जिल्हा उपनिबंधक झालेल्या मजुराची प्रेरणादायी कहाणी…!
अवघ्या दोन एकरची शेती. पाच जणांचा उदरनिर्वाह एवढ्याशा शेतीतून होत नव्हता. जगण्याची लढाई हरता येत नाही म्हणून ती लढावीच लागणार होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून, शेळ्या चारून शिक्षण घेतलं. जिल्हा उपनिबंधक झालेल्या मजुराची ही प्रेरणादायी कहाणी…! वडगाव बुद्रुक (ता. अमळनेर) येथील समाधान घनश्याम सोनवणे याच्या जिद्दीला सलाम.
समाधान लहानपणापासून घराची आबाळ पाहत आला आहे. घरात सर्वांत लहान. दोन एकरच्या शेतीतून फारशी मिळकत नव्हतीच. आईवडील आणि दोन्ही भाऊ मजुरी करायचे. समाधानही नंतर या जगण्याच्या लढाईत उतरला. समाधान व त्याचे दोन्ही भाऊ शिक्षण घेत होते. खर्च वाढला होता. पोट भरण्यापासून शिक्षणाच्या खर्चापर्यंत सगळा खर्च आईवडिलांना पेलणे अशक्य होते. मग ही तिन्ही भावंडे शेळ्या चारण्याचीही कामे करू लागली. अतिशय कठीण परिस्थितीतून हा सगळा परिवार वाटचाल करीत होता.
जगण्याची लढाई एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शिक्षणासाठी या तिन्ही भावांची कसरत सुरू होती. शिक्षण करून काही तरी नोकरी मिळेल एवढेच समाधानला माहिती होते. मात्र, नोकरीसाठी किती खस्ता खाव्या लागतात याची त्याला कल्पना नव्हती. पुढे काय व्हायचंय, याचीही त्याला जाण नव्हती. पण जमेल तसं शिकावं एवढंच त्याने मनाशी ठरवलं होतं. हीच जिद्द त्याला कामात आली. कुणाला वाटलंही नसेल, एका मजुराची ही प्रेरणादायी कहाणी मैलाचा दगड ठरेल.
शेळ्या चारत असताना समाधानला मोठा भाऊ दहावी पास झाल्याचं कळलं. घरात मोठा आनंद झाला होता. घरातला प्रथमच कोणी तरी मोठी परीक्षा पास झाला होता. मोठ्या भावाच्या यशाने समाधानला कमालीची प्रेरणा मिळाली. आपणही शिक्षण घेऊ शकतो, पुढे जाऊ शकतो याचा आत्मविश्वास मोठ्या भावाच्या “रिझल्ट’ने दिला. एका रात्रीत किंवा एका दिवसात “ट्रिमेंडस चेंज’ होणं काय असतं, तर ते हे असतं. या छोट्याशा घटनेनंतर समाधान आत्मविश्वासाने पावलं टाकत होता.
समाधानने याच आत्मविश्वासाच्या जोरावर दहावीत 80, तर बारावीत 82 टक्के गुण मिळविले. पुढे शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पुन्हा खर्च वाढणार होता. त्यामुळे घरात सर्वानुमते निर्णय झाला, की समाधानने “डी.एड.’ करावं! समाधानने हाच पर्याय निवडत डी. एड. पूर्ण केले. वढोदे (ता. यावल) येथे 2007 मध्ये तो शिक्षणसेवक म्हणून रुजू झाला. मोठा भाऊ ग्रामसेवक, दुसरा शिक्षक आणि समाधानही शिक्षक झाल्याने आईवडिलांची काळजी मिटली होती. समाधानचे मामा वर्धा येथे पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी सहज समाधानला सांगितलं, की “”तू स्पर्धापरीक्षेकडे का वळत नाही? एकतर तुझ्याकडे नोकरीही आहे. त्याचबरोबर स्पर्धापरीक्षेचाही अभ्यास सुरू करायला काही हरकत नाही.” मामाकडे पाहून समाधानला स्पर्धापरीक्षा माहिती होती; पण त्याचा अभ्यास कसा करायचा याची माहिती नव्हती. मात्र, मामाने मार्ग दाखवला आहे. त्यावरून कसे चालायचे हे आपल्यालाच ठरवावे लागणार आहे.
