माउंट एव्हरेस्ट ः शिखर की साहसाचं मखर?
माउंट एव्हरेस्ट ः शिखर की साहसाचं मखर?
आपण गणेशोत्सवात जी आरास करतो, ती अवघ्या दहा दिवसांची. त्यात मखराचाही वापर करतो. गड, किल्लेही या मखराचे साकारतो. भक्कम तटबंदी वगैरेंची आरास ही मखरांचीच. पण हात लावला, की केव्हाही कोलमडून पडण्याची शक्यता. त्यामुळे दुरून डोंगर साजरे या म्हणीचा शब्दशः प्रत्यय येतो.
लांबून जे तुम्हाला सुंदर दिसतं त्यावर समाधान मानावं. जवळून पाहिलं, की तुमचा भ्रमनिरासही होऊ शकेल. यात गिर्यारोहकांच्या साहसाविषयी अजिबात शंका घ्यायची नाही. मात्र, या शिखराकडे कूच करताना आपण माणुसकी तर पायदळी तुडवत नाही ना, असा प्रश्न पडतो. Mount Everest Series |
पण काहीही असो, एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांचं कमालीचं कौतुक वाटतं. पावलोपावली आव्हानांचा डोंगर. सर्वांत भयंकर म्हणजे हाडे गोठविणारी थंडी आणि ऑक्सिजनचा अभाव. त्यात छाती दडपणारी या पर्वताची उंची.
हे सगळं पार करीत तुम्ही जेव्हा माउंट एव्हरेस्टचं Mount Everest | शिखर गाठता तेव्हा साहजिकच ही कामगिरी एक अदम्य साहसच म्हणायला हवी. मात्र, यापलीकडेही एक भयावह वास्तव आहे. हे वास्तव जाणून घेताना अंगावर शहारे येतात.
मग प्रश्न पडतो, या अदम्य साहसाचं कौतुक करावं की चिंता? गिर्यारोहकांच्याच अनुभवातून या सगळ्या कहाण्या जगासमोर आल्या आहेत. यातील एकच गोष्ट आपल्यासमोर आली आहे. ती म्हणजे शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांच्या लढाऊ वृत्तीची.
एकूणच या थक्क करणाऱ्या एव्हरेस्ट पर्वताची दुसरी बाजू सांगणारी मालिका खास ‘खेळियाड’च्या Kheliyad | वाचकांसाठी घेऊन आलो आहे. तेव्हा तुम्हीही म्हणाल, की हे शिखर आहे की नुसतंच जणू साहसाचं मखर आहे?
मे महिन्यामध्ये या एव्हरेस्ट मोहिमांना सुरुवात होते. या महिन्यात तापमान जास्त असते. ‘जेट स्ट्रीम्स’ही वाऱ्यात परावर्तित होतात. हवामानाचं काय, तो तर लहरी असतो. कधी बदलेल आणि कधी तुमचे मनसुबे धुळीस मिळवेल सांगता येत नाही. तरीही हा मे महिन्याचा काळ चढाईसाठी किमान दृष्टीने उत्तम.
या शिखरावर हाडे गोठविणारी थंडी असली तरी खिसा मात्र गरम ठेवावा लागतो. कारण अशा मोहिमांसाठी २५ ते ३० लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. केवळ खर्च करण्याची क्षमता उपयोगाची नाही, तर शारीरिक क्षमताही तितकीच महत्त्वाची आहे.
आता हे नामानिराळं धाडस करायचं, म्हणजे मानसिक तयारीही हवी. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एव्हरेस्ट मोहीम आर्थिक, शारीरिक आणि मानसिक या तिन्ही पातळ्यांवर भयंकर खडतर आहे. बरं हे सगळं करताना तुम्हाला काही तरी अनुभव हवा.
त्यासाठी कोलोरॅडोतील शिखरं असो वा अन्य छोटी-मोठी शिखरं सर करण्याचा किमान अनुभव तरी हवा. उगाच सर्वोच्च शिखराच्या ध्यासाने गेलेली हौशी लोकं शिखराच्या पायथ्याशीच गडबडून जातात.
