Sports Review
पुरस्कार पद्धत पारदर्शी हवी!
पुरस्कार पद्धत पारदर्शी हवी!
उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात सर्वत्रच जिल्हा क्रीडा पुरस्कारांची औपचारिकता उरकली असेल. ज्या खेळाडू, संघटकांचा सन्मान झाला, त्यांचे कौतुकच आहे; पण पुरस्कारामागचा हेतू मात्र कुठेही साध्य होताना दिसत नाही. सरकारी नियमांच्या जोखडातच गुणवानांना जोखायचे असेल तर अशा पुरस्कारांची रचनाही सुस्पष्ट असायला हवी.
प्रस्ताव सादर करण्यापेक्षा नको तो पुरस्कार, अशी भावना प्रत्येकाच्या मनात बळावत चालली आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारांबाबत तरी अशी परिस्थिती आहे. नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कारांची यादी यंदा प्रथमच जाहीर होऊ शकलेली नाही.
पुरस्कार वितरणानंतरच पुरस्कारप्राप्त व्यक्ती समजू शकल्या. असे का झाले, याच्या खोलात जाण्यापेक्षा पुरस्कारासाठी संघटना का पुढे येत नाही, ते जिल्हा क्रीडा कार्यालयाने कधी जाणून घेतले आहे का?
नाशिक जिल्ह्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. धावपटूंचं शहर अशी ओळख मिळविणाऱ्या नाशिकमध्ये जिम्नॅस्टिक, जलतरण, बुद्धिबळ, जलतरण, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस आदी खेळांनीही लौकिक मिळवला आहे.
असे असले तरी पुरस्कार काही ठराविक खेळांनाच का जातो? ही खंत क्रीडाप्रेमींना आहे, तशीच तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनाही वाटावी यापेक्षा दुर्दैव आणखी काय म्हणावं! ज्यांना पुरस्कार मिळाले, त्यांचं कौतुक आहेच; पण अन्यही खेळांतील गुणवंत खेळाडू, संघटक या पुरस्कार योजनेत सहभागी का होत नाही, यावर जिल्हा क्रीडा कार्यालयाने कधीच विचार केला नाही.
केवळ नाशिकमध्येच हा प्रश्न आहे असे अजिबात नाही. जळगावातही हीच परिस्थिती आहे. जळगावचे फारूक शेख यांनी, जिल्हा पुरस्कारांबाबत पारदर्शकताच नसल्याचे म्हटले आहे, तर नाशिक जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षक प्रबोधन डोणगावकर यांनी, पुरस्काराची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच या पुरस्काराबाबत बहुतांश संघटनांना स्वारस्य राहिलेले नाही.
काही संघटकांनी प्रस्ताव सादर करणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाने हे अपयश स्वतःकडे घ्यायला कुणाची हरकत नसेल.
याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाने कधी तरी संघटनांशी संवाद साधला आहे का? पुरस्कार कसे सादर करायचे, त्याची गुणदान पद्धती कशी आहे, ते सादर करण्याची प्रक्रिया कशी आहे, याची माहिती संघटनांना मिळायला हवी.
आता अशी परिस्थिती आहे, की बोटावर मोजण्याइतक्याच संघटना दरवर्षी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करतात. या प्रस्तावांवरून जिल्हा क्रीडा कार्यालयाला ना खेद वाटतो ना खंत. जिल्हा क्रीडा कार्यालयाचा संघटनांशी सातत्याने संपर्क असूनही ही परिस्थिती आहे.
गुणदान पद्धत जाहीर करा
पुरस्कार जाहीर होत असले तरी पुरस्कारप्राप्त व्यक्तींना तो कशाच्या आधारे दिला, किती गुण दिले हेही जाहीर करायला हवेत. सध्या काय होते, की केवळ नावे जाहीर केली जातात. मात्र, गुण जाहीर केले जात नाहीत.
पुरस्कारप्राप्त व्यक्तीला गुण किती मिळाले हे जर जाहीर झाले तर आपण कुठे कमी पडलो, हेही इतरांना समजू शकेल. पारदर्शक कामकाज यातूनच सिद्ध होईल.
गुणवान खेळाडू संपले का?
नाशिकमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र, आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंना थेट पुरस्कार दिला जातो. २०१२ मध्ये धावपटू मोनिका आथरे हिला थेट पुरस्कार देण्यात आला आहे.
म्हणजेच कधी तरी गुणवान खेळाडूंसाठी पुरस्काराच्या नियमांची चौकट मोडावी लागते. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणारी व्यक्ती पात्र असते हे जरी खरे असले तरी ज्युनिअर गटात जागतिक विक्रम केला तरी त्याला पुरस्कारच द्यायचा नाही का?
पुरस्कारांची यादी पाहिली तर केवळ चार-पाच खेळ असे आहेत की ज्यांना सातत्याने पुरस्कार मिळत आहे. खो-खोमध्ये स्वप्निल चिकणे हा राष्ट्रीय कुमार गटातील सर्वोच्च वीर अभिमन्यू पुरस्काराचा बहुमान मिळविणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरच त्याचा सराव सुरू असतानाही त्याची दखल जिल्हा क्रीडा कार्यालयाने कधी घेतली नाही. पुरस्कार देऊ शकणार नसाल तर किमान त्याचा फूल देऊन सत्कारही कधी करणार नाही का? असे अनेक खेळांमध्ये स्वप्निल आहेत, कविता आहेत, मोनिका आहेत. त्यांची दखल घेतली गेली पाहिजे.
निष्पक्ष कमिटी हवी
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निष्पक्ष समिती असावी. आज अशी परिस्थिती आहे, की प्रस्ताव दाखल होतो तोच मुळी मिळेल या आत्मविश्वासाने! जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा सुखद धक्का बसायला हवा, इतकी या पुरस्काराची छाननी गोपनीय हवी. समितीत संघटनांबाहेरील व्यक्तींचा प्रतिनिधी असेल तर पुरस्काराची निवड अधिक पारदर्शी होईल. केवळ पुरस्कार द्यायचे म्हणून औपचारिकता पार पाडायची असेल तर तो खेळाडूच्या ‘मेरिट’चा अपमान आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार म्हणजे रेल्वेचे तिकीट काढण्यासारखं झालं आहे. रिझर्वेशन कन्फर्म झालं तर ठीक नाही तर… ही फॉर्म सिस्टीम अतिशय क्लिष्ट ठरत आहे, त्यामुळेही अन्य खेळ पुरस्कारापासून दुरावले आहेत. पुरस्कार जाहीर केले तर त्यांचे गुणही जाहीर करायला हवे. त्यामुळे कळेल तरी कोण कुठे आहे. तसे होत नाही.– प्रबोधन डोणगावकर,एनआयएस प्रशिक्षक, जिम्नॅस्टिक
प्रस्ताव किचकट असले तरी काही लोकांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळवणे खूप स्वस्त झाले आहे. गुणवान खेळाडूंऐवजी ठराविक संघटनांनाच पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्कारासाठी जे सर्टिफिकेट सादर केले जात आहेत त्याची छाननी होत नाही. गुणही जाहीर केले जात नाहीत. त्यामुळे अशा पुरस्कारांबाबत स्वारस्य राहिलेले नाही.
– फारूक शेख, जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी, जळगाव
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon, 1 Feb. 2015)
[jnews_block_22 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]