स. ग. पाचपोळ यांची कविता
हंबरून वासराले… या कवितेचा मूळ कवी स. ग. पाचपोळ आहेत हे अनेकांना माहितीच नाही. अनेक जण तर नारायण सुर्वेंचंच नाव घेत आहेत. ही चूक आधी कोणी तरी केली असेल, पण त्याला बळ दिलं अभिनेता जितेंद्र जोशी याने.
व्हॉट्सअॅप असो वा फेसबुक… सोशल मीडियावर काही पोस्ट फिरवताना सुरुवातीला एक वाक्य असतं.. ते म्हणजे- कोणी लिहिलंय माहिती नाही, पण जे लिहिलंय ते खूप सुंदर आहे…
सोशल मीडियावर अशा अनामिकांच्या अनेक लेख, कवितांचा मारा होत असतो… हे असं कशामुळे होतं? कोण या अनामिकांची नावं पुसून टाकत आहेत? अनेक जण इतरांच्या पोस्ट स्वतःच्या नावाने खपवतात… तसा अनुभवही अनेकांना आला आहे. आपल्याच पोस्ट आपल्याला दुसऱ्याच्या नावाने पाहायला मिळतात. काही महाभाग तर वपुर्झातील विचार पुलंच्या नावावर, तर पुलंचे विचार आणखी भलत्याच्याच नावाने फॉरवर्ड करतात… हे सातत्याने होत राहिलं तर इंद्राणीच्या नात्यागोत्यासारखं कोणी काय लिहिलंय याचा घोळ होत राहील.
आता हेच पाहा ना
हंबरून वासराले चाटती जवा गाय
स. ग. पाचपोळ यांची ही संपूर्ण कविता
हंबरून वासराले
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय
आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय
बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकूनशान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय
काट्याकुट्या येचायाले जाये माय रानी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानत नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय
माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय
– (कै.) प्रा. स. ग. पाचपोळ