Kho-KhoSports Review

खो-खोसमोर ‘मॉडर्न’ होण्याचे आव्हान!

 

खो-खोसमोर ‘मॉडर्न’  होण्याचे आव्हान!
भारतातील प्रत्येक क्रीडा संघटनेत वाद आहेत, राजकारण आहे. यातूनच समांतर संघटना उभ्या राहतात किंवा अंशतः बदल करीत नवे खेळ जन्माला घातले जातात. बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बुद्धिबळ अशा अनेक खेळांत समांतर संघटना उभ्या ठाकल्या.
त्याही पूर्वी अमेरिकेचा माजी विश्वविजेता बुद्धिबळ खेळाडू बॉबी फिशर यानेही बुद्धिबळात काही बदल करून नवा खेळ विकसित केला होता. मात्र, तो फारसा लोकप्रिय होऊ
शकला नाही. आता खो-खोतही सुवसासुभा उभा ठाकला आहे.
मूळ खो-खोत काही बदल करीत मॉडर्न खो-खो या नावाने नवा खेळ अस्तित्वात आला आहे. पश्चिम बंगालचे दिलीप रॉय या खेळाचे जनक मानले जातात. ते अखिल भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) टेक्निकल कमिटीचे चेअरमन होते.
मात्र काही कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले आणि दुखावलेल्या रॉय यांनी मॉडर्न खो-खो विकसित केला. या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच बेंगळुरू येथे झाली असून, आशियाई स्पर्धाही लवकरच जाहीर करण्याचे संकेत मॉडर्न खो-खोने दिले आहेत.
भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असेल तर त्याचे कौतुकच करायला हवे. असे असले तरी महाराष्ट्र मॉडर्न खो-खोचा उदय महाराष्ट्र खो-खो संघटनेला रुचलेला नाही. मात्र, हा विरोध करताना त्यामागची कारणे पटणारी नाहीत.
मॉडर्न असो किंवा अन्य काहीही नाव दिले तरी तो खो-खोच आहे हे जरी खरे असले तरी केवळ नामसाधर्म्यामुळे की की खो-खोच्या अस्तित्वाला आव्हान म्हणून विरोध केला जातोय? महाराष्ट्र खो-खो संघटनेचा यात गोंधळ होतोय.
मुळात महाराष्ट्र खो-खो संघटनेने विरोध करण्याची गरज काय? खो-खोची शिखर संघटना ‘केकेएफआय’ने मॉडर्न खो-खोला विरोध केलेला नाही. बेंगळुरूत मॉडर्न खो-खोची स्पर्धा झाली. त्या वेळी २२ राज्ये सहभागी झाली होती.
कोणत्याही राज्यात त्याला विरोध झाला नाही. त्यामुळेच महाराष्ट्र खो-खो संघटनेचा विरोध पेचात टाकणारा आहे. मॉडर्न खो-खोशी संबंध ठेवण्यास संलग्न संस्था व खेळाडूंना विरोध करतानाच या खेळाच्या स्पर्धेत सहभागी होऊ नये. तसे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र खो-खो संघटनेने दिला आहे.
खरे तर भारतात इतके विदेशी खेळ येऊ घातले आहेत, की ते कसे खेळतात हे कळण्याआधीच त्याच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर होतात. एका खेळातून अनेक खेळ, संघटना जन्म घेतात.
फुटबॉलमध्ये जसे महिला फुटबॉल संघटना, हॉकीमध्ये सिक्स ए साइड हॉकी किंवा आणखी काही नावाने नव्या संघटना उभ्या राहिल्या आहेत. कराटेच्या मार्शल आर्टमध्ये १०० प्रकार आहेत. त्यातून सुमारे नऊ हजारांपेक्षा अधिक स्टाइल जगभरात आहेत.
फुटबॉल, सॉफ्टबॉल, नेटबॉल आदी बॉल गेम्समध्ये जगभरात ५०० क्रीडा प्रकार आहेत. असे असले तरी मूळ खेळांनी काळानुरूप बदल घडवत लोकप्रियतेचे शिखरच गाठले आहे. क्रिकेटमध्येच टेनिसबॉल, प्लास्टिकबॉल, टी-२० अशा अनेक संघटना आल्या तरी त्याचा मूळ क्रिकेटवर तसुभरही परिणाम झालेला नाही.
फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांनीही आपले अस्तित्व राखले आहेच. म्हणूनच मॉडर्न खो-खोला विरोध करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे मूळ खो-खोच्याच विकासासाठी काय करता येईल, याकडे महाराष्ट्र खो-खो संघटनेने लक्ष द्यावे.
भारतात रुजलेला खो-खो आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळवू शकतो. मात्र, या खेळात काळानुरूप बदल घडवण्याचे, अत्याधुनिक करण्याचे, आणखी वेगवान करण्याचे प्रयत्नच होत नाहीत. काही वर्षांपूर्वी जळगावात सहा मिनिटांचा खो-खो प्रायोगिक तत्त्वावर खेळविण्यात आला होता.
जळगावचे पी. जी. अभ्यंकर यांनी हा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे निरीक्षकही त्या वेळी उपस्थित होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे समजू शकले नाही. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खो मोजण्यापासून अनेक बाबींची नोंद घेण्यात आली होती.
एका डावात दीडशेपेक्षा अधिक खो दिले जातात, हे प्रथमच समोर आले. असे नावीन्यपूर्ण बदल करून खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतो, हे या स्पर्धेतून समोर आले.

