All SportsCricketsports newsYuvraj Singh

युवराजची माफी आणि वादग्रस्त विधानांची मालिका…

M. +91 80875 64549
     www.linkedin.com/in/maheshpathade03    


भारताचा माजी क्रिकेटपटू युवराजसिंगने इन्स्टाग्रामवर एका चॅटदरम्यान युजवेंद्र चहलविरुद्ध जातिवाचक टिप्पणी केली होती. यानंतर सोशल मीडियावर युवराजला ट्रोल करण्यात आलं. त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर युवराजने सोशल मीडियावर माफी मागितली.
माझ्याकडून ‘अनवधाना’ने लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे त्याने म्हंटले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासोबत तो लाइव्ह इन्स्टा चॅट करीत असताना युवराजने चहलविषयी अपमानजनक शब्द उच्चारले होते. चहल सोशल मीडियावर नेहमी पोस्ट टाकत असतो. त्यावर या चॅटदरम्यान चर्चा सुरू होती. त्या वेळी युवराजने चहलविषयी जातिवाचक शब्द उच्चारले होते. युवराजबाबत ही नवी घटना नाही. यापूर्वीही त्याच्या वादग्रस्त विधानांनी तो चर्चेत आला होता. या वेळी मात्र त्याला माफी मागण्याची नौबत आली एवढेच…
अर्थात, त्या वेळी यावर कोणाचेही लक्ष गेले नाही. मात्र, काही वेळाने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी युवराजच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका सुरू केली. एवढेच नाही, तर ‘युवराज सिंह माफी मांगो’ ट्रेंडही सुरू झाला. हे प्रकरण इतकं वाढलं, की हरियाणात त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एक दलित अधिकार कार्यकर्ता आणि वकील रजत कल्सन यांनी या प्रकरणावरून युवराजविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत नमूद केले आहे, की सोशल मीडियावर सोमवारी, १ जून २०२० रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत रोहित शर्माशी चर्चा करताना युवराजने जातिवाचक टिप्पणी करताना दिसत आहे. या टिप्पणीमुळे संपूर्ण देशातील दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर युवराजने ट्विटरवर माफी मागितली. तो म्हणाला, ‘‘मी समजू शकतो, की आम्हा मित्रांमधील चर्चेदरम्यान मला चुकीचं ठरवलं गेलं. मी एक जबाबदार भारतीय असून, मला एवढंच सांगायचं आहे, की जर कोणाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माफी मागतो.’’
भारतासाठी 304 वनडे, 58 टी-20 आणि 40 कसोटी सामने खेळलेल्या युवराजने सांगितले, की माझा कोणत्याही पक्षपातीपणावर विश्वास नाही. तो म्हणाला, ‘‘मी स्पष्ट करू इच्छितो, की मी कधीच लिंग, जाती, रंग, वर्णाच्या आधारावरील पक्षपातीपणावर विश्वास ठेवत नाही. मी माझं जीवन लोकांच्या चांगल्यासाठीच दिलं आहे आणि पुढेही देत राहीन. मला वाटतं, की आपण सर्वांचा सन्मान केला पाहिजे. भारत आणि भारतीयांवर माझं प्रेम असीम आहे.’’
आता युवराजने सार्वजनिक रूपात सगळ्यांची माफी मागितल्याने आशा आहे, की तो कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही. सध्या अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर वर्णभेद आणि जातिभेदाने आधीच जगात असंतोष व्यक्त होत आहे. त्यात आणखी भर नको म्हणून युवराजने माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या युवराज आणि रोहित शर्मा हे सूत चांगलंच जुळलेलं दिसतंय. कारण यापूर्वीही एप्रिलमध्ये इन्स्टाग्रामवर या दोघांमध्ये अशीच चर्चा रंगली होती. त्या वेळीही त्याने काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

धोनी कोहलीवरही वादग्रस्त वक्तव्ये


तसंही युवराज आणि वाद हे समीकरणच झालं आहे. एप्रिल २०२० मध्ये त्याची दोन वादग्रस्त वक्तव्ये आली आहेत, ज्यातून त्याने भारतीय संघसंस्कृतीवरच हल्ला चढवला होता. या वक्तव्यांचा एकूणच रोख महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि निवड समितीवर अधिक आहे. काय आहेत ही वक्तव्ये आणि काय आहे या वक्तव्यांमागील युवराजच्या मनातली खदखद…

८ एप्रिल ः सध्याच्या भारतीय संघात एकही आदर्श खेळाडू नाही.


