मानसिक खच्चीकरणासाठी क्रिकेट विश्वातील स्लेजिंग!
स्लेजिंग आणि क्रिकेट हे समीकरण नवं नाही. विशेषत: समोर कांगारूंचा संघ असेल तर विचारूच नका ! मानसिक खच्चीकरणासाठी हे अस्त्र प्रभावीपणे वापरलं जातं. विशेषतः क्रिकेटमध्ये स्लेजिंग sledging | म्हणजेच अपशब्द सर्रासपणे वापरले जातात. एक काळ होता, की या स्लेजिंगने पातळी ओलांडली होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ बलाढ्य आहेच, पण हा संघ स्लेजिंगमुळेच अधिक कुप्रसिद्ध आहे. एकूणच या स्लेजिंगच्या रंजक प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत…
क्रिकेटमध्ये स्लेजिंग खूपच सामान्य बाब झाली आहे. अन्य खेळांमध्ये ही स्लेजिंग संस्कृती sledging culture | फारशी रुजली नाही, जितकी क्रिकेट खेळात पाहायला मिळते. अर्थात, अन्य खेळांमध्येही स्लेजिंग होतं, पण ते फारसं नाही. क्रिकेट खेळाडूंनी मात्र स्लेजिंगची पातळी ओलांडली. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अपशब्द वापरून अपमानित करणं, त्याचं मानसिक खच्चीकरण होण्याच्या हेतूने टिप्पणी करणं. या स्लेजिंगची सुरुवात कशी झाली हे अवघडच आहे; पण इयान चॅपेल ian chappell | यांच्या मते, क्रिकेट आणि स्लेजिंग यांचं नातं ६० च्या दशकापासून असल्याचं म्हंटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू असल्याने चॅपेल यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. किंबहुना ऑस्ट्रेलियन या विषयावर अधिकाराने बोलू शकतात, हे मान्यच करायला हवं. क्रिकेट आणि स्लेजिंग दोन्ही वेगळे नाहीच, इतकी पातळी या स्लेजिंगने ओलांडली आहे. चॅपेल यांच्या मते, क्रिकेट या खेळात स्लेजिंग सुरुवात अॅडीलेड ओव्हल Adelaide Oval | च्या मैदानावर १९६३ की १९६४–६५ दरम्यान शेफील्ड शील्ड स्पर्धेपासून झाली. या स्पर्धेपूर्वी एका महिलेसमोर शपथ घेताना एका क्रिकेटपटूने अशाच काही तरी घटनेवर स्लेजिंग हॅमर– sledgehammer (शाब्दिक हातोड्याने मारणे) अशा प्रकारची काही तरी प्रतिक्रिया दिली होती. नंतर पुढे प्रतिस्पर्ध्यांना अपमानित करण्याची चुरसच निर्माण झाली.
बीबीसीचे पॅट मर्फी यांच्या मते, क्रिकेट या खेळात स्लेजिंगची सुरुवात साठच्या दशकात झाली. ऑस्ट्रेलिया संघाचा ग्राहम कार्लिंग नावाचा एक गोलंदाज होता. तो न्यू साऊथ वेल्सकडूनही खेळायचा. असं म्हणतात, की त्याच्या बायकोचं संघातल्याच कुणा दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मैदानात ग्राहम फलंदाजीला उतरला, की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू एक गाणं म्हणायचे. हे गाणं या अनैतिक संबंधावरच बेतलेलं होतं. ग्राहम फलंदाजीला आला, की प्रतिस्पर्धी संघ एकसुरात ‘व्हेन अ मॅन लव्स अ वूमन’ When a Man Loves A Woman | गाऊ लागायचे… स्लेजिंग खूपच खालच्या पातळीवर केली जायची याचं हे उत्तम उदाहरण.
