कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?
कतारमध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रंगली, ती अनेक कारणांनी. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच समलैंगिकता आणि कामगारांचे स्थलांतर हे दोन मुद्दे गाजले. यावरून युरोपातील संघांनी निषेधाचे सूर आळवले. कतारने मात्र समलैंगिकतेचा विरोध कायम ठेवला. हे मुद्दे बाजूला ठेवले तर स्पर्धेने अखेरपर्यंत उत्कंठा वाढवली. पाठीराख्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. विशेषतः भारतातही फुटबॉलप्रेम पाहायला मिळालं. केरळमधील कटआउट वॉर त्याचंच उत्तम उदाहरण. आपल्या आवडत्या संघाचा पराभव चाहत्यांना पचवणे जड गेले. त्यातूनच काही ठिकाणी दंगलीही उसळल्याचे पाहायला मिळाले. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कतारमधील फुटबॉल स्पर्धेत प्रथमच पाहायला मिळाल्या.
समलैंगिकतेस कतारच्या विरोधावरून निषेधाचे सूर
वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कतारला मिळाल्यापासून हा देश फुटबॉलविश्वाच्या निशाण्यावर आला होता. स्थलांतरित कामगार आणि समलिंगीबाबत कतारच्या भूमिकेवर सातत्याने टीका होत आहे. समलैगिंकतेस कतारचा विरोध कायम राहिला. त्यामुळे युरोपीय देशातील संघांनी कतारच्या या भूमिकेचा निषेध सामन्याच्या वेळी करण्याचा पवित्रा घेतला. कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वादाची पहिली ठिणगी यजमान कतारच्या भूमिकेनेच पडली. त्यानंतर हा प्रश्न सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा काही आठवड्यांवर आली असताना कतारमधील स्थलांतरित कामगारांचा प्रश्न आणि समलैंगिक विवाहावरून यजमानांवर टीकेचे सूर अधिक टोकदार झाले. अखेर जागतिक फुटबॉल महासंघाला (फिफा) स्पर्धेपूर्वी पात्र संघांना पत्र पाठवून खेळास महत्त्व देण्याची सूचना करावी लागली. फिफाचे अध्यक्ष गिआनी इनफँटिनो आणि सचिव फातमा सामौरा यांनी प्रशिक्षक, तसेच खेळाडूंना उद्देशून पत्र लिहिले. ‘वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान फुटबॉलची चर्चा राहील, याकडे कृपया लक्ष द्यावे. फुटबॉलला राजकीय अथवा वैचारिक वादात ओढू नका,’ असे या पत्रात नमूद केले होते. हेच पत्र सर्व पात्र देशांच्या संघटनांनाही पाठवण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अनेक संघांनी उघडपणे विरोध करण्यापेक्षा छुप्या पद्धतीने विरोध केलाच.
प्रथमच तीन महिला रेफरी
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच तीन महिला रेफरींंची नियुक्ती करण्यात आली. या तीन रेफरींंमध्ये जपानच्या योशिमी यामाशिता, फ्रान्सच्या स्टेफानी फ्रॅपार्त आणि रवांडाच्या सलीमा मुकनसांगा यांचा समावेश आहे. वर्ल्ड कप फुटबॉलसाठी एकूण 36 रेफरींंची नियुक्ती करण्यात आली. त्यात तीन महिला आहेत. त्याचबरोबर सहाय्यक 69 रेफरींंमध्ये नेऊझा बॅक (ब्राझील), कॅरेन दिआझ मेदिना (मेक्सिको) आणि कॅथरीन नेसबित (अमेरिका) या तीन महिलांचा समावेश आहे. तिन्ही महिला रेफरींंना पुरुषांच्या सामन्यात काम करण्याचा अनुभव आहे. फ्रॅपार्त यांनी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा, तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. त्या फ्रेंच कपमधील अंतिम सामन्यासाठीही रेफरी होत्या. यामाशिता यांना जपानमधील पुरुषांची लीग, तसेच आशियाई क्लब लीगचा अनुभव आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही रेफरी म्हणून काम पाहिले आहे. मुकासांगा आफ्रिका कपमधील सामन्याच्या वेळी रेफरी होत्या.
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- केरळमध्ये ‘कटआउट वॉर’
वर्ल्ड कप फुटबॉलचा ज्वर भारतातही पाहायला मिळाला. केरळमध्ये तर फुटबॉल चाहत्यांनी कळस गाठला. कोझीकोडे जिल्ह्यात दिग्गज फुटबॉलपटूंचे ‘कटआउट वॉर’ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. उत्तर केरळमधील या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात अव्वल खेळाडूंचे कटआउट उभे करण्यात आले. या कटआउटची चर्चा भारतातच नव्हे, तर सर्व जगात झाली. विशेष म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) या कटआउटचे छायाचित्र ट्वीट केल्याने ते जगभरात व्हायरल झाले. केरळवासीयांचा पाठिंबा ब्राझील, अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशांना प्रामुख्याने असतो. पाठीराख्यांनी लिओनेल मेस्सीचा तीस फूट उंचीचा कटआउट उभारला होता. अर्जेंटिनाच्या पाठीराख्यांनी सुरुवात केल्यावर ब्राझीलचे चाहते पुढे आले. त्यांनी त्याच नदीत नेमारचा ४० फूट उंचीचा कटआउट उभारला. हे पाऊन पोर्तुगालचे चाहते स्वस्थ बसले नाही. त्यांनीही ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ४५ फूट उंचीचा कटआउट उभारला. हे कटआउट वॉर अर्जेंंटिना आणि ब्राझीलच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावरून व्हायरल केले. अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या फेसबुक पेजचे 4 लाख 23 हजार चाहते आहेत. त्यांनी मेस्सीचे छायाचित्र पोस्ट केले. कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा किती औत्सुक्याने भरलेली आहे, याचं भारतातील केरळ हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं.
