शीतली प्राणायाम कसा करावा?
उन्हाळा व योगाभ्यास
उन्हाळा ऋतू म्हंटला, की खरं तर मुलांची खूप मज्जा असते. शाळेला सुटी… नुसती धम्माल. मात्र हेही लक्षात घ्यावे, की रखरखीत ऊन, तप्त हवा, यामुळे शरीरावर परिणाम होतोच, शिवाय मनावरही परिणाम होतो. बाहेर पडता येत नाही. दिवसभर पंखा किंवा एसी सुरू. त्यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. म्हणूनच तर म्हणतात, आला उन्हाळा तब्येत सांभाळा.
उन्हाळ्यात खूप व्यायाम करवत नाही. जर आपण योग्य योगाभ्यास व हलका व्यायाम प्रकाराचा दररोज सराव केला तर उन्हाळ्यात खूपच प्रसन्न वाटेल. खाण्यापिण्याच्या सवयींवरही उन्हाळ्यात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. भरपूर पाणी किंवा सरबत, पाण्याचा अंश जास्त असणारी फळे, शरीराला पचण्यास हलका असा आहार घेणे खूप आवश्यक आहे.
उन्हाळ्यात योग्याभ्यासाने मिळतात हे फायदे
दररोज सकाळी लवकर उठून योगाभ्यास केल्यास शरीर व मनाला भरपूर फायदे मिळतात. जसे, की दिवसभर प्रसन्न वाटते, हलके वाटते. मरगळ, आळस दूर होतो. अन्नपचन नीट झाल्याने आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, करपट ढेकर येणे हे प्रकार कमी होतात. अंगदुखी कमी होते. शरीराची लवचिकता टिकून राहते. मानसिक शांतता मिळते. उष्णतेचे त्रास कमी होतात. सध्या प्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) वाढविण्यासाठी दररोज थोडा वॉर्मअप, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम यांचा योग्य सराव करणे खूप आवश्यक आहे.
या श्वसन प्रकारांचा करा सराव
आज आपण बघणार आहोत, उन्हाळ्याच्या दिवसांत कोणत्या श्वसन प्रकाराचा सराव करणे आवश्यक आहे. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी ज्या श्वसन प्रकाराचा खूप उपयोग होईल, ते म्हणजे शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा प्राणायामचा सराव. शीतली प्राणायाम, सीत्कारी प्राणायाम आणि चंद्रभेदन प्राणायाम यापैकी कोणत्याही एका प्राणायामचा सराव व नंतर अनलोम विलोम प्राणायाम दररोज सकाळी करणे आवश्यक आहे. अगदीच जर पहाटे-सकाळी वेळ नसेल तर सायंकाळी प्राणायाम करावा. प्राणायामच्या सरावाने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मरगळ, आळस, थकवा कमी होतो. मानसिक शांतताही मिळते. ते कसे करतात हे आपण थोडक्यात बघूया…
असा करावा शीतली प्राणायाम
कोणत्याही श्वसनाच्या प्रकाराचा सराव करताना नेहमी ताठच बसावे. पद्मासन, स्वस्तिकासन, सुखासन, वज्रासनात बसणे उत्तम आहे. जर कोणाला खाली बसणे शक्य नसेल तर खुर्चीवर बसून प्राणायाम करावा. या प्राणायामच्या प्रकारात तोंडाने श्वास घेऊन नाकाने सोडतात. त्यामुळे जिथे आपण प्राणायाम करणार आहोत, अतिशय स्वच्छ, धूळ नसलेली असावी. शक्यतो घरातच सराव करावा. यामध्ये प्रथम तोंड उघडून तोंडाचा ओ प्रमाणे करावा. आता जीभ पूर्ण बाहेर काढावी. जीभ बाहेर काढल्यावर जिभेचा आकार हा नळीप्रमाणे दिसतो. आता तोंडाने पूर्ण श्वास घ्यावा. त्यानंतर जीभ तोंडात घेऊन ओठ बंद करावे व नाकाने सावकाश श्वास सोडावा. या पद्धतीने दहा ते पंधरा आवर्तने करता येतील.
असा करावा शीतली प्राणायाम video
फायदे
- शीतली प्राणायामचा सराव केल्याने ताण कमी होतो. शरीर व मनाला थंडावा, शांतता निर्माण होते.
- ॲसिडिटीच्या त्रासावर उपयुक्त.
- तोंड येणे किंवा तोंडाच्या काही त्रासांवर उपयुक्त आहे.
- गालाचे स्नायू ताणले गेल्याने तेथील रक्तप्रवाह सुधारतो.
-
पिंपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.
ज्यांना कफ, सर्दी, सायनस, कमी रक्तदाब, अस्थमा, संधिवाताचा त्रास आहे, ताप आहे, त्यांनी हा प्राणायाम करू नये. डॉक्टर किंवा योगतज्ज्ञांचा सल्ला घेणे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे खूप आवश्यक आहे. पुढच्या भागात आपण पुढच्या दोन प्राणायामचे प्रकार बघूया, तोपर्यंत या प्राणायामचा मस्त सराव करा.
Follow us :
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]