ज्यू धर्मीय क्रिकेटपटूंविषयीही स्लेजिंग केलं जायचं. ज्युलियन विनर आणि बेव लियोन नावाचे दोन क्रिकेटपटू ज्यू होते. ते कोणत्या संघात होते माहीत नाही, पण ते जेव्हा खेळायला यायचे तेव्हा त्यांना ज्यूविरोधी अपशब्दांनी अपमानित केले जायचे.
क्रिकेट विश्वातील खडूस ग्रेसची स्लेजिंग
१९ व्या शतकात इंग्लंडचा विल्यम गिल्बर्ट ग्रेस William Gilbert Grace | या स्लेजिंगमध्ये कुख्यात होता. मैदानावर तो ‘डॉक्टर’ म्हणूनच परिचित होता. तो खोचक विनोदी होता. एकदा तो त्रिफळाचित झाला. या महाशयांनी लगेच स्टम्पच्या बेल्स व्यवस्थितपणे लावत अंपायरला म्हणाला, “अंपायर, आज वारं जास्तच जोरात आहे..” अंपायरही कमी नव्हता. तो म्हणाला, “हो, खरंय, पॅव्हेलियनमध्ये जाताना टोपीची काळजी घे…”
असंच एकदा तो पायचीत झाला. पण हे ग्रेस महाशय मैदान सोडायला तयारच होईना. तो म्हणाला, “हे जे प्रेक्षक आलेय ना, ते माझी फलंदाजी पाहायला आले आहेत. तुझी गोलंदाजी नाही!” हा ग्रेस अनेकांची फिरकी घ्यायचा, पण त्यालाही एकदा एक सव्वाशेर भेटलाच. हा सडेतोड उत्तर देणारा गोलंदाज होता चार्ल्स कॉर्टराइट Charles Kortright |. तोही इंग्लंडचाच. चार्ल्सने त्याला अनेकदा पायचीत केले; पण अंपायर ग्रेसला बाद देत नव्हते. पायचीतचं अपील झालं, की हे ग्रेस महाशय स्वत:च अंपायरकडे पाहत नॉटआउटचा इशारा करायचा. मग अंपायरही गोंधळात पडायचे आणि बाद देत नव्हते. त्या वेळी आजच्यासारखे थर्ड अंपायरही नव्हते. अखेर वैतागलेल्या चार्ल्सच्या एका चेंडूवर ग्रेसच्या दोन यष्ट्याच उडवल्या. आता इथं ग्रेसकडे कोणताही पर्याय उरला नाही. तो जड अंत:करणाने पॅव्हेलियनकडे निघाला. तेव्हा चार्ल्स त्याला म्हणाला, “डॉक्टर साहेब, खरंच तुम्ही निघालात? अजून एक स्टम्प उभाच आहे!”
जेव्हा ग्रेग थॉमसने विव रिचर्डसला डिवचले…
वेस्ट इंडीजचा फलंदाज विव रिचर्डसला Viv Richards | तुम्ही ओळखतच असाल. विव रिचर्डसचा दरारा असा होता, की त्याच्याविषयी अपशब्द काढणे मोठे धाडसाचे म्हंटले जायचे. कारण अपसब्द उचारणाऱ्या गोलंदाजांना तो थेट प्रत्युत्तर देण्यात प्रसिद्ध होता. अनेक कर्णधारांनी तर त्याच्याविरुद्ध अपशब्द काढण्यास बंदीच घातली होती. एका कौंटी सामन्यात मात्र एका गोलंदाजाने विव रिचर्डसला अपशब्द उच्चारण्याचे धाडस केले. त्याचं काय झालं, की गेलमॉर्गन क्लबकडून Glamorgan Club | खेळताना विव रिचर्डस ग्रेग थॉमसच्या Greg Thomas | गोलंदाजीचा सामना करीत होता. थॉमसचे चेंडू तडकावण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर थॉमसने रिचर्डसला डिवचले. तो म्हणाला, “जर तू वैतागला असशील, तर एक सांगू, हा लाल रंगाचा चेंडू असतो आणि त्याचे वजन दीडशे ग्रॅम असते!” नंतर रिचर्डसने थॉमसच्या पुढच्याच चेंडूवर त्वेषाने हल्ला चढवत तो थेट मैदानाबाहेर तडकावला. हा चेंडू नदीत जाऊन पडला. चेंडू तडकावल्यानंतर रिचर्डस थॉमसला म्हणाला, “ग्रेग, तुला तर माहीतच आहे, चेंडू कसा दिसतो ते. मग आता जा आणि शोधून आण!”
