फक्त श्वास सुरू होती. शरीर मात्र निस्तेज झालं होतं…
मेरीची ही स्थिती कठीण होती. वडिलांना काहीच सुचत नव्हतं. निर्णय घेताना त्यांना अडचणी आल्या. त्यामुळे त्यांनी जॅकीलाच निर्णय घेण्यास सांगितलं, की तूच ठरव, तिची श्वासनळी काढून घ्यायची किंवा नाही! जॅकी स्तब्ध झाली. ती आईची गळाभेटही घेऊ शकत नव्हती. तशी परवानगीच नव्हती. तिला जाणीव झाली होती, की आता यापुढे कुटुंबात ही व्यक्ती नसेल. अखेर जॅकीने सांगितले, ठीक आहे…! तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलं आणि एका मिनिटात तिची नाडी थांबली. अजूनही जॅकीच्या भावना त्या घटनेने ओलावतात…
अस्थमाच्या जाणिवेने जॅकी अस्वस्थ
जॅकी यूसीएलएच्या ट्रॅकवर धावण्याचा सराव करीत होती. वातावरणात गारवा होता आणि जशी ती अखेरच्या वळणावर आली, तेवढ्यात जॅकी श्वासावर नियंत्रण मिळवू शकली नाही. ती रडत होती आणि खोकल्याची प्रचंड ढास लागली होती. त्या वेळी समजलं, की जॅकीला अस्थमाचा अॅटॅक आलाय. जॅकी त्या वेळी 23 वर्षांची होती. तिचा भाऊ अल हाही एक उत्तम अॅथलीट होता. त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. हे रुग्णालय अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर होतं. जॅकीची अवस्था इतकी वाईट झाली होती, की ती व्हीलचेअरलाच खिळली. मात्र, जॅकी खचली नाही. तिने 1984 मध्ये लॉस एंजिल्स ऑलिम्पिकसाठी जीवतोड मेहनत घेतली. त्याचं फळ तिला मिळालं. हेप्टॅथलॉनमध्ये तिने रौप्यपदक मिळवलं. याच स्पर्धेत तिचा भाऊ अल यानेही तिहेरी उडीत सुवर्ण जिंकले. हा प्रसंगच भारी होता. स्मरणीय होता. त्या दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होते. त्यांना आईची तीव्र आठवण झाली. हा प्रसंग पाहण्यासाठी आज आई हवी होती… पण आई नव्हती…!
सुवर्ण थोडक्यात हुकल्याची खंत…
जॅकीचं सुवर्णपदक अवघ्या पाच अंकांनी हुकलं होतं. हेप्टॅथलॉनसारखा (Heptathlon) खेळ समजण्यासाठी मनोवैज्ञानिक दृढतेची गरज असते. लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये जॅकी नेमके हेच समजू शकली नव्हती. १९८४ च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये तिचं हेप्टॅथलॉनमधील (Heptathlon) सुवर्ण अवघ्या पाच अंकांनी हुकलं. त्याच्या चार वर्षांनी १९८८ च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्ण जिंकण्याचा इरादा पक्का केला. मात्र, नेमकं याच काळात तिला गुडघ्याच्या व्याधींनी त्रासून सोडलं होतं.
जॅकीने विचार केला, की १९८८ चे हेप्टॅथलॉनमध्ये (Heptathlon) सात इव्हेंट असतात. यापैकी आपण उंच उडीत सगळ्यांना मागे सारू. कारण जॅकीला उंच उडीत तोड नव्हती. या एका खेळातील कामगिरीने आपण इतरांना गुणांमध्ये मागे टाकू असा तिचा कयास होता. झालंही तसंच. उंच उडीत तिने विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे तिला इतरांपेक्षा ३०० पेक्षा अधिक गुण मिळाले. ती लांब उडीतही जिंकली.
याच सेऊल ऑलिम्पिकमध्ये तिच्या वहिनीनेही तीन सुवर्ण जिंकले. होय, तिची वहिनी फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर ही भाऊ अल याची पत्नी. फ्लोरेन्स ‘फ्लो-जो’ या नावाने लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखली जात होती. धावण्याच्या तीन प्रकारांत फ्लोरेन्सने तीन सुवर्ण जिंकले. दुर्दैवाने फ्लोरेन्सचं त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत निधन झालं. हा कुटुंबाला बसलेला दुसरा धक्का. आपल्या भाचीला पाहून जॅकी कमालीची अस्वस्थ झाली होती. कारण फ्लोरेन्सची मुलगी मेरी हिने खूप कमी वयात आई गमावली होती. तिचं दु:ख जॅकीशिवाय कोण समजू शकतं?
सेऊलमधील कामगिरीने जॅकी समाधानी नव्हती. म्हणूनच तिने पुढे १९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये हेप्टॅथलॉनचा किताब जिंकला आणि पुढच्या चार वर्षांनी अटलांटा ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत कास्यंपदक मिळविले. जॅकीने तीन ऑलिम्पिक किताब जिंकले आणि हेप्टॅथलॉनमध्ये (Heptathlon) 7,000 गुणही मिळविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. अनेक किताब तर तिने मिळवलेच, पण कौटुंबिक पार्श्वभूमीने ती नेहमीच विनम्र राहिली.
