Kho-KhoSports Review
बदलाचा सूर, अडचणींना खो!
बदलाचा सूर, अडचणींना खो!
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे नाशिकच्या विभागीय क्रीडासंकुलात ४२ वी कुमार गट राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा रविवारी थाटात झाली. ही स्पर्धा दोन कारणाने लक्षात राहिली. ती म्हणजे, नेटके आयोजन आणि ‘आम्ही बदलत आहोत’ या सूचक कॅचलाइनमुळे.
महाराष्ट्र खो-खो संघटनेवर मंदार देशमुख यांच्या रूपाने गेल्या महिन्यातच नाशिकला तब्बल १५ वर्षांनंतर प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळेही या स्पर्धेकडे गौरवाच्याही दृष्टीने पाहायला हरकत नाही.
‘पीके’च्या शूटिंगनिमित्त आमिर खान नाशिकमध्ये आला तेव्हा त्याने मटाशी संवाद साधताना खो-खोविषयी विशेष उत्सुकता व्यक्त केली होती. खो-खो अपना गेम है असं आपलेपण त्याने या खेळाविषयी व्यक्त केलं होतं. बदलाच्या दिशेने जाणाऱ्या खो-खोविषयी आमिरलाही आपुलकी आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.
खेळाडूंच्या निवासव्यवस्थेपासून भोजनापर्यंत सर्व बाबींकडे विशेष लक्ष पुरविणारी यजमान नाशिक जिल्हा खो-खो संघटना नव्या बदलाच्या दिशेनेही पाऊल टाकते आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने ते प्रकर्षाने जाणवले. प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावर लाल रंगातली टोपी ‘आम्ही बदलत आहोत’ याची जाणीव करून देत होती. बदलतोय म्हणजे नेमके काय? पण ज्यांनी स्पर्धा पाहिली त्यांना हा बदल नक्कीच जाणवला असेल.
बदलाच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या यजमान नाशिकने प्रत्येक स्पर्धेतून काही तरी मेसेज दिला आहे. १९९६ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेचं यजमानपद घेताना खो-खोच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना रोख पारितोषिके दिली होती.
त्या वेळी राणी लक्ष्मीबाई व एकलव्य पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूला पाच हजार रुपये व वॉशिंग मशीन बक्षीस म्हणून दिली होती. या स्पर्धेतून खेळाडूंना आत्मसन्मान दिला.
२०११ मधील राज्यस्तरीय पुरुष-महिला खो-खो स्पर्धेचंही यजमानपद भूषविताना नाशिकने ‘एमिनन्स रिडिफाइन’ ही कॅचलाइन दिली होती. श्रेष्ठत्वाची व्याख्या बदलण्याचा विचार देणारी ही कॅचलाइन वाचताना अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रोख पारितोषिकांचा वर्षाव करताना या स्पर्धेने खेळाडूंना आत्मविश्वास दिला.
आम्ही बदलतोय ही कॅचलाइन देताना येथे आम्ही म्हणजे नाशिक नाही, तर आम्ही म्हणजे खो-खो असे संघटनेला अभिप्रेत आहे. प्रो कबड्डीने मराठी मातीतल्या खेळांमधील सळसळता उत्साह, दर्जा पाहायला मिळाला.
त्याच धर्तीवर आता खो-खो लीगचेही वारे वाहू लागले आहेत. या खेळातला वेग, कौशल्य आणि डोळ्यांचे पाते लवण्यापूर्वीच घ्यावी लागणारी निर्णयक्षमता जगासमोर आणायची आहे. लीगविषयी चर्चाही झडल्या असतीलच; पण केवळ चर्चा करून थांबायचं की पुढे जायचं?
नाशिकने पुढे जाण्याचा विचार या स्पर्धेतून देण्याचा प्रयत्न केला आहे. खो-खो लीगच्या कमिटीवर नाशिकचे माजी राष्ट्रीय खेळाडू कैलास ठाकरे यांची वर्णी लागली आहे. त्या दृष्टीने त्यांनी कामही सुरू केलं आहे.
ही खो-खो लीग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच घेण्याचा मानस महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राने खो-खो लीगसाठी टाकलेले सकारात्मक पाऊल ही बदलाचीच नांदी म्हणावी लागेल.
स्पर्धेतून एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला. तो म्हणजे बॅनरवर झळकणारे महिला खेळाडूचे प्रतीकात्मक चित्र. मंचाच्या मध्यभागी खो-खोची ओळख करून देणारं हे बॅनर होतं. एरव्ही कोणत्याही स्पर्धेत खो-खोची ओळख करून देणाऱ्या बॅनरवरील चित्रामध्ये पुरुष खेळाडूचंच प्रतीकात्मक चित्र पाहायला मिळतं. नाशिकने हे चित्र बदललं.
