इतिहासात डोकावताना… पाकिस्तान महिला क्रिकेट
जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे, सीमा नियंत्रण चुकवणे, जागतिक विक्रम मोडणे आणि विचार बदलणे – गेल्या दोन दशकांत पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने मोठा पल्ला गाठला आहे. कर्मठ विचारसरणीच्या पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटची बीजे रोवली कोणी? काय आहे पाकिस्तान महिला क्रिकेटचा इतिहास? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा छोटासा प्रयत्न…
उन्हाची तिरीप, वाऱ्याची हलकीशी झुळूक आणि कधी कधी मागे सरकणारे ढग… 9 फेब्रुवारी 2019 रोजी दुबईमध्ये क्रिकेट पाहण्याचा हा हंगाम उत्तम होता. ब्रिटिश- पाकिस्तानी लेखिका कामिला शम्सी आणि त्यांचा मित्र फरीद त्या वेळी पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज हा महिलांचा सामना पाहण्यासाठी आले होते. तसं पाहिलं तर कामिला शम्सी एक दिवस आधीच लंडनहून दुबईला आल्या होत्या. या सामन्याची ना तिकिटे, ना ऑनलाइन माहिती. एकाही प्रेक्षकाला सामना पाहण्याची परवानगीही नव्हती.
मात्र, तरी तिथं सामना सुरू होता. कामिला शम्सी आयसीसीच्या कार्यालयात गेल्या. तिथे रिसेप्शन काउंटरवर एक माणूस होता. त्याने कामिला शम्सी यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला, ”आईवडील इथं पोरांना सरावासाठी पाठवतात. आम्ही कोणालाही आत जाऊ देत नाही.” कामिला शम्सी यांनी “पत्रकार” एवढाच शब्द उच्चारला आणि पीसीबीच्या कोणाला तरी फोन करण्यासाठी पर्समधून मोबाइल काढला. तेवढ्यात तो माणूस नरमला.
फरीद आणि कामिला शम्सी मैदानाकडे निघाले. समालोचकांचा तंबू आणि ए/व्ही (ऑडियो-व्हिज्युअल) उपकरणे ठेवलेला टेबल यांच्या मध्ये आणि सीमारेषेच्या मागे प्लास्टिकच्या दोन खुर्च्या कोणी तरी आणून ठेवल्या. फरीदने सभोवार नजर टाकली. पाहिलं तर शेजारच्या मैदानावर आठ वर्षांखालील फुटबॉल सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्यापेक्षा जास्त गर्दी होती. इथं तर आंतरराष्ट्रीय महिलांच्या वन-डेच्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल असलेली सना मीर खेळत होती. त्याचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं.
कामिला शम्सी चकित झाल्या. त्या फरीदला म्हणाल्या, “तुम्ही आणि मी एकमात्र प्रेक्षक आहोत.” इतरत्र जे लोक दिसत होते, ते एक तर संघाशी संबंधित होते किंवा माध्यमांच्या सेटअपशी संबंधित तरी होते. फरीद उत्तरला, “नाही, तुम्ही तर स्पर्धेचे वृत्तांकन करण्यासाठी आला आहात. मीच एकमेव प्रेक्षक आहे.”
कामिला शम्सी यांनी पाकिस्तानी महिला क्रिकेटसंबंधित 2019 मध्ये नोंदवलेला हा किस्सा.
गंमत पाहा,
तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा सुरुवातीचा सामनाही यापेक्षा वेगळा नव्हता. त्या वेळी तब्बल 8,000 लोकांनी हा सामना पाहिला होता. मात्र, तो सर्व पोलिसांचा फौजफाटा होता. त्या वेळी कर्मठ विचारसरणीच्या लोकांनी पाकिस्तानी महिला संघाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच खेळाडूंच्या संरक्षणासाठी हा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तेव्हाही कोणत्याही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली नव्हती.
इथं तर ना कोणाची जिवे मारण्याची धमकी होती, ना पोलिस होते. होता एकमेव प्रेक्षक.
म्हणूनच पाकिस्तान महिला क्रिकेटचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कर्मठ विचारसरणीच्या पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटची बीजे रोवली कोणी? त्यासाठी ऐंशीच्या दशकात जावं लागेल.
1988 मध्ये हुकूमशहा झिया-उल-हक यांचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानातील 11 वर्षांचं दडपशाहीचं लष्करी शासन संपुष्टात आलं. पाकिस्तानात निवडणुका झाल्या. ही निवडणूक जिंकली एका 35 वर्षीय महिलेने. तिचं नाव बेनझीर भुट्टो, ज्यांना बराचसा काळ एक तर तुरुंगात, नजरकैदेत किंवा वनवासात घालवावा लागला होता.
दिलां तीर बिजा
अरबी समुद्रातील शीतलहरींसोबत थंडीने अंगात शिरशिरी भरत असली तरी कराची ऊर्जेने भरलेली होती. कारण लोकशाही मार्गाने दशकभराच्या संघर्षाला बेनझीर भुट्टोंच्या रूपाने यश आलं होतं. कराची हे पाकिस्तानचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले कॉस्मोपॉलिटन आणि दोलायमान शहर. त्या वेळी साउंडट्रॅकवर एकच गाणं धडाक्यात वाजत होतं…दिलां तीर बिजा (तुझ्या हृदयाला बाण).. .बेनझीर भुट्टोंचे हे प्रचारगीत. (प्रचारगीत ऐकतानाही भारी वाटतं. सोबतचा व्हिडीओ पाहा.)
[jnews_element_embedplaylist scheme=”dark” playlist=”https://www.youtube.com/watch?v=hVIfPT0RWlo” column_width=”4″]या गीताचा उगम कराचीतल्याच लियारी (Lyari) भागातून झाला. लियारी ही कराचीतील सर्वांत गरीब वस्ती. पाकिस्तान पीपल्स पार्टीची (पीपीपी) ही मोठी वोट बँक मानली जाते. याच भागात पीपीचं गीत आकारास आलं आणि लियारी डिस्को काय चीज आहे हे जगाला कळलं. पारंपरिक डिस्को बीट्सचं फ्युजन, आफ्रो-बलूच आवाजातला शबाना नोशी यांचा मधुर गळा… त्या वेळी शबाना नोशी अवघ्या 13-14 वर्षांच्या होत्या. हे गीत ठेका धरायला लावणारं होतं. या ल्यारी डिस्को बीटच्या तालावर पीपीपीचे हे गीत बदल आणि आशेची किरणे होती, जी हृदयाची स्पंदनं वाढवत होती.
पाकिस्तान महिला क्रिकेट- संघर्षाचा प्रवास
बदल आणि आशेची अशीच नवी किरणे घेऊन आल्या होत्या दोन टिनेज मुली. 16 वर्षांची शर्मीन आणि 19 वर्षांची शाईजा या खान भगिनी. या खान भगिनींनी किशोरवयीन मुलींना क्रिकेटची स्वप्ने दाखवलीच नाही, तर ती सत्यात उतरवली. शर्मीन आणि शाईजा कराचीतल्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुली. त्या सामान्य मुलींसारख्या नव्हत्या. रुंद खांद्याच्या आणि अंगापिंडाने मजबूत अशा या खान भगिनींनी पाकिस्तानात नवी क्रांती आणली. शाईजाकडे कमालीचे नेतृत्वगुण होते. मुरब्बी नेत्यालाही लाजवेल असे तिचे भाषणकौशल्य. बोलताना श्वास कधीच सोडत नव्हती. जणू काही तिला खूप काही करायचं आहे. कदाचित त्यामुळेच ती पॉझ घेत नसावी. असो. तिचं स्वप्न होतं, की पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेट संघ सुरू करणं.
पाकिस्तान आधीच क्रिकेटवेडा होता आणि पाकिस्तान म्हणजे पुरुष आणि स्त्रियांनी मिळून बनलेला देश. जनरल झिया-उल-हक याची दडपशाही, यातनामय शासनकाळात इम्रान खानने देशाला विजय आणि आशेची ज्योत जागवली. त्याची लोकप्रियता प्रचंड होती. पुरुष आणि महिलांच्या गळ्यातला ताईत बनला होता. महिला क्रिकेट पाहत होत्या आणि पुरुषप्रधान क्रीडा पानांवर क्रिकेटबद्दल भरभरून लिहीतही होत्या. मात्र, तरीही त्यांच्याकडून क्रिकेट खेळण्याची अपेक्षा कधीच करण्यात आली नव्हती. याचे कारण म्हणजे क्रिकेट रस्त्यावर खेळले जात होते आणि रस्ते ही सार्वजनिक जागा होती. सार्वजनिक ठिकाणी महिलांवर बंधने होती.
