धावपटू कोलमन निलंबित
वॉशिंग्टन
जागतिक शंभर मीटर शर्यत जिंकणारा ख्रिस्तियन कोलमन christian coleman | याने उत्तेजक द्रव चाचणी (doping test) न केल्यानं अॅथलेटिक्स इंटीग्रिटी युनिटने त्याला १७ जून २०२० रोजी निलंबित केले आहे. अॅथलेटिक्स इंटीग्रिटी युनिटने तात्पुरते निलंबित केलेल्या खेळाडूंची यादी अपडेट केली आहे. या यादीत कोलमनचं नाव आहे. ही यादी जाहीर करण्याच्या तासाभरापूर्वीच कोलमनने आपल्या उत्तेजक द्रव चाचणीबाबत खुलासा केला होता.
‘वाडा’ने (जागतिक उत्तेजक द्रवविरोधी संघटना) आणि इंटीग्रिटी युनिटीच्या आचारसंहितेनुसार अंतर्गत सुनावणीनंतर जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोलमनला कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. अमेरिकेच्या २४ वर्षीय कोलमनने उत्तेजक द्रव चाचणी केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने तिसऱ्यांदा ही चाचणी टाळली होती. आपण परीक्षण का करू शकलो नाही, याचा खुलासा कोलमनने ट्विटरवर केला होता.
हेही वाचा… संजीवनी जाधवही डोपिंग टेस्टमध्ये सापडली
तो म्हणाला, की गेल्या १२ महिन्यांत ९ डिसेंबर २०१९ रोजी मला तिसऱ्यांदा चाचणी करण्याची संधी होती. मात्र, चाचणी करता आली नाही. त्यामुळे निलंबनाला सामोरे जावे लागले. यापूर्वी तो १६ जानेवारी २०१९ आणि २६ एप्रिल २०१९ रोजी चाचणीला हजर राहू शकला नाही. आपण चाचणीला का हजर राहू शकलो नाही, याची माहिती ‘अॅथलेटिक्स इंटीग्रिटी युनिट’ला दिली होती. माझ्या घरी ९ डिसेंबर २०१९ रोजी चाचणीसाठी कोणी आलं होतं, याची कोणतीही नोंद नाही. त्या वेळी ख्रिसमसच्या खरेदीसाठी एका मॉलमध्ये होतो. जर मला एक फोन जरी केला असता तरी मी पाच मिनिटांत घरी पोहोचलो असतो. कारण माझ्या घरापासून मॉल केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.
कोलमन म्हणाला, ‘‘उत्तेजक द्रव चाचणी करणारे घरी आले होते, तेव्हा त्यांनी घराची घंटी वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घंटी वाजली नाही. मग त्यांनी मला फोन का नाही केला? त्यांनी माझ्याशी संपर्क का नाही साधला?’’