बेशिस्तीला चाप बसायलाच हवा
ऑस्ट्रेलियन टेनिसपटू किरगिओस व बेनार्ड टॉमिक यांना बेशिस्तपणा चांगलाच भोवला आहे. त्यांच्याच ऑस्ट्रेलियन टेनिस असोसिएशनने धडा शिकवत देशातील सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित ठेवले. या दोन्ही खेळाडूंची पुरस्कारात गणतीच केली नाही. मुळात टेनिसच नाही तर अन्य खेळांतही बेशिस्त वाढत आहे. त्याला चाप बसविण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पदच म्हणायला हवीत…
खेळातून शिस्त वाढते, असं कधी काळी ठामपणे म्हणता येत होतं. आता तसं राहिलं नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. ज्या वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा त्यामागची भूमिका एकदम स्पष्ट होती, की खेळातून वैर संपावं. मैत्री वाढीस लागावी. मुळात कोणत्याही खेळामागची भूमिका हीच राहिली आहे. मात्र, तसं आता कुठंही जाणवत नाही. देशांतर्गत स्पर्धांमध्येच प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन टेनिस असोसिएशनने उचलले पाऊल महत्त्वाचे मानले पाहिजे. त्यांनी निक किरगिओस व बेनार्ड टॉमिक यांची ‘मोस्ट आऊटस्टँडिंग एलिट टेनिस प्लेअर अँड अॅम्बेसिडर’ या पुरस्काराच्या नामांकनातही दखल घेतली नाही. हे दोन्ही खेळाडू स्पर्धेत नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. किरगिओसचे वय अवघे २०, तर टॉमिक २३ वर्षांचा आहे. त्यांना भविष्यात अजून बराच पल्ला गाठायचाय. या कारवाईने कदाचित ते ताळ्यावर येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
किरगिओसने गेल्या वर्षी स्टॅन वॉवरिंकाला भर कोर्टवरच अपशब्द वापरले होते, तर टॉमिकने मायामीतील पार्टीत धिंगाणा घातला, तसेच टेनिस ऑस्ट्रेलियाशीही पंगा घेतला होता. त्याचा फटका त्यांना बसला आहे. मात्र, जगाच्या पाठीवर टॉमिक आणि किरगिओस हे दोनच खेळाडू बेशिस्त आहेत असे नाही, तर अनेक खेळाडूंची कारकिर्द बेशिस्तपणामुळेच डागाळलेली आहे. ८०–९० च्या दशकापर्यंत खेळाडूंच्या वर्तनावर कधी चर्चा होत नव्हती. कदाचित त्या वेळचा मीडिया ब्रेकिंग न्यूजसाठी आसूसलेला नव्हता आणि खेळात खुन्नस वगैरे प्रकार अजिबात नव्हते. आता तर युद्धजन्य परिस्थितीच निर्माण केली जाते. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये भारत–पाकिस्तान सामना असो वा अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया– इंग्लंड सामना असो. यातूनच चिडकेपणा खेळाडूंमध्ये आपसूकच उतरतो.
कशामुळे वाढतोय बेशिस्तपणा?
खेळाडूंमध्ये बेशिस्तपणा नेमका कशामुळे वाढतो यामागची कारणे अनेक आहेत. त्यातलं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत खेळामध्ये वाढलेली व्यावसायिकता. त्यातून येनकेनप्रकारे जिंकायचेच ही वाढत चाललेली वृत्ती. त्यामुळे खेळाडूला पैसा, ग्लॅमरसची लालसा वाढत आहे. याला सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू अपवाद असतीलही, पण ही उदाहरणे फारच कमी आहेत हे खेदाने म्हणावे लागते. आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये ही व्यावसायिकता आणि त्यातून उघडकीस आलेले गैरप्रकार ही या बेशिस्तपणाची उत्तम उदाहरणे आहेत. स्पर्धेमागचा हेतू उदात्त असूनही हे प्रकार समोर आले आहेत हे जास्त वाईट. कारण येथे जिंकण्याला जास्त किंमत आली; खेळण्याला नाही किंवा कौशल्याला नाही.
