दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’
अवघ्या दीड मिनिटात महेंद्र गायकवाड याला अस्मान दाखवत नांदेडच्या शिवराज राक्षे याने 14 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र केसरी 2023 ची गदा पटकावली. शिवराज राक्षे मूळचा पुण्याचा आहे. मात्र, यंदा त्याने नांदेडचे प्रतिनिधित्व करीत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिंद्रा थार ही गाडी व रोख पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यालाही मानाची गदा, ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गादी विभागात शिवराज राक्षे याने गतविजेत्या हर्षवर्धन सदगीर 8-1 असा पराभव करीत विजेतेपद मिळविले. माती विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचे कडवे आव्हान 5-4 असे मोडीत काढत विजेतेपद मिळविले. शिवराज आणि महेंद्र दोघेही तुल्यबळ मल्ल महाराष्ट्र केसरीच्या जेतेपदासाठी आखाड्यात उतरले. ही तुल्यबळ लढत चुरशीची होईल अशी अटकळे बांधली जात होती. दोघांनी एकमेकांना आजमावायला सुरुवात केली. सुरुवातीला शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रलाही कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्या वेळी शिवराजने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. महेंद्रने तो प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे करताना शिवराजची चपळाई थक्क करणारी होती. त्याने वेगाने हालचाल करीत महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या संधीचे सोने करून शिवराजने महेंद्रला अस्मान दाखवले.
माती विभागात महेंद्र गायकवाड विजेता
तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला 6-4 असे पराभूत केले होते. दोन्ही मल्ल एकमेकांच्या तोडीचे होते. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकांना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. सिकंदर या वेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला बहाल करण्यात आला. त्यानंतर 10 सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना दोन गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने 2-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचली. त्याने महेंद्रला बाहेर ढकलताना आणखी एक गुण वसूल केला. या वेळी सिकंदरने 3-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदरला आणखी एक गुण मिळाला. या वेळी सिकंदर 4-1 अशा आघाडीवर होता. संपूर्ण स्पर्धेत सिकंदरचं वर्चस्व असतानाच त्याला एक चूक भोवली. आक्रमक कुस्ती करण्याच्या प्रयत्नात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग करीत बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकले. इथे महेंद्रला चार गुण मिळाले. आणि हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदरला बाहेर ढकलताना अद्याप एका गुणाची कमाई करताना ही लढत 6-4 अशी जिंकली.
गादी विभागात शिवराज राक्षे विजेता
गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा 8-1 असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला होता. या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलून चार गुणांची कमाई केली. दोन वेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक असे दोन गुण वसूल केले. दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावला. त्याने ताबा घेऊन २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र, यात हर्षवर्धनला केवळ एक गुण मिळवण्यात यश आले. अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुणाधिक्याने जिंकली.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=AkrQZ5KIOGQ” column_width=”4″]कुस्तीगिरांच्या मानधनात तिप्पट वाढ
कुस्तीगिरांच्या मानधनात तिपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी, 14 जानेवारी 2023 रोजी केली. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन सहा हजारांवरून 20 हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन सहा हजारांवरून 20 हजार, तर हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम-ए-हिंद या कुस्तीगिरांचे मानधन चार हजारांवरून 15 हजार इतके करण्यात येईल. कुस्तीगिरांचे निवृत्तिवेतन अडीच हजारांवरून साडेसात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले. कुस्ती स्पर्धांमध्ये यशस्वी कुस्तीगिरांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल.
महाराष्ट्र केसरी किताबाची लढत फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली. संयोजक मुरलीधर मोहोळ आणि खासदार रामदास तडस यांनी खेळाडूंना अत्यल्प मानधन दिले जात असल्याकडे लक्ष वेधले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धा खेळणाऱ्या आपल्या राज्यातील कुस्तीपटूंना केवळ सहा हजार रुपये मानधन दिले जाते, ते आता वीस हजार रुपये करण्याचा निर्णय करूया. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद कुस्तीपटूंना चार हजार रुपये दिले जातात, ते आता पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीत सामान्य घरातील मुले खेळतात. या खेळात मेहनतीसोबत खुराकही चांगला लागतो. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागतो. म्हणूनच आपण मानधन वाढीचा निर्णय घेत आहोत. मागे आपण तीन खेळाडूंना थेट ‘डीवायएसपी’ची नोकरी दिली, त्याप्रमाणेच आमच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी असेल, संधी असेल, तर ते देण्याचा काम आम्ही निश्चित करू.’
महिला खेळाडूंना मदत करणार
ब्रिजभूषणसिंह यांनी महिला गटातही कुस्ती स्पर्धाही आयोजित करायला हवी, अशी सूचना मांडली होती. त्यावर ‘महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घ्यावा, त्यासाठी राज्य सरकारही मदत करेल,’ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार
ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मल्लाला ऑलिम्पिकमध्ये यश मिळाले नाही, याकडे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषणसिंह यांनी लक्ष वेधले होते. यावर फडणवीस म्हणाले, ‘आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर आपण तसे मल्ल तयार करण्यात मागे राहिलो. आता आपण महाराष्ट्राचे मिशन ऑलिम्पिक सुरू करू. महासंघाच्या मदतीने येत्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने पदक विजेते खेळाडू घडवू. यासाठी सरकार पुढाकार घेईल.’
आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी
1. पहिलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961) | 29. पहिलवान संजय पाटील (अकोला, 1994-95) |
2. पहिलवान भगवान मोरे (धुळे, 1962) | 30. पहिलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96) |
3. पहिलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964) | 31. पहिलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97) |
4. पहिलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965) | 32. पहिलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98) |
5. पहिलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966) | 33. पहिलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99) |
6. पहिलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976) | 34. पहिलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000) |
7. पहिलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968) | 35. पहिलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001) |
8. पहिलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969) | 36. पहिलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02) |
9. पहिलवान दादू चौगुले (पुणे, 1970) | 37. पहिलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03) |
10. पहिलवान दादू चौगुले (अलिबाग, 1971) | 38. पहिलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04) |
11. पहिलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972) | 39. पहिलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05) |
12. पहिलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973) | 40. पहिलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06) |
13. पहिलवान युवराज पाटील (ठाणे, 1974) | 41. पहिलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007) |
14. पहिलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975) | 42. पहिलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008) |
15. पहिलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976) | 43. पहिलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009) |
16. पहिलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978) | 44. पहिलवान समाधान घोडके (रोहा, 2010) |
17. पहिलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979) | 45. पहिलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011) |
18. पहिलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980) | 46. पहिलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012) |
19. पहिलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981) | 47. पहिलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013) |
20. पहिलवान संभाजी पाटील (बीड, 1982) | 48. पहिलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014) |
21. पहिलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983) | 49. पहिलवान विजय चौधरी (नागपूर-2015) |
22. पहिलवान नामदेव मोळे (सांगली, 1984) | 50. पहिलवान विजय चौधरी (वारजे-2016) |
23. पहिलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985) | 51. पहिलवान अभिजीत कटके (भूगाव-2017) |
24. पहिलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986) | 52. पहिलवान बाला रफीक शेख (जालना-2017) |
25. पहिलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987) | 53. पहिलवान हर्षवर्धन सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019) |
26. पहिलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988) | 54. पहिलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22) |
27. पहिलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992) | 55. पहिलवान शिवराज राक्षे (पुणे 2023) |
28. पहिलवान उदयराज जाधव (पुणे, 1993) | 56. ??? |