आयसीसी टी20 मध्ये नियम करणार आणखी कडक
षटकामागे गती कमी राखल्यास क्षेत्ररक्षणाला फटका बसणार असून, आयसीसी हा नवा नियम अमलात आणणार आहे. टी 20 क्रिकेट स्पर्धेत षटकामागे कमी गती राखल्यास आता शिक्षा आणखी कडक होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 7 जानेवारी 2022 रोजी नवा नियम आणला आहे. निर्धारित वेळेच्या आत षटके पूर्ण न करणाऱ्या संघाला 30 यार्डाबाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागणार आहे. हा नियम जानेवारी 2022 मध्येच अमलात आणण्यात येणार आहे.
यापूर्वी ज्या शिक्षा होत्या, त्या तशाच असून, त्यात आता नव्या शिक्षेची भर पडणार आहे. त्यामुळे षटकांची गती राखण्यासाठी प्रत्येक संघाला काळजी घ्यावी लागणार आहे.
आयसीसीने नव्या नियम आणि अटींमध्ये द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यादरम्यान पर्यायी ड्रिंक्स ब्रेकचाही समावेश केला आहे. खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी आयसीसीच्या आचारसंहिता कलम 2.22 नुसार षटकामागे कमी गती राखल्यास आयसीसीचे जी कारवाई आहे ती जैसे थे राहणार आहे.
यात डिमेरिट गुण आणि संघ किंवा कर्णधाराला आर्थिक दंड या नियमानुसार होणारच आहे.
आयसीसीने सांगितले, ‘‘खेळण्याचे नियम आणि अटींच्या कलम 13.8 मधील षटकांच्या गती नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अखेरच्या षटकातील पहिला चेंडू निर्धारित वेळेतच टाकायला हवा. असे न केल्यास सामन्यातील उर्वरित षटकांत 30 यार्डाच्या सर्कलबाहेर एक फील्डर कमी ठेवावा लागेल’’
साधारणपणे पहिल्या सहा षटकांनंतर 30 यार्डाबाहेर पाच क्षेत्ररक्षक ठेवले जाऊ शकतात. षटकामागे कमी गती राखल्यास नव्या नियमानुसार चारच क्षेत्ररक्षक ठेवले जाऊ शकतील. गोलंदाजाच्या बाजूला उभा असलेला अंपायर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, फलंदाजाला आणि दुसऱ्या अंपायरला डावाची सुरुवात करण्यापूर्वीच निर्धारित कालावधीची माहिती देतील.
आयसीसीच्या क्रिकेट समितीने हा नवा बदल केला असून, सर्व प्रारूपांतील क्रिकेटची गती कायम ठेवण्याच्या पद्धतीवर ही समिती काम करीत असते.
त्याचबरोबर सामन्यादरम्यान दीड मिनिटांच्या पर्यायी ड्रिंक ब्रेकचाही समावेश या नियमात आहे.
मात्र, त्यासाठी मालिकेच्या सुरुवातीलाच सदस्यांमध्ये यावर सहमती असणे आवश्यक आहे.
नव्या नियमांची अंमलबजावणी या सामन्यांत होणार
- नव्या नियमांनुसार पहिला सामना 16 जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडीज आणि आयर्लंड याच्यात सबीना पार्कवर खेळविला जाणार आहे.
- नव्या नियमानुसार महिला गटातील पहिला सामना 18 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सेंच्युरियन येथे होणार आहे.
असा आहे नियम
- 20 षटके पूर्ण करण्यासाठी 85 मिनिटांची वेळ
- आयसीसीच्या मापदंडानुसार 20 वे षटक 85 व्या मिनिटापूर्वी सुरू होणे बंधनकारक
- डाव सुरू होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघांना 20 वे षटक सुरू होण्याची वेळ सांगण्यात येईल
- खेळाडूंच्या दुखापती, पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद यांसारख्या कारणांसाठी वाया गेलेला वेळ गृहीत धरूनच निर्णय
- पाऊस अथवा अन्य कारणामुळे डावातील तीन अथवा त्यापेक्षा जास्त षटके कमी झाल्यास हेच निकष
तिसरा पंच ठेवणार लक्ष
- षटकांच्या गतीवर तिसरा पंच लक्ष ठेवणार
- तिसरा पंच सामना थांबल्याच्या घटनांची नोंद ठेवतील
- सर्व विचार करून तिसरा पंच डाव संपण्याची अंतिम वेळ मैदानावरील पंचांना कळवतील
- प्रतिस्पर्धी संघाचा होणार फायदा
प्रतिस्पर्धी संघाचा होणार फायदा
तीस यार्ड वर्तुळाबाहेरील क्षेत्ररक्षक कमी झाल्यास त्याचा फटका गोलंदाजी करणाऱ्या संघास बसणार आहे. अखेरच्या षटकात सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक कमी झाल्यास त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त धावा घेण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळणार आहे. त्यामुळे चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळू शकेल. यापूर्वी संघ किंवा कर्णधाराला आर्थिक दंड होत होता. आता दंड होईलच, शिवाय प्रतिस्पर्धी संघाचा फायदाही होईल.
डकवर्थ-लुईस नियम चुकीचा आहे की योग्य?
Follow on Facebook page kheliyad
Follow on Twitter @kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”65″]