टेनिसमध्ये एका युगाचा अंत?
अमेरिकन ओपन ही प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा कदाचित सेरेना विल्यम्स या स्टार खेळाडूसाठी अखेरची असेल. रफाएल नदाल चौथ्या फेरीतच पराभूत झाला. नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर या दोघांनी तर या स्पर्धेत भागच घेतलेला नाही. थोडक्यात काय, तर क्वार्टर फायनलमध्ये ना सेरेना आहे ना नदाल, ना फेडरर… हा टेनिसमध्ये एका युगाचा अंत म्हणावा का?
टेनिस विश्वात अनेक दिग्गजांनी आपला काळ गाजवला. महिलांमध्ये मार्टिना नवरातिलोवा, मार्गारेट कोर्ट, ख्रिस एवर्ट, बिली जीन किंग, मोनिका सेलेस, स्टेफी ग्राफ यांचंही एक युग होतं. पुरुषांमध्ये जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो, पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी यांनी एक काळ गाजवला आहे. त्यानंतर टेनिस विश्वात सेरेना विल्यम्स, रफाएल नदाल, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच यांचं युग सुरू झालं. या चारही टेनिसपटूंनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ टेनिसविश्वात आपला दबदबा निर्माण केला. या चौघांच्याही ग्रँडस्लॅमची गोळाबेरीज केली तर त्यांनी एकेरीचे 86 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. प्रत्येकाने किमान 20 किताब तर नक्कीच जिंकले आहेत. मात्र, आज अमेरिकन ओपन स्पर्धेकडे पाहिले तर या चौघांपैकी एकही खेळाडू क्वार्टर फायनलमध्ये नाही. हा एका अर्थाने टेनिसमध्ये एका युगाचा अंत मानायचा का? कारण हे चारही खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर कमी-अधिक अंतराने तसेही पोहोचलेच आहेत.
छत्तीस वर्षीय रफाएल नदाल याचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. अमेरिकेचा 24 वर्षीय फ्रान्सिस टियाफो याने नदालचा 6-4, 4-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. हा पराभव एक युग अस्ताला चाललंय, असं म्हणायला हवं का, असा प्रश्न टेनिसप्रेमींमध्ये उपस्थित झाला तर त्यात नवल काय?
स्पेनचा टेनिस स्टार रफाएल नदाल या प्रश्नावर म्हणतो, ‘‘काही निघून जातात, तर काही नव्याने येतात. विश्व चालत राहो हाच निसर्गाचा नियम आहे.’’ नदाल म्हणतो, की मला माहीत नाही मी आणखी किती वर्षे खेळत राहीन. कारण बायकोला माझा अभिमान वाटतो. मलाही तिच्यासोबत वेळ देण्याची गरज आहे.
सेरेना विल्यम्स हिने तर यापूर्वीच निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ती म्हणालीही, ही माझी अखेरची अमेरिकन ओपन स्पर्धा असेल. तिला कुटुंब आणि व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसला कायमचा रामराम ठोकायचा आहे.
अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला तसेच पुरुष गटात ज्या 16 खेळाडूंनी क्वार्टर फायनलची फेरी गाठली, त्यातील 15 खेळाडूंनी अद्याप एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. केवळ इगा स्वियाटेक ही एकमेव अशी खेळाडू आहे, जिने दोन वेळा फ्रेंच ओपनचा किताब जिंकला आहे. विश्व रँकिंगमध्ये ती अव्वल नंबरवर स्थानापन्न आहे.
अमेरिकन ओपन स्पर्धेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. अमेरिकन ओपन स्पर्धा 1968 मध्ये सुरू झाली. व्यावसायिक युगातली ही पहिलीच घटना आहे, जेथे अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये एकही ग्रँडस्लॅम न जिंकलेले 15 खेळाडू दाखल झाले आहेत. यापूर्वी 2003 च्या विम्बल्डन स्पर्धेत असे घडले होते. त्या वेळी क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या सर्वच खेळाडूंनी एकही ग्रँडस्लॅम किताब जिंकलेला नव्हता. याच स्पर्धेत रॉजर फेडरर याने विम्बल्डनच्या रूपाने पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकला. त्यानंतर आज त्याच्याकडे एकूण 20 ग्रँडस्लॅम किताब झाले आहेत.
रॉजर फेडरर आता 41 वर्षांचा आहे. सध्या तोही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. डाव्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये विम्बल्डन स्पर्धा खेळल्यानंतर तो एकही स्पर्धा खेळू शकलेला नाही. फेडरर सध्या ऑक्टोबर 2022 मध्ये स्वित्झर्लंडमधील एक स्पर्धा खेळण्याबाबत विचार करीत आहे. 2023 च्या विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याचेही त्याच्या डोक्यात घोळत आहे. मात्र, त्यानंतर काय होईल, याबाबत कोणालाही सांगता येणार नाही.
जोकोविचही हलक्या हलक्या पावलांनी निवृत्तीकडे जात आहे. तो आता 35 वर्षांचा आहे. तो आणखी काही वर्षे ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याचा दावेदार बनू शकतो. मात्र, एक अडचण आहे. ती म्हणजे सद्य:स्थितीत तो अशाच देशांत खेळू शकतो, जेथे कोविड-19 चे लसीकरण अपरिहार्य नसेल.
कोविड-19 ची लस न घेतल्याने जोकोविचला 2022 च्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया ओपनमधून बाहेर काढले होते. अमेरिकेनेही त्याला आपल्या देशात पाय ठेवण्यास नकार दिला होता.
जोकोविच आणि नदाल या दोघांनी 2022 चे पहिले तीन ग्रँडस्लॅम किताब जिंकले होते. त्यांनी मागील 17 पैकी 15 ग्रँडस्लॅम किताब जिंकले होते. यात जर फेडररच्याही किताबांची गोळाबेरीज केली तर या तिघांनी मागील 22 पैकी 20 किताब जिंकले आहेत.
याच आकड्यांना आणखी पुढे जाऊन गोळाबेरीज केली तर या तिघांनी मागील 76 ग्रँडस्लॅमपैकी 63 किताब जिंकले आहेत. या दरम्यान या तिघांशिवाय अँडी मरे आणि स्टॅन वावरिंका यांनीच एकापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. या दोघांच्या नावावर तीन- तीन किताब आहेत.
एकूणच सेरेना विल्यम्स, नोवाक जोकोविच, रफाएल नदाल, रॉजर फेडरर यांची टेनिस विश्वावरील हुकूमत स्पष्ट होते. हे चारही खेळाडू एखाद्या स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीतून बाद होत असतील तर टेनिसमध्ये तो एका युगाचा अंत नाही तर काय म्हणावा? मला वाटतं, थोडंसं सकारात्मक पाहिलं तर ही नव्या युगाची सुरुवातही म्हणावी लागेल. मावळत्या सूर्याला निरोप दिल्यानंतर तो पुन्हा नवा दिवस घेऊन उगवतो. टेनिसविश्वात इगा स्वियाटेक, राडुकानू यांच्यासारख्या नव्या दमाच्या खेळाडू टेनिस विश्वात नवे युग घेऊन येत आहे. त्यांचे स्वागत करूया…
[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]
One Comment