खेळांचे फौजदार!
नाशिकच्या क्रीडा चळवळीला चालना देण्यासाठी गेल्याच महिन्यात जिल्हा क्रीडा महासंघ आणि ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ नाशिक अशा दोन संघटना स्थापन झाल्या. या संघटना खरंच खेळाडूंचे प्रश्न सोडविणार आहे की नुसतीच फुकट फौजदारी ठरणार हे काळच ठरवेल… इतिहासात डोकावलं तर हे खेळांचे फौजदार पुढे काही करू शकतील याची सूतराम शक्यता वाटत नाही.
सर्व क्रीडा संघटनांचं पालकत्व स्वीकारण्यासाठी, थोडक्यात म्हणजे खेळांचे फौजदार झालेल्या सध्या नाशिकमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. कधी नव्हे तो खेळ आणि खेळाडूंच्या विकासाचा प्रत्येकाने ध्यास घेतला आहे. विशेषतः छत्रपती पुरस्कारप्राप्त धुरंधरांनी पुढाकार घेतल्याने भविष्यात नाशिकचा क्रीडाविकास प्रचंड झपाट्याने वाढेल, असं काही तरी वाटू लागलंय. खेळाविषयी इतकी आपुलकी असलेलं नाशिक महाराष्ट्रातलं एकमेव शहर असेल!
अनेक बैठकींमागून बैठकी झडत अखेर नाशिक जिल्हा क्रीडा महासंघाची स्थापना झाली आणि छत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड यांनी या नव्या संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. म्हणजेच खेळांचे फौजदार झालेल्या संघटनेचे नायक. क्रीडा महासंघाच्या स्थापनेनंतर काही दिवसांनी ‘ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ नाशिक’ या संघटनेचीही स्थापना झाली. राष्ट्रवादीचे अर्जुन टिळे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. खरं तर ही संघटना कागदोपत्री वर्षभरापूर्वीच स्थापन झाली होती. खूप दिवस कागदावर असलेल्या या संघटनेने ऑलिम्पिक सप्ताहाचा मुहूर्त साधत लोकांसमोर आणली एवढेच. विशेष म्हणजे या संघटनेच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत बऱ्याच क्रीडा संघटकांना माहितीच नव्हती! अर्थात, या संघटनेच्या नावावरून लक्षात येते, की ऑलिम्पिकमध्ये समावेश असणाऱ्या खेळांचे पालकत्व या संघटनेने स्वीकारले आहे. मग क्रीडा महासंघाची गरज नाही, असा त्याचा अर्थ आहे का? १९८५-८६ मध्येही नाशिक जिल्हा ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झाल्याचं नाशिककरांना कदाचित स्मरत असेल… एखादी संघटना आठवणीत राहण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे खूप काम केलं असेल म्हणून आणि दुसरे म्हणजे काहीच काम केलं नसेल तर..! ही संघटना आठवणीत राहिली असेल तर दुसऱ्या कारणामुळे आणि विस्मरणातही गेली असेल तरीही दुसऱ्या कारणामुळेच.