All SportsCricketSports Historysports news

ग्रेग चॅपेल विरुद्ध सौरव गांगुली

भारतीय संघाला पहिल्यांदाच सौरव गांगुलीसारखा उत्तम कर्णधार लाभला होता. भारतीय क्रिकेटमध्ये विजिगीषू वृत्ती त्यानेच रुजवली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, 2005 मध्ये सौरव गांगुली विरुद्ध ग्रेग चॅपेल वाद सुरू झाला नि संपूर्ण भारतीय क्रिकेट यात ढवळून निघालं. गांगुलीसाठी भारतीय क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले. अगदी संसदेपर्यंत हे प्रकरण गेले. नेमकी काय आहे हा वाद, त्याविषयी….

भारतीय क्रिकेट निकालनिश्चितीच्या फेऱ्यात अडकलं होतं. त्यातून बाहेर कुणी काढलं असेल तर ते सौरव गांगुलीने. त्याने भारतीय क्रिकेटची सगळी परिमाणंच बदलून टाकली. सौरव गांगुलीपूर्वी भारतीय क्रिकेटची अवस्था फार काही चांगली नव्हती. मात्र, सौरव गांगुलीने जिंकण्याची ऊर्मी जागवली. लॉर्डसवर शर्ट काढून त्याने जो जोश दाखवला, त्यावरून भारतीयांना पहिल्यांदा जाणवलं, की आम्हीही गोऱ्यांविरुद्ध माज दाखवू शकतो. एरवी गोरे स्लेजिंग करायचे तेव्हा आपण आदर्शाचे महामेरू बनायचो. मात्र, गांगुली अशी व्यक्ती होती ज्याने स्लेजिंगलाही जुमानलं नाही. वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, मोहम्मद कैफ, झहीर खान, हरभजनसिंग यांना सौरव गांगुलीनेच पुढे आणलं, असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. इरफान पठाण, महेंद्रसिंह धोनी यांनाही आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी दिली होती. अर्थात, एवढं सगळं केल्यानंतरही एक वेळ अशी आली, की खेळाडू ते कर्णधारपद सगळं त्याच्यापासून हिरावून घेतलं गेलं. त्यानंतर एक वादग्रस्त प्रकरण उभं राहिलं, जे संसदेपर्यंत जाऊन पोहोचलं. हा वाद होता ग्रेग चॅपेल विरुद्ध सौरव गांगुली.

हे प्रकरण होतं 2005 मधलं. त्या वेळी जॉन राइट यांचा प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात आला होता. त्यांच्या जागी ग्रेग चॅपेल यांची नियुक्ती झाली. चॅपेल यांनी प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली आणि भारतीय संघात धडाधड बदल सुरू केले. हे बदल इतके धाडसी होते, की त्याची कोणीही कल्पना केली नव्हती. त्यांनी संघातील सर्वांत अनुभवी सौरव गांगुली यालाच संघाबाहेर बसवलं. त्याचं कर्णधारपद राहुल द्रविडकडे सोपवलं. एव्हाना सौरव गांगुलीचं गारूड भारतीयांवर असं काही होतं, की त्याच्याविरुद्धचे कोणतेही पाऊल त्याचे समर्थक सहन करू शकत नव्हते. ग्रेग चॅपेल यांना भयंकर विरोधाला सामोरं जावं लागलं. विशेषतः पश्चिम बंगालचे नागरिक रस्त्यावर उतरले आणि ग्रेग चॅपेलचा प्रचंड विरोध सुरू केला. ठीकठिकाणी त्यांचे पोस्टर्स जाळण्यात आले.