कटआउटविरोधातील तक्रार फेटाळली
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा | हे कटआउट वॉर पर्यावरणवाद्यांना रुचले नाही. त्या विरोधात कोझीकोडे परिसरातील एका वकिलाने चथमंगलम पंचायतीत, तसेच कोडुवलल्ली नगरपालिकेत तक्रारही केली. आम्ही कटआऊट काढणार नाही, असे नगरपालिकेने सांगितले. या कटआउटमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला असल्याचे तक्रारीत म्हंटले होते. स्थानिक आमदार पी. टी. ए. रहीम यांनी या तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगितले. हे कटआउट कालिकत राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरात आहेत. ते कटआउट धरणाच्या परिसरात असले तरी त्यामुळे नदीचा प्रवाह बदलत नसल्याचा दावा करण्यात आला.
इस्रायल-कतारची वर्ल्ड कप डिप्लोमसी
सख्खे शेजारी पक्के वैरी अस वर्णन इस्रायल आणि त्याला लागून असलेल्या शेजारील देशांविषयी केलं जातं. मात्र, वर्ल्ड कप फुटबॉलच्या निमित्ताने कतारशी संबंध सुधारण्याची संधी इस्रायलने साधली. त्यांनी वर्ल्ड कपचे (कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा) निमित्त साधून कतारसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कतारला जाणाऱ्या इस्रायलमधील फुटबॉलप्रेमींसाठी खास अधिकारीही पाठवण्याचा निर्णय घेतला. पॅलेस्टाइनच्या मान्यतेवरून कतार आणि इस्रायल यांच्यात संघर्ष आहे. इस्रायलने संयुक्त अरब अमिराती आणि बहारीनबरोबरील संबंध दोन वर्षांपूर्वी सुधारण्यास सुरुवात केली. इराणबरोबरील संबंध तोडल्यास कतारसह चर्चा सुरू होईल, असे इस्रायलने सुचवले होते. मात्र, कतारने त्यास नकार दिला. मात्र आता इस्रायलमधून सुमारे 20 हजार चाहते कतारला जाणार आहेत. त्यामुळे इस्रायल परराष्ट्र मंत्रालयाचे एक पथक दोहास रवाना झाले आहे. इस्रायल आणि कतारच्या नागरिकांतील संघर्ष टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलने देशवासीयांना कतारमध्ये मद्यसेवन न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मद्यसेवनाबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतल्यास साह्य करण्यात अडचणी येतील, असे सांगितले आहे.
कोस्टा रिकास प्रवेशबंदी
बसरा येथील इराकविरुद्धच्या लढतीसाठी कोस्टा रिका संघाच्या बसला देशात प्रवेश नाकारण्यात आला होता. संघाच्या पासपोर्टवर इराकचा शिक्का नसल्याचे कारण सीमेवरील सुरक्षा यंत्रणेने दिले होते.
नखशिखांत कपडे परिधान करा
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना, तसेच पर्यटकांना कतारने काही नियम घालून दिले होते. या नियमांपैकी एक होता महिलांच्या पोशाखाविषयीचा. खांदे आणि गुडघे झाकले जातील असा पोशाख अनिवार्य असल्याचा नियम कतारने केला होता. मात्र, नियम मोडल्यास कारवाई होणार नाही, असेही स्थानिक संयोजन समितीने स्पष्ट केले. मात्र, कतारच्या संस्कृतीचा मान राखून त्यानुसार वर्तन असायला हवे, अशी माफक अपेक्षा कतारला आहे. पुराणमतवादी कतारमधील पुरुषप्रधान संस्कृती आणि येथील महिला हक्कांचा अभ्यास करणाऱ्या रोथना बेगम यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या ‘ह्युमन राइट्स वॉच’मध्ये वरिष्ठ संशोधकही आहेत. ‘खांदे आणि गुडघे झाकणारे कपडेच परिधान करावेत असा ‘ड्रेस कोड’ नाही. असे कपडे बंधनकारकही नाहीत हे लक्षात घ्या. हा नियम पाळला नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. हे फक्त सामाजिक बंधन अन् इथली परंपरा आहे एवढेच,’ असे रोथना बेगम यांनी स्पष्ट केले. कतार सरकारने आपल्या पर्यटन संकेतस्थळावर एक पत्रक प्रसिद्ध केले होते. ‘पुरुष आणि महिलांच्या पोशाखावरून कतारमध्ये खूप बंधने लादली जाणार नाहीत. मात्र, परदेशी पर्यटकांनीही येथील स्थानिक संस्कृती लक्षात घेत सार्वजनिक ठिकाणी अंग अधिकाधिक झाकले जाईल असा पोशाख परिधान करावा. पुरुष आणि महिला अशा दोघांनीही खांदे आणि गुडघे झाकले जातील, असा पोशाख करावा,’ असे पत्रकात नमूद केले आहे.