मर्व ह्यूजच्या स्लेजिंगमुळे मियांदादभाऊची दांडी गूल
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि स्लेजिंग हे मेतकूट काही वेगळंच असतं. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मर्व व्ह्यूज Merv Hughes | याला स्लेजिंगचा बादशाह म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याच्या स्लेजिंगमध्ये धमकीही असायची आणि शिव्याही हासडलेल्या असायच्या. त्याच्या खोचक टिपण्यांमुळे तो अपमानितही करायचा. या व्ह्यूजच्या स्लेजिंगचा शिकार जावेद मियांदाद झाला होता. या मियांदादची त्याने अशी जिरवली, की मियांदाद अजूनही ते विसरलेला नसेल. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्ध सामना सुरू होता. व्ह्यूज पाकिस्तानी फलंदाज मियांदादला गोलंदाजी करीत होता. तेव्हा तो मियांदादला म्हणाला, “तू की नाही, बस कंडक्टरसारखाच दिसतो.” या टिपणीमुळे मियांदाद मनातल्या मनात चरफडत राहिला आणि पुढच्याच चेंडूवर व्ह्यूजने मियांदादची दांडी गूल केली. व्ह्यूजने जल्लोष करीत आपल्या सहकाऱ्यांकडे धावत धावत ओरडला, ‘‘चला चला तिकीट खरेदी करा…!”
स्लेजिंग, क्रिकेट आणि हाणामारी!
काही वेळा तर या अपशब्दांमुळे प्रकरण हाणामारीपर्यंतही गेले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डेनिस लिलीने Dennis Lillee | अनेकांना अशाच अपशब्दांनी डिवचले आहे. एकदा त्याने पाकिस्तानच्या जावेद मियांदादलाही डिवचले. त्यावर संतापलेल्या मियांदादने त्याच्यावर बॅटच उगारली होती. तेवढ्यात अंपायरने रोखल्याने अनर्थ टळला.
शेन वॉर्न- डॅरिलमध्ये स्लेजिंग
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नही Shane Warne | स्लेजिंगमध्ये मागे नव्हता. अर्थात तो ऑस्ट्रेलियाचाच ना! तो शरीराने काहीसा स्थूल होता. आताही तो तसाच आहे. एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने डॅरिल कलिननला Daryll Cullinan | डिवचले.
डॅरिलला गोलंदाजी करताना शेन वॉर्न त्याला म्हणाला, “दोन वर्षांपासून तुझी वाट पाहतो. आता बरा तू सापडलास…”
प्रत्युत्तरात डॅरिल त्याला म्हणाला, “मला वाटतं, माझी वाट पाहता पाहता तू सारखा खादाडतच होता वाटतं!”
कुटुंबातला उत्तम खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ Mark Waugh | यालाही कमी खाज नव्हती. या मार्क वॉपेक्षा त्याचा जुळा भाऊ स्टीव वॉ चांगला खेळायचा. इंग्लंडविरुद्ध मार्क वॉ खेळत होता. त्या वेळी बारावा खेळाडू जेम्स ऑर्मंड James Ormond | मैदानात आला. त्याच्याकडे पाहून मार्क वॉ म्हणाला, अरे हा कोण आला? तू इथं कशाला आला? तुझी तर इंग्लंडकडून खेळण्याची लायकीही नाही.”