एकूणच या विरोधाची सुरुवात झाली जॉन राइट यांच्या राजीनाम्यानंतर. प्रशिक्षकाविरुद्ध क्रिकेटप्रेमी जनता रस्त्यावर येण्याचा भारताच्या क्रिकेट इतिहासातील हा पहिलाच प्रकार. झालं काय, की राइट यांच्यानंतर भारताचा प्रशिक्षक कोण, यावर बराच खल सुरू होता. मुळात भारतीय प्रशिक्षकाचा विचारही नव्हता. अपवाद फक्त मोहिंदर अमरनाथ यांचा होता. बाकी सर्व विदेशीच होते- डेव्ह व्हाटमोअर, टॉम मूडी, ग्रॅहम फोर्ड, डेस्मंड हेन्स, ग्रेग चॅपेल अशी नावांची यादी चर्चेत आली. या सहा नावांपैकी तुलनेने ग्रेग चॅपेल यांना प्रशिक्षकपदाचा अनुभव कमी होता. तरीही त्यांची प्रशिक्षकपदी निवड झाली. चॅपेलच का, याचं उत्तर कुणालाही कळलं नाही. त्या तुलनेने इतर त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होते. मात्र, त्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण होतं, सौरव गांगुली याची शिफारस. सौरव गांगुली सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी कर्णधार होता. त्याची शिफारस डावलून चालणार नव्हती.

सौरव गांगुली याने ग्रेग चॅपेल यांची शिफारस का केली?

सौरव गांगुली याने ग्रेग चॅपेल यांची शिफारस का केली, हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामागचे कारण 2003-04 चा ऑस्ट्रेलिया दौरा होता. 2003-04 मध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी ग्रेग चॅपेल यांनी सौरव गांगुलीला फलंदाजीशी संबंधित अनेक टिप्स दिल्या होत्या. त्यामुळे गांगुली फारच प्रभावित झाला. त्याचा फायदा गांगुलीला झाला. एका सामन्यात गांगुलीने शतकही झळकावलं आणि सामनावीराचा बहुमानही मिळवला होता. ग्रेग चॅपेल यांच्या टिप्सचाच हा महिमा होता. गांगुलीची चॅपेल यांच्यावर श्रद्धाच बसली असंच म्हणावं लागेल. 2005 मध्ये जेव्हा जॉन राइट यांचा करार संपला, तेव्हा गांगुलीसमोर सर्वांत प्रथम ग्रेग चॅपेल यांचंच नाव समोर आलं. गांगुलीने बीसीसीआयला त्यांच्या नावाची दोनदा शिफारस केली. बरं हे करताना किमान वरिष्ठांशी सल्लामसलत तर करायची… पण तसे झाले नाही. हा गांगुलीचा उतावीळपणा म्हणावा लागेल. गांगुलीच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गांगुलीने या निर्णयावर फेरविचार करावा, असं सुनील गावस्करांनी सुचवलंही होतं. दस्तूरखुद्द ग्रेग चॅपेल यांचा भाऊ इयान चॅपेल यांनीही गांगुलीच्या या निर्णयावर प्रतिकूल मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले, की ग्रेग भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी योग्य ठरणार नाही. मात्र, गांगुलीने कुणाचंही मत विचारात घेतलं नाही. त्यांनी ग्रेग चॅपेल यांची पाठराखण केली. अखेर ग्रेग चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले…

वादाची ठिणगी कुठे पडली?

सौरव गांगुली ग्रेग चॅपेल

ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाचा श्रीगणेशा इंडियन ऑइल कप मालिकेने झाली. ही तीन देशांची वन डे मालिका श्रीलंकेत होती. भारतासह यजमान श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांचा या मालिकेत समावेश होता. सौरव गांगुली सुरुवातीच्या काही सामन्यांत संघात खेळू शकला नाही. कारण 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्याने सौंरव गांगुलीला आयसीसीने सहा सामन्यांची बंदी घातली होती. नंतर ही बंदी सहावरून चार सामन्यांपुरती करण्यात आली. गांगुलीच्या गैरहजेरीत ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. बंदी हटवल्यानंतर चौथ्या सामन्यात गांगुलीचे संघात पुनरागमन झाले. मात्र, ग्रेग चॅपेल यांनी कर्णधारपद राहुल द्रविडकडेच कायम ठेवलं. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. तारीख होती 9 ऑगस्ट 2005 ची. मात्र, श्रीलंकेकडून भारताला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 281 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 50 षटकांत 9 बाद 263 धावांतच गडगडला.

