ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याचा असाही विक्रम
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याने डे-नाइट (दिवस-रात्र) ॲशेस कसोटी मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात तीन शतके करणारा तो जगातला एकमेव फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात 17 डिसेंबर 2021 रोजी दिवसाच्या पहिल्या सत्रात पाच बाद 302 धावा करीत स्थिती मजबूत केली आहे. ॲशेस मालिकेतील मार्नस लाबुशेन याचा विक्रम महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाला किमान 300 चा टप्पा ओलांडता आला.
डिनरसाठी खेळ थांबवला तेव्हा कर्णधार स्टीव स्मिथ 55 आणि ॲलेक्स कॅरी पाच धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाने दिवसाची सुरुवातच दोन बाद 221 धावांनी केली. त्या वेळी लाबुशेन 95 धावांवर खेळत होता. दिवसाच्या सुरुवातीची 40 मिनिटे बरीच नाट्यमय राहिली. चेंडू आणि बॅट यांच्यात निकटचं द्वंद्व पाहायला मिळालं. लाबुशेनने जिम्मी अँडरसनचा चेंडू थर्ड मॅनजवळील सीमापार तडकावत कसोटी कारकिर्दीतलं सहावं आणि ॲशेस मालिकेतील पहिलं शतक पूर्ण केलं आणि हे त्याचं विक्रमी शतक ठरलं. यानंतर काही वेळानंतर तो ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर झेलबाद झाले. मात्र, रिप्लेमध्ये हा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला जीवदान मिळाले. अर्थात, याचा फायदा त्याला उचलता आला नाही. आपल्या 400 मिनिटांची ही खेळी रॉबिन्सननेच संपुष्टात आणली. रॉबिन्सनने त्याला पायचीत केले. लाबुशेनने या दरम्यान कसोटीतील 2,000 धावा पूर्ण केल्या. त्याने या धावा 34 डावांत केल्या. डॉन ब्रॅडमन (22), जॉर्ज हेडली (32), हर्बर्ट सटक्लिफ (33) आणि माइक हसी (33) यांनीही हा टप्पा कमी डावांत पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. आता या पंक्तीत लाबुशेन जाऊन बसला आहे. ॲशेस मालिकेत
लाबुशेनने ॲडीलेड ओव्हल मैदानावर सलग तीन डे-नाइट कसोटी सामन्यांत शतके ठोकली आहेत. त्याची सरासरी 100 आहे. ऑस्ट्रेलिया आपला नववा दिवस-रात्र सामना खेळत आहे. मागील सर्व आठ सामने घरच्याच मैदानावर जिंकले आहेत. पहिले कसोटी शतक बनविणारा ट्रॅव्हिस हेड इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 18 धावा केल्या. कॅमेरून ग्रीन याला बेन स्टोक्सद्वारे त्रिफळाचीत केले.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]