बॅनरवर महिला खेळाडू झेपावतानाचे ते चित्र स्त्रीशक्तीचा सन्मान करून देणारे होते. स्त्री-पुरुष भेद आम्हाला आता चित्रातही नकोय. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या स्पर्धेतून नाशिककरांनी खऱ्या अर्थाने बदलाच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.
पैसे नव्हते तेव्हाही खो-खो होता आणि आजही आहे. मात्र, ७०-८० च्या दशकात गावागावात जे खो-खोचं अस्तित्व होतं, तितकं आज नाही हेही मान्य करावंच लागेल. मात्र, खो-खोची आता नव्याने ओळख करून द्यायला हवी. नाशिकने त्या दृष्टीने एक पाऊल टाकलं आहे.
नाशिकमधील स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक बदल प्रकर्षाने पाहायला मिळाला. काही खेळाडूंच्या डोक्यावर लाल टोपी होती, तर काही खेळाडूंना गुलाबी रंगातले फेटे होते. हा दोन खेळाडूंमधला फरक नव्हता, तर ती खेळाडूंची करून दिलेली सन्मानजनक ओळख होती.
ज्यांना फेटे होते, ते राष्ट्रीय खेळाडू होते, तर ज्यांना फेटे नव्हते ते राष्ट्रीय स्पर्धेच्या वाटेवर आहेत, असा सूचक संदेश होता. राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांच्या पाठीवर स्टारचं चिन्ह पाहायला मिळत होतं. दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळलेला असेल तर त्याच्या पाठीवर दोन स्टार दिले होते.
खेळाडूची ही नावीन्यपूर्ण ओळख नाशिकने सर्वप्रथम दिली. अनेक खेळ अत्याधुनिक झाले. तांत्रिकतेची जोड देत अनेक खेळांनी कात टाकली आहे. क्रिकेट असो वा फुटबॉल कोणत्याही खेळाडूची माहिती, त्याची कामगिरी काही क्षणात मिळते.
अनेक जुन्या सामन्यांचे रेकॉर्ड अपडेट आहे. खो-खोत असे का होऊ नये? खो-खोच्या इतिहासातला पहिला बदल नाशिकने या स्पर्धेतून दिला आहे. तो म्हणजे सामन्यात किती खो दिले, किती फाऊल झाले याची नोंद ठेवण्यात आली.
त्यासाठी प्रत्येक सामन्यात खो आणि फाऊलची नोंद ठेवणारे खास खेळाडू नियुक्त केले होते. ही नोंद साखळीतल्या सामन्यांपासून ठेवण्यात आली. नंदुरबारने साखळीतील एका सामन्यात तब्बल ४४० खो दिले होते, तर ४७ फाऊल केले होते.
त्यांना त्या सामन्यात केवळ ४ गडी बाद करता आले. हे वाचल्यानंतर कोणीही थक्क होईल. असा प्रत्येक संघाचा डाटा गोळा करून नाशिकने स्पर्धेतल्या नेटकेपणाचा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. हा डाटा जर तुमच्या हातात असेल तर कामगिरी सुधारण्यासाठी काय चुकले हे पटकन लक्षात येईल. अर्थात, यामागे मानवी मेहनत आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजी विकसित केली तर ते आणखी सोपे होईल. हे का करायचं यामागे काही तरी लॉजिक आहे. त्यातून संघाचा दर्जा नक्कीच सुधारेल. खो-खोच्या इतिहासातला हा बदल नाशिकने दिला, असं म्हणायला हरकत नाही.
उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचं व्हिडीओ शूटिंग नाशिकने केलं आहे. सामन्यांची ही क्लीप राज्य संघटनेला सादर केली जाणार आहे. खो-खोत सूर मारतात, पोल मारतात, खूप एक्साइटमेंट आहे, थ्रिलिंग आहे हे वर्षानुवर्षे सांगितलं जातं; पण ते दाखवू शकत नाही.
त्यामुळेच या खेळाचे रेकॉर्डिंग नाशिकने करायचं ठरवलं. असं प्रत्येक स्पर्धेत झालं तर या खेळातला देखणेपणा जगासमोर आणणे सोपे होईल. नाशिकच्या खो-खो संघटनेची लवकरच अपडेट वेबसाइटही येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच या वेबसाइटला मुहूर्त गवसेल.
आम्ही फक्त बदलतच नाही तर बदल घडवण्यासाठी कृतिशीलही आहोत, हे नाशिकच्या संघटनेने स्पर्धेच्या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. कदाचित महाराष्ट्र खो-खो संघटनेनेही या बदलाची नोंद नक्कीच घेतली असेल.
आपण काही सांगण्यापेक्षा आधी करून दाखवलं पाहिजे, या भूमिकेतूनच आम्ही स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं. यातून स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आम्ही स्पर्धेत जाणीवपूर्वक काही बदल केले आहेत. ते खेळ, खेळाडूच्या दृष्टीने पोषकच ठरतील.– मंदार देशमुख, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो संघटना(Maharashtra Times, Nashik, Jalgaon : 21 Sep. 2014)