अपयशाच्या गर्तेत सौरव गांगुली

ही मालिका संपल्यानंतर भारताला तीन देशांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जावे लागले. या वेळी निवड समितीने सौरव गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. याच मालिकेदरम्यान गांगुली आणि ग्रेग चॅपेल यांच्यात वादाची ठिणगी पडली. या दौऱ्यात गांगुलीची कामगिरी खालावली होती. शिवाय दोन वर्षांपासून एकही शतक करता आलं नव्हतं. त्या वेळी वॉर्मअप सत्रात चॅपेल यांनी गांगुलीला कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. कर्णधारपदाच्या दबावामुळेच गांगुलीची कामगिरी खालावत असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गांगुलीला हा धक्का होता. ज्या माणसासाठी मी आग्रह धरला तोच माणूस माझं कर्णधारपद घालवायला निघाला, यामुळे गांगुली प्रचंड नाराज झाला. गांगुलीने चॅपेल यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कर्णधारपद सोडण्यास नकार दिला. इथंही भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला खरा, पण न्यूझीलंडकडून पराभूत झाला. सौरव गांगुली इथंही अपयशी ठरला आणि पाच सामन्यांत केवळ 77 धावा करू शकला. गांगुलीने कर्णधारपद सोडावं हे ग्रेग चॅपेल यांचं मत बरोबर होतं, याला आता बळ मिळालं.

गांगुलीचा संताप

तीन देशांची मालिका संपल्यानंतर 13 सप्टेंबर 2005 रोजी भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध पहिला कसोटी सामना होणार होता. या वेळी ग्रेग चॅपेल यांनी सांगितलं, की पहिला कसोटी सामना जिंकणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी भारताने सर्वोत्तम 11 जणांचा संघच खेळवायला हवा. त्यासाठी त्यांनी युवराजसिंग आणि मोहम्मद कैफ यांना संघात समाविष्ट केलं. आणि कामगिरी खालावलेल्या गांगुलीला विश्रांती घेण्यास सांगितलं. गांगुलीसाठी हे अपमानास्पद होतं. तो संतापला. त्याने थेट आपली बॅग आवरली आणि दौरा सोडण्याची तयारी सुरू केली. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर ग्रेग चॅपेल, राहुल द्रविड आणि भारतीय संघाचे संचालक अमिताभ चौधरी यांनी गांगुलीला समजावलं. अर्धवट दौरा सोडणं बरं नाही. तू सामना खेळ. पहिल्या कसोटी सामन्यात गांगुली प्रचंड तणावात होता. दोन वर्षांपासून शतकही नाही आणि आठवडाभरापूर्वीच चॅपेल यांचा कर्णधारपद सोडण्याचा तगादा यामुळे तो अस्वस्थ होता. त्यावर एकच उत्तर होतं, ते म्हणजे चांगला स्कोअर करणं. गांगुलीने तेच केलं. त्याने 260 चेंडूंत शतक झळकावलं आणि कसोटी सामना जिंकण्यातही मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्यात एका पत्रकाराने गांगुलीला प्रश्न विचारला, की तुला हा सामना खेळण्यास सांगितलं नव्हतं हे खरं आहे काय?

या प्रश्नावर गांगुलीने बेधडक उत्तर दिलं. तो म्हणाला, हो, मी हा सामना खेळू नये असं सांगण्यात आलं होतं आणि टीम इंडियाचे बडे अधिकारी कर्णधारपद सोडण्यासाठीही दबाव टाकत आहेत. मात्र, हे वक्तव्य करताना त्याने कोणाचंही नाव घेणं टाळलं.

गांगुलीचा इशारा नेमका कुणाकडे आहे, हे नंतर समोर आलंच. ते ग्रेग चॅपेल होते, ज्यांनी गांगुलीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव आणला होता, असा एक अहवाल समोर आला. एवढेच नाही, तर जर त्याला कर्णधारपदावरून हटवलं नाही तर मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देईन, अशी धमकीही अधिकाऱ्यांना दिली होती. यावर चॅपेलने खुलासा केला, की मी ना प्रशिक्षकपद सोडण्याची धमकी दिली, ना कुणाला कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव आणला. आणि राहिला मुद्दा गांगुलीशी झालेल्या खासगी चर्चेचा, तर त्यामागाचा हेतू त्याला प्रोत्साहन देणे हाच होता.

