सानिया मिर्झा का घेणार निवृत्ती?
भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने यंदाच्या मोसमाच्या शेवटी निवृत्त होणार असल्याची घोषणा 19 जानेवारी 2022 रोजी केली. यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत. निवृत्तीची घोषणा करतानाच तिने ही तीन कारणे पुढे केली आहेत. पस्तिशीत असलेली सानिया आता लवकर थकते. मार्टिना हिंगीस हिच्यासोबत तिची दुहेरीतील ऊर्जा टेनिसप्रेमींनी पाहिली आहे. ही जोडी टेनिसमध्ये इतकी हिट होती, की जागतिक टेनिस क्रमवारीच्या दुहेरीत अव्वल स्थानावर होती. मार्टिना हिंगीसने तर केव्हाच निवृत्ती घेतली आहे. आता सानियालाही टेनिसमधून निवृत्त होण्याचे वेध नव्हे, तर संकेत मिळू लागले आहेत.
“आता शरीर थकत चालले असून, पूर्वीसारखी उर्जा कायम नाही,” हे 35 वर्षीय सानियाचं वाक्य सगळं काही स्पष्ट करतं. सानिया मिर्झा हिने कारकिर्दीत सहा ग्रँड स्लॅम जेतीपदे पटकावली असून, यात मिश्र दुहेरीतील तीन ग्रँड स्लॅमचा समावेश आहे. भारतातील सर्वांत यशस्वी टेनिसपटू म्हणून ती निवृत्त होईल. सानिया ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत नादिया किचेनोकसह सहभागी झाली होती. या जोडीला पहिल्याच फेरीत स्लोव्हेनियाच्या तामरा झिदान्सेक आणि कजा जुवान जोडीकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर सानियाने लगेचच निवृत्ती जाहीर केली.
सानिया मिर्झा हिची निवृत्ती घेण्यामागची कारणे
- पहिलं कारण म्हणजे दुखापतींचा ससेमिरा. वयाच्या तिशीनंतरचं दुखणं आणि तिशीच्या आतलं दुखणं यात बराच फरक आहे. सानिया म्हणते, दुखापतीतून सावरायला मला प्रदीर्घ काळ लागत असल्याचे लक्षात येत आहे.
- दुसरे कारण म्हणजे सानियाचा तीन वर्षीय मुलगा. सानिया जेथे जेथे स्पर्धेसाठी जाते, तेथे ती मुलाला सोबत घेऊन जाते. त्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. सध्या करोना महामारीमुळे देशाटन करणं धोक्याचंच आहे. मुलाच्या आरोग्य सुरक्षेसाठी तिचा जीव टांगणीला लागणार नाही तरच आश्चर्य. सानिया म्हणते, त्याला सोबत घेऊन स्पर्धेसाठी प्रवास करताना मी धोका पत्करत असल्याची जाणीव मला होत आहे. दुर्दैवाने करोना संसर्ग आपल्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी काही निर्णय घेण्यास भाग पाडत आहे.
- तिसरे कारण म्हणजे वयपरत्वे येणारा थकवा. सानिया वयाच्या सहाव्या वर्षापासून खेळत आहे. व्यावसायिक टेनिसची सुरुवात 2003 पासून आहे. आता पस्तिशीतला तिचा टेनिस कोर्टवरील वावर सोपा मुळीच नाही. लग्नानंतरही टेनिस कोर्टवर टिकणं खूप कमी जणांना जमलं आहे. सानिया म्हणते, आता माझे शरीर थकत चालले आहे. 19 जानेवारी 2022 रोजी सानियाचा गुडघा चांगलाच त्रास देत होता. हे ती पराभवाचे कारण देत नाही, तर वयपरत्वे येणारा ताण ती सांगत आहे. वय वाढत असल्याने दुखापतीतून सावरताना वेळ लागत असल्याचेही सानिया म्हणाली.
