ऑलिम्पियन पहिलवान सुशील कुमार खुनी? काय आहे हे प्रकरण?

Sushil Kumar a murderer? ऑलिम्पियन पहिलवान सुशील कुमार खुनी?
ऑलिम्पिक चॅम्पियन पहिलवान सुशील कुमार एका खून प्रकरणात गोत्यात सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस बजावली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय पहिलवान सागर राणा याचा मृत्यू झाला. या हाणामारीत सुशील कुमारचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने कुस्तीचा आखाडा स्तब्ध झाला आहे. नवोदित पहिलवानांसाठी सुशील प्रेरणा बनला होता. मात्र, त्याच्यामुळेच कुस्तीची प्रतिमा मलिन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एकूणच हे प्रकरण काय आहे, सुशील कुमारच्या (Sushil Kumar a murderer?) टोळीची कशी दहशत होती, सागर राणाला का मारलं, त्याने असं काय केलं होतं, की त्याला आपला प्राण गमवावा लागला. यावर 365 अंशांतून घेतलेला हा वेध…
सागर धनखड राणा खून प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच टाकलेल्या छापासत्रात काही आरोपी हाती लागले आहेत. मात्र, सुशील अद्याप फरार झाला. पोलिस सुशीलशिवाय इतर २० संशयितांचा शोध घेत आहेत. सुशील कुमार नेमका कुठे लपला आहे, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. मात्र, या घटनेमुळे जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याची उत्तरे आता कुस्ती महासंघाला द्यावी लागणार आहेत.
कोणी केला सागर राणाचा खून?
सागर राणाचा खून कोणी केला, यामागे संशयाची सुई सुशील कुमारवर आहे. ही घटना नेमकी काय आहे, याची थोडक्यात माहिती… ही घटना आहे, मंगळवार, 4 मे 2021 रोजीची. ही घटना घडली, तेव्हा सर्वाधिक आठ मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला कोटा मिळवून दिल्याचा जल्लोष सुरू होता. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्याच वेळी चार मे 2021 रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पहिलवानांच्या दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले. जखमी पहिलवानांमध्ये सोनू महाल आणि अमित कुमार यांचा समावेश आहे. सागर राणाही गंभीर जखमी झाला. त्याला बीजेआरएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तब्येत आणखी गंभीर झाल्याने त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला.
ही हाणामारी झाली होती स्टेडियमच्या पार्किंग भागात. तेथे सुशील कुमार, अजय, प्रिन्स दलाल, सोनू, सागर, अमित आणि इतरांमध्ये बाचाबाची झाली. नंतर त्यांच्यात हाणामारी झाली. ही हाणामारीची घटना घडल्यानंतर पोलिस तेथे पोहोचले. मात्र, तत्पूर्वीच सगळे पहिलवान तेथून पसार झाले होते. फक्त प्रिन्स दलाल हा आरोपी घटनास्थळी हाती लागला. त्याच्याकडून 12 बोअरची सात जिवंत काडतुसे, एक मोबाइल फोन आणि दोन डबल बॅरल बंदूक हस्तगत करण्यात आली. दलालला ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे कंगोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेचा व्हिडीओ दलालने मोबाइलमध्ये शूट केला होता. तोही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळेच या खून प्रकरणात सुशील कुमारचा (Sushil Kumar a murderer?) सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडीओत सागरला मारहाण करणाऱ्यांचे चेहरे स्पष्टपणे समोर आले आहेत. अतिरिक्त डीसीपी (उत्तर-पश्चिम जिल्हा) गुरिकबल सिंह सिद्धू यांनी ही माहिती दिली.
भांडणामागे हे होते कारण? Sushil Kumar a murderer?
सागर राणा आणि त्याचे मित्र स्टेडियमजवळील एका फ्लॅटमध्ये राहत होते. हा फ्लॅट सुशीलशी संबंधित होता. सागर व त्याच्या मित्रांना हा फ्लॅट रिकामा करण्यास सांगण्यात आले होते. मॉडेल टाउन परिसरात हा फ्लॅट आहे. हाच फ्लॅट सागर राणाच्या मृत्यूचे मूळ कारण ठरला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी कॅमेरा फूटेजचाही आधार घेतला आहे. यातून काहींची ओळख पटली आहे. हा फ्लॅट एकमेव कारण नव्हता, तर सुशील कुमारची गुंडगिरी हेही त्यातले आणखी एक कारण होते. छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारविरुद्ध जाण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. जर कोणी त्याचं ऐकलं नाही, तर तो त्यांचा छळ करायचा. सागर राणाने फ्लॅट सोडण्यास नकार दिल्याने सुशील कुमारच्या गटाने हा विषय प्रतिष्ठेचा केला आणि त्यातच त्याचा काटा काढला.