मात्र, खान भगिनींवर ही बंधने नव्हती. अर्थात, त्यांचं घरच इतकं मोठं होतं, की एक स्विमिंग पूल आणि एक टेनिस कोर्ट त्यात होतं. मात्र, त्या भाऊ झियासोबत रस्त्यावर खेळतच लहानाच्या मोठ्या झाल्या. अर्थात, झिया बोर्डिंग स्कूलमध्ये असताना बहुतांश वर्षे इंग्लंमध्येच क्रिकेट खेळला. झियाचा मृत्यू झाला आणि खान भगिनींचं विश्वच बदललं. खान भगिनी मायदेशी पाकिस्तानात परतल्या. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शाईज़ाला पाकिस्तानमध्ये महिलांच्या क्रिकेट संघाची बांधणी करायची होती.
कराचीतल्या थंडीत खान भगिनींना इतर महिलांची साथ मिळाली, ज्या क्रिकेट खेळण्यास तयार होत्या. कसाबसा महिला संघ आकारास आला. या महिला संघाने झहीर अब्बास यांच्यासह माजी आंतरराष्ट्रीय पुरुष खेळाडूंच्या संघाविरुद्ध सामना खेळण्याचे थेट आव्हान दिले. या आव्हानाने पाकिस्तानात खळबळ माजली. कर्मठ विचारसरणीच्या मौलानांनी तर या सामन्याला विरोध दर्शवत फतवेच काढले. महिला खेळाडूंना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या.
बेनझीर भुट्टोंच्या विजयामुळे धर्ममार्तंडांना धक्का बसला होता. मात्र, महिला खेळाडूंच्या आव्हानानंतर हे धर्मनिष्ठ समूह पुन्हा एकवटले. अजूनही रस्त्यावरील सत्ता आमच्याच ताब्यात आहे, हे दाखविण्याची संधी कडव्या धर्मनिष्ठांना या निमित्ताने मिळाली. प्रकरण चिघळत चालले होते. महिला संघ मागे हटायला तयार नव्हता. अखेर कराचीच्या पोलिस आयुक्तांनी शाईजाला बोलावून घेतले. खेळ थांबवा अन्यथा दंगली भडकतील, अशी सूचना केली. शाईझाने नकार दिला. ती म्हणाली, जर बेनझीर देश चालवू शकतात आणि टेबलाभोवती बसून पुरुषांशी मीटिंग करू शकतात, तर महिला संघ पुरुषांविरुद्ध का खेळू शकत नाही? मात्र, हा युक्तिवाद धर्मनिष्ठ समूहांच्या थोडाच पचनी पडणार होता.
वृत्तपत्रांत बातम्या येऊ लागल्या, की धार्मिक समूह शाईजा आणि शर्मीनच्या घरावर हल्ला करणार होते. तेव्हा खान भगिनीच्या वडिलांनी पुरुष संघाला सांगितलं, की विरोध करण्यापेक्षा त्यांनी महिला संघाविरुद्ध खेळावं. पुरुष संघ तयार झाला. मात्र, विरोधाची धार इतकी तीव्र होती, की पोलिसांना सामन्याच्या एक दिवस आधीच रात्री त्यांच्या घरावर बंदोबस्त तैनात करावा लागला. बंदोबस्तातच त्यांना स्टेडियमवर आणण्यात आलं. शाईजाच्या मते, आठ हजार पोलिस कर्मचारी त्या वेळी तैनात होते. त्यांनी एकाही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये सोडले नाही. सामना संपल्यानंतर तातडीने शाईजा आणि शर्मीन यांना विमानाने लंडनला रवाना केले. त्यांच्या वडिलांनी सांगितले, की तुम्ही आता तिथेच राहा. जेव्हा हा देश तुमच्यासाठी तयार होईल, तेव्हा परत या.
आता अनेक वर्षे उलटली. मात्र, खान भगिनींसाठी या देशाने तयार होण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. बेनझीर भुट्टो यांचे पहिले सरकार 20 महिन्यांनंतर कोसळले आणि त्याच वेळी आमूलाग्र परिवर्तनाचे आश्वासनही धुळीस मिळाले. यानंतरही खान भगिनी इंग्लंडमध्येच क्रिकेट खेळत राहिल्या. शाईजा लीड्स विद्यापीठात महिला संघाची कर्णधार बनली. ती ब्रिटिश नसलेली पहिली कर्णधार ठरली. ती व तिची बहीण शर्मीन मिडलसेक्ससाठी खेळल्या.
1993 साल उजाडलं. याच वर्षी इंग्लंडमध्ये पाचव्या महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या आदल्या वर्षी 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने पुरुषांचा वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र, 1993 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा महिला संघ कुठेही नव्हता. महिलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करीत विजेतेपदाचा करंडक उंचावला. हा सामना पाहण्यासाठी शाईजा आणि शर्मीन लॉर्ड्स मैदानावर होत्या. त्यांनी ठरवले, की पुढचा महिला वर्ल्ड कप येईपर्यंत म्हणजे 1997 मध्ये पाकिस्तानचा महिला संघही खेळेल.
“आम्ही खेळाचा पुरेपूर आनंद घेतला. आम्हाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे आहे.” शाईजाने 2014 मध्ये बीबीसीशी बोलताना निर्धार व्यक्त केला होता. “आम्हाला हरवून जायचं नव्हतं. आम्ही विचार केला होता, की आम्ही कोणत्याही देशासाठी खेळण्यास उत्तम आहोत. म्हणून आम्हाला एका मंचाची गरज आहे.”
जर खान भगिनी इंग्लंडकडून खेळण्यासाठी पात्र ठरल्या असत्या, तर पाकिस्तानात महिला क्रिकेटचा इतिहास खूप वेगळा असता. मात्र, आहे त्या परिस्थितीतून त्या शिकल्या. जर क्रिकेट इतिहासाचा भाग बनायचं असेल तर त्या देशाचं माध्यम व्हायला हवं. ज्या वेळी खान भगिनींनी तेथे खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा असाही देश होता, जो आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला संघाचं प्रतिनिधित्व करू शकला नव्हता.
त्या काळात महिला क्रिकेट केवळ हौशी खेळ होता, जो आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेद्वारे (IWCC) खेळवला जायचा. शाईजाला तीन गोष्टी सुचवण्यात आल्या, की पुढच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करावी लागेल. त्यासाठी तिला एक संघ तयार करावा लागेल, त्याला पीसीबीद्वारे मान्यता मिळायला हवी आणि तिसरे म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी कमीत कमी तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आवश्यक असेल.
1996 मध्ये शाईजा कराचीत परतली. तेथे तिने पाकिस्तान महिला क्रिकेट कंट्रोल असोसिएशनची (PWCCA) स्थापना करीत रीतसर नोंदणी केली. त्याला पीसीबीने मान्यता दिली होती. मात्र, पुन्हा मुद्दा तोच- संघ शोधण्याचा.
खान भगिनींच्या मार्गातील अडथळ्यांवर संपादक आफिया सलाम म्हणतात- “त्या पाकिस्तानबाहेर आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. मात्र, खरी लढाई तर पाकिस्तानमध्ये सुरू होती. कोणीच त्यांना मैदान देणार नाही. कोणी त्यांना स्टेडियम देणार नाही. त्यांच्या वडिलांशिवाय कोणीही त्यांच्या पाठीशीही राहणार नाही.”