क्रिकेटमधील बेशिस्तपणा
भारतात क्रिकेटला जितकं ग्लॅमर आहे तितकं अन्य खेळांना मिळालेलं नाही. सभ्य माणसांचा खेळ किंवा साहेबांचा खेळ ही ओळख अलीकडे विनोदी वाटते. अगदी गेल्याच महिन्यात फिरोजशाह कोटला मैदानावर गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यातील धक्काबुक्कीही अशीच चर्चेत आली होती. दोघेही हमरीतुमरीवर आले होते. गौतम गंभीरसारख्या खेळाडूकडून असं घडावं हे जास्तच ’गंभीर’ म्हणावं लागेल. कारण विश्वकरंडक सामना जिंकल्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली जल्लोष करणाऱ्या संघात हाच तो गंभीर होता, ज्याने गरीब लहान मुलांच्या हाती तिरंगा पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी कणव निर्माण झालेली अनेकांनी पाहिली होती. सुग्रास जेवणाचा आस्वाद न घेता त्यांनी त्या मुलांसाठी जेवण पाठविले होते. पाच वर्षांपूर्वी २०१० मध्ये बीसीसीआयनेही युवराजसिंग, झहीर खान, रोहित शर्मा, आशीष नेहरा, पीयूष चावला आणि रवींद्र जडेजा या सहा खेळाडूंना बेशिस्त वर्तन आणि रात्री पबमध्ये फॅन्सबरोबर झालेल्या बाचाबाचीमुळे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये कोलंबोत झालेल्या कसोटी सामन्यात बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी भारताचा इशांत शर्मा आणि श्रीलंकेचे तीन खेळाडू धम्मिका प्रसाद, दिनेश चंडीमल आणि लहिरु थिरीमाने यांच्यावर आयसीसीने कारवाई केली होती. अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसारख्या जबाबदार खेळाडूंमुळे क्रिकेटमध्ये आचारसंहितेचा विचारही कधी केला जात नव्हता. मात्र, आता बदलत्या परिस्थितीनुसार खेळाडूंची बेशिस्त खपवून घेतली जात नाही. त्यामुळेच विदेशात खेळाडूंना पब किंवा डिस्कोमध्ये जाण्यास बंदी, तसेच अनोळखी व्यक्तीला खोलीत न बोलविणे आदी नियमच बीसीसीआयने घालून दिले आहेत. या नियमांनंतरही खेळाडूंचा बेशिस्तपणा काही कमी झाला आहे असे वाटत नाही. पाकचा माजी कसोटीपटू जावेद मियाँदादने डेनिस लिलीवर उगारलेली बॅटही क्रिकेटप्रेमी विसरलेले नसतील. हरभजनसिंग, श्रीशांतची बेशिस्तही अनेकांच्या स्मरणात असेल. हरभजनचे अँड्र्यू सायमंड्सशी झालेली बाचाबाचीही कोणीही विसरलेले नाहीत. ही बेशिस्त रोखण्यासाठी नियम आल्यानंतरही आणखी उपाययोजना करण्याचा खल सुरू आहे. अशीही चर्चा सुरू आहे, की क्रिकेटमध्ये फुटबॉलसारखा यलो, रेड कार्डचा अवलंब करण्यात यावा. अद्याप त्यावर एकमत झालेले नाही; पण त्यानंतरही काही उपाययोजना आल्यास नवल वाटायला नको.