यात अत्याधुनिकताही आणता येऊ शकेल. मात्र, हे बदल करँण्यासाठी आंतरिक इच्छा असायला हवी. महाराष्ट्र खो-खो संघटनेने आयपीएलच्या धर्तीवर खो-खो प्रीमिअर लीगचीही घोषणा केली होती. ही स्पर्धा प्रो कबड्डीच्याही आधी आली असती.

मात्र, प्रो कबड्डी होऊन आता आठ महिने उलटले तरी केकेपीएलला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या गोष्टींकडे लक्ष न देता मॉडर्न खो-खोचा विरोध करणे चुकीचे आहे. ‘दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा अन् मोरीला बोळा घालायचा’ अशातला हा प्रकार आहे.

‘मॉडर्न’समोरही आव्हान

मॉडर्न खो-खो लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, असे मॉडर्न संघटनेला वाटतेय. मात्र, देशभरात अद्याप या खेळाचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. खो-खोतीलच खेळाडू, संघटकांवर या नव्या खेळाची मदार असेल. मुळात नव्या संघटनांना आयओए, एमओएच्या मान्यतेची अजिबात हौस नसते.
कारण त्यांच्या मान्यतेशिवायही ‘एसजीएफआय’ची (शालेय क्रीडा महासंघ) मान्यता सर्वांत महत्त्वाची असते. कारण एकदा शालेय खेळात एंट्री मिळाली, की पुढचा मार्ग मोकळा. असे अनेक खेळ शालेय खेळात समाविष्ट आहेत, ज्यांना आयओए, एमओएची मान्यता नाही.
अशा खेळांना अंकुश लावणारी यंत्रणा नाही. मान्यता नसतानाही असे खेळ शालेय खेळात कसे समाविष्ट होतात, यामागचे ‘अर्थ’कारणही एव्हाना सर्वांना माहीत झाले आहे आणि एकदा असे खेळ शालेय खेळात समाविष्ट झाले, की त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्टिफिकेट विकत मिळतात, हेही लपून राहिलेले नाही.
एका वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले पदक मिळवून दिले जातात. पालकांमध्ये जागृती नाही. मुलाचे कौतुक त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च असते. ते कसे मिळाले याची शहानिशा कोणी करीत नाही. कारण या एका सर्टिफिकेटमधून मुलाचे ‘मेरिट’ वाढते. त्यामुळे नव्या खेळांच्या भाऊगर्दीत मॉडर्न खो-खोलाही विश्वास निर्माण करण्याचे आव्हान असेलच.

विरोध की प्रचार?

नव्या खेळांच्या संघटनांची दखल अन्य खेळांनी घ्यायची गरज नाही. सोलापुरातील राज्यस्तरीय स्पर्धेनंतरही मॉडर्न खो-खो नेमका काय आहे, याची माहिती बऱ्याच जणांना नाही.
‘केकेएफआय’ने विरोध केला नसला तरी महाराष्ट्र खो-खो संघटनेने या खेळाशी संबंध ठेवण्यास संलग्न संस्था व खेळाडूंवर कारवाईचे पत्रक काढले आहे. कालपर्यंत कोणालाही माहीत नसलेला हा खेळ या पत्रकामुळे राज्यभर चर्चेत आला आहे.
खो-खोपूर्वीही सर्कल खो-खो होता. कबड्डीमध्येही सर्कल कबड्डी अन्य राज्यांमध्ये आहेच. ज्या वेळी समांतर संघटना अस्तित्वात येतात त्या वेळी ते क्रीडा विकासाला मारक ठरू शकतात.
मॉडर्न खो-खो संघटनेने मूळ खो-खोला शह देण्यासाठी समांतर संघटना स्थापन करण्याची चूक हेतुपुरस्सर केलेली नाही. मात्र, मूळ खो-खोतच काहीसे बदल करून नवी संघटना स्थापन केली.
मूळ खो-खो जर नऊ खेळाडूंमध्ये असेल तर हा खो-खो आठ खेळाडूंमध्ये असेल आणि वेळेतही बदल केले. त्यात सहा-सहा मिनिटांचे तीन सेट केले आहेत. हे बदल केले असले तरी मूळ खो-खोची ओळख मात्र पुसली गेलेली नाही.
मॉडर्न खो-खोचे वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ मॅटवर खेळविला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीनेच मॉडर्न खो-खोमध्ये बदल केले आहेत. असे असले तरी मॉडर्न खो-खोचे मूळ खो-खोसमोर आव्हान नक्कीच असेल. आव्हान आहे मॉडर्न होण्याचे, खो-खोला ग्लॅमर देण्याचे, नव्या बदलाला सामोरे जाण्याचे….
मॉडर्न खो-खोला मान्यता नाही. भारतीय खो-खो महासंघातून बाहेर पडलेल्या काहींनी ही संघटना स्थापन केली आहे. मॉडर्न खो-खोची नियमावली माहीत नाही. मात्र, खो-खोचे नाव लावून खेळाडूंची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळेच अधिकृत खो-खो संघटनेशी संलग्न असलेले खेळाडू, संस्था यात सहभागी झाल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 
– चंद्रजित जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो संघटना 
मॉडर्न खो-खोला विरोध करणे हास्यास्पद आहे. आमचा खेळ नवा आहे. त्याला लगेच कोणाची मान्यता मिळते का? सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्याने कदाचित त्यांना ते रुचले नसेल. आमची संघटना खो-खोच्या विरोधात नाही. शिर्डीत ५ एप्रिलमध्ये बैठकीत आम्ही जिल्हा संघटनांना संलग्नता देण्याबाबत, तसेच खेळाच्या प्रसाराबाबत निर्णय घेणार आहोत.
– मनोज व्यवहारे, महाराष्ट्र मॉडर्न संघटना
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon, 23 March 2015)
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!