कतारचा आणखी नियम- सामन्यादरम्यान ‘बीअर’बंदी!
यजमान कतारने फिफा वर्ल्ड कपदरम्यान स्टेडियममध्ये ‘बीअर’ विक्रीस बंदी घातली. कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना स्पर्धेच्या यजमानांनी हा निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्पर्धेच्या निमित्ताने 64 लढतींचे आयोजन होणाऱ्या या देशात आता सामन्यादरम्यान फक्त ‘अल्कोहोलमुक्त’ बीअरच विक्रीस उपलब्ध करण्यात आली. कतार हा इस्लामिक देश असून, येथे मद्यपानास बंदी आहे. मात्र, यामुळे फिफाची प्रायोजक म्हणून भागीदारी असणाऱ्या ‘बडवायजर’ या बीअर कंपनीस कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. ज्या वेळी कतारने स्पर्धेचे यजमानपद मिळविले तेव्हा फिफाची मद्यविक्रीची मागणीही कतारने मान्य केली होती. मात्र, कतारने ऐनवेळी घेतलेला निर्णय फिफाला मान्य करावा लागला. ‘यजमान देश आणि फिफा यांच्या चर्चेनंतर या फुटबॉल महोत्सवातून ‘बीअर विक्री’ हटविण्यात आली आहे. इतर मोजकीच, पण परवाना देण्यात आलेल्या ठिकाणीच अल्कोहोलयुक्त बीअर उपलब्ध होईल,’ असे फिफाने पत्रकात नमूद केले. शॅम्पेन, वाइन, व्हिस्की आणि अन्य अल्कोहोलयुक्त पेय विशेष ठिकाणीच विक्रीसाठी आणि सेवनासाठी उपलब्ध होत्या.
- यजमानपद मिळविताना कतारने फिफाची सामन्यांदरम्यान मद्यविक्रीची मागणी मान्य केली होती.
- मात्र स्पर्धेस ४८ तासांपेक्षा कमी अवधी असताना कतारचे घूमजाव.
- अल्कोहलमुक्त बीअरच सामन्यादरम्यान विक्रीस उपलब्ध
- अल्कोहलयुक्त बीअर विशेष ठिकाणीच
फिफा अध्यक्ष म्हणाले होते, युरोपने माफी मागायला हवी
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्यावर कतारमधील स्थलांतरित कामगार आणि देशाची समलैंगिक विवाहाबाबतची भूमिका यावरून युरोपीय देशातून टीकेचा सूर आळवण्यास सुरुवात झाली. ही टीका दुटप्पी आहे. युरोपीयांनी जे तीन हजार वर्षे केले आहे, त्याबाबतची माफी तीन हजार वर्षे मागायला हवी, असे फिफाचे अध्यक्ष जिआनी इनफँटिनो यांनी सुनावले. युरोपीय देशांनी स्थलांतरित कामगारांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. कतार याच वेळी भारत, बांगलादेश, दक्षिण पूर्व आशियाई देशातून आलेल्यांना कामाची संधी देत आहे, असेही इनफँटिनो यांनी सुनावले. कतारमधील वर्ल्ड कप स्टेडियमची उभारणी स्थलांतरित कामगारांनी केली आहे. त्यांना पुरेसा मोबदला देण्यात आला नाही; तसेच त्यांची पिळवणूक केल्याचा आरोप होत आहे. मात्र, इनफँटिनो यांनी कतारने गेल्या काही महिन्यांत लक्षवेधक काम केले आहे, असे प्रमाणपत्र दिले. ण
तीन तास बीअर नसेल, तर काही बिघडत नाही
वर्ल्ड कप सामन्यांच्या वेळी बीअरचा आस्वाद घेता यावा, यासाठी आम्ही अखेरपर्यंत प्रयत्न केले; पण ते काही शक्य झाले नाही. दिवसातील तीन तास बीअर घेतली नाही, तरी काही बिघडत नाही. त्याविनाही जगता येते. कदाचित याचमुळे फ्रान्स, स्पेन, स्कॉटलंडमध्ये फुटबॉल स्टेडियमवर बीअर नेण्यास बंदी आहे. कदाचित ते आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. आम्ही असे करणार हा विचार त्यांनी केला असेल, असे इनफँटिनो यांनी सुनावले. वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्याच्या वेळी अल्कोहोलयुक्त बीअर स्टेडियममध्ये नेण्यास बंदी घातल्यामुळे कतारवर जगभरातून टीका झाली. त्याला इनफँटिनो यांनी उत्तर दिले. ‘बीअर’बंदीमुळे आमचे पुरस्कर्त्यांबरोबरी संबंध बिघडले आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून एकमेकांचे सहकारी आहोत. या निर्णयामुळे आम्ही अधिक एकमेकांना समजून घेतले, असेही इनफँटिनो म्हणाले. दरम्यान, समलैंगिक व्यक्तींचे कतारमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी स्वागतच होईल, असे आश्वासन आपल्याला कतार सरकारने दिले असल्याचेही ते म्हणाले.