फुटबॉलमध्येही वाह्यातपणा
क्रिकेटच नाही, तर फुटबॉलमधील फ्रान्सचा झिनेदीन झिदानची इटलीच्या माकरे मॅटेरेझी याला डोक्याने मारलेली टक्कर अनेकांच्या लक्षात असेल. झिदान फुटबॉलमधील वलयांकित खेळाडू. मात्र त्याच्या वर्तनाने २००६ मधील विश्वचषक स्पर्धा जास्त चर्चेत आली होती. अर्थात, या घटनेला मॅटेरेझ्झीही तेवढाच जबाबदार होता. गेल्या वर्षीची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धाही खेळाडूंच्या बेशिस्तपणामुळे अशीच चर्चेत आली होती. उरुग्वेचा स्टार खेळाडू लुईस सुवारेझ इटलीच्या जॉर्जिओ शिएलिनी याला चावला होता. ही घटना कोणालाही रुचली नाही. सुवारेझ तसा वादग्रस्तच खेळाडू. २०१३ मधील प्रीमिअर लीग स्पर्धेत चेल्सीच्या ब्रानिस्लाव इवानोविच याला मारल्याबद्दल त्याच्यावर दहा सामन्यांची बंदीही घालण्यात आली होती. त्याचा हा पहिलाच गुन्हा नव्हता. त्यापूर्वीही २०१० मध्ये त्याने एका खेळाडूला मारहाण केली होती. फुटबॉलमधील या वाह्यातपणाच्या प्रातिनिधिक घटना आहेत. मात्र, बेशिस्तपणाचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा या घटना डोळ्यांसमोरून गेल्याशिवाय राहत नाहीत. खेळाची प्रतिष्ठा डागाळणारे असे प्रसंग मग ब्रेकिंग न्यूज होतात.
टेनिसपुरता विचार केला तर या बेशिस्तपणाला अंकुश लावण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टेनिसने पाऊल उचलले हे जास्त दिलासादायक आहे. तिथल्या क्रिकेटकडूनही अशाच प्रकारची अपेक्षा आहे. डॉन ब्रॅडमनपासून स्टीव वॉ व आता रिकी पॉंटिंगपर्यंतच्या कर्णधारांची कारकीर्द भन्नाटच आहे. मात्र, क्रिकेटविश्वात स्टीव वॉपासून ऑस्ट्रेलियाची प्रतिमा फारशी चांगली म्हटली जात नाही. स्लेजिंग या गोंडस नावाखाली प्रतिस्पर्धी संघांना किती छळले असेल कांगारूंनी! किंबहुना त्यांच्यामुळेच स्लेजिंग या शब्दाचा अर्थ जगाला उमगला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. खिलाडू वृत्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवत राहिला. रिकी पाँटिंगने तर बेशिस्तपणाचा कळसच केला. मुंबईतल्या बक्षीस वितरण समारंभात पाँटिंगसह ब्रेट ली,अँड्र्यू सायमंड्ससह अन्य खेळाडूंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अपमान केला होता. नंतर दिलगिरी, खेद या औपचारिकतांना काही अर्थ उरत नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियात बेशिस्तपणावर कठोर निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा तो जास्त कौतुकास्पद म्हणायला हरकत नाही. भारतातील प्रीमिअर लीग स्पर्धामुळेही खेळाडूचे वर्तन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल.
एकूणच खेळातला नितळपणा हरवत चाललाय… कधी ही बेशिस्त नियमांतून, कारवाईतून, आचारसंहितेतून डोकावते, तर कधी कधी ती उत्तेजक चाचणीतूनही डोकावते. पूर्वी खेळाडूला अत्याधुनिक साधने माहीत नव्हती. आता फिटनेसला प्रशिक्षक, ध्यानासाठी प्रशिक्षक, खेळातल्या तंत्रज्ञानालाही प्रशिक्षक, खेळाचं विश्लेषण करणाराही स्वतंत्र प्रशिक्षक आला. कदाचित उद्या वर्तन सुधारण्यासाठीही प्रशिक्षकाची नियुक्ती न होवो एवढीच अपेक्षा.
(Maharashtra Times, Nashik & Khandesh : 23 Nov. 2015)
[jnews_hero_14 post_offset=”7″ include_category=”60″]