अनेकांनी तर अर्ध्यावरूनच प्रवास सोडला, तर काही जण गेली, ती पुन्हा परतलीच नाहीत. त्यांचे मृतदेहही त्यांच्या कुटुंबाला पाहायला मिळालेली नाहीत. म्हणजे निरोप देताना जेवढे पाहिले तेवढेच.
कोणतीही गिरिभ्रमणाची मोहीम सर करताना काही संकेत पाळले जातात. म्हणजे हवामानाची अनुकूलता, तेथे जाताना लागणाऱ्या वस्तू, खाण्यापिण्याचे जिन्नस असा सगळा विचार केला जातो.
ज्या वेळी तेन्झिंग नोर्ग्ये यांनी १९५३ मध्ये चढाई केली होती, त्या वेळी तर आताच्या सारख्या कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता तरी तुमच्या मदतीला शेर्पा आहे, अनेक कंपन्याही सोयी-सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.
त्यामुळे तुमचं सामान वाहून नेणं सोपं झालं आहे. तुमचं जेवण बनवून देण्यासाठी शेर्पा दिमतीला असतो. पूर्वी तर जो चढाई करणार असतो, त्याच्याच पाठीवर सगळं ओझं असायचं. जेवणही स्वतःलाच बनवावं लागतं.
अर्थात, तेन्झिंग नोर्ग्ये हा शेर्पाच असल्याने त्याला हे शक्य झालं. असो, तर या एव्हरेस्टच्या चढाईसाठी एकेक टप्पा महत्त्वाचा आणि तितकाच खडतरही असतो. बेस कॅम्पवर पोहोचायलाच तुम्हाला १७ हजार फुटांची चढाई करावी लागते. साधारणपणे 60 दिवसांच्या या मोहिमेतील दोन आठवडे तर या बेस कॅम्पलाच लागतात.
या बेस कॅम्पवर तुम्हाला हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. मग तेथून या मोहिमेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. बेस कॅम्पची चढाईच इतकी आव्हानात्मक असते, की अनेकांना तर या बेस कॅम्पवरूनच शिखर सर करण्याचा आपला इरादा बदलावा लागला आहे.
क्षमता नसतानाही ज्यांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा कधीच परतले नाहीत. म्हणजे १९५३ पासूनच्या मोहिमांचा आढावा घेतला, तर तब्बल ४०० पेक्षा अधिक मृतदेह या एव्हरेस्टच्या कुशीत कायमची विसावलेली आहेत. काही मृतदेह तर ७० वर्षांपासून पडून आहेत.
हे वास्तवच अंगावर शहारे आणणारं आहे. हे मृतदेह इतक्या उंचावर आहेत, की ते खाली आणण्यासाठी पन्नासपेक्षा अधिक लोकांचं एक पथक लागेल. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा तर तुम्ही विचारही करू शकणार नाहीत.
मृतदेहांवरूनच सांगायचं झालं, तर एव्हरेस्टवर दोन असे पॉइंट आहेत, ज्यांची नावं मृतदेहांवरून पडली आहेत. एव्हरेस्टवर ग्रीन बूट नावाचा एक पॉइंट आहे. जर गिर्यारोहक या ठिकाणावर पोहोचला तर तो सांगतो ग्रीन बूटवर पोहोचलो.
हा ग्रीन बूट म्हणजे हिरवे बूट परिधान केलेल्या एका गिर्यारोहकाचा मृतदेह आहे. हा मृतदेह २० वर्षांपासून पडून आहे. दुसरा पॉइंट स्लीपिंग ब्यूटी नावाचा आहे. एका अमेरिकी महिलेचा मृतदेह निपचित पडलेला आहे. बर्फामुळे तिचं संपूर्ण शरीर पांढरंशुभ्र पडलं आहे.