१९ एप्रिल ः सुरेश रैना महेंद्रसिंह धोनीचा जवळचा खेळाडू होता.


 

एकाच महिन्यातील युवराजची ही दोन वक्तव्ये. तसं पाहिलं तर ही दोन्ही वक्तव्ये वैयक्तिक मत म्हणून कोणीही गांभीर्याने घेतलेली नाहीत. अपवाद फक्त गौतम गंभीरचा. आपल्या फलंदाजीतल्या शैलीप्रमाणे युवराजने पहिला चेंडू हलक्या हाताने तडकवला आहे. एकदा अंदाज आल्यानंतर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून खेळपट्टी दणाणून सोडावी, तसंच त्याच्या या वक्तव्यांकडेही पाहता येईल.

सध्याच्या भारतीय संघात एकही आदर्श खेळाडू नाही, हे त्याचं वक्तव्य अशा वेळी आलं, ज्या वेळी महेंद्रसिंह धोनीवर संघात परतण्याविषयी अनिश्चिततेचे ढग दाटलेले आहेत, तर संपूर्ण संघाची कमान आता विराट कोहलीकडे आली आहेत. पस्तिशीनंतर युवराजला मैदानातच क्रिकेटला गुडबाय करायचा होता. त्यासाठी फिटनेसची परीक्षा मानली जाणारी यो-यो yo yo | चाचणीही यशस्वीपणे पूर्ण करीत त्याने २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची दारे ठोठावली होती. मात्र, त्याला संघात स्थान मिळाले नाही. जवळपास दोन वर्षे झुलवत ठेवल्यानंतर अखेर त्याने १० जून २०१९ रोजी क्रिकेटला कायमचा अलविदा केला. त्याला वाटत होते, की महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीने जर सपोर्ट केला असता तर संघात स्थान मिळू शकलं असतं. उत्तम फॉर्म असूनही या दोघांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, ही बाब त्याला अधिक सलत असावी आणि या वक्तव्यात त्याने अप्रत्यक्षरीत्या धोनी आणि कोहलीवरच निशाणा साधलेला आहे हे क्रिकेटच्या जाणकारांनी वेळीच ताडलेही असावे. मात्र, त्यावर उघडपणे कोणीही बोलले नाही. अपवाद फक्त गौतम गंभीरचा होता. अर्थात, गंभीरला कोणीही गंभीरपणे घेत नाही. अधूनमधून शाहीद आफ्रिदी त्याला डिवचत असतो हा भाग निराळा. आफ्रिदीने आपल्या गेम चेंजर या आत्मकथेत गंभीरला घमंडी म्हंटलं होतं. गंभीर तसा गंभीरच दिसतो. मात्र, गंभीरला तशीही स्वतःची अशी मतं नाहीत. त्याने युवराजच्या वक्तव्याची पाठराखण केली एवढेच. मात्र, युवराजने आपल्या वक्तव्यातून भारतीय संघसंस्कृतीवरच हल्ला चढवला होता. युवराजचं हे वक्तव्य एका इन्स्टाग्रामवर रोहित शर्माशी केलेल्या चर्चेतून बाहेर आलं होतं.
युवराज इन्स्टाग्रामवर रोहित शर्माला म्हणाला, की संघात खूप कमी रोल मॉडेल आहेत आणि तरुण खेळाडू वरिष्ठ खेळाडूंचा फारसा सन्मान करीत नाहीत.