चॅपेल यांच्या ईमेलने जनक्षोभ

सौरव गांगुली ग्रेग चॅपेल

एकूणच या घडामोडींनंतर भारताने दुसरा कसोटी सामनाही आरामात जिंकला. याच दरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली. दौरा सुरू असतानाच ग्रेग चॅपेल यांनी बीसीसीआयला एक ईमेलही पाठवला होता. त्यात त्यांनी म्हंटले, की गांगुली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास सक्षम नाही. त्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे भारत 2007 चा वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही. सौरव गांगुली दुखापतीचे नाटक करतो आणि कर्णधारपद त्याला दुसऱ्याकडे सोपवायचं नाही. त्याने संघ सहकाऱ्यांची प्रतिष्ठा आणि विश्वास दोन्ही गमावले आहे.

चॅपेल यांचा हा खासगी ईमेल होता. मात्र, तो प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाला. यावरून प्रचंड वादळ उठलं. गांगुलीचे समर्थक रस्त्यावर आले. ग्रेग चॅपेलविरुद्ध घाषणा देऊ लागले. किकआउट ग्रेग चॅपेल असे फलक हाती घेत समर्थक रस्त्यावर आल्याने देशभर चॅपेलविरुद्ध क्षोभ वाढत गेला. चॅपेल यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. या वाढत्या तणावामुळे झिम्बाब्वेचा दौरा संपताच गांगुली आणि चॅपेल यांना बीसीसीआयने चर्चेसाठी मुंबईत बोलावलं. गांगुलीला एक प्रकर्षाने जाणवलं, की क्रिकेट बोर्डाचं आपल्याला फारसं समर्थन मिळणार नाही. त्यासाठी त्याला काही बाबींवर तडजोड स्वीकारावी लागणार होती. कारण गांगुली खराब कामगिरीतून जात होता आणि निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरेही त्याच्या कामगिरीवर फारसे खूश नव्हते. त्यामुळे एकच मार्ग होता, की चॅपेल आणि गांगुली दोघांनी वाद मिटवून भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीवर लक्ष केंद्रित करावं. अखेर दोघांनी सोबत काम करण्याचा निर्धार करीत भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याचा विश्वास दिला.

मात्र, सगळंच आलबेल नव्हतं. ऑक्टोबर 2005 मध्ये श्रीलंका सात वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला. दुखापतीमुळे सौरव गांगुली ही मालिका खेळू शकणार नव्हता. त्यामुळे संघाचं कर्णधारपद पुन्हा राहुल द्रविडकडे सोपविण्यात आलं. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्ध 4-0 ची आघाडी घेतली. तोपर्यंत सौरव गांगुलीही दुखापतीतून बाहेर आला. आता पुन्हा प्रश्न उभा ठाकला- गांगुलीला उर्वरित सामन्यांत कर्णधारपद मिळणार की नाही? अखेरच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात काही बदल नक्की झाले. मात्र, त्यात सौरव गांगुलीचं नाव कुठेच नव्हतं. पुढच्या तीन सामन्यांतही कर्णधारपदाची राहुल द्रविडकडेच सोपविण्यात आली आणि भारताने ही मालिका 6-1 अशी जिंकली.

ही मालिका संपताच दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात दाखल झाला. या मालिकेतही सौरव गांगुलीला संघात स्थान दिलं नाही आणि पुन्हा कर्णधारपद राहुल द्रविडकडेच सोपविण्यात आलं. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, तर दुसरा सामना भारताने. तिसऱ्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. चौथा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होता. हेच ते गांगुलीचं घरचं मैदान. जेव्हा भारतीय संघ कोलकात्यात आला तेव्हा गांगुलीच्या समर्थकांनी ग्रेग चॅपेलचा निषेध केला. या सामन्यात भारतीय प्रेक्षक भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेला समर्थन देत होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 10 गडी राखून आरामात जिंकला होता. सामना गमावल्यानंतर ग्रेग चॅपेल यांनी गांगुली समर्थकांना संतापात मधलं बोट दाखवत आपली नाराजी दाखवली. मुंबईत झालेल्या पाचव्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.