कराचीत कुठे तरी एक क्रिकेटवेडी, 18 वर्षांची किरण बलूच नावाची मुलगी तीन वर्षांपासून महिला क्रिकेट संघात खेळण्यासाठी धडपडत होती. शाईजामुळे तिला आशेची किरणे दिसू लागली. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणीसाठी शाईजाने एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. जाहिरात वाचून किरण निवड चाचणीसाठी आली. तिची निवड झाली आणि संघाच्या उपकर्णधारपदावर लगेच वर्णीही लागली. तीन महिन्यांनंतर खान भगिनी, बलूच आणि घाईघाईने गोळा केलेला उर्वरित खेळाडूंचा तोडकामोडका संघ तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. तत्कालीन क्रीडामंत्री अनिता गुलाम अली महिलाच होत्या. त्यांनी या दौऱ्यासाठी सरकारकडून हिरवा कंदील दाखवला.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाने सपाटून मार खाल्ला. प्रत्येक सामना त्यांनी मोठ्या फरकाने गमावला. अर्थात, त्याचं फार वैषम्य वाटले नाही. कारण बऱ्याच खेळाडू अशा होत्या, ज्यांनी निवड होण्यापूर्वी बॅटही हातात धरलेली नव्हती.
बॅट हाती न धरलेला संघ
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला फक्त खेळाडू हव्या होत्या. संघ निवडीचा एवढाच उद्देश होता. पाकिस्तानात महिलांच्या खेळाकडे फारच कमी लक्ष दिलं गेलं. ज्या मुलींची निवड खान भगिनींनी केली, त्यातील अनेक जणी हॉकी खेळलेल्या होत्या. एक तर भालाफेक खेळाडू होती. त्यांच्यात आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये मोठी दरी होती. ही दरी प्रत्येक पातळीवर- शारीरिक तंदुरुस्ती, साहित्य, प्रशिक्षण. खान भगिनींसमोर जिंकण्याचं लक्ष्य कधीच नव्हतं. फक्त तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणं एवढंच शाईजाचं लक्ष्य होतं. यात तिने काय मिळवलं?
या वेळी धार्मिक पक्षांकडून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. अर्थात, त्यांच्यासाठी एक बरं झालं, ते म्हणजे महिला पुरुषांसोबत खेळणार नव्हत्या. याउलट शाईजा यांना आता नव्या वर्गाचा विरोध सहन करावा लागत होता. तो म्हणजे इतर महिलांकडून.
पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटची सुरुवात खान भगिनींनी केलेली नाही. पाकिस्तान महिला क्रिकेट असोसिएशन (PWCA) 1978 पासून लाहोरबाहेर सुरू होती. मात्र, तिचे कधीच IWCC शी संबंध नव्हते. तसेच पीसीबीची अधिकृत मान्यताही नव्हती. इतर देशांविरुद्धही खेळलेले नव्हते. मात्र, शाइजाने संघटना स्थापन केल्यानंतर, आम्ही दीर्घकाळापासून या संघटनेशी जोडलेलो आहोत आणि आम्हीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करायला हवं, असं असं ही पीडब्लूसीए (PWCA) सांगू लागली.
अर्थात, IWCC द्वारे शाईजाच्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघटनेला सदस्यत्व मिळाले. मात्र, महिलांच्या खेळात पीसीबीची विशेष भूमिका कधीच राहिली नाही. हे खरं आहे, की मैदान, प्रशिक्षक, पंच, माध्यमांशी संपर्क या सुविधा वापरण्यास मिळालं. हीच खूप मोठी गोष्ट होती.
पत्रकार पीटर ओबोर्न यांच्याशी एका मुलाखतीत पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष माजिद खान यांनी दावा केला, की मला महिलांच्या खेळात सहभागी व्हायचं नव्हतं. त्या वेळी पुरुष संघाचेच प्रश्न मोठे होते. विशेषतः मॅच फिक्सिंगचे आरोप वाढले होते.
त्याच काळात पाकिस्तानच्या दोन आघाडीच्या महिला क्रिकेट पत्रकारांपैकी एक फरेश्ते गती (Fareshteh Gati) होती. तिने निर्धार केला, की मॅच फिक्सिंगचं वास्तव आता निर्विवाद आहे. हे प्रकरण लोकांसमोर आणायलाच हवं. गतीने हे प्रकरण सातत्याने लावून धरलं. मात्र, नाही म्हंटलं तरी महिला असल्याने तिच्यावर अपमानास्पद टिप्पणी झाली.
गतीने सांगितले, “ते (ज्या खेळाडूंवर ती आरोप करीत होती) दूषणं द्यायचे, की ‘ओह, मी तिच्यासोबत झोपलो नाही म्हणून ती असे करीत आहे.” तिला क्रिकेटमधून फारच कमी समर्थन मिळालं. अपवाद फक्त माजिदचा होता. त्याने गतीच्या लिखाणाचं कौतुक केलं.
पीडब्लूसीसीएची कोंडी
खान भगिनी आणि किरणसाठी माजिद खान भक्कम तटबंदीसारखा वाटत होता. जो प्रगतीत बाधा आणेल त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माजीद खानचं समर्थन डोंगराएवढं होतं. त्याचा परिणाम असा झाला, की पीडब्लूसीएने त्याला प्रत्युत्तर म्हणून शाईजाच्या पीडब्लूसीसीएला दिल्या जाणाऱ्या पीसीबीच्या सर्व सुविधा मागे घेतल्या. यात देशातील सर्वोत्तम मैदानाचाही समावेश होता.
मात्र, पीडब्लूसीसीएची कितीही कोंडी केली तरी त्याचा महिलांच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही. शाईजा आणि शर्मीनचे वडील मुहम्मद सय्यद खान त्यांच्यामागे खंबीर होते. त्यांनी कोणतीही उणीव भासू दिली नाही.
त्यांनी आपल्या राहत्या घराच्या भिंती तोडून महिला क्रिकेटपटूंच्या झोपण्याची व्यवस्था केली. टेनिस कोर्ट ॲस्ट्रोटर्फमध्ये रूपांतरित केलं. गोलंदाजीच्या प्रशिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेतून खास मशीन आयात केल्या. बलूचने सांगितले, “त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी खर्च केला. तिकीट, निवासव्यवस्था, नेट, क्रिकेटचे साहित्य, भोजन अशा सगळ्या व्यवस्थेवर लक्ष दिलं. त्यांनी आपल्या कारखान्याच्या मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी तयार केली. ही खेळपट्टी खास ग्राऊंड्समनकडून तयार करून घेतली होती. याच ग्राऊंड्समनने कराचीतील नॅशनल स्टेडियमसाठी खेळपट्टी तयार केली होती.
हनीफ मोहम्मदनेच खान भगिनींना ग्राउंड्समनची ओळख करून दिली होती. त्यानंतर हा ग्राउंड्समन शाईजाच्या संघाचा समर्थक बनला. बलूचच्या मते, 1950 च्या दशकातील पिढीचे अनेक दिग्गज खेळाडू आमच्या सरावसत्राला भेट देऊन समर्थन द्यायचे. यात हनीफ, त्यांचे बंधू सादिक आणि फजल मेहमूद यांचाही समावेश होता.
तसं पाहिलं तर खान भगिनी आणि किरण बलूच सुखवस्तू कुटुंबातल्या होत्या. मात्र, बहुतांश खेळाडूंबाबत ही परिस्थिती नव्हती. क्रिकेटपटूंना वेगवेगळी पार्श्वभूमी होती. वेगवेगळ्या पार्श्वभूमींच्या या खेळाडूंना अफिया सलाम हिने अधिक प्रभावित केलं. अफिया सलाम देशातील प्रसिद्ध क्रिकेट मासिक ‘क्रिकेटर’ची संपादक होती. ती आणि गती पाकिस्तानच्या दोन उत्तम क्रिकेट पत्रकार होत्या. त्या वेळी अनेक मुलींना वाटू लागलं, की भलेही खेळता येत नसलं तरी मुलीही क्रिकेटवर उत्तम लिखाण करू शकतात.
कामिला शम्सी कराचीतील ‘टी2एफ’मध्ये सलामला भेटल्या. टी2एफ हा कॅफे होता, तसेच इव्हेंट स्पेसही होता. या कॅफेची स्थापना दिवंगत सबीन मेहमूद हिने केली होती. ही सबीन अशीच एक दुर्मिळ खेळाडू होती, जी मुलांबरोबर रस्त्यावर क्रिकेट खेळतच मोठी झाली होती. शम्सी यांना सलाम म्हणाली, “छोट्या छोट्या खेड्यांतून मुली [क्रिकेट चाचणीसाठी] येत होत्या. त्यांचे आईवडील या मुलींना घेऊन येत होत्या आणि म्हणायचे, की या मुली क्रिकेटवेड्या आहेत.”