मार्टिना हिंगीस-सानिया जोडी सर्वांत हिट
स्विसची मार्टिना हिंगीससह सानियाची जोडी 2015 मध्ये चांगली जमली होती. 13 एप्रिल 2015 मध्ये ही जोडी दुहेरीत अव्वल क्रमांकावर होती. सानियाला वयोमानानुसार थकवा जाणवत आहे. टेनिसमध्ये कोर्टवर जी चपळता लागते, ती पस्तिशीतल्या टेनिस खेळाडूंसाठी अधिक आव्हानात्मक ठरते. सानिया म्हणाली, की आता पूर्वीसारखी ऊर्जा राहिलेली नाही. खरे तर आता खेळण्याचा उत्साह कायम आहे. मात्र, एखादा दिवस असा येतो, जेव्हा मला खेळावेसे वाटत नाही. मी नेहमी सांगत आले आहे, की खेळत राहीन, तोपर्यंत आनंद घेत राहीन. मात्र, खेळाच्या प्रक्रियेचाही आनंद घेता यायला हवा. सध्या तरी मला तो आनंद लुटता येत नाही. सानिया पुढे म्हणाली, की पुनरागमनासाठी मी भरपूर मेहनत घेतली. वजन कमी केले. मातांसाठी एक चांगले उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जागतिक क्रमवारीत सध्या सानिया 68 व्या क्रमांकावर आहे. ती (27) एकेरीत अव्वल 30 मध्ये पोहोचली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे तिने एकेरीत खेळणे सोडले आणि दुहेरीवर लक्ष केंद्रित केले. त्याचा अपेक्षित परिणाम तिला मिळाला.
सानियासाठी 2022 चा मोसम अखेरचा
सानिया ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाने निराश झाली नाही. ती म्हणते, मी अजूनही अव्वल 70 मध्ये आहे. हा मोसम तर नक्कीच खेळू शकते. मनगटाची दुखापत आणि गुडघ्याचीही आहेत. यावर मात करून हा मोसम पूर्ण करायचा असल्याचे सानियाने सांगितले.
दुहेरीत यशस्वी कामगिरी
- महिला दुहेरीत 2016 ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 विम्बल्डन आणि 2015 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद
- मिश्र दुहेरीत 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेती
- 2006 आणि 2014 च्या एशियाडमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक
- एशियाडमध्ये तीन रौप्य आणि तीन ब्राँझ पदकांचीही कमाई
कौटुंबिक पार्श्वभूमी
सानिया मिर्झा हिचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत झाला. तिचे आईवडील मूळचे हैदराबादी मुस्लिम. वडील इम्रान मिर्झा क्रीडा पत्रकार, तर आई नसीमा प्रिंटिंग व्यवसायात होती. मात्र, सानियाच्या जन्मानंतर हा व्यवसाय बंद करून मिर्झा कुटुंब मुंबईतून हैदराबादमध्ये शिफ्ट झालं.
बायोग्राफी
सानिया मिर्झा | एकेरीतील कामगिरी |
देश : भारत | कारकिर्दीतील कामगिरी : 271–161 (62.7%) |
निवास : हैदराबाद, भारत | विजेतीपदे : 1 |
जन्म : 15 नोव्हेंबर 1986 | सर्वोत्तम रँकिंग : 27 (27 ऑगस्ट 2007) |
जन्मस्थळ : मुंबई | ग्रँड स्लॅम एकेरीतील कामगिरी |
उंची : 1.73 मी. (5 फूट 8 इंच) | ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (2005, 2008) |
व्यावसायिक टेनिस : फेब्रुवारी 2003 | फ्रेंच ओपन दुसरी फेरी (2007, 2011) |
खेळण्याची शैली : उजव्या हाताची (दोन्ही हातांनी बॅकहँड) | विम्बल्डन दुसरी फेरी (2005, 2007, 2008, 2009) |
महाविद्यालय : सेंट मेरीज कॉलेज | अमेरिकन ओपन चौथी फेरी (2005) |
बक्षीस रक्कम : 69,63,060 डॉलर | अन्य स्पर्धा : ऑलिम्पिक पहिली फेरी (2008) |
दुहेरी | इतर दुहेरीच्या स्पर्धांतील कामगिरी |
कारकिर्दीतील यश : 500–220 (69.4%) | टूर फायनल्स विजेती (2014, 2015) |
कारकिर्दीतील विजेतीपदे : 43 | ऑलिम्पिक दुसरी फेरी (2008) |
सर्वोत्तम रँकिंग : 1 (13 एप्रिल 2015) | मिश्र दुहेरी |
सध्याचे रँकिंग : 68 (17 जानेवारी 2022) | कारकिर्दीतील विजेतीपदे : 3 |
ग्रँड स्लॅम दुहेरीतील कामगिरी | ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरी |
ऑस्ट्रेलियन ओपन विजेती | ऑस्ट्रेलियन ओपन विजेती (2009) |
फ्रेंच ओपन अंतिम फेरी | फ्रेंच ओपन विजेती (2012) |
विम्बल्डन विजेती | विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी (2011, 2013, 2015) |
अमेरिकन ओपन विजेती | अमेरिकन ओपन विजेती (2014) |
Follow on facebook Page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]