जेम्सनेही त्याला उत्तर दिलं… “हो, ते बरोबर आहे, पण किमान मी माझ्या कुटुंबात तरी चांगला खेळाडू आहे..”
मार्क वॉला जेम्सने मारलेला हा टोला इंग्लंडच्या खेळाडूंनी मस्त एंजॉय केला.
एका बास्टर्डने दुसऱ्या बास्टर्डला बास्टर्ड म्हंटले…!
एकदा इंग्लंडचा कर्णधार डग्लस जॉर्डन Douglas Jordan | ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यालाही स्लेजिंगचा प्रचंड त्रास झाला. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बिल वुडफूल Bill Woodfull | याच्याकडेच तक्रार केली.
तो म्हणाला, “तुझ्या एका खेळाडूने मला ‘हरामी’ Bastard | म्हंटले!”
बिल वुड्फुल लगेच आपल्या संघातील खेळाडूंकडे गेला आणि म्हणाला, “बरं मित्रांनो! तुमच्यापैकी कोणत्या हरामीने या हरामीला हरामी म्हंटले?”
आपल्याकडे ‘भाड्या’ हा शब्द जितका सहजपणे उच्चारला जातो, तसं ऑस्ट्रेलियात ‘बास्टर्ड’ हा शब्द सहजपणे बोलला जातो. ‘यू लक्की बास्टर्ड!!’ हे तर सहजपणे म्हंटलं जातं. कदाचित इंग्लंडच्या कर्णधाराला हे माहीत नसावं.
अंपायरवरही स्लेजिंग
एकदा गोलंदाज फिल टफनेलने Phil Tufnell | पायचीतचे LBW | जोरदार अपील केले. त्याला विश्वास होता, की फलंदाज आउट आहे. पण छे, अंपायरने त्याचे अपील फेटाळले. संतापाने लाल झालेल्या फिलने अंपायरकडे पाहत ओरडला, “आंधळा आहेस का?” अंपायर गडबडला आणि म्हणाला, “काय म्हणालास?” फिल आणखी भडकला आणि म्हणाला, “बहिरापण आहे का?” भारताविरुद्ध तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची स्लेजिंग प्रचंड गाजली आहे. अशातच एकदा स्टीव वॉ कारकिर्दीतला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळत होता. त्या वेळी पार्थिव पटेलने त्याच्याविरुद्ध काही अपशब्द वापरले. स्टीवने त्याला उत्तर दिले, “अरे बच्चू, माझा सन्मान करायला शीक. जेव्हा मी कसोटी सामना खेळायला लागलो, तेव्हा तू डायपर घालून रांगत होतास!” स्टीव वॉसारख्या ऑस्ट्रेलियन स्लेजिंग विद्यापीठातल्या सीनिअर विद्यार्थ्याला डिवचणे सोपे नाही भावा…!
तुझं डोकंच फोडीन!
रवी शास्त्रीलाही अशाच एका स्लेजिंगला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरू होता. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा माइक व्हिटनी Mike Whitney | याला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात पाचारण करण्यात आले होते. शास्त्रीने मिड-ऑफला चेंडू खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीने मारलेला या चेंडूवर झडप घालत व्हिटनी शास्त्रीला म्हणाला, “पुन्हा जर तू खेळपट्टीवरून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर मी तुझं डोकंच फोडीन.” त्यावर शास्त्री म्हणाला, “जर तू चांगला फलंदाज किंवा गोलंदाज असता तर तू आज बारावा खेळाडू नसता!”
पोरासोरांना काय मारतो?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तोंडाने नाही, तर बॅटनेच सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळताना सचिनने मुश्ताक अहमदला एका षटकात दोन उत्तुंग षटकार खेचले होते.