हलाखीतही मुलींचा क्रिकेटकडे ओढा
वस्तुस्थिती ही होती, की या खेळाडू खान कुटुंबाच्या घरी राहत होत्या आणि तेथेच सराव करायच्या. त्यामुळे इतर कुटुंबांना आपल्या मुली शर्मीन आणि शाईजाकडे सोपवणे सोपे झाले. जेव्हा कुटुंबांची साथ मिळत नसायची तेव्हा खेळाडू मुलींना प्रोत्साहन द्यायच्या. सज्जिदा शाह (Sajjida Shah) च्या बाबतीतली कहाणीही अशीच होती. तिला पाकिस्तान महिला क्रिकेट संघात निवडलं, तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती.
जेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्जिदाला पाठवणार नाही, तेव्हा सज्जिदाने उपोषणच सुरू केले. इतरही मुलींची आर्थिक स्थिती बेताचीच होती. काही मुलींना संघाच्या बैठकीसाठी जायचे असेल तर घरापासून लाहोरपर्यंतचे बसचे तिकीटही परवडत नव्हते. त्या मुली गुजरनवालापर्यंतचा निम्मा रस्ता पायी कापायच्या. नंतर लाहोर बस पकडायच्या. त्यामुळे तिकिटाची निम्मीच रक्कम मोजायला लागायची. “आमच्याकडे बऱ्याच मुली अशाच होत्या,” असं बलूच सांगते. प्रत्येकीची कहाणी वेगळी होती.
खान भगिनींच्या उल्लेखनीय संघटनात्मक कौशल्याने सलाम प्रभावित झाली. खान भगिनींनी केवळ आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली नाही तर सुविधाही विकसित केल्या. खेळाडूंच्या शोधमोहिमेसाठी देशभर फिरल्या. व्यापक मीडिया कव्हरेज मिळवले, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जोडी डेव्हिस (Jodie Davis) यांना आणले. त्यांना ऑस्ट्रेलियन स्पोर्टस कमिशनने प्रायोजित केले होते. खान भगिनींनी सलामशी संपर्क साधला आणि तिला महिला क्रिकेटसाठी एक मासिक संपादित करण्यास सांगितले. अर्थात, पुढे काही दिवसच ती टिकली. मात्र, ‘क्रिकेटर’च्या या माजी संपादकाने आता महिलांच्या खेळाविषयी मासिकाचे संपादन करीत आहेत. हे महत्त्वाचे पाऊल होते.
मासिकाच्या माध्यमातून काम करताना सलामने पाहिलं, की “महिला क्रिकेटमध्ये काय घडत होतं, त्यांच्यासाठी अधिकृतता, स्वीकारार्हतेच्या स्थानावर नेव्हिगेट करणे किती कठीण होते! खान भगिनी पाकिस्तानबाहेर आपली छाप पाडण्यात सक्षम होत्या. मात्र, ही लढाई तर पाकिस्तानातील होती. कोणीच त्यांना मैदान देणार नाही, कोणी स्टेडियम देणार नाही. कोणीही त्यांना समर्थनही देणार नाही. अपवाद फक्त त्यांच्या वडिलांचा होता.”
राष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करण्याचा खान भगिनींना कोणताही अधिकार नाही, असं जेव्हा म्हंटलं जातं, तेव्हा सलाम खान भगिनींच्या योगदानाबद्दल भरभरून सांगतात. खेळाचे आयोजन, भरती, प्रशिक्षण आणि विकास यासाठी खान भगिनींनी जे योगदान दिलं, तसं कोणीही करीत नव्हतं.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खूप चांगले संबंध असलेल्या PWCA विरुद्धची खान भगिनींची लढाई थांबली नाही. भारतात 1997 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अगदी आधी, PWCA ने शाईजाच्या संघाला एक्झिट कंट्रोल लिस्टशी जोडले. हा सीमा नियंत्रणाचा एक प्रकार आहे, ज्याचा वापर सरकारकडून गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या लोकांना पाकिस्तान सोडून जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी केला जातो.
अर्थात, हे पहिल्यांदाच घडत होतं, असं अजिबातच नव्हतं. जानेवारी 1997 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीही पीडब्लूसीएद्वारे रोखण्याचे प्रयत्न झाल्याने खान भगिनी चिंतीत होत्या. त्यांना माहिती होतं, की ऐन भरारीच्या प्रसंगी संघासमोर अडचणीच येतील. म्हणूनच आपले क्रीडा साहित्य डब्यात लपवून आणि सामान्य नागरिकांसारखे कपडे परिधान करून कराचीतून त्या सर्व जणी एकाच वेळी बाहेर पडत नव्हत्या. त्यापेक्षा त्या छोट्या छोट्या गटाने बाहेर पडायच्या. ख्राइस्टचर्च दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी जेव्हा त्या सर्व मेलबर्न विमानतळावर एकत्र आल्या, तेव्हा त्यांनी संघाचा पोशाख परिधान केला.
मात्र, काही महिन्यांनंतर त्यांची नावे ईसीएल (एक्झिट कंट्रोल लिस्ट)मध्ये आली, तेव्हा त्यांना कळलं, की आता एकट्यादुकट्याने जा किंवा समूहाने जा, आपल्याला विमानतळावर अडवणारच. सुदैवाने त्या वेळी म्हणजे 1997 मध्ये आतासारखं डिजिटायझेशन नव्हतं. लाहोरमध्ये महिलांची नावं ईसीएलशी जोडली होती. मात्र, कराचीमध्ये सीमा नियंत्रणाबद्दल कोणीही इशारा दिला नसल्याच्या संधीवर शाईजा आणि तिच्या सल्लागारांनी एक जुगार खेळण्याचा निर्णय घेतला. भारताकडे रवाना होण्यापूर्वी अनेक चाचण्यांतून जावे लागत असताना त्यांच्या हृदयाची स्पंदने वेगाने वाढली होती. म्हणजे चेक इन डेस्क, इमिग्रेशन नियंत्रण आणि इतर सुरक्षा तपासण्यांतून त्या गेल्या आणि सहिसलामत सुटल्याही.
वर्ल्ड कप स्पर्धेत त्या प्रत्येक सामना हरल्या. मात्र, मुद्दा पराभवाचा नव्हता. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहून पाकिस्तान आधीच जिंकला होता…
पुढची सात वर्षे शाईजाने पीडब्लूसीए आणि पीसीबीविरुद्ध संघर्ष करीत संघटन आणि क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. क्रिकेटपटूंवर खटले, राजकीय लॉबिंग, सार्वजनिक चिखलफेक आणि खासगी आयुष्यावरील अफवा पसरवल्या जात होत्या. या दरम्यान तिच्या संघाने 2001 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध वनडे मालिका 4-3 ने जिंकली. पाकिस्तानच्या महिला क्रिकेट इतिहासातला हा पहिला मालिकाविजय होता.
जर तुम्ही अविवाहित स्त्री असाल आणि काही अपारंपरिक करीत असाल तर तुम्ही योग्य करीत आहात हे तुम्हाला माहीत नाही.
– सना मीर
कहाणी न मोडलेल्या विश्वविक्रमी खेळीची
एक महिला म्हणून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याशी संबंधित समस्या, कायदेशीर समस्या तर होत्याच, शिवाय क्रीडा साहित्याच्या आकाराचाही प्रश्न होताच. उदा. क्रिकेटची उपकरणे पुरुष किंवा मुलांसाठीच बनवली गेली होती, महिलांसाठी नाही. त्यामुळे महिला संघ ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या प्रमाणात उपकरणे खरेदी करीत. कारण तिथे महिलांच्या शरीरयष्टीप्रमाणे ग्लव्हज, बॅट आणि शूज बनवले जातात. 2003 मध्ये बलूच आणि शाईजा या दोघी ऑस्ट्रेलियातील क्रिकेटच्या गोदामात खरेदीसाठी गेल्या होत्या. बलुचला बॅटची एक यादी केल्याचे आठवले. नंतर ती शाईजाला म्हणाली, की माझ्यासाठी तुझ्या पसंतीने एक बॅट निवड. शाईजाने एक बॅट निवडत बलूचला दिली आणि म्हणाली, ‘या बॅटवर तुझा विश्वविक्रम होऊ शकतो.’
बलूच म्हणाली, माझा? विश्वविक्रम? काहीतरीच.