रोहित शर्माने त्याला विचारले, की ‘‘सध्याच्या व तुझ्या काळातील संघात काय फरक वाटतो?’’
युवराजच्या अगदी मनातला प्रश्न रोहितने विचारला असावा.
आता कुठे असं काही राहिलंय? आता संघात रोल मॉडेलही कुणी नाही. वरिष्ठांचा मान राखला जात नाही. कुणीही कुणाला काहीही बोलतं… – युवराज
‘‘जेव्हा मी, तसेच तू संघात आला तेव्हा वरिष्ठ खेळाडूंमध्ये खूप शिस्त होती. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे लक्षही विचलित होत नव्हतं. आपल्या वर्तनाची विशेष काळजी घ्यावी लागायची. आता कुठे असं काही राहिलंय? आता संघात रोल मॉडेलही कुणी नाही. वरिष्ठांचा मान राखला जात नाही. कुणीही कुणाला काहीही बोलतं…’’ – इति युवराज.
एकूणच या अनौपचारिक गप्पांची बातमी झाली नि युवराज चर्चेत आला. अर्थात, आता या वक्तव्याचा युवराजला काहीही उपयोग होणार नाही. कारण त्याची फलंदाजीतली जादूही ओसरत चालली होती. केवळ हेच कारण होतं, की युवराज संघात स्थान मिळवू शकला नाही. अर्थात, चर्चा तर होणारच. हे वक्तव्य विरते न विरते तोच युवराजने धोनीच्या पक्षपातीपणावर हल्ला चढवला.
प्रत्येक कर्णधाराचा जवळचा एक तरी खेळाडू असतो, तसा धोनीचा जवळचा खेळाडू सुरेश रैना होता, असे वक्तव्य युवराजने केले आणि भारतीय संघात सगळंच काही आलबेल नव्हतं हेही या निमित्ताने समोर आलं. या वक्तव्याच्या पुष्ट्यर्थ त्याने एक प्रसंग सांगितला. 2011 च्या वर्ल्ड कपच्या वेळी धोनीला अंतिम अकरा जणांच्या संघात तीन खेळाडूंतून दोन खेळाडू निवडायचे होते. त्याच्यासमोर माझ्यासह युसूफ पठाण आणि सुरेश रैना असे पर्याय होते. त्यामुळे तिघांपैकी एकाचा पत्ता कटणार होता. त्या वेळी रैनाची निवड पक्की मानली गेली होती. कारण त्याला धोनीचं विशेष समर्थन होतं. अखेर या तीन खेळाडूंमधून सुरेश रैना आणि युसूफ पठाणची निवड झाली. मात्र, नंतर काय कुणास ठाऊक, पण युसूफ पठाणला स्पर्धेदरम्यानच अंतिम अकरातून वगळले आणि माझी वर्णी लागली. युवराजचा हा प्रसंग बरंच काही सांगून जातो. कदाचित युवराजला तेव्हापासून धोनीविषयी एक अढी निर्माण झाली असावी. अर्थात, युवराजने आपली निवड सार्थ ठरवत भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली. मुळात युवराजला रैनाची निवड अजिबात रुचलेली नव्हती. युसूफ पठाण आणि युवराज या दोघांची कामगिरी उत्तम कामगिरी करीत होते. रैनाची कामगिरी त्या वेळी खालावलेली होती.

