टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदक जिंकणार का?
भारतीय बॅडमिंटन साधणार का ऑलिम्पिक पदकांची हॅटट्रिक?
Tokyo Olympics India medal | साईना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली. त्यांचा हा पदकांचा प्रवास पुढे नेण्यासाठी नव्या उमेदीने भारतीय बॅडमिंटन संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे. यात भारताने बॅडमिंटनमध्ये पदक जिंकलं तर ती ऑलिम्पिकमधील पदकांची हॅटट्रिक ठरेल.
बॅडमिंटन स्टार अर्थात ‘फुलराणी’ साईना नेहवालने जवळपास नऊ वर्षांपूर्वी चार ऑगस्ट 2012 रोजी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. हे पदक ‘भारतीय बॅडमिंटन’साठी ऐतिहासिक ठरले. भारतीय बॅडमिंटनसाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्याच्या चार वर्षांनी रियो ऑलिम्पिक पी. व्ही. सिंधूने यादगार बनवले. पी व्ही सिंधूने 19 ऑगस्ट 2016 रोजी रौप्यपदक जिंकले. सिंधूला अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभूत व्हावे लागले होते.
सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताने पाचपैकी चार प्रकारांत बॅडमिंटनमध्ये आव्हान दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना फक्त तीन प्रकारांत पात्रता सिद्ध करता आली. साईना नेहवालला जागतिक क्रमवारीतील घसरणीमुळे ऑलिम्पिकमध्ये पात्रता सिद्ध करता आलेली नाही. अन्यथा तिची ही चौथी ऑलिम्पिकवारी ठरली असती.
भारताची मदार या वेळीही पी. व्ही. सिंधूवरच असेल. तिने 2019 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्येही तिने महिला एकेरीचे रौप्यपदक मिळविले आहे. त्यामुळेच टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिला पदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. पुरुष एकेरीत आव्हान कठीण आहे. मात्र, 2019 च्या जागतिक स्पर्धेत साईप्रणीतने कांस्यपदक मिळविले आहे. त्यामुळे त्याच्यावरही भारतीयांच्या अपेक्षा खिळलेल्या असतील.
पुरुष दुहेरीत आपली नेहमीचीच सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक क्रमवारीत ही भारतीय जोडी दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल देण्यात ही जोडी कोणतीही कसर सोडणार नाही.
रियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पी व्ही सिंधू आणि कॅरोलिना मरिन यांच्यात कडवी लढत पाहायला मिळाली होती. यात सिंधूला 21-19, 12-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला होता. असे असले तरी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली. आधी साईनाने कांस्य, नंतर सिंधूने रौप्य, आता आणखी एक पाऊल पुढे टाकत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्यानेच सिंधू खेळेल.
पुरुष गटाचा विचार केला तर साईप्रणीतने 2019 च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आपला करिष्मा दाखवला आहे. त्याची ही कामगिरीच सांगते, की तो जगातील कोणत्याही खेळाडूला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. साईप्रणीतचं लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं असेल. असं झालं तर तो पुरुष बॅडमिंटनमधला पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल.
‘भारतीय बॅडमिंटन’चा ऑलिम्पिक प्रवास
Tokyo Olympics India medal | ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनचा ऑलिम्पिक प्रवास 1992 पासूनचा. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये दीपांकर भट्टाचार्य, विमल कुमार आणि मधुमिता बिष्ट यांनी पहिल्यांदा भारतीय बॅडमिंटनचं प्रतिनिधित्व केलं. दीपांकर यांनी बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, या फेरीत त्यांना त्यावेळचा जागतिक विजेता झाओ जियानहुआ याच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मधुमिता बिष्ट यांनी सुरुवात तर दमदार केली होती. त्यांनी पहिल्याच फेरीत आइसलँडची एल्सा नीलसन हिच्याविरुद्ध सहज विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या जोआन मुगेरिजने त्यांचा पराभव केला. विमल कुमार यांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. डेनमार्कचे थॉमस स्टुए लॉरिडसेन यांनी त्यांच्यावर विजय मिळविला. दीपांकर भट्टाचार्य आणि विमल कुमार या भारतीय जोडीलाही फारशी कमाल करता आली नाही. ही जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली.
अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटन
बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये भारताची झोळी रिकामीच राहिली. त्यानंतरच्या 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये दीपांकर आणि पीव्हीव्ही लक्ष्मी यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत दुसऱ्या फेरीतच पराभूत झाले. त्यानंतर 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची आशा होती. या ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं पुल्लेला गोपिचंद आणि अपर्णा पोपट यांनी. पी. गोपिचंद सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत. अपर्णाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. गोपिचंदने सुरुवात चांगली केली. त्याने पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्या. मात्र, तिसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या हेंद्रावान याच्याविरुद्ध 9-15, 4-15 अशा सरळ सेटमध्ये पराभूत व्हावं लागलं. हेंद्रावानने नंतर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं.
1996 ते 2004 या काळात ‘भारतीय बॅडमिंटन’चा ऑलिम्पिक प्रवास यथातथाच
Tokyo Olympics India medal | 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत अभिन्न श्याम गुप्ता आणि निखिल कानिटकर, तर महिला एकेरीत अपर्णा पोपटने भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, हे तिन्ही खेळाडू पदकाच्या जवळपासही जाऊ शकले नाहीत. 1996 ते 2004 या काळात ‘भारतीय बॅडमिंटन’चा ऑलिम्पिक प्रवास यथातथाच राहिला. पदकांची झोळी रिकामीच होती. मात्र, 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये साईना नेहवालच्या रूपाने भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या. साईनाचं हे पहिलंच ऑलिम्पिक पदार्पण होतं. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत तिने भारतीयांना पदकाचं स्वप्न दाखवलं. अंतिम आठच्या लढतीत तिच्यासमोर इंडोनेशियाच्या मारिया क्रिस्टीन युलियांती हिचं आव्हान होतं. यात साईनाने पहिलाच गेम जिंकत आपले इरादे स्पष्ट केले. भारतीय गोटातही उत्साहाचे वातावरण होते. मात्र, पुढच्या दोन सेटमध्ये तिची कामगिरी खालावली. अखेर 28-26, 14-21, 15-21 अशा पराभवास तिला सामोरे जावे लागले. पुन्हा एकदा भारताचं स्वप्न भंगलं. पुरुष एकेरीत अनुप श्रीधरलाही विशेष छाप पाडता आली नाही. त्याला दुसऱ्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
लंडन ऑलिम्पिक भारतीय बॅडमिंटनसाठी खास
पुढचं ऑलिम्पिक मात्र भारतासाठी खास ठरलं. हे 2008 चं लंडन ऑलिम्पिक होतं. याच सुमारास भारतीय बॅडमिंटनची प्रगती डोळ्यांत भरणारी होती. भारताने या वेळी प्रथमच चार गटांत आव्हान दिलं होतं. साईनाने महिला एकेरीत में कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यपने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळवलं. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा, तसेच मिश्र दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि व्ही. दीजू या दोन जोड्यांना गटातूनच बाहेर पडता आलं नाही. उपांत्य फेरीत चीनची अव्वल बॅडमिंटनपटू यिहान वँग हिने साईनाचे आव्हान 13-21, 13-21 असे सहज मोडीत काढले. त्यामुळे साईनाला कांस्य पदकासाठीच झुंजावे लागणार होते. या प्ले ऑफच्या लढतीत तिच्यासमोर द्वितीय मानांकित चीनच्या शिन वँगचं आव्हान होतं. साईनाला पहिला गेम 18-21 असा गमवावा लागला. त्यामुळे ही लढत सोपी नाही, हे साईनाला कळून चुकले असेल. दुसरा गेम सुरू झाला. पहिला गुण वसूल केल्यानंतर चिनी खेळाडू पायाच्या दुखापतीसमोर हतबल ठरली. तिला पुढे खेळणे शक्यच नव्हते. अखेर तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि साईनाने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूवर आशा
रियो ऑलिम्पिकमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा, महिला एकेरीत साईना आणि पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांना गटातून बाहेर पडताच आलं नाही. हे खेळाडू पदक मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर सर्वांचे लक्ष सिंधूच्या कामगिरीकडे लागले. तिनेही चाहत्यांना निराश केले नाही आणि अंतिम फेरीत पोहोचली. ही कामगिरीही ऐतिहासिकच होती. कारण भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात प्रथमच भारतीय खेळाडूने अंतिम फेरीत धडक मारली होती. सिंधूला अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला. सुवर्णपदकाचं तिचं स्वप्र भंगलं असलं, तरी टोकियोत ती स्वप्नपूर्ती नक्कीच करील. सिंधूला ‘खेळियाड’तर्फे शुभेच्छा.
One Comment