All SportsTokyo Olympic 2020

मीराबाई चानूला मल्लेश्वरीचा कित्ता गिरवण्याची सुवर्णसंधी

जागतिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग (भारतोलन) क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी कर्णम मल्लेश्वरी एकमेव भारतीय खेळाडू आहे. आता मीराबाई चानूला ऑलिम्पिक पदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

मीराबाई चानूच्या नावावर क्लीन अँड जर्कमध्ये विश्वविक्रम आहे. मीराबाई 49 किलो वजनगटात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची ती प्रबळ दावेदार मानली जात आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे वेटलिफ्टिंगमध्ये सहभागी होणारी ती एकमेव महिला आहे.

मल्लेश्वरीने ऑलिम्पिक पदक जिंकून आता दोन दशके उलटली आहेत. तिने 19 सप्टेंबर 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये 69 किलो वजनगटात कांस्यपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये 110 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 130 किलो वजन उचलले होते. या कामगिरीमुळे मल्लेश्वरी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला, तसेच एकमेव वेटलिफ्टर ठरली. त्या वेळी वेटलिफ्टिंगचा पहिल्यांदाच महिला गटात समावेश करण्यात आला होता.

2017 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये विश्वविजेती असलेली मीराबाई चानू हिने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या रँकिंगच्या आधारे ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. ती ऑलिम्पिक पात्रता रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली. तसं पाहिलं तर मीराबाई रँकिंगमध्ये चीनची हाउ झीहुई आणि जियांग हुईहुआ, तसेच उत्तर कोरियाची री सोंग गुम हिच्यानंतर चौथ्या स्थानावर होती. मात्र, उत्तर कोरियाने ऑलिम्पिकमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एक देश एक खेळाडू’ ही चीनची भूमिका आहे. त्यामुळे चीनच्या झीहुई हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले, पण हुईहुआ हिला बाहेर राहावे लागणार आहे. त्याचा फायदा मीराबाईला मिळाला. ती चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आली.

महिलांमध्ये 49 किलो वजनगटात मीराबाईपेक्षा जास्त वजन फक्त चीनची झीहुई हीच उचलू शकलेली आहे. त्यामुळे मीराबाईला आव्हान देणारी झीहुई ही एकमेव वेटलिफ्टर आहे. अर्थात, ऑलिम्पिकध्ये काहीही होऊ शकते. तूर्तास वस्तुस्थिती पाहता मीराबाई ऑलिम्पिक पदकाची प्रबळ दावेदार आहे. झीहुई हिची सर्वोत्तम कामगिरी 213 किलोग्रॅम आहे. मीराबाईने एप्रिल 2021 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्लीन अँड जर्कमध्ये विश्वविक्रमी 119 किलो आणि स्नॅचमध्ये 86 किलोसह एकूण 205 किलो वजन उचलले होते. या दरम्यान तिने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला होता. मीराबाईची ही दुसरी ऑलिम्पिकवारी आहे. यापूर्वी ती रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. मात्र रिकाम्या हाताने भारतात परतली. रियो ऑलिम्पिकमध्ये ती 48 किलो वजनगटात सहभागी झाली होती. क्लीन अँड जर्कमध्ये तीन प्रयत्नांत वजन उचलण्यात ती अपयशी ठरल्याने तिला पदकापासून वंचित राहावे लागले. सध्या ती अमेरिकेत सराव करीत आहे.

ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगचा इतिहास

ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंगचा इतिहास पाहिला तर 1896 च्या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकपासून हा खेळ खेळला जात आहे. मात्र वेटलिफ्टिंग हा खेळ तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. 1900, 1908 आणि 1912 या तीन ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगला वगळण्यात आलं. भारताने या खेळात आतापर्यंत फक्त एक कांस्यपदक जिंकू शकला. भारताची या खेळातली कामगिरी तशी निराशाजनकच म्हणावी लागेल. मल्लेश्वरीचा अपवाद वगळता एकाही वेटलिफ्टरला खेळांच्या महाकुंभात पदक जिंकता आलेले नाही. कुंजरानी देवीने भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 48 किलो वजनगटात कुजरानी चौथ्या स्थानावर राहिली. पदकाच्या जवळ पोहोचूनही तिला ते जिंकता आलं नाही. सनामाचा चानू या खेळाडूनेही चौथे स्थान मिळवले होते. मात्र उत्तेजक द्रव चाचणीत ती पॉझिटिव्ह आढळल्याने तिला बाद करण्यात आले. मल्लेश्वरीनेही 63 किलो वजनगटात आव्हान दिले होते. मात्र, दुखापतीमुळे तिला स्पर्धा अर्ध्यावरच सोडावी लागली. डोपिंग प्रकरणामुळे भारताला खाली मान घालावी लागली. 2006 मध्ये याच डोपिंग प्रकरणामुळे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकाही भारतीय वेटलिफ्टरला सहभागी होता आलं नाही. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूसह सतीश शिवलिंगम यानेही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुरुष गटात 77 किलो वजनगटात सतीश 11 व्या स्थानी राहिला. पदकाच्या जवळपासही तो फिरकला नाही.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय वेटलिफ्टिंग

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाची स्थापना 1935 मध्ये झाली. बिजॉय चंद मेहताब हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते. ऑलिम्पिकमध्ये भारतीय वेटलिफ्टिंगचा सहभाग तसा नगण्यच राहिला. ऑलिम्पिकमध्ये यू जॉव वीक या भारतीय वेटलिफ्टरने पहिल्यांदा भाग घेतला होता. तो मूळचा बर्माचा (म्यानमार). 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्याने सहभाग घेतला होता. मात्र, मूळ भारतीय वेटलिफ्टरचा पहिला ऑलिम्पिक सहभाग म्हणायचा झाला तर तो 1948 चा. दंदामुंदी राजगोपाल यांनी 1948 च्या लंडन ऑलिम्पिकबरोबरच 1952 हेलसिंकी, 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय वेटलिफ्टिंगची सुरुवातीची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. 1948 लंडन ऑलिम्पिक, 1952 ची हेलसिंकी ऑलिम्पिक, 1956 ची मेलबर्न ऑलिम्पिक, 1960 रोम ऑलिम्पिक, 1964 ची टोकियो ऑलिम्पिक, 1968 ची मेक्सिको ऑलिम्पिक आणि 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारतीय वेटलिफ्टरना पहिल्या दहा क्रमांकातही स्थान मिळवता आले नाही. 1976 माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये एक आणि 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये दोन वेटलिफ्टरने भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र हे सर्व वेटलिफ्टर आपल्या गटात वजन उचलण्यात अपयशी ठरले. मात्र 1984 ची लॉस एंजिल्स ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टरसाठी किमान समाधानकारक ठरली. कारण या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भारताने पहिल्या 10 क्रमांकात स्थान मिळवले. महेंद्रन कन्नन याने पुरुष गटातील 52 किलो वजनगटात, तर देवेन गोविंदसामी याने 56 किलो वजनगटात 10 वा क्रमांक मिळविला. 1988 च्या सिओल ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच एकाच वजनगटात दोन खेळाडू पाठवले. गुरुनाथन मुथुस्वामी आणि राघवन चंद्रशेखरन 52 किलो वजनगटात अनुक्रमे 11 वे आणि 19 वे स्थान मिळवले. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये बी. अधिशेखर याने 52 किलो वजनगटात 10 वे स्थान मिळवले. पोनुस्वामीला मात्र 56 किलो वजनगटात 18 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिल्या वेटलिफ्टिंगचं मोठं पथक पाठवलं. मात्र, एकालाही पदक मिळवता आलं नाही. मात्र, त्यातल्या त्यात राघवन चंद्रशेखरन याची कामगिरी सर्वोत्तम म्हणावी लागेल. त्याने पुरुषांच्या 59 किलो वजनगटात 11 वे स्थान मिळविले. सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीबरोबरच सनामाचा चानूने 53 किलो आणि टीएम मुथूने 56 किलो गटात सहभाग घेतला. चानूला सहाव्या, तर मुथूला 16 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात रवी कुमार आणि महिला गटात सोनिया चानू हिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. ते अनुक्रमे 15 व्या आणि सातव्या स्थानी राहिले.

 

ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक भारतीय वेटलिफ्टिंग

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!