विम्बल्डन जिंकणारी कोण ही इलेना रिबाकिना?
कझाकिस्तानच्या इलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने शनिवारी प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. या स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद पटकावणारी ती पहिलीच आशियाई टेनिसपटू ठरली.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत इलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने ट्युनिशियाच्या ओन्स जेबरला (Ons Jabeur) 3-6, 6-2, 6-2 असे नमविले. ही लढत पावणेदोन तास चालली. जागतिक क्रमवारीत 23 वर्षीय रिबाकिना 23 व्या, तर 27 वर्षीय ओन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी या दोघी तीन वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्यात दोन वेळा ओन्सने, तर एकदा रिबाकिनाने बाजी मारली होती. या वेळी कोण बाजी मारणार, याबाबत औत्सुक्य होते.
ओन्स जेबरची सुरुवात धडाक्यात, पण…
ओन्स जेबर हिने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सेटमधील तिसऱ्याच गेममध्ये तिने ब्रेक पॉइंट मिळवला आणि तो जिंकलाही. त्यानंतर पाचव्या गेममध्येही ओन्सने दोन ब्रेक पॉइंट मिळवले. मात्र, या वेळी तिला संधी साधता आली नाही. त्यानंतर पाहता पाहता ओन्सने आठव्या गेमअखेर 5-3 अशी आघाडी घेतली. सेटमध्ये आव्हान राखण्यासाठी इलेना रिबाकिना हिला नववी गेम जिंकणे गरजेचे होते. मात्र, ओन्स जेबर हिने रिबाकिनाची सर्व्हिस भेदली आणि पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.
इलेना रिबाकिना हिने अशी घेतली मुसंडी
आव्हान राखण्यासाठी इलेना रिबाकिनाला दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. तिने धडाक्यात सुरुवात केली. पहिल्याच गेममध्ये तिने ओन्सची सर्व्हिस भेदली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखून 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या गेममध्येही तिने ब्रेक पॉइंट मिळवला होता. मात्र, ओन्सने सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये ओन्सने तीन ब्रेक पॉइंट मिळवले. मात्र, झुंज देऊन रिबाकिनाने ते वाचवले आणि सर्व्हिसही राखली. त्यापाठोपाठ रिबाकिनाने पाचवी आणि सहावी गेमही जिंकली आणि 5-1 अशी आघाडी घेतली. सातव्या गेममध्ये ओन्सने सर्व्हिस राखली. मात्र, त्यानंतर आठवी गेम जिंकून रिबाकिनाने सेट जिंकला आणि आव्हानही राखले.
Elena Rybakina’s Wimbledon Winning Moment | Wimbledon 2022 |
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=pjYyB4P_qos” column_width=”4″] |
निर्णायक गेममध्ये रिबाकिना विजयी
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्येही रिबाकिनाने पहिल्या दोन गेम जिंकल्या. पाचव्या गेमअखेर इलेना रिबाकिना हिच्याकडे 3-2 अशी आघाडी होती. सहाव्या गेममध्ये ओन्सला तीन ब्रेक पॉइंट मिळाले होते. मात्र, या संधीचे तिला सोने करता आले नाही. रिबाकिनाने सर्व्हिस तर राखलीच; पण त्या पुढील दोन्ही गेम जिंकून संस्मरणीय जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
कोण ही इलेना रिबाकिना?
- ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद पटकावणारी इलेना रिबाकिना कझाकिस्तानची पहिलीच टेनिसपटू
- 2011 नंतर ‘विम्बल्डन’च्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी इलेना रिबाकिना सर्वांत कमी (23) वयाची टेनिसपटू. 2011 मध्ये पेट्रा क्विटोवाने ही स्पर्धा जिंकली होती. त्या वेळी ती 21 वर्षांची होती.
- क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडूवर इलेना रिबाकिनाचा हा पहिलाच विजय ठरला.
- रिबाकिनाचे हे आंतरराष्ट्रीय (डब्लूटीए) कारकिर्दीतील तिसरेच जेतेपद ठरले. यापूर्वी, तिने 2019 मध्ये बुखारेस्ट ओपन आणि 2020 मध्ये होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सलग चार फायनलमध्ये पराभव
- विम्बल्डनमध्ये महिला एकेरीची गेली सहा विजेतीपदे सहा वेगवेगळ्या टेनिसपटूंनी (सेरेना विल्यम्स, मुगुरुझा, अँजेलिक कर्बर, सिमोना हालेप, अॅश्ले बार्टी, इलेना रिबाकिना) जिंकली आहेत. असे प्रथमच झाले.
- आठपेक्षा जास्त सीडिंग असणाऱ्या महिला टेनिसपटूने विम्बल्डन जिंकण्याची ही सातवी वेळ. यंदाची विजेती इलेना रिबाकिनाला 17 वे सीडिंग होते.