टेनिस विश्वातील पेंग शुआई हिने केला लैंगिक शोषणाचा आरोप
पेंग शुआई हिने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर टेनिस विश्वात खेळबळ उडाली आहे. स्टार नाओमी ओसाकाही या घटनेने स्तब्ध झाली आहे. अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी चीनची पेंग शुआई या टेनिस खेळाडूचा सध्या ठावठिकाणा लागत नाही.
अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी चीनची पेंग शुआई (Peng Shuai) या टेनिस खेळाडूचा सध्या ठावठिकाणा लागत नाही. पेंग शुआई (Peng Shuai) हिने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर टेनिस विश्वात खेळबळ उडाली आहे. स्टार नाओमी ओसाकाही या घटनेने स्तब्ध झाली आहे. ओसाका म्हणाली, की या आरोपानंतर पेंग शुआई गायब आहे. चीनच्या माजी मुख्य सरकारी अधिकाऱ्याविरोधात शुआईने आरोप केला होता. त्यानंतर पेंग शुआई हिचा ठावठिकाणा लागलेला नाही.
चार वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ओसाकाने बुधवारी, १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने प्रश्न उपस्थित केला आहे- पेंग शुआई कुठे आहे?
#whereispengshuai या हॅशटॅगसह ओसाकाने ट्विटरवर लिहिले आहे, की ‘‘मला माहीत नाही, की तुमचं लक्ष बातम्यांवर आहे की नाही? मात्र, सध्या मला माझी सहकारी खेळाडूबाबत सूचित करण्यात आले आहे, जिने लैंगिक शोषणाबाबत खुलासा केला आहे. त्यानंतर काही वेळाने ती गायब झाली आहे. आवाज दाबणे कोणत्याही स्थितीत योग्य नाही.’’
चोवीस वर्षीय ओसाकाने अपेक्षा व्यक्त केली, की पेंग आणि तिचा परिवार ‘सुरक्षित आणि ठीक’ असेल. ओसाकाने पुढे लिहिले, ‘‘सद्य:स्थिती मी स्तब्ध आहे. मी तिच्यासाठी प्रेम आणि आशेचे किरण पाठवत आहे.’’
जगातली अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचसह आघाडीच्या खेळाडूंनी, तसेच डब्लूटीए, एटीपीच्या आयोजकांनी पेंग शुआईच्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे.
विबोवरील पोस्टने खळबळ
पेंग शुआई हिने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली होती. सतत नकार दिल्यानंतरही एका माजी उपप्रधानमंत्र्याने लैंगिक संबंधासाठी बाध्य केले. चीनची प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘विबो’वरून पेंगची ही पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. एवढेच नाही, तर चिनी सरकारच्या नियंत्रणाखालील प्रसारमाध्यमांनीही ही बातमी दाबली. पस्तीस वर्षीय पेंगने लिहिले होते, की माजी उपप्रधानमंत्री आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झांग गाओली याने तीन वर्षांपूर्वी टेनिस दौऱ्यानंतर लैंगिक संबंधाची मागणी केली. त्याला सातत्याने नकार दिल्यानंतरही त्याने लैंगिक संबंध राखण्यास मला बाध्य केले. या घटनेदरम्यान झेंगची बायको दरवाजावर पहारा देत होती. पेंगने आपल्या पोस्टमध्ये असेही लिहिले होते, की सात वर्षांपूर्वीही त्याने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.
काय आहे हे प्रकरण?
पेंग शुआई चीनची माजी टेनिसपटू आणि विम्बल्डन विजेती खेळाडू आहे. तिने दोन नोव्हेंबर रोजी माजी उपप्रधानमंत्री झांग गाओली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ‘वीबो’वर तिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने टेनिसविश्वात प्रचंड खळबळ उडाली. तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे, की झांगने तीन वर्षांपूर्वी माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. अर्थात, काही वेळानंतरच ही वादळी पोस्ट हटविण्यात आली. का नाही हटविणार? विबो या सोशल मीडियाच्या माध्यमावर चिनी सरकारचं नियंत्रण आहे. आता असे वृत्त आहे, की दोन आठवड्यांपासून पेंग शुआई गायब आहे.