त्याच्या पुढच्याच वर्षी वेस्ट इंडीज सात वनडे मालिका आणि एक चारदिवसीय कसोटी सामना खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला. तत्पूर्वी पाकिस्तानबाहेर शाइजाच्या संघाने दोन कसोटी सामने खेळले होते. आणि दोन्ही सामने मोठ्या फरकाने पराभूतही झाल्या होत्या.
कसोटी सामन्यापूर्वी उपकर्णधार आणि स्टार फलंदाज किरण बलूच हिला शाईजाने थेट सूचना केल्या. “तुला चार दिवस फलंदाजी करायची आहे. तुला फलंदाजी करायला आवडते ना, मग जा आणि खेळ.” तसं पाहिलं तर दोघींच्या शारीरिक क्षमतेवर आणि महिलांच्या चार दिवस खेळण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत होते. या टीकाकारांची तोंडे बंद करण्याची त्यांना ही एक संधी होती.
15 मार्च 2004 रोजी, बलुच मैदानात उतरली. हातात तीच बॅट होती जी शाईजाने तिच्यासाठी निवडली होती. बलूचने सज्जिदा शाहसह फलंदाजीची सुरुवात केली. त्या दोघींनी अशी काही फलंदाजी केली, की ती विश्वविक्रमी खेळी ठरली. दिवसाचं अखेरचं षटक सुरू सज्जिदा बाद झाली. तिचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. मात्र, तिने आणि बलूचने 241 धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली. आता वीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही. बलूच 138 धावांवर नाबाद राहिली.
बलूच म्हणाली, “सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम मिताली राज (214)च्या नावावर आहे. मी त्याविषयी विचार करीत होते आणि नाहीही…” दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या बाजूने धडाधड विकेट पडू लागल्या. पाकिस्तानची धावसंख्या 1 बाद 241 वरून 5 बाद 273 झाली. नंतर शाइजा फलंदाजीस आली. तिने बलूचसोबत 95 धावांची भागीदारी रचली. बलूच गमतीने म्हणाली, “जेव्हा 190 वर होते, तेव्हा शाईजा दुसऱ्या बाजूला होती. जेव्हा 200 धावा झाल्या तेव्हाही ती तेथे होती. आणि जेव्हा मी मितालीचा विक्रम मोडीत काढला तेव्हाही ती तेथे होती. मी 215 धावा केल्या तेव्हा ती तेथे होती. एकूणच ती माझ्यासोबत रेकॉर्डब्रेक धावली.”
बलूच अखेर 242 धावांवर बाद झाली. हा नवा विश्वविक्रम होता. अद्याप या धावसंख्येच्या जवळपासही कोणी पोहोचू शकलेलं नाही. शाईजाने 7 बाद 426 धावांवर डाव घोषित केला.
दुसरा दिवस संपला तेव्हा वेस्ट इंडीज 5 बाद 72 धावांवर खेळत होता. पुढच्या दिवशी सकाळी शाईजाने हॅटट्रिक घेतली. कसोटीमध्ये अशी कामगिरी करणारी जगातली ती दुसरीच महिला ठरली. वेस्ट इंडीजचा डाव 147 धावांत संपुष्टात आला. शाईजाने आपल्या लेगस्पिनवर 59 धावांत सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडीजला फॉलोऑन दिला. मात्र, त्यांनी चौथ्या दिवशी पूर्णपणे फलंदाजी केली. या डावात शाईजाने 55 षटके टाकली. आतापर्यंत एखाद्या संघातील एका गोलंदाजाने जास्तीत जास्त 23 षटके टाकली होती. बीबीसीशी बोलताना शाईजा म्हणाली, “मी पूर्ण दिवस गोलंदाजी केली. माझ्या बोटांतून रक्त येत होते. मात्र, मला असं करावं लागलं. कारण माझ्या इतर सहकारी गोलंदाजी करून थकत होत्या.”
सामन्याच्या अखेरीस तिने सहा विकेट घेतल्या, तर संपूर्ण सामन्यात 226 धावांत 13 विकेट टिपल्या. हाही एक विश्वविक्रम ठरला, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही.
अखेर सामना अनिर्णित राहिला. मात्र, का त्या खेळू शकतात, या प्रश्नाचं उत्तर आपल्या खेळातून पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंनी दिलं. शाईजा आणि बलूच यांच्या यशस्वी खेळीपेक्षाही त्यांनी या खेळासाठी काय दिलं हे जास्त महत्त्वाचं होतं.
वेस्ट इंडीजविरुद्धची ही मालिका शाईजा आणि बलूचसाठी अखेरची होती. 2005 मध्ये IWCC चे ICC मध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे महिलांचे क्रिकेट संपूर्णपणे पुरुषांच्या नियंत्रणाखालील बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आले. पीसीबी आणि शाईजाच्या पीडब्लूसीसीए दरम्यान काही काळ तणाव आणि न्यायालयीन वाद सुरू राहिला. मात्र, हे आधीच स्पष्ट झाले होते, की दोन्ही संघटना एकत्रपणे काम करू शकणार नाहीत. या वादात बलूचलाही कडवा विरोध सहन करावा लागला. ज्या नॅशनल स्टेडियमवर तिने विश्वविक्रमी खेळी साकारली, तेथेही ती जाऊ शकत नव्हती.
वयाच्या अवघ्या ४६ वर्षी डिसेंबर 2018 मध्ये शर्मीनचे न्यूमोनियामुळे निधन झाले.
दंतचिकित्सक उरूजचा क्रिकेटप्रवास
“आज जे काही महिला क्रिकेट आहे त्याचा पाया खान भगिनींनी रचला,” असे उरूज मुमताज हिने लेखिका कामिला शम्सी यांना कराचीतील तिच्या दंत चिकित्सालयात सांगितले. उरूज ही क्रिकेटचा भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील पूल आहे.
वडील, काका आणि शेजारच्या मुलांसोबत खेळतच उरूज मोठी झाली. इतर खेळाडूंपेक्षा उरूजची कहाणीही काही वेगळी नाही. मात्र, इतरांसारखी ती फक्त रस्त्यावर खेळली नाही. तिचे वडील कराची जिमखान्याचे सदस्य होते. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी ती नऊ वर्षांखालील संघात होती. संघात असलेली ती एकमेव मुलगी.
जनरल झियाच्या यातनामयी वर्षांमध्ये क्रिकेटपटू इम्रान खानने देशामध्ये आशेचा किरण दाखवला. त्याची क्रेझ महिला आणि पुरुषांमध्ये समान होती. मात्र, महिला क्रिकेट पाहत असताना, त्यावर लिहीत असताना महिलांनी क्रिकेट खेळावं अशी अपेक्षा मात्र कोणीही करीत नव्हतं.
“त्यांना माझं खेळणं आवडत नव्हतं.” उरूज आपल्या संघ सहकाऱ्यांबाबत सांगत होती. एखाद्या मुलीचं खेळणंच त्यांना मान्य नव्हतं. विशेषतः त्या मुलीसाठी एखाद्या मुलाला बाहेर बसावे लागेल हेच त्यांना पटत नाही. मला वाटले, या मुलांनी संघातील माझे स्थान स्वीकारण्यासाठी किमान मला 50 टक्के तरी चांगले खेळणे आवश्यक आहे.
नऊ वर्षांखालील संघातून तिने 17 वर्षांखालील संघापर्यंत मजल मारली. ती कर्णधारही झाली. तरीही ती संघात एकमेव मुलगी होती. काही लहान मुलं हिणवायची, हिचं काय काम. पण मोठ्या मुलांनी उरूजला स्वीकारलं. कारण त्यांच्यासोबत ती काही वर्षांपासून खेळत होती. जेव्हा उरूजची पाकिस्तानच्या संघात निवड झाली, तेव्हा त्या पुरुष सहकाऱ्यांना तिच्यासोबत खेळल्याचा खूप अभिमान वाटला.
जिमखान्यात खेळत असताना उरूजला आसपास पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आहे याची जाणीवही नव्हती. एके दिवशी शाईजा आणि शर्मीन सामने खेळण्यासाठी जिमखाना मैदान शोधत आल्या. त्यांना क्लबच्या सचिवांशी बोलण्यास सांगितलं. क्लबचे सचिव उरूजचेच वडील होते. ते म्हणाले, क्लबच्या नियमानुसार तुम्हाला मी मैदान तर देऊ शकणार नाही, पण तुमच्या संघासाठी एक खेळाडू सुचवू शकतो. अर्थातच त्यांचा इशारा उरूजकडे होता. कराचीत निवड चाचण्या सुरू होत्या. त्यांनी उरूजला तेथे नेले आणि 2003-04 च्या वेस्ट इंडीज मालिकेसाठी उरूजची निवडही झाली.