दक्षिण आफ्रिका मायदेशी परतला. त्यानंतर भारत श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत युवराजसिंग मालिकावीर ठरला होता. त्या वेळी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला, की मधल्या फळीत युवराजसिंग आता गांगुलीची जागा घेणार का? मात्र, तसं काही झालं नाही. गांगुलीला झहीर खानच्या जागी संघात स्थान मिळालं. त्याचबरोबर बीसीसीआयने हेही स्पष्ट केलं, की आता यापुढे राहुल द्रविड नियमित कर्णधार असेल, तर उपकर्णधारपदी वीरेंद्र सेहवाग असेल. पहिला कसोटी सामना तर पावसामुळे बरोबरीत सुटला. यात गांगुली पाच धावा करू शकला.

दुसऱ्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग आजारी पडला. त्यामुळे गांगुलीबरोबरच युवराजसिंगलाही संघात घेतले. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने 129 चेंडूंत 40, तर दुसऱ्या डावात 115 चेंडूंत 39 धावा केल्या. ही कामगिरी गांगुलीच्या लौकिकास साजेशी अजिबातच नव्हती. यातून स्पष्टपणे जाणवलं, की गांगुली किती तणावात खेळत होता! युवराजसिंगला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. मात्र, दुसऱ्या डावात नाबाद 77 धावा केल्या. यामुळे संघाला आश्वासक धावसंख्या उभारता आली. भारताने हा सामना 128 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली.

गांगुलीला संघातून वगळलं

तिसऱ्या कसोटी सामन्यात गांगुलीला संघातून अचानक वगळले आणि त्याच्या जागी मोहम्मद कैफला स्थान दिले. हे जेव्हा गांगुलीच्या समर्थकांना कळलं, तेव्हा कोलकात्यात चॅपेलच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू झाले. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले होते.

श्रीलंका दौऱ्यानंतर भारताला पाकिस्तान दौरा करावा लागणार होता. यात भारताला तीन कसोटी सामने व 5 वनडे सामन्यांची मालिका खेळायची होती. सौरव गांगुलीही संघासोबत पाकिस्तानात गेला. पहिला कसोटी सामन्यात गांगुलीला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. हा सामना बरोबरीत सुटला. एक राखीव गोलंदाज खेळविण्यासाठी गांगुलीला दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा संघाबाहेर व्हावे लागले. हा कसोटी सामनाही बरोबरीत सुटला. तिसऱ्या कसोटी सामन्यात गांगुलीला पुन्हा अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं. गांगुलीने पहिल्या डावात 34, तर दुसऱ्या डावात 37 धावा केल्या. भारताला या सामन्यात 347 धावांनी दणदणीत पराभवास सामोरेही जावे लागले होते. या सामन्यात युवराजसिंग वगळता सर्वच भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते.

कसोटी मालिकेनंतर आता वनडे मालिका होती. या वेळी फक्त सौरव गांगुलीला संघाबाहेर ठेवण्यात आलं. त्यानंतर भारताला इंग्लंड, वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळायच्या होत्या. या मालिकांतही सौरव गांगुलीला संघातून वगळण्यात आलं. वेस्ट इंडीजचा दौरा संपेपर्यंत सौरव गांगुली जवळपास पाच महिने संघाबाहेर होता. या दरम्यान त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणे सुरू केले आणि तेथे चांगली कामगिरीही केली. ऑक्टोबर 2006 मध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची होती. ही स्पर्धा भारतातच होणार होती. त्यानंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा होता. मात्र, भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे मालिकेत 4-0 असा दणदणीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निवड समितीला सौरव गांगुलीची आठवण आली. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले. या मालिकेपूर्वी भारताला सराव सामनाही खेळायचा होता. या सामन्यात भारताने 37 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्या वेळी गांगुलीने 87 धावांची खेळी साकारत भारताला विजय मिळवून दिला.