इनफँटिनो काय म्हणाले…
- एखादा इंग्रज नसलेला, भारतीयांसारख्या दिसणाऱ्या चाहत्याने इंग्लंड, स्पेन, फ्रान्स संघाला पाठिंबा देण्यात गैर काय?
- फुटबॉलचा चाहता त्याच्या आवडत्या कोणत्याही संघाला प्रोत्साहित करू शकतो
- सहिष्णुतेची सुरुवात आपणच करू शकतो, आक्रमकतेस प्रोत्साहन नको
- कतारला सुरुवातीस यजमानपद दिले, त्या वेळी मी टीका केली होती
- परिस्थिती बदलते, हे आपल्यापैकी काही स्वीकारायलाच तयार नाहीत
- मी गप्प होतो, म्हणजे काहीच करीत नव्हतो, असे नव्हे
- विकसनशील देशातील लोक कतारमध्ये काम करून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारतात यात गैर काय?
जर्सी, झेंड्यांसाठी रांगा
कोलकात्यात फुटबॉल वर्ल्ड कपच्या उत्सुकतेने टोक गाठले होते. इथल्या मैदान बाजार परिसरातील दुकाने आणि गल्ल्यांमध्ये फुटबॉल पाठीराख्यांनी लाडक्या खेळाडूंच्या जर्सी आणि आवडत्या संघांच्या देशांचे झेंडे खरेदी करण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. यातही अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल, जर्मनी आणि स्पेन या देशांच्या झेंड्यांना अधिक मागणी होती. जर्सी विक्रीतही याच संघांना पसंती मिळते होती. दिवसाला सरासरी 500 जर्सींची विक्री झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. एका जर्सींची किंमत सहाशे ते आठशे रुपयांपर्यंत असून, झेंडे साधारण दीडशे रुपयांना विकले गेले.
फिफाला विक्रमी महसूल
कतार वर्ल्ड कपसाठी झालेल्या जाहिरातींच्या करारातून फिफाला 7.5 बिलियन डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळाला. जागतिक फुटबॉलचा कारभार बघणाऱ्या फिफानेच ही माहिती दिली. 2018 च्या रशिया वर्ल्ड कपपेक्षा हा महसूल एक बिलियन डॉलर्सनी अधिक आहे. विशेष म्हणजे यजमान कतारने केलेल्या अतिरिक्त व्यावसायिक भागीदारींमधून ही कमाई झाली आहे.
फॅन झोन प्रवेश पोलिसांनी रोखला
[jnews_element_embedplaylist layout=”vertical” scheme=”dark” playlist=”https://www.youtube.com/embed/u1HpmdS5Xus”]वर्ल्ड कप फुटबॉलसाठी तयार केलेल्या ‘फॅन झोन’च्या ठिकाणी पहिल्याच दिवशी गोंधळ झाला. पोलिसांनी बीअर विक्रीच्या ठिकाणी जाण्यापासून चाहत्यांना रोखले. त्याचबरोबर जास्त गर्दी होऊ नये, यासाठी अनेक चाहत्यांना बळाचा वापर करून दूर ठेवले. दोहामध्ये सलामीच्या लढतीसाठी तयार केलेल्या ‘फॅन झोन’ची क्षमता 40 हजार चाहत्यांची होती. तिथे प्रवेश करण्यासाठी सायंकाळपासून रांगा लागल्या होत्या. ‘फॅन झोन’ची क्षमता संपली. त्याभोवती असलेल्या कुंपण चाहत्यांच्या रेट्यामुळे वाकल्यावर पोलिसांनी प्रवेश बंद केला. प्रवेश रोखताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
फिफा आक्रमक; खेळाडू झुकले
कतारमध्ये समलैंगिक विवाहास मान्यता नाही. त्याच्या विरोधात आर्मबँड परिधान करण्याचा निर्णय युरोपातील अव्वल खेळाडूंनी घेतला होता. मात्र, हे आर्मबँड असल्यास पिवळे कार्ड दाखवण्याचा इशारा ‘फिफा’ने दिला. त्यामुळे आता आपण आर्मबँड परिधान करणार नाही, असा निर्णय इंग्लंडचा हॅरी केन, नेदरलँड्सचा व्हिर्गील व्हॅन डिक, वेल्सचा गॅरेथ बेल यांनी घेतला. बेल्जियम, स्वित्झर्लंड, जर्मनी, तसेच डेन्मार्कच्या कर्णधारांनी हे आर्मबँड परिधान न करण्याचे ठरवले. वर्ल्ड कप जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सामन्यापूर्वीच कार्डचा धोका नको, अशी भूमिका या देशांनी घेतली.
