योगाभ्यास : ‘तिच्या’ आरोग्यासाठी…
Yoga for women
योगाभ्यास : ‘तिच्या’ आरोग्यासाठी…
भारताची प्राचीन योगविद्या जगभर गेली. योगाकडे कल वाढत चालला आहे. विशेषतः महिला अधिक सजग झाल्या आहेत. अगदी ऑनलाइन मार्गदर्शनही सहजपणे घेतले जात आहे. मात्र, त्यामागचे शास्त्र समजून घेतले जात नाही. हे शास्त्र सोप्या भाषेत उलगडून सांगत आहेत पुण्याच्या आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ मनाली देव (घारपुरे) . खास ‘खेळियाड’च्या वाचकांसाठी हा निरामय निरोगी आरोग्याचा समृद्ध योगप्रवास नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून…
जबाबदारीसह ती घेते भरारी, तक्रार नसे कधी तिच्या जिव्हारी…
म्हणूनच नवरात्र विशेष… तिच्या आरोग्यासाठी (Yoga for women) आपण घेऊन आलोत योगाभ्यासामधील आसने, जेणेकरून तिच्या तणावविरहित आरोग्य व जीवनशैलीसाठी एक खारीचा वाटा उचलता येईल.
योगाभ्यास हा खरं तर सर्वांनीच करावा. फक्त महिला-पुरुष, वयस्कर असे न समजता लहान मुलांपासून शेवटच्या श्वासापर्यंत योगाभ्यास करावा. योगाभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नव्हेत. ‘अष्टांगयोग’ म्हणजे योगाभ्यास.
मुळातच योग म्हणजे जुळवणे, जोडणे, बांधणे, संयोग पावणे. योग म्हणजे बुद्धी, मन, भावना यांचे एकत्र नियमन.
योगशास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे. पातंजल मुनींनी योगशास्त्राचे ज्ञान योगसूत्रांद्वारे मांडले. भगवद् गीतेतही योगविषयी विवेचन आहे. जसे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करीत राहणे.
प्रत्येक घरातील स्त्रीसुद्धा कुटुंबासाठी सतत कर्तव्य करीत असते; पण मनापासून कोणतीही अपेक्षा न करता अशा स्त्रीसाठी योगाभ्यास खूपच गरजेचा आहे. हाच योगाभ्यास स्त्रीला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदतच करेल.
प्राणायाम, ध्यान, आसने, शुद्धिक्रिया याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच; पण आज आपण स्त्रीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आसने कोणती ते पाहणार आहोत.
वजन वाढणे, अतिरिक्त चरबी जमा होणे. चिडचिड होणे, घुसमट होणे, पिंपल्स येणे, केसगळती, थायरॉइड, तणावामुळे होणारा मधुमेह, पीसीओडी PCOD, पाळीविषयीच्या तक्रारी, गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी अशा अनेक समस्या कमी होण्यासाठी विशिष्ट योगाभ्यास केल्यास खूप छान उपयोग होतो. दररोज सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम, ध्यान करणे आवश्यक आहे. यामुळे वरील समस्या कमी होतील.
योगाभ्यासाचे फायदे | benefits of yoga |
- शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत, चैतन्य, उत्साह वाढेल, सकारात्मक ऊर्जानिर्मिती, आत्मविश्वासात वाढ, आत्मनिर्भरता
थोडक्यात सांगायचे, तर नियमित योगाभ्यास हा शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्लीच आहे.
आजपासून भद्रासन, त्रिकोणासन, वीरांगनासन, भूजंगासन अशी काही आसने, तसेच अनुलोम- विलोम प्राणायामाचा सराव रोज करणे आवश्यक आहे.
मात्र, ज्यांना अद्याप काही व्याधी आहेत, औषधोपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यांनी डॉक्टरांचा किंवा योगतज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा. मगच सराव सुरू करावा; अन्यथा त्रास होऊ शकतो. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, प्रकृतीनुसार योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
पुढच्या काही भागांमध्ये आपण प्रत्येक आसनाविषयी (महिलांच्या दृष्टीने) जाणून घेऊया…
तत्पूर्वी डॉ. मनाली देव (घारपुरे) यांच्याविषयी थोडेसे…
डॉ. मनाली अमोद देव (घारपुरे) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील योग प्रशिक्षक, खेळाडू आणि पंचही आहेत. पुण्यातील माइंड अँड बॉडी योगा संस्थेच्या (MIND AND BODY YOGA INSTITUTE) त्या संस्थापक संचालिका आहेत. डॉ. देव यांनी योगा विषयावर अनेक पुस्तके लिहिली असून, त्यांच्या नावावर एका विक्रमाचीही नोंद आहे. वर्ल्ड यंग अचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना गौरविण्यात आले आहे. योगाभ्यासातील योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार | ओम साईनाथ पुरस्कार |
योगगुरू | युवाश्री पुरस्कार |
सर्वोत्कृष्ट योग प्रशिक्षक | योगरत्न पुरस्कार |
सर्वोत्तम योग संस्था | सावित्रीगौरव राष्ट्रीय पुरस्कार 2019 |
गोल्डन वुमन पुरस्कार | दि प्राइड नेशन पुरस्कार |
चेन्नईतील पतंजली महाविद्यालयातर्फे द्रोणाचार्य पुरस्कार | प्रतिभासन्मान पुरस्कार 2019 |
राज्यस्तरावरील पुरस्कार | मोरया पुरस्कार |
युवागौरव पुरस्कार | स्वयंसिद्धा पुरस्कार |
योगसाधना पुरस्कार | योगिनी 2019 |
सर्वोत्कृष्ट योगशिक्षिका पुरस्कार | गॉर्जिअस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019 |
शक्ती पुरस्कार | प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार 2020 |
सिद्धी पुरस्कार | क्वीन ऑफ योगा 2020 |
लेखनसंपदा |
दैनिक सकाळ व दैनिक संचार वृत्तपत्रांत ब्लॉगलेखन |
विविध मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये योग विषयावर विपुल लेखन |
योगावर आतापर्यंत तीन पुस्तके प्रसिद्ध |