क्रीडाप्रेमींमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला टेनिस संघटनेने (WTA) या घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. पस्तीस वर्षीय शुआई हिने (Peng Shuai) झांगवर आरोप केला आहे, की 75 वर्षीय माजी उपप्रधानमंत्री झांग गाओली यांनी माझ्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा वारंवार प्रयत्न केला. अखेर त्याने मला मजबूर केलं. झांग गाओली हा पक्षातील सर्वांत शक्तिशाली पॉलिट ब्यूरोच्या स्थायी समितीतील सदस्य होता. त्याने तीन वर्षांपूर्वी माझ्याशी लैंगिक संबंध राखण्यास भाग पाडले होते.
दुहेरीत दोन वेळा ग्रँड स्लँमची विजेती असलेल्या पेंग शुआईने दावा केला होता, की कि सात वर्षांपूर्वी त्याचे माझ्याशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत तो खूप गंभीर होता. पेंग शुआई हिने 1600 शब्दांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते- तुम्हाला (झांग गाओली) माझ्याकडे परत का यावं लागलं? तुम्ही मला लैंगिक संबंध राखण्यासाठी घरी घेऊन गेले. माझ्याकडे याचा कोणताही पुरावा नाही आणि तो असणं शक्यही नव्हतं. मात्र, त्याच्या बायकोला हे सगळं माहीत होतं.
पेंग शुआई हिने पुढे लिहिले- मी सांगू शकत नाही, की मी किती घाबरलेले होते. मी किती वेळा स्वत:ला विचारलं, खरंच मी आता माणूस आहे? मी चालतं-फिरतं एक प्रेत असल्याचं अनुभवत होते. तो माझ्याशी प्रेमाचं नाटक करीत होता. कोणती व्यक्ती खरी आहे?
या आरोपांचा झांग गाओलीकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. झांग 2018 मध्ये उपप्रधानमंत्री पदावरून निवृत्त झाला आहे. गंमत पाहा, जागतिक टेनिस संघटना आरोपांच्या चौकशीची मागणी करीत आहे, तर चिनी टेनिस संघटनेने मात्र यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. टेनिसविश्वात मात्र चिंतेचं वातावरण आहे. कारण या पोस्टनंतर पेंग कुणालाही दिसलेली नाही.
कोण आहे पेंग शुआई?
पेंग शुआई हिने 2013 मध्ये विम्बलडन आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे. या यशानंतर पेंग फेब्रुवारी 2014 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाची दुहेरीची खेळाडू बनली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविणारी ती चीनची पहिली खेळाडू (पुरुष आणि महिलांमध्ये) होती. ती चीनची दिग्गज स्पोर्ट्स स्टार्सपैकी एक आहे. पेंग शुआई टेनिसकडे कशी वळली? त्याचं मुख्य कारण म्हणजे तिचे काका चीनमधील प्रसिद्ध टेनिस प्रशिक्षक होते. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षीच पेंग शुआई हिच्या हातात टेनिसचे रॅकेट आले. हार्डकोर्टवर तिची मजबूत पकड होती. फोरहँड, बॅकहँड हे तिचे प्रमुख अस्र. तिचे वडील पेंग जिजून ( Peng Jijun) पोलिस अधिकारी होते. झांग बिंग ही पेंग शुआई हिची आई. वयाच्या 13 व्या वर्षी पेंग शुआई एका मोठ्या आजारातून बचावली. तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अवघड शस्त्रक्रियेतून ती सहिसलामत बाहेर आली. पेंग शुआई हिला जणू आयुष्य बोनस मिळालं होतं. या आयुष्याचं तिने सोनं केलं. वयाच्या 15 व्या वर्षी 2001 मध्ये तिने बाओतू (Baotou) येथे विजेतेपद मिळवलं. टेनिस कारकिर्दीतील हे तिचं पहिलं विजेतेपद. 2015 हे वर्ष पेंग शुआईसाठी निराशाजनक ठरलं. दुखापतीमुळे ती प्रचंड त्रस्त होती. त्याचा परिणाम तिच्या खेळावर झाला. बहुतांश स्पर्धांत तिला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. 2016 च्या ऑलिम्पिकमध्येही तिला पदकाने हुलकावणी दिली. तिचं आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आलं.
[jnews_hero_8 hero_margin=”2″ post_offset=”3″ include_category=”60″ sort_by=”oldest”]