या घटनेवर सुशील काय म्हणाला?
या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मी किंवा माझ्याबरोबरील पहिलवानांचा या भांडणात सहभाग नव्हता. आम्ही पोलिसांना सांगितले आहे, की काही अज्ञातांनी हे भांडण केले. ही सारवासरव केली आहे सुशील कुमारने. ही घटना घडल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुशीलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यानंतर तो पसार झाल्याने त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणात तो पूर्णतः फसला आहे.
कोण आहे सागर राणा?
कोण आहे हा सागर राणा…? सागर राणा अवघ्या 23 वर्षांचा मल्ल होता. भारतीय कुस्तीतला तो उमदा पहिलवान होता. ग्रीको रोमन प्रकारात त्याची हुकूमत होती. मध्यमवर्गीय कुटुंबातला हा पहिलवान नवी स्वप्ने घेऊन दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये आला होता. तो दिल्ली पोलिसमधील एका हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता. ज्युनिअर गटातला तो राष्ट्रीय विजेता पहिलवान होता. ग्रीको रोमनमध्ये 97 किलो ग्रॅम वजनगटात तो खेळत होता. दिल्लीत सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय शिविरातही त्याचा सहभाग होता.
कुठे लपून बसलाय सुशील?
सुशील कुमार (Sushil Kumar a murderer?) कुठे लपून बसला आहे, याचा तपास अद्याप लागलेला नाही. दिल्ली पोलिसांची डझनभर पथके सुशील कुमारच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. तब्बल पाच राज्यांत त्याचा तपास सुरू आहे. सुशील कुमारचा ठावठिकाणा त्याचा सासरा सतपाल सिंह यांना माहीत आहे. मात्र, त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सुशीलने 7 मे 2021 रोजी सतपाल यांच्याशी चर्चा केल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने केला आहे. पोलिसांचा दावा आहे, की एकदोन दिवसांत सुशील कुमार हाती लागेल. मात्र, तत्पूर्वीच सुशील कायदेशीर सल्ला चाचपून पाहत आहे. ही अटक टाळण्यासाठी तो आणि त्याचा सासरा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ते राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न करीत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण रामदेवबाबांपासून काही राजकीय व्यक्ती सुशील कुमारशी संबंधित असल्याची वदंता आहे. कायदेशीर सल्लाही ते घेत आहेत. अद्याप तरी त्यांचे प्रयत्न फळास आलेले दिसत नाहीत. त्यामुळेच तो पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांनी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये छापासत्र अवलंबले आहे. सुशीलचा मोबाइलही बंद आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी प्रिन्स दलाल या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 17 तरुणांची एक यादी तयार केली आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सुशीलमुळे कुस्ती डागाळली ः डब्लूएफआय
सुशील कुमार जेव्हा कुस्तीत सर्वोच्च स्थानावर होता, तेव्हा त्याचे भारतीयांना कौतुक वाटत होते. नवोदित मल्लांसाठी तो प्रेरणादायी होता. त्याने भारतीय कुस्तीला शिखरावर नेले. मात्र, जेव्हा सागर राणा खून प्रकरणात सुशीलचे (Sushil Kumar a murderer?) नाव आले तेव्हा क्रीडाविश्वाला धक्का बसला. त्याच्यामुळे कुस्तीची प्रतिमा डागाळल्याची उद्विग्न प्रतिक्रिया भारतीय कुस्ती महासंघाने व्यक्त केली आहे. बापरोला गावातला हा पहिलवान भारतातला एकमेव विश्वविजेता (2010) आहे. दोन ऑलिम्पिक पदके मिळविणाराही तो भारतातला एकमेव पहिलवान आहे. सुशीलसह इतर पहिलवानांनी भारतीय कुस्तीला जी प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याला सुशीलने डाग लावल्याची भावना भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) व्यक्त केली आहे. डब्लूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी या प्रकरणी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की होय, भारतीय कुस्तीची प्रतिमा या घटनेने मलिन झाली आहे. मात्र, पहिलवान मॅटबाहेर काय करतात, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्ही मॅटवरील त्यांच्या कामगिरीवर चिंतित आहोत.’’
