Kho-KhoSports Review
खो-खोला अच्छे दिन?
खो-खोला अच्छे दिन?
तब्बल ५९ वर्षांनंतर मराठमोळा खो-खो दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) समाविष्ट झाला आहे. तमाम भारतीयांना त्याचं कौतुक आहेच; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोचं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. ती खो-खो महासंघ कसा पेलणार हाच खरा प्रश्न आहे…
‘सॅफ’मधील प्रवेशाने ‘अच्छे दिन’ आणि ‘मेक इन इंडिया’ असे दोन्ही योग खो-खोला आले, असं म्हणायला हरकत नाही. कारण सॅफच्याही आधी आशियाई स्पर्धेचे संकेत भारतीय खो-खो महासंघाने दिले आहेत. त्यामुळे अच्छे दिन.
भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) प्रयत्नांचं फलित म्हणावं, की महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांची वजनदार भूमिका म्हणावी, पण दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) खो-खोचा समावेश झाला. भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंकेचा समावेश असलेल्या सॅफ स्पर्धेत खो-खोला आपले स्थान भक्कम करण्याचे आव्हान आहे.
तब्बल ६० वर्षांच्या इतिहासात भारतीय खेळांमध्ये कुस्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे, तर नंतरच्या काळात कबड्डीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र, खो-खो हा खेळ बरीच वर्षे चाचपडतच राहिला.
खो-खो महासंघाचे हे अपयशच म्हणावे लागेल. ‘सॅफ’मध्ये समावेश होण्यामागे महासंघाचे अध्यक्ष मेहता यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण तेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचेही महासचिव आहेत.
कालानुरूप खो-खोला बदलायला ६० वर्षे लागली. कारण खो-खोचं मातीतलं कौशल्य वादातीत आहे. तो थरार, तो वेग सगळं काही अफलातून आहे. यात कुठेही कृत्रिमता नाही.
ब्राझीलमधील फुटबॉल क्लब वीस वर्षांपासून खो-खो खेळत असल्याचे म्हटले जाते. आफ्रिकन देशांनीही खो-खो खेळण्याची उत्सुकता दर्शविल्याचे महासंघाने म्हटले आहे. तरीही हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जसा आहे, तसा स्वीकारला जाणार नव्हताच. त्याला मॅटवरच यावंच लागणार होतं.
आताही सॅफच्या स्पर्धा मॅटवरच खेळविल्या जाणार आहेत. मात्र बदलाची ही मानसिकता बदलल्यानंतरही मॅटवर हा खेळ सहजासहजी आलेला नाही. आता बदलायचंच म्हटलं, तर या खेळाचं कौशल्य जपणारी मॅट हवीच. मात्र, त्याचा ‘अभ्यास’ही महासंघाच्या तांत्रिक समितीने उशिरानेच केला.
एकूणच ‘सॅफ’मधला प्रवेश सुखद असला तरी या खेळाचं कौशल्य जपणाऱ्या मॅटचा अभ्यास टेक्निकल कमिटीला सातत्याने करावा लागणार आहे. अर्थात, ‘सॅफ’मधील प्रवेशाने हुकमी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खो-खोच्या वाट्याला आली, एवढं खरं.
आव्हाने प्रसाराची
‘सॅफ’मधील प्रवेशाने भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंद असला तरी खो-खोसमोरची आव्हाने संपलेली नाहीत. उलट वाढली आहेत. पहिले सर्वांत मोठे आव्हान म्हणजे या खेळाचे प्रशिक्षण, मार्गदर्शनासाठी भारतातून इतर देशांना प्रशिक्षक पाठविण्याची.
खो-खो महासंघाने अशा २० जणांची यादी तयार केली आहे. त्यात महाराष्ट्रातील अरुण देशमुख, सुधाकर राऊत, नरेंद्र कुंदर, प्रशांत पाटणकर, बिपीन पाटील या पाच जणांचा समावेश आहे.
ही यादीला अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही. महासंघाचे सचिव सुरेश शर्मा यांनी सांगितले की, किमान महिनाभराचे प्रशिक्षण या देशांमध्ये दिले जाणार आहे. त्यासाठी भाषेचा प्रश्न आहेच. शिवाय तंदुरुस्त प्रशिक्षकांचीही गरज लागणार आहे. या सर्व बाबी पडताळून आम्ही प्रशिक्षकांची यादी निश्चित करू. जगभरात खो-खोच्या प्रसारासाठी आशियाई खो-खो महासंघाबरोबरच ही जबाबदारी भारतीय खो-खो महासंघावरच अधिक असेल.