 

 

‘‘त्या वेळी आमच्याकडे डाव्या हाताचा फिरकी गोलंदाजच नव्हता आणि मी विकेटही घेण्यात सक्षम होतो. त्यामुळेच त्यांच्याकडे माझ्याशिवाय दुसरा उत्तम पर्याय नव्हता.’’ – युवराजसिंग

त्या विक्रमानंतर बॅटवरही घेतल्या शंका


युवराजने आपल्या वक्तव्याच्या पुष्ट्यर्थ आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, की ज्या वेळी मी २००७ मधील टी-२० वर्ल्डकप सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात खणखणीत सहा षटकार खेचले, तेव्हा माझ्या बॅटीवरच शंका घेण्यात आल्या. त्यामुळे नंतर सामन्याच्या पंचांनी माझ्या बॅटीची तपासणीही केली होती. त्या वेळी आस्ट्रेलियाचा प्रशिक्षक माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तुझ्या बॅटीला मागे फायबर लावले आहे का? आणि तसे असेल तर ते वैध आहे का? एवढेच नाही तर अॅडम गिलख्रिस्टनेही मला विचारले, की तुमच्या बॅटी कोण बनवतं? पण प्रामाणिकपणे सांगतो, ती बॅट माझ्यासाठी विशेष होती. मी यापूर्वी माझ्या बॅटीने असा कधीच खेळलेलो नव्हतो. त्यामुळेच ती बॅट आणि 2011 चा वर्ल्डकप माझ्यासाठी खास होता.

निवृत्तीवेळी काय होते युवराजचे आरोप?


  • युवराज आपल्या कारकिर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. त्यानंतर दोन वर्षे त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. युवराजच्या दृष्टीने संघात घेतलेच नाही. त्यावर त्याने आपल्या मनातल्या वेदनाही बोलून दाखवल्या. मला कधीच सांगितले नाही, की तुला संघातून बाहेर काढले आहे. हे अजिबात योग्य नव्हते. कोणताही खेळाडू यामुळे दुःखी होईल, तसाच मीही झालो. जो खेळाडू 15-17 वर्षे क्रिकेट खेळला, त्याला तुम्ही शांतपणे सांगू शकला असता. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खानलाही सांगितले गेले नव्हते. भारतीय क्रिकेटमध्ये असंही होतं.

  • मी विचारही केला नव्हता, की आठ-नऊ सामन्यांपैकी दोन सामन्यांत सामनावीराचा बहुमान मिळवूनही मला संघातून वगळले जाऊ शकेल. मी जखमी झालो तेव्हा मला सांगितले, की श्रीलंका मालिकेसाठी तयार राहा. नंतर अचानक यो-यो चाचणी घेण्यास सांगितले. 36 वर्षांच्या वयात मला माघारी परतावं लागलं आणि यो-यो चाचणीची तयारी करावी लागली. त्यानंतर यो-यो चाचणीही पास झालो. नंतर मला सांगितलं, की तुला आता स्थानिक क्रिकेट खेळावे लागेल.

  • मला वगळायचंच होतं म्हणून यो-यो चाचणीचा घाट घालण्यात आला. कदाचित वाढत्या वयामुळे मी ही चाचणी देऊ शकणार नाही. मात्र, मी चाचणी पास झाल्यानंतर त्यांना संघातून डच्चू देता येणार नव्हता म्हणून स्थानिक क्रिकेट खेळण्याचे कारण पुढे केले. जर मला संघातून काढायचंच असेल तर बहाणे कशाला शोधायचे?

  • कुणाविषयीही मला दुजाभाव नाही. जे काही मी खेळलो, ते स्वतःच्या हिमतीवर. कोणाच्या वशिल्यावर कधी पुढे गेलो नाही. निवृत्ती घेण्याचा निर्णय कटू होता. मात्र, प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात हा क्षण येतोच. मी ताठ मानेने निवृत्ती घेतली आहे. मैदानावरून निरोप घेता आला असता तर आणखी चांगले वाटले असते. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.

  • बीसीसीआयने संघात संधी का दिली नाही, या प्रश्नावर युवराज बीसीसीआय आणि कर्णधार महेंद्रसिंह यांच्याकडे बोट दाखवतो. असे प्रश्न हे संबंधित व्यक्तीच देऊ शकतील. माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी खूप क्रिकेट खेळलो आहे. मात्र, आयुष्यात जी खदखद आहे, तिचा खुलासा मी वेळ आली की नक्की करीन.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!