काळ्या बाह्यांचे शर्ट
कतारमधील स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी डेन्मार्क संघातील खेळाडूंनी सामन्यापूर्वी सराव करताना काळ्या बाह्यांचे शर्ट परिधान केले होते. अर्थात, त्यांनी सामन्याच्या वेळी विरोध टाळला. डेन्मार्क संघटनेचे अध्यक्ष, तसेच माजी पंतप्रधान हले थर्निंग श्मिड यांनी आपल्या कोटवर वन-लव्ह बोधचिन्ह लावले होते. हेच बोधचिन्ह लावून खेळाडूंनी खेळण्याचा निर्णय घेतला होता.
सलमा पहिल्या महिला
दोहा : रवांडाच्या पंच सलमा मुकानसांगा यांनी मंगळवारी इतिहास रचला. त्या पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्ड कपमधील पहिल्या आफ्रिकन महिला पंच बनल्या. फ्रान्स-ऑस्ट्रेलिया लढतीत 34 वर्षीय सलमा या चौथ्या पंच होत्या. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
जर्मनीकडून कतारचा मूकनिषेध
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील मैदानाबाहेरील वाद थांबता थांबेना. ‘वन-लव्ह आर्म बँड’ वापरल्यास पिवळे कार्ड दाखवण्यात येईल, या ‘फिफा’च्या इशाऱ्यानंतर जर्मनीच्या संघाने तोंडावर हात ठेवून कतारमध्ये होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्यापूर्वी अंतिम संघाचे छायाचित्र ‘फिफा’च्या वतीने घेण्यात येते. या वेळी जर्मनीच्या संघातील सर्वांनी तोंडावर हात ठेवला. जर्मनी फुटबॉल महासंघाने हे छायाचित्र ट्वीट केले. त्यासोबत आर्मबँड असो वा नसो, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही त्यासोबत म्हटले. कतारमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे; तसेच समलैंगिक विवाहास विरोध आहे. वन-लव्ह आर्म बँड बंदीच्या विरोधात जर्मनीचे मार्गदर्शक हॅन्सी फ्लिक आणि जर्मनीच्या फुटबॉल महासंघाचे प्रमुख बर्न्ड नेऊनदॉर्फ यांनी यापूर्वीच ‘फिफा’च्या पिवळे कार्ड दाखवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फिझर यांनी ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इनफँटिनो यांच्यासह सामना बघितला. मात्र, या वेळी फिझर यांनी डाव्या हातावर सर्वांना दिसेल, असा ‘वन-लव्ह आर्मबँड’ परिधान केला होता.
इक्वेडोरची चौकशी
इक्वेडोरच्या चाहत्यांनी त्यांच्या वर्ल्ड कप लढतीच्या वेळी समलैंगिक विवाहाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत शिस्तभंगाची चौकशी सुरू होणार असल्याचे ‘फिफा’ने सांगितले. इक्वेडोर संघावर स्पर्धेपूर्वीच बाद होण्याचे संकट होते. त्यांनी राष्ट्रीय संघ निवडीसाठी अपात्र खेळाडूची निवड केल्याची तक्रार चिलीने केली होती. पात्रता स्पर्धेत त्यांना एका गुणाचा दंड करण्यात आला. मात्र, वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली.
इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हटले; पण…
वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील वेल्सविरुद्धच्या लढतीच्या वेळी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हटल्याने नवा वाद टळला. मात्र, त्याच वेळी इराणमधील सत्तेचे विरोधक आणि पाठीराखे यांच्यात स्टेडियममध्ये आणि स्टेडियमबाहेर शाब्दिक चकमकी उडाल्या. पर्शियन क्रांतीपूर्वीचा ध्वज इराणच्या काही चाहत्यांनी अन्य पाठीराख्यांकडून घेतला, तसेच इराणमधील हिजाब बंदीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देणाऱ्यांची हुर्यो उडवली. इराणमधील आंदोलनाबाबत मुलाखत देत असलेल्या महिला परदेशी माध्यमांशी संवाद साधत असताना काहींनी इराण प्रजासत्ताक अशा घोषणा दिल्या. हाच संघर्ष स्टेडियममध्येही होता. महिला, जीवन, स्वातंत्र्य यास इराण प्रजासत्ताक असे म्हणत उत्तर दिले जात होते. अनेक इराणी महिला चाहत्यांभोवती विरोधकांनी गराडा घातला. इराणच्या ध्वजासह त्यांचे छायाचित्रही घेतले. आम्हाला सुरक्षेची चिंता वाटत आहे, अशी भावना काही इराणी महिलांनी व्यक्त केली. इराणमधील आंदोलनाच्या दरम्यान अटक करण्यात आलेल्या वोरिया घाफोरी या फुटबॉलपटूचे नाव असलेली टोपी इराणच्या एका चाहत्याने घातली होती. मात्र, ही टोपी चोरीला गेली असल्याची तक्रार त्याने केली. माहसा अमिनी या 22 वर्षीय महिलेचे इराणमधील तुरुंगात 16 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. तेव्हापासून इराणमध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरू झाले आहे. सुरुवातीस हिजाबच्या सक्तीविरोधात हे आंदोलन होते. मात्र, आता थेट सरकार हटवण्याचे लक्ष्य आहे.