आशियाई स्पर्धा का रखडल्या?
मराठमोळ्या खो-खोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कधीच सातत्य राहिले नाही. १९८७ मध्ये कोलकात्यात आशियाई खो-खो महासंघाची स्थापना झाली. त्या वेळी कोलकात्यात तिसरी सॅफ स्पर्धा सुरू होती.
सॅफ स्पर्धेशी खो-खोचा संबंध असाही आहे! त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच १९९६ मध्ये खो-खोची पहिली आशियाई स्पर्धा बांगलादेशातील ढाक्यात झाली. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या देशांचा समावेश होता.
त्यानंतर चार वर्षांनी २००० मध्ये दुसरी आशियाई स्पर्धा झाली. त्यात भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, जपान, थायलंड, बांगलादेशचा समावेश होता. त्यानंतर ही स्पर्धा कुठेही झाली नाही. सातत्य राहिले नाही तर या खेळाचं इतर देशांमध्ये गांभीर्य राहत नाही.
आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तब्बल १५ वर्षांच्या कालखंडानंतर तिसरी आशियाई स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होण्याचे संकेत आहेत. मात्र, जी स्पर्धा १५ वर्षांत झाली नाही, त्या स्पर्धेच्या निश्चिततेविषयी खो-खोप्रेमींमध्ये नेहमीच संभ्रमाचे वातावरण राहिले आहे.
स्पर्धा होईल तेव्हाच खरं. ही सगळी परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे आव्हान खो-खोला पेलणे तितके सोपे नाही. संघटनात्मक पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत तेच मुळी होत नसल्याने ‘सॅफ’मधील समावेश म्हणूनच आशादायी वाटतो.
दोन वर्षांत खो-खो लीग?
भारतीय खो-खो महासंघाला अद्याप खो-खो प्रीमिअर लीग सुरू करता आलेली नाही. प्रो-कबड्डीच्याही आधी खो-खोला लीग स्पर्धा घेण्याची अधिक संधी होती. तत्पूर्वी महाराष्ट्रानेही प्रीमिअर लीगसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
याबाबत महासंघाचे सचिव सुरेश शर्मा यांनी सांगितले, की ‘‘केकेपीएल घेण्यासाठी महासंघ नियोजन करीत आहे. ही स्पर्धा दर्जेदार व्हावी हाच आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र स्तरावरच ती का व्हावी? खो-खोला प्रतिसादही चांगला आहे. कबड्डीपेक्षाही केकेपीएल अधिक चांगली असेल आणि दोन वर्षांत ती दिमाखदारपणे तुमच्यासमोर येईल.’’
महासंघाची केकेपीएल दोन वर्षांत केव्हा येणार, हे नक्की नसले तरी महाराष्ट्र खो-खो संघटनेतर्फे एप्रिल २०१६ मध्ये केकेपीएल होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
एक कोटी ३० लाख रुपयांचे बजेट असलेली ही स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याचे महाराष्ट्र संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच महाराष्ट्र किंवा महासंघ यापैकी कोणाचीही केकेपीएल होवो, खो-खोप्रेमींमध्ये मात्र या स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
एकूणच केकेपीएल असो किंवा ‘सॅफ’, खो-खोला अच्छे दिन येवो. ‘मेक इन इंडिया’चा नारा क्रीडा क्षेत्रातही घुमावा याच अपेक्षा.
महाराष्ट्राबाहेरही खो-खो आहे, हा विचार रुजणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खो नेण्यासाठी आम्ही २० प्रशिक्षकांची यादी तयार केली आहे. सॅफमधील खो-खोचा सहभाग अध्यक्ष राजीव मेहता व टीमवर्कमुळेच झाला आहे. केकेपीएलही दोन वर्षांत पाहायला मिळेल.– सुरेश शर्मा, सरचिटणीस, भारतीय खो-खो महासंघ
महाराष्ट्रातून पाच प्रशिक्षकांची यादी महासंघाला दिली असून, हे प्रशिक्षक अन्य देशांमध्ये प्रशिक्षण देतील. केकेपीएलही एप्रिल २०१६ मध्ये घेण्याचे नियोजन आहे. संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे.
– चंद्रजित जाधव, सचिव, महाराष्ट्र खो-खो संघटना
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon : 20 July 2015)
[jnews_block_22 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]