समाधानने पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी त्याने पुण्यातील मित्रांकडून पुस्तके मिळवली. नंतर त्याने जळगावातील “दीपस्तंभ फाऊंडेशन’च्या मार्गदर्शन वर्गाचीही माहिती मिळवली. 2009 मध्ये या मार्गदर्शन वर्गातूनच अभ्यासाला सुरवात केली. डेप्युटी कलेक्टर होण्याचं ध्येयही निश्चित केलं. त्यासाठी त्याला राज्यसेवा परीक्षा द्यावी लागणार होती. 2009 मध्ये जाहिरात निघाली, तेव्हा नेमकी हीच पोस्ट त्यात नव्हती. अर्थात, त्याने या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पूर्व परीक्षा पास होऊ याची खात्री त्याला होती. पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागण्यापूर्वीच त्याने मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या दोन्ही परीक्षा तो पास झाला. मुख्य परीक्षेचा निकाल डिसेंबर 2009 मध्ये हातात पडला. दोन अडथळे पार केल्यानंतरही मुलाखतीचा महत्त्वाचा टप्पा त्याला पार करायचा होता. त्याने “दीपस्तंभ’मध्येच “मॉक इंटर्व्ह्यू’ देऊन मुलाखतीचा सराव केला.
प्रा. यजुर्वेंद्र महाजन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव एम. व्ही. बरिदे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी मापकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मुलाखतीचा सराव केला. मुलाखतीचे बारकावे त्याला येथेच समजले. ऑगस्ट 2010 मध्ये त्याने मुलाखत दिली आणि त्याचा रिझल्ट सप्टेंबर 2010 मध्ये लागला. समाधानला रिझल्ट कधी लागेल, याची माहिती नव्हती. गावाकडे नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होता. तेथेच त्याला मोबाइलवर पास झाल्याची माहिती मिळाली. समाधानसह सर्वांनाच आनंद झाला. ऑक्टोबरमध्ये त्याला पोस्ट कळली. समाधान जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) पद मिळालं आहे. नियुक्तीचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही; मात्र याच महिन्यात त्याचा शिक्षणसेवकाचा कालावधीही संपला आहे. अर्थात, तत्पूर्वीच तो “डीडीआर’ झाल्याने त्याच्या कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण गावाला आनंद झाला होता. समाधानने पहिल्याच प्रयत्नात “क्लास वन’ची पोस्ट सर केली होती. “क्लास वन’ पोस्ट घेणारा गावातला तो पहिलाच तरुण होता. त्याच्या कष्टाचं चीज झालं होतं. अख्ख्या गावाने त्याची मिरवणूक काढली. त्याच्या यशाचा गौरव केला. आईवडील, भाऊ, प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांच्यासह मित्र संभाजी पाटील यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहनामुळेच मी यशस्वी होऊ शकलो, हे सांगायला तो विसरला नाही.
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास कसा करायचा, हा प्रश्नच नसतो. खरं तर अभ्यासाची सुरवातच दणक्यात करायची, असे सांगत त्याने आपल्या अभ्यासाचा मंत्र सांगितला. तो म्हणाला, की मी भरपूर वाचन करायचो. नंतर त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची टिपणं काढायचो. साध्या कागदांवरच लिहायचो आणि त्या रोज वाचायचो. हे सर्व कागद मी टाचून ठेवलेले आहेत. परीक्षेच्या वेळी मला माझ्याच नोटस (टिपण) खूप उपयोगी आल्या. अर्थात, हे सर्व करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास असेल तरच स्पर्धापरीक्षा शक्य आहे. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप क्षमता असतात. या क्षमता ओळखून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश हमखास मिळतं.”
समाधान आपल्या यशाचा मंत्र सांगत होता. आर्थिक गरिबीपेक्षा यशाची श्रीमंती मोठी असते आणि त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीचं भांडवल जवळ असावं लागतं. समाधानकडे ते होतं म्हणूनच तो जिंकला…
उपनिबंधकपदी पोहोचलेल्या मजुराची ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली यावर आपलं मत अवश्य नोंदवा…
(सकाळ ः ७ नोव्हेंबर २०१०)
[jnews_block_37 first_title=”हेही वाचा” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]