इंद्रधनुषी रंगास प्रवेश
वेल्स-इराण लढतीच्या वेळी इंद्रधनुषी टोप्या, तसेच झेंड्यास परवानगी देण्यात आली. वेल्समधील समलैगिंक विवाहाचे पाठीराखे वेल्सच्या लढतीच्या वेळी इंद्रधनुषी रंगाच्या टोप्या परिधान करतात; तसेच झेंडे फडकावतात. अमेरिकेविरुद्धच्या लढतीच्या वेळी वेल्सच्या या पाठीराख्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. इंद्रधनुषी टोप्या आणि झेंडे नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. याबाबत वेल्स संघटनेने ‘फिफा’कडे तक्रार केली होती. इंद्रधनुषी टोप्या आणि झेंड्यास स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची सूचना सर्वांना केल्याचे ‘फिफा’ने कळवले असल्याचेही वेल्स संघटनेने सांगितले.
वर्ल्ड कप लढतीपूर्वी अमेरिका-इराण वाद
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिका आणि इराण यांच्यातील लढतीपूर्वीच वाद सुरू झाला. हे दोन्ही देश एकमेकांचे कडवे विरोधक. अमेरिका फुटबॉल संघाने इराणविरुद्धच्या लढतीची माहिती देताना इराणच्या राष्ट्रध्वजातील चिन्हच हटवले. अमेरिका फुटबॉल संघटनेने ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सर्व सोशल मीडियावरील इराणच्या राष्ट्रध्वजात बदल केला. इराणचा राष्ट्रध्वज केवळ हिरवा, पांढरा आणि लाल रंगात आहे. इराणमधील तुरुंगात 16 सप्टेंबर 2022 रोजी २२ वर्षीय मेहसा अमिनी या तरुणीचे निधन झाले. तेव्हापासून इराणमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात 450 जणांनी जीव गमावला आहे, तर 18 हजार जणांना पोलिसांनी अटक केल्याचा दावा होत आहे. इराण सरकारने याबाबत काहीही शेरेबाजी केलेली नाही. त्यांनी या आंदोलनामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला. इराणच्या राष्ट्रध्वजावरून वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी वाद होत आहे. वेल्सविरुद्धच्या लढतीच्या वेळी सरकारच्या पाठीराख्यांनी इस्लामिक प्रजासत्ताकची चिन्हे असलेला ध्वज फडकावला होता, तर विरोधकांनी सिंह आणि सूर्याचे चिन्ह असलेला.
बेल्जियम हरल्यानंतर नेदरलँडमध्ये दंगल
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मोरोक्कोविरुद्धच्या पराभवानंतर बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरात दंगल झाली. निराश चाहत्यांनी अनेक ठिकाणी कार, स्कूटर आणि इतर वाहनांची जाळपोळ केली. मोरोक्कोचा राष्ट्रध्वज परिधान केलेले चाहते आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. या दंगलीत बेल्जियममध्ये दोन पोलिस जायबंदी झाले, तसेच सुमारे 15 जणांना ताब्यात घेण्यात आले. निराश चाहत्यांनी वाहनांवर दगडफेक केली. स्फोटक परिस्थिती टाळण्यासाठी सबवे, तसेच ट्राम थांबवण्यात आल्या होत्या. बेल्जियमप्रमाणेच नेदरलँडमध्येही दंगल झाली. सुमारे पाचशे जणांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या. बेल्जियम, तसेच नेदरलँडमध्ये मोरोक्कोतील अनेक स्थलांतरित आहेत. त्यांनी मोरोक्कोच्या विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केल्यामुळे परिस्थिती चिघळल्याचे पोलिसांनी सांगितले.
कतारचा स्पेनला पाठिंबा
अल् खोर (कतार) : स्पेन आणि जर्मन यांच्यातील लढतीत कतारच्या चाहत्यांनी स्पेनला पाठिंबा दिला. त्याला कारण म्हणजे जर्मनीचे चाहते कतारच्या कायद्यांची खिल्ली उडवत होते. त्याचबरोबर जर्मनीच्या चाहत्यांनी समलैंगिकतेचे समर्थन केले होते. त्याला विरोध म्हणून कतारचे चाहते जर्मनीचा माजी खेळाडू मेसत झिलचे फोटो घेऊन आले होते. त्यांनी तोंडावर हात ठेवून जर्मनीचा विरोध केला.
उंटाचा ओव्हरटाइम
कतार : फुटबॉल वर्ल्ड कपच्या निमित्ताने कतारमध्ये लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. फुटबॉल लढतींचा आनंद घेण्याबरोबरच हे चाहते कतारमध्ये भटकंती करीत आहेत. यात उंट सफारीचा आनंद घेण्यात पर्यटकांचा भर दिसत आहे. यामुळे येथील उंटांना ओव्हरटाइम करावा लागत आहे. कतारमधील पारंपरिक पोशाख घालणे, वाळवंटात फिरणे, पक्षी हातावर घेऊन फोटो काढणे आणि कतारमधील गल्लीबोळांमध्ये फिरण्यावर पर्यटकांचा भर होता.
