पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार
मेलबर्न
अश्लील मेसेज प्रकरणी टिम पेन याने ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, यावर बराच खल सुरू होता. याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आता आस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार झाला आहे. स्टीव स्मिथला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी, 26 नोव्हेंबर 2021 रोजी ही घोषणा केली.
पॅट कमिन्स उपकर्णधार होता. आता तो टिम पेनची जागा घेईल. चार वर्षांपूर्वी अश्लील मेसेज प्रकरण पुन्हा व्हायरल झाल्याने टिम पेन याने गेल्या आठवड्यात कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली होती. रे लिंडवाल हे कसोटी स्तरावर ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषविणारे अखेरचे वेगवान गोलंदाज होते. अर्थात, त्यांनी 1956 मध्ये कसोटी संघाची कार्यवाहक कर्णधार पदाजी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर म्हणजे 1956 नंतर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पद सांभाळणारा पहिलाच गोलंदाज असेल. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा 47 वा कसोटी कर्णधार आहे.
उपकर्णधारपदी नियुक्त झालेला स्टीव स्मिथ हादेखील दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 मध्ये चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्मिथला कर्णधारपदावरून हटविण्यात आले होते. त्याला दोन वर्षे संघातही घेतले नव्हते. हाच स्मिथ आता उपकर्णधार पदाची धुरा वाहणार आहे.
अॅशेस मालिकेपूर्वी मिळालेली कर्णधारपदाची जबाबदारी माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे पॅट कमिन्स याने म्हटले आहे. तो म्हणाला, की अपेक्षा आहे, की मी टिम पेन याचं कार्य पुढे नेऊ शकेन. अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना आठ डिसेंबर रोजी ब्रिस्बेनवर खेळवला जाणार आहे.
टिम पेन याचा अनिश्चित काळासाठी ब्रेक
अश्लील मेसेज प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार टिम पेन सध्या मानसिक तणावाखाली आला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला आता संघातील एक खेळाडू म्हणून भूमिका बजवावी लागणार होती. हे सगळंच निराशाजनक होतं. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याने क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय 26 नोव्हेंबर 2021 जाहीर केला आहे. किती काळ तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे हे स्पष्ट केलेले नाही. मानसिक स्वास्थ्यासाठी त्याने अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय त्याने जाहीर केला आहे. त्यामुळे अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे.
2017 मध्ये महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवल्याचे प्रकरण पुन्हा व्हायरल झाल्यानंतर टिम पेन याने कर्णधारपद सोडले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पेनचा निर्णय जाहीर केला. टिम पेन याच्या निर्णयानुसार तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हंटले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी सांगितले, ‘‘आम्हाला जाणीव आहे, की टिम पेन आणि त्याच्या परिवारासाठी हा खूपच कठीण प्रसंग आहे. आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत. मानसिक स्वास्थ्यासाठी त्याने क्रिकेटपासून काही काळासाठी विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचा सन्मान करीत आहोत.’’
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्ध 8 डिसेंबर 2021 रोजी अॅशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना आहे. हा टिम पेन याचा जन्मदिवसही आहे. याच आठवड्यात तो संघात सहभागी होणार होता. त्याला शुक्रवारी, 26 नोव्हेंबर 2021 रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध तस्मानिया या सामन्यासाठी बोलवण्यातही आले होते. क्रिकेट तस्मानियाने नंतर जाहीर केलं, की पेन हा सामना खेळणार नाही.
क्रिकेट तस्मानियाने सांगितले, ‘‘गेल्या 24 तासांत झालेल्या चर्चेनंतर टिम पेन याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून विश्रांती घेण्याचा निर्णय क्रिकेट तस्मानियाला कळविला आहे. पेन याच्या जागेवर आता संघात अॅलेक्स कारी किंवा जोश इंगलिस याचा समावेश होऊ शकेल.’’
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]
One Comment