सुशीलच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदके
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकले होते. सुशीलच्या या पदकामुळे भारतीय कुस्तीचा 56 वर्षांचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपुष्टात आला होता. सुशीलच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्तीला उभारी मिळाली. त्यानंतर योगेश्वर दत्त, गीता, बबिता आणि विनेश फोगाट, रिओ ऑलिम्पिकमधील कांस्य पदकप्राप्त साक्षी मलिक आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविणारे बजरंग पुनिया, रवी दाहिया आणि दीपक पूनिया अशा अनेक मल्लांनी आपली छाप सोडली. मात्र, सुशील कुमारवर जेव्हा खून प्रकरणी लूक आउट नोटीस जारी करण्यात आली तेव्हा सगळेच स्तब्ध झाले. कुस्तीची प्रतिमा मलिन झाली होती. कुस्ती आजच डागाळली असं नाही, तर भारतीय कुस्तीच्या प्रतिमेला फेब्रुवारीतही तडा गेला होता. डब्लूएफआयचे सचिव तोमर यांनी सुशील कुमारच्या प्रकरणाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तोमर यांच्या बोलण्यातून वाढते गैरप्रकार, गुंडगिरी कुस्तीला कशी पोखरत चालली आहे, याची काही उदाहरणे समोर आली आहेत.
करारातून सुशील कुमारला हटवणार का? Sushil Kumar a murderer?
Sushil Kumar a murderer? | डब्लूएफआयच्या वार्षिक करारसूचीत सुशील कुमारचा 2018 पासून ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्याला 30 लाख रुपये वार्षिक सहायता निधी मिळतो. आता तो खुनाच्या प्रकरणात अडकल्याने त्याला या करारसूचीतून हटवणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, यावर सध्या कोणताही विचार सुरू नसल्याचे डब्लूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. नूर सुल्तानमध्ये 2019 च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर सुशील कुमार एकाही स्पर्धेत सहभागी झालेला नाही.
सासरा-जावयाची दहशत
Sushil Kumar a murderer? छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारच्या गटाची दहशत आहे. असं म्हणतात, की योगेश्वर आणि बजरंगसारख्या पहिलवानांनी हे स्टेडियम सोडले आहे. कारण त्याचं ऐकलं नाही म्हणून सुशील कुमारच्या टोळीने त्यांनाही धमकावलं होतं. सुशीलचे प्रशिक्षक आणि त्याचे सासरे सतपाल सिंह (आशियाई स्पर्धा 1982 मधील विजेते ) 2016 पर्यंत स्टेडियमचे प्रभारी होते. ते अतिरिक्त निदेशकपदापर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच या स्टेडियमवर हळूहळू सतपाल सिंह यांचीच दादागिरी होती. त्यांचा हाच कित्ता नंतर जावयाने गिरवला. सतपाल यांच्या निवृत्तीनंतर जावई सुशीलची वर्णी लागली. सुशील ओएसडीपदी नियुक्त झाला. त्यामुळे स्टेडियममध्ये सुशील कुमार याच्या इच्छेबाहेर कोणाचीही मात्रा चालत नव्हती. रेल्वेत प्रतिनियुक्तीवर काम करणारा सुशील सगळे निर्णय घेत होता. जर त्याचं कुणी ऐकलं नाही किंवा त्याच्या सल्ल्यानुसार वागलं नाही, तर तो विरोधकांना छळायचा. त्याची दहशत इतकी होती, की कोणीही त्याविरुद्ध बोलत नव्हतं. कारण त्यांना करिअर करायचं होतं. या राजकारणात त्यांना पडायचंच नव्हतं. याचाच फायदा सुशीलने उचलला. यामुळेच काहींनी स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला. सुशीलवर जेव्हा खुनाचा आरोप लागला, तेव्हा कुणालाही फारसं आश्चर्य वाटलं नसेल. मात्र, अशा घटना सातत्याने समोर येत असताना कुस्तीची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याचे काय?
ही घटना बरंच काही सांगून जाते…
ही घटना आहे ऑगस्ट 2019 ची. जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी दोन मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यापैकी एक होता दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार तर दुसरा होता हरियाणाचा जितेंद्र कुमार. 74 किलोग्रॅम वजनगटातील ही कुस्ती पाहण्यासाठी 1500 वर प्रेक्षकांची उपस्थिती होती. ही कुस्तीही वादात सापडली होती. ही कुस्ती इतकी रांगडी होती, की दोन्ही पहिलवान रक्ताने माखले होते… आयजीआय स्टेडियममध्ये ही लढत रंगली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह हेही त्या वेळी कुस्ती पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या लढतीत जितेंद्रचा डोळा आणि कोपरा जखमी झाला, तर सुशील कुमारच्या नाकातून दोन वेळा रक्त आले. मात्र, या लढतीत सुशीलच जिंकावा, म्हणून काही निर्णय जितेंद्रच्या विरोधात देण्यात आले.