शाईजा आणि पीसीबी यांच्यात जेव्हा वाद झाला, तेव्हा उरूजची भूमिका सरळ होती. ती त्या वेळी जेमतेम 19 वर्षांची असेल. तिला फक्त पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळायचं होतं. जेव्हा हे स्पष्ट झालं, की पीसीबी हीच संघाची अधिकृत शिखर संघटना आहे, तेव्हा ती त्यांच्यासोबत गेली.
आधी खेळ, मग परीक्षा
पुढच्याच वर्षी आशिया कप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आलं. ही स्पर्धा कराचीत होती. या स्पर्धेच्या तारखा नेमक्या उरूजच्या परीक्षेच्या दिवशीच होत्या. ज्या दिवशी तिची पाकिस्तान महिला क्रिकेट संघात निवड झाली, त्याच वर्षी तिने डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. एक क्रिकेटपटू म्हणून तिच्या पालकांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला होता. पण त्यासाठी शिक्षण सोडण्यास ते राजी नव्हते. त्या वेळी तिच्या विद्यापीठाचे प्राध्यापक तेथे आले. तो प्राध्यापक भारीच होता. तो म्हणाला, जर तुम्ही तिला क्रिकेट खेळू दिले नाही, तर मी तिला परीक्षेला बसू देणार नाही. परीक्षा काय, त्या पुढच्या वर्षीही देता येतील. पण आशिया कप स्पर्धा खेळण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते.
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान एकही सामना जिंकू शकला नाही. मात्र, 2006 नंतर जेव्हा उरूजकडे कर्णधारपदाची धुरा आली, तेव्हा संघाने विजयाची चव चाखायला सुरुवात केली. वारंवार नाही, पण 2009 ची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही कामगिरी पुरेशी होती. या स्पर्धेत जगातील पहिले आठ संघांचा समावेश होता. त्याच वर्षी 3 मार्च 2009 रोजी आणि संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. ती निघाली तेव्हा सर्वांचे फोन खणखणू लागले. हजारो मैल दूर असताना त्यांना समजलं, की श्रीलंकेच्या संघाला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमकडे घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांना हल्ला केला.
या घटनेनंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट (पुरुष व महिला) बंदच झालं. त्यानंतर पाकिस्तान संघाचं घर संयुक्त अरब अमिरात झालं. स्थानिक प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम खेळण्याचे सर्वच फायदे महिला संघाने कायमचे गमावले. तरीही आयसीसीने महिला क्रिकेटच्या विकासासाठी, त्यांच्या प्रोत्साहनासाठी पीसीबीला बाध्य केले. अर्थात, बोर्डाचे बरेच प्रयत्न दिखावू स्वरूपाचे असतात. मात्र, गेल्या दशकात महिलांच्या खेळात निःसंशय वाढ झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उरूज सांगते त्याप्रमाणे ज्या महिला पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळवतात, त्या क्रिकेटमधून बऱ्यापैकी चांगली कमाई करू शकतात. उरूज म्हणते, आर्थिक बाबीमुळे अनेक कुटुंबांना वाटू लागले, की आपल्या मुलींनाही खेळायला पाठवलं पाहिजे.
लैंगिक शोषणाचा आरोप
मात्र, खान भगिनींच्या घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत क्रिकेटच्या विस्ताराचे काही वाईट परिणामही समोर आले. 2013 मध्ये मुलतान क्रिकेट क्लबच्या पाच महिला क्लबच्या अध्यक्षावर लैंगिक छळाचे आरोप करण्यासाठी थेट टीव्हीवर आल्या. चार दिवसांनंतर पीसीबीने एक चौकशी समिती बसवली आणि सर्व पाच महिलांना बोलावले. त्यापैकी फक्त तिघींनी हजेरी लावली. मात्र, त्यांनी आरोप मागे घेतले. दोन मुली या प्रकरणापासून लांबच राहिल्या. त्यात 17 वर्षीय हलीमा रफिक हिचा समावेश होता. चौकशी समितीने अहवालात नमूद केले, की या मुलींना माध्यमांशी खोटे आरोप केल्याप्रकरणी कडक शब्दांत समज दिली पाहिजे आणि सहा महिन्यांसाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली पाहिजे. समितीने अहवालात क्लब प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांचीही खरडपट्टी काढत जिल्हा क्रिकेट संघटनेला क्लबच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. अहवालात नमूद करण्यात आले, की महिलांनीच सांगितले, की आम्हाला कोणाविषयीही तक्रार नाही. आम्ही काहीही पाहिलं नाही.
महिलांवर कठोर निर्बंध असलेल्या देशात या पाच महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी का जायला हवे? आणि चार दिवसांनी आरोप मागेही घेतले. चौकशीत कोणालाही विशेष स्वारस्य होतं. बोलावल्यानंतर दोन मुली चौकशीला का आल्या नाहीत? हाही चिंताजनक विषय आहे. पुढच्याच वर्षी क्लबच्या अध्यक्षांनी पाचही खेळाडूंविरुद्ध दोन कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. काही दिवसांनंतर रफिकने ड्रेन क्लीनरची एक बाटली पिऊन आयुष्य संपवलं.
पीसीबीने हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळलं, असं उरूजलाच नाही तर इतर लोकांनाही दिसत होतं. उरूज म्हणते, “ज्या पद्धतीने आम्ही ही स्थिती हाताळली, ती अतिशय चुकीची होती. मुलगी हकनाक गेली. आम्ही तिच्या सुरक्षेसाठी काय केलं? आम्ही इतरांच्याही बचावासाठी काय केल? कारण आता काय होईल, की देव न करो असं पुन्हा होवो. पण जर असं झालंच तर कोणीही तुम्हाला काहीही सांगणार नाही. कारण कोणीही तुमच्यामागे उभं राहणार नाही.”
न्यूझीलंड क्रिकेटने अलीकडे आपल्या नियमपुस्तिकेत लैंगिक शोषणाबाबत एक सेक्शन नमूद केले आहे. पीसीबीनेही तसं करण्याची गरज आहे. उरूज 2010 मध्ये सेवानिवृत्त झाली. मात्र, खेळातील तिची सर्वांत महत्त्वाची भूमिका कदाचित नुकतीच सुरू झाली असेल. 2018 च्या अखेरीस पीसीबीने क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी चार जणांची क्रिकेट समिती नियक्त करण्याची घोषणा केली. समितीमध्ये तीन हाय प्रोफाइल माजी क्रिकेटपटू, तर चौथी उरूज होती. काही महिन्यांनंतर तिला पीसीबी महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं. पाकिस्तान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच महिला निवड समितीत महिलेची नियुक्ती झाली होती.
“तुला चार दिवस फलंदाजी करायची आहे.तुला फलंदाजी करायला आवडतं. पुढे जा आणि सिद्ध कर.”
– शाईजा खान किरण बलूचला तिच्या विश्वविक्रमी खेळीपूर्वी
क्रिकेट प्रशासनात उरूजचा समावेश होणं ही स्वागतार्ह बाब आहे. अखेर पीसीबी महिला क्रिकेटकडे गांभीर्याने पाहतंय असं म्हणायला हरकत नाही. उरूजला तिची स्वतःची मते आहेत. ती प्रत्येकाला आवडतीलच असे नाही. जेव्हा तिला विचारलण्यात आलं, की महिलांनी पुरुषांची बरोबरी करण्यासाठी काय करायला हवं? त्यावर तिचं सरळ उत्तर असतं- “काही तरी मोठं जिंका.”
पहिली सुपरस्टार- सना मीर
पाकिस्तानमध्ये क्रिकेटमध्ये बदल होत असताना, देशही बदलत होता. विशेषत: लैंगिक राजकारणाच्या बाबतीत. गेल्या दशकात महिलांसाठी, विशेषत: कायदे आणि शिक्षणाच्या बाबतीत खूप फायदा झाला आहे. मात्र, त्यासोबत तीव्र प्रतिक्रियांनाही सामोरं जावं लागलं, कधी कधी हिंसा, धक्केही बसले आहेत.