फुटबॉलमुळे अरब चाहत्यांमध्ये एकजूट
सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाला दिलेला पराभवाचा अनपेक्षित धक्का, मोरोक्कोने क्रोएशियाला बरोबरीत रोखताना पुढील लढतीत जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेल्जियमला पराभूत केले. अरब संघांचे हे दखल घेण्याजोगे यश या संघांच्या पाठीराख्यांनाही मनाने एकजूट केले. त्यात वर्ल्ड कपचे यजमानपद कतारकडे असल्याने आखाती देशांच्या पाठीराख्यांचा आनंद दुप्पट झाला. सध्या सौदी आणि मोरोक्को या दोन्ही संघांचे अखेरचे गटसाखळी सामने शिल्लक होते. अशा वेळी त्यांना बाद फेरीचीही संधी होती. इतिहास घडवण्याच्या या संधीमुळे दोहामधील अरब समर्थकांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली.
दारू नाही! पर्वा नाही
दोहा : यंदाचा फिफा वर्ल्ड कप हा जवळपास मद्याविना रंगणारा फुटबॉल वर्ल्ड कप ठरला. मद्यपान आणि दारूविक्री याबाबत यजमान कतारने आपले धोरण स्पर्धेच्या दोन दिवसआधीच जाहीर केले होते. मुस्लिम देश असल्याने त्यांचे मद्याबाबतचे असे धोरण साहजिकच आहे. मात्र या निर्णयावर आधी नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांचा विरोधही आता मावळत असून, मद्याविना वर्ल्ड कप ही संकल्पना त्यांनी मानाने स्वीकारली. स्टेडियममधील खास ठिकाणी आणि शहरांतील ठराविक जागी अल्कोहलचे प्रमाण नसणारी बीअर उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते. यामुळे पाठीराख्यांनी बीअर, मद्याविनाच सामन्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. जर्मनीचा समर्थक ख्रिस्तियन कॉपातश यांने दिलेल्या माहितीनुसार जर्मनीतीही बऱ्याचदा सामन्यांदरम्यान दारूबंदीचे फर्मान काढण्यात येते. दारूच्या नशेमुळे पाठीराखे हिंसक होऊ शकतात. त्यामुळे जर्मनीही काही वेळेस स्टेडियममध्ये दारूबंदी जाहीर करते. त्यामुळेच मेक्सिको-अर्जेंटिना लढतीनंतर झालेले बाचाबाचीचे किरकोळ प्रसंग वगळता कतारमध्ये सारे काही आलबेल आहे.
अमेरिकेच्या विजयाने इराणमध्येही जल्लोष
तेहरान ः इराणवरील अमेरिकेच्या विजयाचा आनंद साजरा करणारा तरुण, पोलिस गोळीबारात ठार झाल्याचे वृत्त आहे. इराणचा पराभव म्हणजे इराण सरकारचे अपयश आहे, असे मानून सरकार विरोधकांनी अमेरिकेचा विजय साजरा केला. उत्तर इराणमध्ये अमेरिकेने विजय मिळवल्यानंतर अनेक तरुणांनी रस्त्यावर येत कारचे हॉर्न वाजवले होते, तसेच जल्लोष व्यक्त केला होता. याच जल्लोषात सहभागी झालेला 27 वर्षीय मेहरान सामक याला गोळी घालून ठार केल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला. सामकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी सरकारचे विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला; तसेच एका महिलेस मारहाण केल्याचा दावा होत आहे.
फ्रॅपार्ट पहिल्या महिला
अल् खोर (कतार) : कोस्टा रिका आणि जर्मनी यांच्यात एक डिसेंबरला अल् बायत स्टेडियममधील रंगणारी लढत ऐतिहासिक ठरली. याला कारण म्हणजे या लढतीत फ्रान्सच्या स्टिफानी फ्रॅपार्ट यांनी रेफ्री म्हणून काम पाहिले. पुरुषांच्या वर्ल्ड कपमधील त्या पहिल्या महिला रेफ्री ठरणार आहेत. लीग-1 आणि चॅम्पियन्स लीगमध्येही रेफ्री म्हणून मैदानात उतरल्यावर फ्रॅपार्ट यांनी इतिहास रचला होता. या लढतीत त्यांच्या साथीला ब्राझीलच्या नेयूझा बॅक आणि मेक्सिकोच्या कारेन डिझ मेडिना या दोन महिला सहाय्यक रेफ्री असतील.
‘साहित्यबंदी नाही’
इंद्रधनुष्याचे चित्र असलेल्या वस्तू, बॅनर ध्वज आता चाहत्यांना स्टेडियममध्ये आणण्याची परवानगी जागतिक फुटबॉल महासंघाने दिली आहे. सुरुवातीला या वस्तूंना मैदानात आणण्याची बंदी होती. मात्र, वेस्ल आणि इराणचे आव्हान स्पर्धेत संपुष्टात आल्यानंतर ही बंदी उठविण्यात आली आहे. समलैंगिक संबंधांना कतारमध्ये विरोध आहे. त्यासाठी या वस्तू मैदानात आणल्या जात होत्या. वेल्स या विरोधात आघाडीवर होते.