Sushil Kumar a murderer? | पंचांनी सुशील कुमारला 4-2 असे विजयी घोषित केले. त्या वेळी जितेंद्रचे प्रशिक्षक संतापले. त्यांनी मॅटवर येऊन आपला विरोध व्यक्त केला. महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी मात्र निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच या कुस्तीची स्क्रीप्ट आधीपासून लिहिली होती. कारण सुशीलच्या नाकातून दोन वेळा रक्त आल्यानंतर त्याला दोन वेळा मेडिकल ब्रेक देण्यात आला. मात्र, जेव्हा जितेद्र जखमी झाला, तेव्हा त्याला एकदाही मेडिकल ब्रेक दिला नाही.
पराभूत झालेला पहिलवान जितेंद्र म्हणाला, की सुशीलने स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी जाणूनबुजून दोन ब्रेक घेतले होते. मात्र, माझ्या डोळ्याला जखम झाली तेव्हा मला अंधुक दिसत होते. त्या वेळी मला ब्रेक का दिला नाही…? जितेंद्रचा प्रश्न बरोबर आहे, पण त्याचे उत्तर त्या वेळीही कोणाकडे नव्हते आणि आजही नाही…
फेब्रुवारीत 2021 मध्ये आखाड्यातच पाच जणांचा खून
तोमर यांनी फेब्रुवारी 2021 मधील ज्या घटनेचा संदर्भ दिला आहे, ते असेच गंभीर होते. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील जाट कॉलेजमध्ये एका प्रशिक्षकाने सहकारी प्रशिक्षक मनोज मलिकसह पाच जणांचा खून केल्याची घटना घडली होती. महाविद्यालयाचा आखाडा 12 फेब्रुवारी 2021 रोजी रक्ताने लालेलाल झाला. महाविद्यालयाच्या आखाड्यात सुखविंदर मोर नावाचा प्रशिक्षक होता. या आखाड्यात उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पहिलवान पूजा तोमर कुस्ती प्रशिक्षण घेत होती. या पूजाशी सुखविंदरला लग्न करायचं होतं. मात्र, पूजा व तिच्या घरच्यांनी हा प्रस्ताव धुडकावला. सुखविंदर याची तक्रार मुख्य प्रशिक्षक मनोज मलिक यांच्याकडे करण्यात आली. लग्नासाठी दबाव, तसेच सातत्याने त्रास दिला जात असल्याची कैफियत त्यांनी मांडली. या तक्रारीनंतर सुखविंदरला आखाड्यात येण्यास बंदी घातली. या घटनेने सुखविंदरच्या मनात संताप खदखदत होता.
एकतर्फी प्रेमातून महिला पहिलवानालाही घातल्या गोळ्या
सुखविंदरने संतापाच्या भरात सुखविंदरने जाट कॉलेजच्या आखाड्याचे प्रशिक्षक मनोज मलिक, रेल्वेत काम करणारी त्यांची पत्नी साक्षी मलिक, प्रशिक्षक प्रदीप, सतीश आणि महिला पहिलवान पूजा यांच्यावर निर्दयपणे गोळ्या झाडल्या. यात पाचही जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मनोज आणि साक्षी या दाम्पत्याचा तीन वर्षांचा मुलगा सरताज, तसेच प्रशिक्षक अमरजीत यांच्या मुलालाही गोळी लागली. सुदैवाने ते बचावले आहेत. या एकूणच घटनेत केवळ एकतर्फी प्रेमच कारणीभूत नव्हते, आणखी एक कंगोरा होता. सुखविंदर आणि मनोज यांच्यात मुख्य प्रशिक्षकपदावरूनही वाद होते. सुखविंदरला मुख्य प्रशिक्षकपद हवे होते. खून केल्यानंतर सुखविंदर फरार झाला होता. त्याला नंतर अटक करण्यात आली. हरियाणातल्या या घटनेपाठोपाठ आता सुशील कुमारही खून प्रकरणात अडकल्याने भारतीय कुस्ती कशी डागाळत आहे, याचे वाभाडेच तोमर यांनी या निमित्ताने काढले आहेत.
One Comment