पाकिस्तानात सार्वजनिक ठिकाणी महिलांनी क्रिकेट खेळणे आजही संघर्षाचा मुद्दा बनतो. अशा प्रसंगी एका महिला क्रिकेटपटूसाठी केवळ खेळाडू म्हणून नाही, तर चर्चेत भाग घेण्यासाठी एक व्यक्ती म्हणूनही संधी आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सना मीर. पाकिस्तानची पहिली सुपरस्टार महिला क्रिकेटपटू.
2004 मध्ये 17 वर्षीय सना मीर रसायनशास्त्राची परीक्षेच्या अभ्यासापेक्षा डुडलिंग फिल्ड सेटिंग (स्केचिंग, पेंटिंग, ड्रॉइंग) करण्यात अधिक रमायची. एके दिवशी तिच्या आईने तिला पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आणि किरण बलूच नावाच्या खेळाडूबाबत एक लेख दाखवला. या लेखात तिने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केल्याबद्दल लिहिलेलं होतं. लेखाच्या शेवटी, इच्छुक महिला क्रिकेटपटूंना संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं होतं.
दोन महिन्यांनंतर मीर शाईजाच्या घरी 70 ते 80 मुलींमध्ये बाजूला उभी होती. जेव्हा मीरने गोलंदाजी सुरू केली, तेव्हा तिला पाहण्यासाठी शाईजा जवळ आली. तिने पाहिले, की किरण बलूचला मीर गोलंदाजी करीत होती. सना मीर हिची संघात निवड झाली आणि काही दिवसांतच तिला IWCC ची ICC मध्ये विलीनकरणामुळे सुरू असलेल्या अडचणींचा साक्षात्कार झाला. उरूजसारखंच 19 वर्षीय मीर हिलादेखील फक्त क्रिकेट खेळायचं होतं. कोणत्याही 19 वर्षीय मुलींप्रमाणेच तिलाही वाटलं, की आपण देशाच्या पंतप्रधानाला (जे पीसीबीचे पालकही होते) पत्र लिहून या गोंधळातून मार्ग काढण्याचे सुचवावे. तिच्या पत्राला पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी कधीच उत्तर दिलं नाही. मात्र, दोन महिन्यांनी तिला पीसीबीने निवड चाचणीसाठी बोलावलं आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघात तिची निवडही झाली.
गंभीर दुखापतीने बदलली गोलंदाजीची शैली
सना संघातील वेगवान गोलंदाज होती. तिचा आदर्श होता वेगवान गोलंदाज वकार युनूस. तिच्या गोलंदाजीची अॅक्शनही वकारसारखीच होती. जाणीवपूर्वक तिने तशी शैली ठेवली होती. कराची येथे 2005 मध्ये झालेली आशिया कप ही तिची कारकिर्दीतली पहिलीच स्पर्धा. तिचं स्वप्न होतं, की भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिची विकेट घ्यायचीच. आपल्या वेगवान गोलंदाजीवर एका इनस्विंग यॉर्करवर तिने मितालीच्या यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. काही महिन्यांनंतर तिला स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करावा लागला. तिची कारकीर्द संपुष्टात आणणारीच ही दुखापत होती. डॉक्टरांनी तिला सांगितलं, की तुला गोलंदाजीची अॅक्शन पूर्णतः बदलावी लागेल. सना मीर हिने तसंही करून पाहिलं. मात्र, पदरी निराशाच पडली.
तिच्याकडे शिकण्यासाठी कौशल्याचा एक मंत्र होता. त्याचं श्रेय बालपणी तक्षशिला शहरातल्या गल्लीत खेळण्याला जातं. तक्षशिला हे जगातील प्राचीन शिक्षण केंद्रांपैकी एक आहे. यात ग्रीक, फारशी आणि बौद्ध इतिहासाची मुळे दडलेली आहेत.
सना मीर म्हणते, “जेव्हा मी तक्षशिलेच्या रस्त्यांवर खेळत होते, तेव्हा सकाळपासून मगरिबपर्यंत (सूर्यास्ताची प्रार्थनावेळ) वेगवान गोलंदाजी करायचे. पुन्हा आम्ही सर्व जाणार, प्रार्थना करणार आणि परत येणार. तिथे एक पथदीप होता. प्रकाश फारच कमी होता. त्यामुळे आम्ही वेगवान गोलंदाजी करीत नव्हतो. ते एक मोठा प्लास्टिक चेंडूने खेळत होते. त्यामुळे फलंदाजाला कमी प्रकाशातही चेंडू दिसायचा आणि वेगापेक्षा आम्ही फिरकी गोलंदाजी करीत होतो. तो मोठा प्लास्टिकचा चेंडू पकडण्यासाठी मी दोनऐवजी तीन बोटांचा उपयोग करायचे.”
जेव्हा स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे वेगवान गोलंदाजी करण अशक्य झालं, तेव्हा पीसीबीने तिला फलंदाज निवडलं. मात्र, महत्त्वाचं म्हणजे सना मीर मूळची गोलंदाज आहे. तिने फिरकी गोलंदाजी सुरू केली आणि विकेटही घेऊ लागली. “जेव्हा मी रन-अप घेणे सोडले, तेव्हा मी खूप रडले. वकार युनूससारखा रन-अप घेताना मला अभिमान वाटायचा. माझे केस उडायचे. मी रडले आणि थोड्या तक्रारी केल्या. मात्र, मी स्वतःला समजावलं, ठीक आहे. यातही यश मिळतंय. म्हणून मी फिरकी गोलंदाजी सुरू ठेवली.”
2009 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी सना मीर पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार झाली. त्या वर्षी मीर पहिल्या 20 वनडे गोलंदाजांमध्ये सातत्याने राहिली. अर्थात, तिने सातत्याने चांगली कामगिरी केली. मात्र, जेव्हा संघ जिंकण्यात अपयशी ठरला, तेव्हा ती टीकेची धनीही ठरली. तिला जाणवलं, की टीकाकारांची तोंडे बंद करणे नेहमीच सोपे नसते. जो फक्त एक खेळाडू कसा खेळतो यावर नाही, तर एक महिला आपलं आयुष्य कसं जगते यावर सगळं अवलंबून असतं.
“जेव्हा तुम्ही एकट्या महिला असता आणि वेगळं काही करीत असता, तेव्हा तुम्ही तुम्हाला समजत नाही की तुम्ही योग्य काम करीत आहात.” सनाने अनेकदा कर्णधारपद सोडण्याचा गांभीर्याने विचार केला आणि 2017 मध्ये जेव्हा तिने बिस्माह मारूफ हिच्याकडे कर्णधारपद सोपवलं. तेव्हाच तिने निर्णय घेतला, की काही महिन्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची. अर्थातच 2018 च्या विश्वकरंडक टी 20 स्पर्धेनंतर.
मात्र,निवृत्ती घेण्याऐवजी तिने उत्तम गोलंदाजी करताना पहिल्यापेक्षा जास्त विकेट घेणे सुरू केले. सना म्हणते, हा बदल मानसिक होता. 2018 च्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर सना मीर मलेशियात खरेदी करीत होती, तेवढ्यात फोन वाजला. फोनवर तिची संघ सहकारी जावेरिया खान होती. “ती म्हणाली, तू काय केलंस?’ सना म्हणाली, ‘काय झालं?” झालं काय, की आयसीसीने अव्वल वनडे गोलंदाजांची सूची अपडेट केली होती. त्यात 32 वर्षीय सना नंबर 1 होती.
2019 मध्ये तिच्या मार्गदर्शक शाहबानो अलियानी यांचे निधन झाले. त्याच्या काही महिन्यांपूर्वी सनाची एक फेसबुक पोस्टची लिंक वाचायला मिळाली. “त्या सर्व तरुण मुलींसाठी ज्या खेळात सहभागी होण्याची इच्छा ठेवतात. खेळाच्या मैदानावर तुम्हाला मजबूत हातांची गरज आहे, चिकन्याचुपड्या हातांची नाही.” ही हातावरील केस काढणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीविरुद्धची मोहीम होती, जी एका प्रभावशाली फेसबुक पोस्टने सुरू झाली. या जाहिरातीत एका बास्केटबॉल कोर्टवर एक मुलगी कसे खेळते यापेक्षा कशी दिसते याची चिंता करताना दिसत होती. या पोस्टमध्ये सनाने अनेक वर्षांपासून सौंदर्यप्रसाधनांचा प्रचार करण्यास नकार दिल्याचा उल्लेख केला आहे.
