धक्कादायक! इक्वाडोरच्या धावपटूला गोळ्या घातल्या!!!
इक्वाडोरच्या ३२ वर्षीय धावपटूची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अॅलेक्स क्विनोनेज असे या धावपटूचे नाव असून, त्याची बंदरगाह शहराच्या गुआयाक्विल येथे हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.
क्विनोनेज 2012 मध्ये इक्वाडोरचा राष्ट्रीय हीरो बनला होता. त्याने लंडन ऑलिम्पिकच्या 200 मीटर शर्यतीत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्या वेळी इक्वाडोरने त्याला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. अंतिम फेरीत त्या सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्या वेळी महान धावपटू उसेन बोल्ट याने सुवर्णपदक जिंकले होते.
त्यानंतर क्विनोनेज 2019 मध्ये जागतिक ट्रॅक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारा तो इक्वाडोरचा पहिलाच खेळाडू ठरला होता. दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतील त्याच्या कांस्यपदकाला इक्वाडोरच्या लेखी सुवर्णाइतकीच झळाळी होती.
क्विनोनेज टोकियो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला होता. मात्र निवासस्थानासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घेता आला नाही. अॅलेक्स क्विनोनेज याची शुक्रवारी, 15 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या घालून हत्या केली. यात एक अन्य व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. क्विनोनेजच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा इक्वाडोरचे राष्ट्रपति गुइलेर्मो लासो यांनी शनिवारी दिला.