पहिल्या कसोटी सामन्यात गांगुलीने 51 धावांची नाबाद खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र दक्षिण आफ्रिकेने दोन्ही कसोटी सामने जिंकत मालिकेवर नाव कोरले. अर्थात, भारताने जरी ही कसोटी मालिका गमावली असली तरी सौरव गांगुलीने निवड समितीचे लक्ष मात्र वेधून घेतले होते. त्याने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक 214 धावा केल्या.

वेस्ट इंडीजविरुद्दच्या वन डे मालिकेसाठीही सौरव गांगुलीला संघात स्थान मिळाले. जवळपास दीड वर्षांनंतर गांगुली पहिला वनडे सामना खेळणार होता. यातही त्याने 98 धावांची खेळी साकारली. श्रीलंकेविरुद्धही त्याने कामगिरी उंचावली आणि मालिकावीराचा बहुमान मिळवला. आता वेध लागले होते 2007 च्या वर्ल्ड कपचे.

या स्पर्धेत भारत विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र, बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने साखळीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. या पराभवामुळे ग्रेग चॅपेल यांना पुन्हा भारतीय प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागला. त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एक वर्षाने 2008 मध्ये सौरव गांगुलीनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

चॅपेल यांच्यावर सचिनचीही टीका

ग्रेग चॅपेलनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले. त्यानंतर भारताने यशाचे इमले रचले, ज्यावर एखादं पुस्तक होईल. ग्रेग चॅपेल गेल्यानंतर वादाच्या अंकावर पडदा पडला होता. त्यांच्यामुळे भारतीय संघाला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, ते कोणीही विसरणार नाही.

2014 मध्ये सचिन तेंडुलकरची ऑटो बायोग्राफी प्लेइंग इट माय वे हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यात सचिनने ग्रेग चॅपेल यांच्यावर टीका करताना म्हटले, की ते एक रिगमास्टरसारखे होते. सहमती नसतानाही स्वतःच्या आयडिया खेळाडूवर ते थोपवत होते. त्यांना खेळाडूंच्या मर्जीची कोणतीही पर्वा नव्हती.

या पुस्तकात सचिन पुढे म्हणतो, की 2007 चा वर्ल्ड कपच्या काही महिन्यांपूर्वी ग्रेग चॅपेल मला भेटण्यासाठी घरी आले होते. ते मला म्हणाले, की राहुल द्रविडचं कर्णधारपद मी तुला देतो. कसं आपण दोघं मिळून भारतीय क्रिकेटवर नियंत्रण मिळवू शकतो. यामुळे मला धक्का बसला होता. मला लक्षात आले, की त्यांना भारतीय क्रिकेटची कोणतीही पर्वा नाही. त्यानंतर मी बीसीसीआयला सूचनाही केली होती, की 2007 च्या वर्ल्ड कपसाठी ग्रेग चॅपेल यांना भारतीय संघासोबत पाठवू नये. त्यांच्याऐवजी वरिष्ठ खेळाडूच्या माध्यमातून आम्ही सर्व एकजूटपणे राहू. मात्र बीसीसीआयने माझ्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि 2007 चा वर्ल्डकप आमच्यासाठी नुकसानकारक ठरला.

झहीर खाननेही ग्रेग चॅपेलवर आरोप केले होते. जोपर्यंत मी प्रशिक्षक आहे, तोपर्यंत तू संघात खेळू शकणार नाही, असे ग्रेग चॅपेल मला म्हणाले होते, असा आरोप झहीर खानने केला.

व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले, की मला ग्रेग चॅपेल यांनी सलामीला जाण्यास सांगितले होते. मी नकार दिला तर त्यांनी मला संघातून काढून टाकण्याची धमकी दिली होती.

एकूणच ग्रेग चॅपेल भारतीय संघासाठी पनौती होते. भारतीय खेळाडूंच्या आरोपांतून ते स्पष्टपणे समोर येतं. मात्र, यात सौरव गांगुलीला जे भोगावं लागलं ते इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

3 Comments

  1. Pingback: otc cialis

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!