जॉयनर कर्सी (Joyner-Kersee) हिच जन्म १९६२ मध्ये ईस्ट सेंट लुइस येथे झाला. तिचं ‘जॅकी’ हे नाव जॅकी केनेडी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. 1984 च्या ऑलिम्पिकमध्ये हेप्टॅथलॉन प्रकारात रौप्यपदक मिळविले. त्यानंतर दोनच वर्षांनी तिने यात विश्वविक्रम रचला.
1987 मध्ये जॅकी वर्ल्ड चॅम्पियन झाली. त्याचबरोबर तिने लांब उडीत तिने विश्वविक्रमही प्रस्थापित केला. 1988 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने लांब उडी आणि हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक मिळविले. 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने पुन्हा हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्ण, तर 1993 मध्ये ती पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन झाली.
1996 च्या ऑलिम्पिकमध्ये लांब उडीत तिने कांस्यपदक मिळविले. ऑलिम्पिकमधील तिचे हे अखेरचे पदक होते. जॅकी विसाव्या शतकातील सर्वोत्तम महिला अॅथलीट होती. 2001 मध्ये तिने खेळातून निवृत्ती घेतली. जॅकी आता 59 वर्षांची आहे. आता ती स्वत:ची एक संस्था चालवते. या संस्थेच्या माध्यमातून ती जगभरातील मुलांना क्रीडाकौशल्य शिकवून त्यांना उत्तम खेळाडू बनविण्याचं काम करीत आहे.
व्यावसायिक बास्केटबॉलमध्ये अपयशी
जॅकीचं ऑलिम्पिक करिअर जवळजवळ संपुष्टात आलं होतं. त्यामुळे ती व्यावसायिक बास्केटबॉलकडे वळली. 1996 मध्ये तिने रिचमंड रेज (Richmond Rage) या फ्रँचायजी टीमकडून अमेरिकन बास्केटबॉल लीग (American Basketball League) खेळली. ती तशी लोकप्रिय खेळाडू होती, पण ट्रॅक अँड फिल्डसारखी बास्केटबॉलमध्ये ती फारशी छाप पाडू शकली नाही. ती एकूण 17 गेम खेळली. यात ती 15 पेक्षा जास्त गुण मिळवू शकली नाही.
2000 च्या ऑलिम्पिकमध्ये अपयशी
जॅकीने वयाच्या ३६ व्या वर्षी खेळातून निवृत्ती जाहीर केली. मात्र, दोन वर्षांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ती पुन्हा लांब उडीकडे वळली. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने मेहनत घेतली खरी, पण पात्रताफेरीतच तिला अपयश पदरी पडलं. ती सहावी आली. नंतर जॅकी पुन्हा मैदानावर परतली नाही.
जॅकीची ऑलिम्पिक कामगिरी |
1984
जॅकीचं १९८४ मध्ये पहिलंच ऑलिम्पिक पाऊल होतं. लॉस एंजिल्समध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये जॅकीने सात विविध इव्हेंटचा समावेश असलेल्या हेप्टॅथलॉनमध्ये रौप्यपदक मिळविले. या खेळात 200 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि 100-मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा समावेश आहे.
1988
सेऊलमध्ये झालेल्या 1986 च्या ऑलिम्पिकमध्ये जॅकीने 7,291 गुण मिळवत हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय लांब उडीतही सुवर्णपदक जिंकणारी ती अमेरिकेची पहिली महिला खेळाडू ठरली.
1992
1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्येही जॅकीने हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये हेप्टॅथलॉनचे सुवर्ण जिंकणारी ती जगातली पहिली महिला खेळाडू ठरली. याच ऑलिम्पिकमध्ये तिला लांब उडीत कांस्यपदक मिळाले.
1996
1996 मध्ये ती अखेरची ऑलिम्पिक अटलांटामध्ये खेळली. यात तिने लांब उडीत तिने कांस्यपदक मिळविले. मात्र, मांसपेशी ताणल्या गेल्याने आपल्या हुकमी हेप्टॅथलॉनमध्ये ती खेळू शकली नाही.
Join our Facebook page
ऑलिम्पिक |
पदक | वर्ष-स्थळ | खेळ |
सुवर्ण | 1988 सेऊल | हेप्टॅथलॉन |
सुवर्ण | 1988 सेऊल | लांब उडी |
सुवर्ण | 1992 बार्सिलोना | हेप्टॅथलॉन |
रौप्य | 1984 लॉस एंजिल्स | हेप्टॅथलॉन |
कांस्य | 1992 बार्सिलोना | लांब उडी |
कांस्य | 1996 अटलांटा | लांब उडी |
वर्ल्ड चॅम्पियनशिप |
सुवर्ण | 1987 रोम | लांब उडी |
सुवर्ण | 1987 रोम | हेप्टॅथलॉन |
सुवर्ण | 1991 टोकियो | लांब उडी |
सुवर्ण | 1993 स्टुटगार्ट | हेप्टॅथलॉन |
गुडविल गेम्स |
सुवर्ण | 1986 मॉस्को | हेप्टॅथलॉन |
सुवर्ण | 1990 सिएटल | हेप्टॅथलॉन |
सुवर्ण | 1994 सेंट पीटर्सबर्ग | हेप्टॅथलॉन |
सुवर्ण | 1998 न्यूयॉर्क | हेप्टॅथलॉन |
पॅन अमेरिकन गेम्स |
सुवर्ण | 1987 इंडियानापोलिस | लांब उडी |
Follow us :
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”69″]
2 Comments