एका बाहुलीसारखी ती सुंदर भासते. त्यावरून तिला स्लीपिंग ब्यूटी हे नाव पडलं. या दोघांच्याही कहाण्या तर अंगावर शहाऱ्या आणणाऱ्या आहेत. या मालिकेत तुम्हाला ते वाचायला मिळेलच. पण सांगायचा हेतू हा, की एव्हरेस्टवर अशा अनेक मृतदेहांचा खच पडला आहे.
mount everest series |
स्लीपिंग ब्यूटी असो वा ग्रीन बूट असो वा उर्वरित शेकडो मृतदेहांच्या कहाण्या काही तरी सांगत आहेत. मात्र, ते समजून घ्यायला वेळ नाही. कारण मोहिमा सर करण्यासाठी आलेले गिर्यारोहक कुणाकडून तरी कर्ज घेऊन चढत आहेत, तर कुणी प्रायोजकाच्या मदतीने आले आहेत.
त्यामुळे कुणी मरणासन्न अवस्थेत असले तरी त्याला मदत करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नाहीत. एक महिला गिर्यारोहक तर ऑक्सिजन संपल्याने मृत्यूच्या घटका मोजत होती. तिला गिर्यारोहक पाहत होते, मात्र कुणीही तिला मदत करीत नव्हते. ते झपझप पुढे जात होते.
अचानक कुणी तरी ऑस्किजनची बाटली तिच्याकडे फेकली आणि वाचली. स्लीपिंग ब्यूटीची कहाणी तर वेगळीच आहे. ती मरणासन्न अवस्थेत असताना तिच्याजवळ कुणीही येत नव्हते. तिला जर वेळीच मदत झाली असती तर कदाचित स्लीपिंग ब्यूटीची शोकांतिका तिच्या वाट्याला कधीच आली नसती.
सेवांग पलजोर जो ग्रीन बूट नावाने अजरामर झाला, त्याला जपानी गिर्यारोहकांनी मदत केली नसल्याची चर्चा आहे. त्यालाही मदत झाली असती तर तो आज ग्रीन बूट नावाच्या वेदना झेलत नसता. एक मृतदेह तर तब्बल ७० वर्षांनी खाली आणण्यात आला.
एकूणच या शिखरावर हाडे गोठविणारीच थंडी नाही, तर मनेही गोठली जातात की काय, असा प्रश्न पडतो. स्लीपिंग ब्यूटीला वाचविण्यासाठी एक महिला पुढे आली होती, मात्र ती एकटी काहीही करू शकली नाही.
मात्र, या प्रयत्नात तिने शिखराकडे जाण्याचा विचार सोडून केवळ स्लीपिंग ब्यूटीला वाचविण्याचाच प्रयत्न केला. माणुसकीची अशीही काही उदाहरणे आहेत. मात्र, ती अगदी बोटावर मोजण्याइतकी.
या अदम्य साहसाच्या हव्यासापोटी अनेक जण कर्जाच्या खाईत कोसळले. लाखो रुपयांचा खर्च करण्याची क्षमता नसलेले अनेक गिर्यारोहक कुणाच्या तरी मदतीने आलेले असतात. त्यामुळे शिखर सर करण्याचा आनंद त्यांना फार काळ अनुभवता आलाच नाही.
कौतुक करणाऱ्यांपेक्षा त्यांच्यामागे कर्जवसुली करणाऱ्यांचेच अधिक फोन आल्याचीही उदाहरणे आहेत. एव्हरेस्टच्या अंतरंगात दडलेल्या अशाच कहाण्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न माउंट एव्हरेस्ट ः शिखर की साहसाचं मखर या मालिकेतून केला आहे.
एव्हरेस्टच्या इतिहासापासून सुरू झालेल्या या मालिकेत मन हेलावणाऱ्या कहाण्याही दडलेल्या आहेत. ही मालिका आपणही वाचा आणि इतरांनाही पुढे पाठवा. आणि हो… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लिहायला बळ मिळेल.
4 Comments