त्यावर पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर तेंडुलकरला म्हणाला, “पोरासोरांना काय मारतो? धमक असेल तर मला मारून दाखव.” सचिन नेहमीप्रमाणे त्याला काहीही बोलला नाही; कादीरला त्याने आपल्या बॅटीने जे उत्तर दिलं ते कादीर आयुष्यभर विसरला नसेल. पुढचंच षटक कादीरचं होतं. सचिनने त्याची पिसंच काढली. कादीरच्या त्या षटकात सचिनने चार उत्तुंग षटकार आणि एक चौकार खेचला. कादीरचं अर्थातच तोंड बंद झालं होतं.
भावा, आधी फलंदाजी करायला शीक!
इंग्लंडचा फलंदाज रॉबिन स्मिथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. रॉबिन स्मिथ ‘जुडी’ या नावाने ओळखला जायचा. त्याला एकेक धाव काढण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. इतका, की बॅट आणि बॉलचा संपर्कही होत नव्हता. त्याच वेळी गोलंदाज मर्व ह्यूज Merv Hughes | याने त्याला डिवचले, “भावा, आधी फलंदाजी करायला शीक.”
तू इतका जाडा कसा काय रे?
विश्वातील सर्वांत उत्तम गोलंदाजांपैकी ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रथ. तो त्याच्या धारदार गोलंदाजीने जेवढा प्रसिद्ध होता, तसा तो स्लेजिंगमध्येही कुविख्यात होता. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेदरम्यान सुरू असलेल्या सामन्यात मॅकग्रथ आणि एड्डो ब्रांड्स Eddo Brandes | या दोघांमध्ये अशीच शाब्दिक चकमक उडाली. मॅकग्रथ गोलंदाजी करीत असताना त्याला ब्राँड्सची विकेट काही मिळत नव्हती. त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मॅकग्रथने स्लेजिंगचं हत्यार उपसलं. तो म्हणाला, “तू इतका जाडा कसा काय रे?” त्यावर ब्रांड्सने खोचक उत्तर दिलं, “कारण जेव्हा मी तुझ्या बायकोवर प्रेम करतो, तेव्हा ती मला एक बिस्कीट देते.”
मंकी गेट : क्रिकेट विश्वातील ‘स्लेजिंग’ चा कळसाध्याय
क्रिकेट मालिका जसजशा वाढत गेल्या तसतशा स्लेजिंग म्हणजेच अपशब्दांची मालिकाही तेवढी चढत्या क्रमाने रंगत गेली. मात्र, या स्लेजिंगने एका प्रकरणात कळस गाठला. अर्थातच, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमध्ये स्लेजिंगचं प्रकरण चांगलंच तापलं. हे प्रकरण होतं 2007-08 मधलं. प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण तर फार चवीने चघळलं गेलं. त्याला कारण ठरलं, अँड्र्यू सायमंड्सचा Andrew Symonds | हरभजनसिंगवर केलेला वर्णभेदाचा आरोप. हा आरोप सिद्ध झाला नाही हा भाग निराळा. पण या प्रकरणाने दोन देशांतील खेळाडूंची मने काहीअंशी दुरावली हेही तेवढेच खरे. या वर्णभेदाच्या आरोपामुळे हरभजनसिंगवर जी तीन सामन्यांची बंदी लादली गेली होती, ती मागे घेण्यात आली. मात्र, त्याऐवजी दुसरा आरोप लावण्यात आला तो म्हणजे अपशब्द आणि अपमानजनक टिपणीचा; वर्णभेदाचा नाही. तो हरभजनने मान्यही केला. त्यामुळे त्याला सामन्यातून पन्नास टक्के रक्कम कपातीचा दंड झाला. अपील कमिशनरने नंतर असा खुलासा केला, की जर मला हरभजनचं आधीचं वर्तन माहिती असतं तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी लादली गेली असती. सायमंड्सनेही नंतर मान्य केलं, की या प्रकरणाची सुरुवात माझ्या एका अपशब्दाने झाली.
तुम्हाला क्रिकेटचे किती नॉलेज आहे?
Follow on official Facebook Page kheliyad
[jnews_hero_11 post_offset=”5″ include_category=”65″]
2 Comments