ऐश्वर्या पिसे हिचा खेळ कोणता?
ऐश्वर्या पिसे हिचा खेळ कोणता? हा प्रश्न २०१९ च्या एनडीए परीक्षेत विचारला गेला होता. बऱ्याच जणांना ऐश्वर्या पिसे ही खेळाडू आहे का, हाच प्रश्न पडला असेल. ती कोणता खेळ खेळते, हा तर फार दूरचा प्रश्न. ऐश्वर्या पिसे ही साधारण खेळाडू नाही, तर ती आहे जागतिक दर्जाची बाइक रायडर. मोटरस्पोर्ट्स खेळात भारतातील मोजक्या महिला रायडरपैकी एक.
ऐश्वर्या पिसे हिचा खेळ कोणता, हा प्रश्न जेव्हा २०१९ च्या एनडीए परीक्षेत विचारला गेला, तेव्हा अनेकांची भंबेरी उडाली असेल. एरव्ही क्रिकेट, हॉकी, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंगमधील महिला खेळाडूंची नावं पटापट डोळ्यांसमोर येतील. मात्र, ऐश्वर्या पिसे हे नाव फारसं चर्चेत आलेलं नाही. ऐश्वर्या पिसे ही मूळची बेंगलुरूची. भारतातील अव्वल मोटरस्पोर्ट्स रायडरपैकी ती एक. ऐश्वर्या ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे, जिने रोड रेसिंग अँड रॅलीच्या पाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.
आजच्या तारखेला तिने ऑफ रोड आणि ऑन रोड प्रकारातील स्पर्धांत सहा वेळा विजेतिपदे मिळवली आहेत. ऐश्वर्याच्या यशाचं ऐश्वर्य इथेच संपत नाही. महिला गटातील ग्रुप बीच्या २५० सीसी श्रेणीत रेड डी हिमालय ( Raid de Himalaya) आणि डक्षिण डेअर (Dakshin Dare) या दोन्ही स्पर्धांत ऐश्वर्याने विजेतेपद मिळवले आहे. ऐश्वर्याने २०१९ वर्षाच्या सुरुवातीला पोर्तुगाल आणि दुबई बाजा या स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीनंतर महिला गटात जागतिक स्पर्धेत आघाडी घेतली होती.
अर्थात, हा तिचा सगळा प्रवास सोपा नव्हताच. मुळात ती मोटरस्पोर्ट्स या खेळाकडे वळलीच कशी, हाच भुवया उंचावणारा प्रश्न आहे. जेव्हा तिने व्यावसायिक स्तरावर मोटरसायकलिस्ट म्हणून खेळायला सुरुवात केली, तेव्हा भारतात एकदोनच महिला रेसर होत्या. यावरून महिलांच्या बाइक रायडिंगची स्थिती लक्षात येते.
तिच्या आईवडिलांचा तर या खेळाला पाठिंबा अजिबातच नव्हता. पोरीने निवडला खेळ तर मग खेळूदे… अशी तिच्या वडिलांची भूमिका. मात्र, आईने तिला अजिबातच परवानगी दिली नाही. करिअर म्हणून मोटरस्पोर्टस खेळावं? मुळात मुलींनी बाइक चालवावी का, हाच पहिला प्रश्न. हळूहळू आईवडिलांची मतं बदलली, जेव्हा ऐश्वर्याने या खेळात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. आईचं मन बदललं आणि ऐश्वर्याचा बाइक रायडिंगचा मार्ग मोकळा झाला.
ऐश्वर्या पिसे कोणताही बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी कोणतेही खेळ खेळू शकली असती; पण तिने हटके खेळ निवडला. तो म्हणजे मोटरस्पोर्ट्स. या खेळातलं आकर्षण बेंगलुरूतच निर्माण झालं. बाइक चालवण्याची आवड लहानपणापासूनच होती. वयाच्या 18 व्या वर्षी तिने पहिल्यांदा बाइक चालवली. ही तिची स्वत:ची बाइक होती. तिचे वडील इंजिनीअर होते. ते तिला अनेकदा फिरायला घेऊन जायचे. नंतर वर्षभर तिने बाइकवरच फिरण्यात आपला वेळ घातला.
ऐश्वर्या पिसे आणि मोटरस्पोर्ट्स खेळ हे समीकरणच झालं. तशीही ती मैत्रिणींसोबत वीकेंड टूरला जात होती. त्याच वेळी तिला बाइक रायडिंगची आवड निर्माण झाली. तिने गुजरातमधील कच्छचं रण ते मेघालयातील चेरापुंजी हा तब्बल 8,000 किलोमीटरचा मार्ग अवघ्या 24 तासांत पूर्ण केला.
ऐश्वर्या बाइक रेसिंगचं पॅशन जपत असली तरी तिला आता शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाची गरज होती. कोइम्बतूरला अपेक्स रेसिंग अॅकॅडमी मोटरसायकलिस्टसाठी खास मार्गदर्शन करणारी एक संस्था होती. ऐश्वर्याने तिथे प्रशिक्षण घेतलं. तिने अपेक्स अकादमीत रोड रेसिंगचं प्रशिक्षण घेतलं, पण 2017 नंतर तिने रोड रेस आणि रॅली या दोन्हींचेही प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ऑफ रोड रेसिंग म्हणजे डोंगर, जंगलातील रेसिंग. या प्रशिक्षणात तिची कौशल्ये विकसित झाली आणि एक उत्तम व्यावसायिक रेसर म्हणून ऐश्वर्या नावारूपास आली.
रेसिंगमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ऐश्वर्याला एका स्पर्धेत टीव्हीएस रेसिंग टीमने पाहिलं. त्यांनी तिला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली. ही मोठी सुवर्णसंधी ऐश्वर्यापर्यंत चालून आली होती. टीव्हीएस रेसिंगने तिला तांत्रिक आणि आर्थिक मदत केली. यामुळे ऐश्वर्याचं स्वप्न साकार झालं होतं. नंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही.
ऐश्वर्याने 2016 व 2017 मध्ये रोड रेसिंग अँड रॅली चॅम्पियनशिपच्या चार राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर तिने 2018 मध्ये राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपही आपल्या नावावर केली.
2019 मध्ये तिने दुबई आंतरराष्ट्रीय बाजा आणि पोर्तुगाल बाजा स्पर्धेतही सहभागघेतला. महिला गटातली ती अव्वल बाइक रायडर आहे. ज्युनिअर गटात जागतिक स्तरावर ती दुसऱ्या क्रमांकाची महिला खेळाडू आहे.
मोटरस्पोर्टस हा खेळ जरी बाइकच्या फिटनेसवर अवलंबून असला तरी रायडरचा फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे. ती दिवसातून तीन ते चार तास जिममध्ये घालवते. यात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच ध्यानावरही अभ्यास करते. या खेळात आहारालाही तितकंच महत्त्व आहे. त्यासाठी तिच्याकडे आहारतज्ज्ञही आहे, जो तिच्या समतोल आहाराकडे लक्ष देत असतो. आठवड्यातील तीन दिवस चार तास बाइक चालवते.
ऐश्वर्या जेव्हा रेसिंग करीत नाही, त्या वेळी ती वाचन, चित्रपट पाहणे आणि चित्र काढण्यात वेळ घालवते. तिचे तीन आदर्श खेळाडू आहेत- अरविंद केपी, सीएस संतोष आणि लाया सांझ.
आव्हानात्मक रेसिंग
मोटरस्पोर्ट्स हा खेळ ऐश्वर्या पिसे हिच्यासाठी आव्हानात्मकच आहे. कारण यातील दुखापती जीवघेण्याही ठरू शकतात. 2017 मध्ये ती दोन मोठ्या दुखापतींना सामोरी गेली आहे. एका घटनेत तिचा अपघात झाला. यात तिचे कॉलरबोन फ्रॅक्चर झाले होते. ही खांद्याची दुखापत. दुसऱ्या एका घटनेत स्वादुपिंडावर दुखापत झाली होती. या दुखापतींनंतर कोणालाही वाटले नव्हते, की ही मुलगी काही महिन्यांत रेसिंगमध्ये येऊ शकेल. मात्र पाचच दिवसांनी ती रेसिंग स्पर्धेत उतरली आणि जिंकलीही. ऐश्वर्या म्हणते, या अपघातानंतर मी एक शिकले, ते म्हणजे कधीही हार न मानणे. विशेष म्हणजे हा अपघात ज्या वर्षात (2017) घडला, त्याच वर्षी ती रोड रेसिंग आणि रॅली चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धा जिंकली.
ऐश्वर्याला मान्य करते, की भारतात मोटरसायकल रेसिंग विकसित होत असली तरी या खेळाला अधिक लोकप्रियता हवी आहे. ज्या वेळी ऐश्वर्या खेळत होती, त्या वेळी एक-दोनच महिला या खेळात होत्या.
ऐश्वर्या म्हणते, मी प्रशिक्षण घेत होते, त्या वेळी काही महिलाही प्रशिक्षण घेत होत्या. त्या रेसिंग स्पर्धा छंद म्हणून खेळण्यास तयार होत्या. मात्र एक व्यावसायिक खेळ म्हणून निवडण्यास त्या उत्सुक दिसल्या नाहीत. आज मला आनंद होत आहे, की बऱ्याच महिला भारतीय स्पर्धांत व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळत आहेत.
मोटरस्पोर्टस हा खेळ मेहनत आणि समर्पण या दोन घटकांवर अवलंबून आहे. ज्याला रेसर व्हायचे आहे, त्याने आधी आपलं हृदय काय सांगतं, हे पाहावं. मगच या खेळात यावं, असंही ऐश्वर्या आवर्जून सांगते.
अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची ऐश्वर्याची इच्छा आहे. डकार रॅली खेळणे आणि वैश्विक स्पर्धा जिंकणं हे तिचं ध्येय आहे.
भारताची एक मोटरस्पोर्टस क्वीन म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या पिसे हिची ही कहाणी… मोटरस्पोर्टस हा खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही, म्हणून दुर्लक्षित राहिला असला तरी ऐश्वर्या पिसे या भारतीय महिलेच्या योगदानाची दखल घ्यावीच लागेल. कुणी म्हणेल हा श्रीमंतांचा खेळ आहे. मी आणखी पुढे जाऊन म्हणेन हा ‘ऐश्वर्या’चा खेळ आहे. ऐश्वर्या पिसे हिच्यामुळे मोटरस्पोर्टस हा खेळ खऱ्या अर्थाने ऐश्वर्यवान झाला आहे. 2019 च्या एनडीए परीक्षेत तिची दखल घेतल्याने या खेळाचं ऐश्वर्य अधिकच अधोरेखित झालं असं म्हणायला हरकत नाही.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”69″ sort_by=”oldest”]