गोलरक्षकावर शिस्तभंगाची कारवाई
कॅमेरूनचा गोलरक्षक आंद्रे ओनान याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. ओनानला तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, मायदेशी पाठविण्यात आले. ओनान आणि रिगोबेर्ट साँग यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. ओनानला स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत संधी दिली होती. मात्र, सर्बियाविरुद्धच्या लढतीतून त्याला वगळण्यात आले होते. ही लढत सर्बियाने पिछाडीवरून 3-3 अशी बरोबरीत सोडविली होती.
गुडघ्यावर बसून निषेध
वर्णद्वेषाच्या विरोधात आम्ही एक आहोत हे दाखविण्यासाठी गटातील अखेरच्या लढतीपूर्वी इंग्लंड आणि वेल्सच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून निषेध व्यक्त केला. समलैंगिक संबंधांना विरोध असल्याने यजमान कतारवर टीका झाली. त्याला विरोध म्हणून काही युरोपीय फुटबॉल संघाचे कर्णधार ‘वन लव्ह आर्मबँड’ बांधणार होते. मात्र, फिफाने कारवाईची धमकी दिल्याने ही योजना मागे घेण्यात आली. मात्र, हा विरोध इतर मार्गाने सुरूच आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट म्हणाले, ‘आम्ही गटातील तिन्ही लढतींत अशा प्रकारचा निषेध केला. वेल्सने प्रथमच असे केले.’
पेलेंनी बघितली रुग्णालयातून लढत
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते रुग्णालयात आहेत. 82 वर्षीय पेले यांनी रुग्णालयातूनच ब्राझील-दक्षिण कोरिया यांच्यातील फुटबॉल वर्ल्ड कपची लढत बघितली. ‘1958 मध्ये मी वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या विचारात रस्त्यावर चालत होतो. मला माहिती आहे, आजही अनेकांनी अशाच प्रकारचे वचन दिले असेल आणि ते वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा करीत असतील. मी लढत रुग्णालयातून बघणार आहे,’ असे ट्वीट त्यांनी केले होते. यासाठी त्यांनी ते 17 वर्षांचे असतानाचा फोटो जोडला आहे.
पराभवानंतरही जपानचे स्वच्छतेचे धडे
जपानचे फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले; पण त्यांच्या चाहत्यांत मोठी वाढ झाली आहे. त्याला कारण म्हणजे एक तर त्यांनी मैदानात दाखविलेला खेळ आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेले स्वच्छतेचे धडे. पराभवानंतरही जपानने आपली ही स्वच्छता मोहीम कायम राखली. जपान संघाने नेहमीप्रमाणे ड्रेसिंग रूम सोडताना ती स्वच्छ केली होती. त्याच वेळी जपानच्या पाठीराख्यांनी कचरा पूर्ण उचलून स्टेडियम स्वच्छ केले होते. जर्मनी संघाला पराभूत केल्यानंतर जपानचे चाहते; तसेच संघ बेभान झाले होते. मात्र, त्यांना आपल्या स्वच्छतेच्या संस्कृतीचा विसर पडला नव्हता. जर्मनीविरुद्धच्या सामन्यानंतर जपान संघ बाहेर पडला, त्या वेळी या ड्रेसिंग रूमचा कोणी वापरही केला नसेल, असेच वाटत होते. केवळ ‘आभारी आहोत,’ या अर्थाचा अरबी भाषेतील संदेशाचा एक कागदच तिथे होता. ‘फिफा’ने त्या ड्रेसिंग रूमचे छायाचित्र ट्वीट केले होते. क्रोएशियाविरुद्धच्या पराभवानंतरही काही वेगळे घडले नाही. क्रोएशियाविरुद्ध पूर्वार्धात जपानने आघाडी घेतली होती. ‘वार’ची साथ लाभली असती, तर जिंकूही शकलो असतो, अशी जपानच्या पाठीराख्यांची खात्री होती. पेनल्टी शूटआउटवर आपला संघ पराभूत झाला. त्यामुळे ते निराश झाले; पण ते आपली शिकवण विसरले नाहीत. त्यांनी स्टेडियमवरील सर्व कचरा काळ्या बॅगेत भरून तो बाहेर नेला होता. याकडे लक्ष वेधल्यावर ते फक्त एकच शब्द उच्चारतात, ‘आतारीमाए’! या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे अवघड आहे; पण त्यातून ध्वनीत होते, हे आम्ही करणे अपेक्षितच आहे, ते आमच्या रक्तातच आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे पाहून ते जगाचे लक्ष वेधण्यासाठी हे करीत आहेत, असे विचारही मनात येत नाहीत. या ‘आतारीमाए’ मंत्रामुळेच कमालीची गर्दी असूनही जपानमधील महानगरे स्वच्छ आहेत.
शाळेपासूनच शिकवण
जपानमधील शाळेमध्ये स्वच्छता सेवक नसतात. तेथील विद्यार्थीच हे काम करतात. माँटेसरीपासूनच स्वच्छता ठेवण्याचे कौशल्य मुलांच्या अंगी बाणवण्यात येते. आपण केलेला कचरा त्यासाठी नियुक्त व्यक्ती साफ करील, असा विचारही जपानी व्यक्तींच्या मनात येत नाही. जपानी चाहते हे अनेक स्पर्धेच्या वेळी करताना दिसतात. कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यास अपवाद नाही.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=gam4t7fdHvU”] [jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1814″]