इम्रान खानकडून निराशा
आपल्या सार्वजनिक जीवनात मीर स्पष्टवक्ती आणि मुत्सद्देगिरीचं दुर्मिळ मिश्रण आहे . कारण जेव्हा तिला इम्रान खानविषयी विचारलं तेव्हा तिच्यातलं हे दुर्मिळ मिश्रण प्रकर्षाने जाणवलं. पंधरा वर्षांपूर्वी शाईजाने एका मुलाखतीत सांगितलं होतं, की एकदा इम्रान खान याच्याशी महिला क्रिकेट संघ तयार करण्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्याने तो मुद्दाच झिडकारला.”तो टेबलवर दोन पाय ठेवून बसलेला होता आणि मला म्हणाला, की महिला क्रिकेट संघ बनवण्याचा त्रास कशाला घेता? कारण महिलांचा संघ पुरुषांसारखा चांगला खेळूच शकणार नाही. हे ऐकून मी तिथून निघून गेले.” मात्र आता काळ बदलतोय आणि महिला क्रिकेट एक प्रस्थापित खेळ झाला आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे महिलांच्या खेळात एक पाकिस्तानी जगातली सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. कदाचित पंतप्रधानाने आपल्या भूमिकेत बदल केला असेल.
“आम्ही त्यांना कधीही भेटलो नाही.” मीर स्वतःपेक्षा संघाबद्दल बोलते. इम्रानकडून तिला कधीही कौतुकाचा शब्द मिळाला नाही म्हणून ती वैयक्तिकरीत्या निराश असेल, पण चेहऱ्यावर ती निराशा अजिबात दाखवत नाही. याउलट तिच्या शैलीत ती मुद्दा अधिक व्यापक बनवते आणि महिलांच्या आरोग्याबाबत बोलते. तिला वाटतं, की पाकिस्तानमध्ये महिलांच्या आरोग्यावर खूप कमी लक्ष दिलं जातं. खेळाने महिलांचे आरोग्य उत्तम राहते. “इम्रान खान सर्वोच्च पदावर असल्याने मला त्यांच्याकडून खेळात महिलांसाठी अशा प्रकारचं समर्थन पाहायला आवडेल.”
कधी कधी मीर काही गोष्टींबाबत आपला निर्णयही सुनावते.पाकिस्तानातील सार्वजनिक ठिकाणांबाबत ती म्हणते, “देशातील पायाभूत सुविधांकडे पाहिले तर आर्किटेक्ट, डिझायनर किंवा धोरणकर्त्यांना कदाचित माहीत नसावं, की आपल्या लोकसंख्येत 50 टक्के महिलाही आहेत. जिम, उद्याने, शाळेची मैदाने, मशीद, कॉमन रूम पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी नेहमीच लहान असतात.”
जाहिरातीतून मुलींना मोकळेपणे खेळण्याचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणांचा मुद्दा तेव्हा उपस्थित झाला, जेव्हा उबेरद्वारे पाकिस्तानच्या महिला क्रिकेटला समर्थन देणाऱ्या पहिल्या जाहिरातीची ती एक चेहरा बनली. या जाहिरातीत सुरुवातीला एक ओळ आहे, क्रिकेट की कहानी, लडकीयों की जुबानी. यात नऊ महिला क्रिकेटबाबत बोलताना दिसतात. त्यांच्या कानावर एका अनामिक महिलेचा आवाज कानी पडतो.
तो आवाज म्हणतो- तुम्ही क्रिकेट खेळता?
नाही. कारण गल्लीत फक्त मुलं खेळतात आणि मैदाने घरापासून लांब आहेत. – मुली
“आणि जर तुम्ही कोणत्याही मैदानावर क्रिकेट खेळू शकला तर?” – अनामिक आवाज.
तेवढ्यात एक महिला त्यांच्यासमोर येते आणि सगळ्या मुली चकित होत उभ्या राहतात.
त्या समोर आलेल्या महिलेची ओळख सांगण्याची गरज नाही. तिला प्रत्येक जण ओळखतो. ती सना मीर आहे.
“ही मोकळेपणे खेळण्याची वेळ आहे,” असे म्हणत सन मुलींना उबेर टॅक्सीतून क्रिकेटच्या मैदानावर घेऊन जाते. तिथं मुलींना शिकवण्यासाठी एक पुरुष असतो, जे कोणालाही अप्रासंगिक अजिबात वाटत नाही. परिवर्तन दरवाजावर दस्तक देत आहे आणि हे परिवर्तन स्पष्टवक्ते, प्रभावशाली आहे. आणि ती जगातली सर्वश्रेष्ठ गोलंदाजही आहे.
कुठे आहे प्रेक्षक?
आता दुबईतल्या त्या सामन्याकडे परत येऊया, जिथे कामिला शम्सी यांचा फरीद नावाचा मित्र एकमेव प्रेक्षक होता. संघाला रिकाम्या मैदानावर खेळताना निराशाजनक वाटलं. कामिला शम्सी यांच्या मागे दोन पुरुष आणि एक महिला होती, जे सामन्याच्या लाइव्ह चित्रणासाठी एका जबाबदार माध्यमाचे भाग होते. ते पुरुषांच्या क्रिकेट संघाविषयी बोलत होते. मैदानावर सिद्रा अमीन हिने अर्धशतक झळकावले. कोणीही लक्ष दिलं नाही. कामिला शम्सी यांना सना मीरचे वाक्य आठवले. सना म्हणायची, महिला क्रिकेटप्रती दृष्टिकोनाची समस्या ही आहे, की जी संघटना प्रोत्साहन देण्याची गप्पा झोडते, तेसुद्धा व्यावसायिक क्षमतेपेक्षा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग मानतात. दुबईत प्रेक्षक नसलेला सामना पाहून कामिला शम्सी निराश झाल्या. त्यांना लॉर्डसवर 2017 मध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आठवली. भारत- इंग्लंडमध्ये झालेल्या या सामन्यात तब्बल 24 हजार तिकिटं विकली गेली होती. सामना पाहण्यासाठी मुली, महिलांबरोबरच पुरुषांनीही गर्दी केली होती.
काही वेळाने दुबईतल्या सामन्याचं चित्र बदललं. अमीन आत्मविश्वासाने खेळत होती. ती 90 पर्यंत पोहोचली. आता पुरुषांच्या क्रिकेटविषयी कोणीही बोलत नव्हतं. प्रत्येक कॅमेरामन आणि टेक्निशियन लक्षपूर्वक सामना पाहत होते. जेव्हा ती 96 वर बाद झाली, तेव्हा मागे कोणीतरी सिद्रा… असा वेदनादायी आवाज दिला. शतक हुकल्याने अनेक हळहळले. आता आम्ही सर्व सामना पाहत होतो. खरोखर पाहत होतो. प्रत्येक वेळा जेव्हा चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवला जात होता, तेव्हा कोणी ओरडायचं- “शॉट!” जेव्हा निदा दारने अर्धशतक झळकावले तेव्हा सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. कामिला शम्सी यांनी मनात म्हंटलं, बस एवढंच पाहिजे. पाकिस्तानी क्रिकेटवर प्रेम करतात आणि या महिला चांगल्या क्रिकेट खेळतात. त्यांना फक्त सामना पाहायला येणाऱ्या लोकांची गरज आहे. त्यांच्याकडे कोणीच का नाही पाहत?
(The Cricket Monthly मधून साभार)
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=obYeTYV0hK0&t=692s” column_width=”4″]न ऐकलेल्या कॅप्टन कूलची कहाणी…
खूप अभ्यास करून माहितीपूर्ण लेख लिहिलाय महेश…लेखनशैलीची खूप छान..वाचताना मजा येते..भाषाही साधी, सामान्यांना कळेल अशी आहे..तुझ्या पुढील लेखनप्रवासाकरिता अनंत शुभेच्छा…
Very nice khup Sundar lekh lihilay
I love how this article challenges common misconceptions on this topic. ❤️
अभ्यासपूर्ण कसदार लेखन, खूपच छान