वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता
जर्मनी संघाने पुरुषांच्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जर्मनीला 2006 नंतर 17 वर्षांनी विश्वविजेतेपद मिळाले. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अंतिम लढतीत जर्मनीने गतविजेत्या बेल्जियमला हरवले. निर्धारित वेळेत लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर शूटआउटमध्ये जर्मनीने 5-4 अशी बाजी मारली.
हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम लढत 29 जानेवारी 2023 रोजी कलिंगा स्टेडियममध्ये झाली. जागतिक क्रमवारीत बेल्जियम दुसऱ्या, तर जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हे संघ 35 वेळा आमनेसामने आले होते. त्यातील सात लढती बरोबरीत सुटल्या होत्या, तर जर्मनीने तेरा आणि बेल्जियमने पंधरा लढती जिंकल्या होत्या. साहजिकच या वेळी कोण बाजी मारणार, याबाबत औत्सुक्य होते. गतविजेत्या बेल्जिमने जोरदार सुरुवात केली. नवव्या मिनिटाला वॅन ऑबेल फ्लोरेन्टने, तर दहाव्या मिनिटाला टॅन्गायने गोल नोंदवून बेल्जियमला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात जर्मनीने जोरदार प्रतिआक्रमणे रचली. 28 व्या मिनिटाला निकलस वेलेनने संधीचे सोने केले. त्याने गोल नोंदवून जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर जर्मनीने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. ४०व्या मिनिटाला पेइलाट गोन्झालोने गोल नोंदवून जर्मनीला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अखेरच्या चौथ्या सत्रात, 47 व्या मिनिटाला मॅट्स ग्रॅम्बूशने गोल नोंदवून जर्मनीला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बेल्जियमने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. जर्मनी आघाडी राखून जेतेपद निश्चित करणार असे वाटत असतानाच ५८व्या मिनिटाला टॉम बूनने गोल नोंदवून बेल्जियमला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. बरोबरी कायम राहिल्यानंतर ‘शूटआउट’मध्ये जर्मनीकडून प्रिन्झ थिस, निकलन वेलेन यांनी प्रत्येकी दोन, हॅनेस म्यूलरने एक गोल नोंदवला. बेल्जियमकडून फ्लोरेन्टने दोन गोल केले, तर टॅन्गाय, अँटनी किना यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=SEMdtARBMpQ” column_width=”4″]हे माहीत आहे काय?
- जर्मनी संघाने तिसऱ्यांदा पुरुषांचा हॉकी वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी 2002 आणि 2006 मध्ये जर्मनीने ही स्पर्धा जिंकली होती.
- तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नेदरलँड्सने ऑस्ट्रेलियावर ३-१ अशी मात केली.
- जर्मनीविरुद्ध आतापर्यंत (वर्ल्ड कपपर्यंत) बेल्जियमचे 15 विजय.
- आतापर्यंतच्या कारकिर्दीत बेल्जियमविरुद्ध जर्मनीचा 14 वा विजय.
- जर्मनी विरुद्ध बेल्जियम यांच्यात आतापर्यंत सात लढती बरोबरीत
- 2023 च्या वर्ल्ड कप आधी प्रतिस्पर्ध्यांतील गेल्या पाच लढतींत बेल्जियमचे तीन विजय, तर जर्मनीचा एक. एक लढत बरोबरीत.
- जर्मनीचा बेल्जियमविरुद्ध नोव्हेंबर 2022 मध्ये विजय. हा विजय जुलै 2017 नंतर प्रथमच. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये 3 फेब्रुवारी 2023 रोजी अंतिम सामन्यात दीड महिन्याच्या अंतराने नोंदवला विजय.
- प्रतिस्पर्ध्यांतील या स्पर्धेतील गटसाखळी लढत बरोबरीत.
- बेल्जियम संघातील 11 खेळाडूंचे वय 30 पेक्षा जास्त, तर त्यातील तीन 35 वर्षांपेक्षा अधिक
- बेल्जियमने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 18 गोल, त्यातील सात टॉम बून याचे. बेल्जियमविरुद्ध अवघे पाच गोल
- 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध दोन गोलची पिछाडी अखेरच्या अडीच मिनिटांत जर्मनीने भरून काढली आणि त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये विजय.
- वर्ल्ड कप (2023) जर्मनीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-२ अशा पिछाडीनंतर विजय. त्यात सहा सेकंद असताना निर्णायक गोल
हॉकी क्रमवारीत भारत सहावाच
वर्ल्ड कप विजेत्या जर्मनीने ऑस्ट्रेलियास मागे टाकून 30 जानेवारी 2023 रोजी जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला. वर्ल्ड कपमधील अपयशानंतरही भारतीय संघाने जाहीर झालेल्या क्रमवारीत सहावे स्थान राखले. जर्मनीने 29 जानेवारी 2023 रोजी गतविजेत्या बेल्जियमला निर्धारित वेळेत 3-3 असे रोखले होते आणि त्यानंतर शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. या यशामुळे जर्मनी चौथ्या क्रमांकावरून अव्वल झाले आहेत. वर्ल्ड कप उपविजेते बेल्जियमची एका क्रमांकाने घसरन झाली. हा संघ आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रॉसओव्हर लढतीत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरही भारत सहावा आहे. नेदरलँड्स तिसऱ्यावरून दुसऱ्या स्थानावर गेले, तर ऑस्ट्रेलियाची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली. दक्षिण कोरियाने नववा क्रमांक मिळवताना न्यूझीलंडला मागे टाकले.
2023 मधील नवी क्रमवारी
- जर्मनी (2912.47)
- नेदरलँड्स (2848.29)
- बेल्जियम (2845.82)
- ऑस्ट्रेलिया (2792.96)
- इंग्लंड (2536.24)
- भारत (2478.22)
- अर्जेंटिना (2260.32)
- स्पेन (2093.52)
- दक्षिण कोरिया (1942.50)
- न्यूझीलंड (1899.79)