हॉकीच्या सुवर्णकाळातील महान हॉकीपटू चरणजीत सिंह यांचे निधन
हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले महान हॉकीपटू चरणजीत सिंह (वय ९०) यांचे 27 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 1964 च्या टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते कर्णधार होते. हिमाचल प्रदेशातील ऊना येथील आपल्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने चरणजीत सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराशीही ते लढत होते.
हॉकीपटू चरणजीत सिंह यांचा पुढच्या महिन्यात 91 वा वाढदिवस होता. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. चरणजीत सिंह यांना पाच वर्षांपूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते लकवाग्रस्त झाले होते.
त्यांचा मुलगा व्ही पी सिंह यांनी सांगितले, ‘‘पाच वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे ते लकवाग्रस्त झाले. काठीच्या आधारानेच ते चालत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांनी 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला.’’
1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे ते कर्णधार होते. त्याचबरोबर 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही होते. 1962 च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या संघातही चरणजीत सिंह सदस्य होते. हॉकीपटू चरणजीत सिंह यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा मोठा मुलगा कॅनडामध्ये डॉक्टर आहे, तर धाकटा मुलगा त्यांच्यासोबत असायचा. चरणजीत सिंह यांची मुलगी लग्नानंतर दिल्लीत राहते.
दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारे चरणजीत सिंह भारतीय हॉकीच्या गौरवशाली क्षणांचे साक्षीदार होते. हाफ बॅकवर खेळणारे चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले होते.
चरणजीत सिंह यांचे शिक्षण डेहराडून येथील कर्नल ब्राउन केम्ब्रिज स्कूल आणि पंजाब विद्यापीठात झालं आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील सुवर्ण कारकिर्दीला अलविदा केल्यानंतर ते शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभागाचे निदेशकही राहिले.
चरणजीत सिंह 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या शानदार नायकांपैकी एक होते. मात्र, दुखापतीमुळे ते पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळू शकले नाहीत. या स्पर्धेत भारत एका गोलने पराभूत झाला होता. त्यानंतर चार वर्षांनी चरणजीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली पराभवाची परतफेड करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
हॉकी इंडिया फ्लॅशबॅक सीरिजमध्ये चरणजीत सिंह यांनी या स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला होता. ते म्हणाले, ‘‘भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ त्या वेळी दिग्गज संघ होते. ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळणे प्रचंड तणावाचे होते. दोन्ही संघांच्या सदस्यांचं डोकं थंड करण्यासाठी सामना अनेक वेळा थांबविण्यात आला.’’
चरणजीत सिंह म्हणाले होते, ‘‘मी संघातील खेळाडूंना सांगितलं, की त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करा. आमच्यासमोर कठीण आव्हान होतं. मात्र, आम्ही सिद्ध केलं आणि सुवर्ण पदक घेऊनच भारतात परतलो.’’
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]