युक्रेन-रशिया युद्ध आणि भारत
संपूर्ण विश्व अद्याप कोविड-19 महामारीतून बाहेर पडलेले नाही. अशातच रशिया युक्रेन युद्ध जगासमोर नवे संकट घेऊन आले आहे. सर्वांचे लक्ष या युद्धाच्या परिणामांकडे लागले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दोन देशांच्या लढाईपासून भारतही फार काळ अंतर राखू शकणार नाही. या युद्धाची परिणती काय असू शकेल, भारतासह विश्वातील इतर देश कसे प्रभावित होतील असे अनेक प्रश्न पडले आहेत. याच मुद्द्यांवर सुरक्षा तज्ज्ञांनी लोकांच्या मनात असलेल्या पाच प्रश्नांवर विश्लेषण केले आहे.
रशिया – युक्रेन यांच्यात भीषण युद्ध पेटले आहे. या युद्धाची परिणती काय असू शकेल?
रशियाची सीमा एक डझनापेक्षा अधिक देशांना मिळते. यातील काही देश असेही आहेत, जे एकेकाळी पूर्व सोव्हियत संघाचे भाग होते. मात्र, आज हेच देश उत्तर अटलांटिक संधी संघटनेचे (नाटो) सदस्य झाले आहेत. युक्रेनच्या राष्ट्रपतींचा कल पाश्चात्य देशांकडे होता. परिणामी, रशिया आपल्या सुरक्षेबाबत चिंतीत होता. रशियाला वाटते, की आपल्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत आहे. पाश्चिमात्य देश, विशेषत: अमेरिकेला वाटत होते, की रशिया दुबळा आहे आणि आताची परिस्थिती पाहता, त्याची पूर्वीच्या तुलनेत तेवढी क्षमता नाही. अमेरिकेने 1994 पासून हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया, लातविया आणि लिथुवानिया यांसारख्या देशांना हळूहळू ‘नाटो’चे सदस्यत्व बहाल केले. यामुळे रशियाची चिंता वाढली होती. त्यामुळेच रशियाने युद्धाचा निर्णायक मार्ग पत्करला. यात प्रचंड नुकसान आहे. मात्र, मला वाटते, की चूक युक्रेनचीही आहे. युक्रेन कधी काळी रशियाचा भाग होता. दोघांनीही एकमेकांच्या चिंता समजून घ्यायला हव्या होत्या. मात्र, युक्रेनने कदाचित हे समजून घेतलं नाही. खरं तर युक्रेनला पाश्चिमात्य देशांनी भडकावले. त्याचा परिणाम काय झाला, हे आपण पाहतच आहोत.
भारताच्या दृष्टिकोनातून या युद्धाचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम काय होतील?
युक्रेन- रशिया युद्धाचे परिणाम भारतावरही होतीलच, यात दुमत नाही. कारण युक्रेनसोबत आपले चांगले संबंध आहेत, शिवाय रशियाशीही आपले उत्तम संबंध आहेत. तीच स्थिती अमेरिकेबाबतही आहे. मात्र, चीनशी आपले कधी जमले नाही. अशा परिस्थितीत आपले युक्रेनसोबत जे काही आर्थिक संबंध आहेत, ते प्रभावित होतील. खाद्यतेल, खते आदींची आयात युक्रेनकडून होते. या आयातीवर गंभीर परिणाम होतील. रशियाकडूनही तेलाची आयात होते. कच्चे इंधनही रशियाकडूनच येते. कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण विश्वाची स्थिती आधीच प्रभावित झाली आहे. आता युद्धामुळे जी अशांती पसरली आहे, त्याचा परिणाम तर होणारच.
या युद्धानंतर एक ‘‘नवी वैश्विक व्यवस्था’’ आकार घेतेय, असे वाटते काय?
यात कोणतीही शंका नाही. एक ‘नवा वर्ल्ड ऑर्डर’ (वैश्विक व्यवस्था) निश्चितच आकार घेईल. यात चीन स्वत:ला आशियातील सर्वांत प्रभावशाली होण्याचा प्रयत्न करील. रशिया ना आशियात आहे, ना युरोपमध्ये. त्याचा 30 टक्के भाग युरोपमध्ये येतो, तर 70 टक्के आशियात. पाश्चिमात्य देशांसोबत अमेरिका उभा आहे. अशा स्थितीत रशिया स्वत:चे अस्तित्व दाखवू पाहत आहे. वर्ष 2000 पासून आतापर्यंत राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन रशियाला अशा ठिकाणी घेऊन आले आहे, ज्याबाबत कोणीही विचार करू शकत नाही. विशेषत: 1990 मध्ये सोव्हियत संघाच्या विघटनानंतर रशिया विखुरला गेला. तो बिल्कुलच संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता. तेथून अशा ठिकाणी घेऊन जाणे अशक्यप्राय होते. आता रशियाने सिद्ध केले आहे, की तो पुन्हा आपल्या गौरवशाली स्थानावर पोहोचला आहे. त्याला वाटते, की आपली प्रतिष्ठा राखावी. दुबळे समजू नये. रशिया पाश्चात्य देशांना, विशेषत: अमेरिकेला संदेश देत आहे, की आम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही. आमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर चीन, रशिया, इराण, अझरबैजान… हे सगळे देश एक झाले आणि पाश्चात्य देश अमेरिकेसोबत आले तर भारताची चिंता आणखी वाढणार आहे. कारण चीनसोबत भारताचे संबंध अतिशय तणावाचे आहेत. मात्र, रशियासोबत चांगले संबंध आहेत. रशिया- युक्रेन युद्ध भारतासाठी राजनैतिक समस्या निर्माण करणारे असले तरी त्यातून मार्ग काढता येईल.
युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने भारत द्विधा मन:स्थितीत सापडला आहे का?
रशियाच नाही, तर युक्रेनही आपला चांगला मित्र आहे. अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत. अशा स्थितीत कोणाचीही बाजू घेणे अवघड आहे. भारताने आतापर्यंत खूप चांगली बाजू सांभाळली आहे. राजनैतिक संवादातून पेच सोडविणे आणि युद्ध त्वरित बंद करण्यावर भारताने जोर दिला आहे. या युद्धाने एक संदेश स्पष्टपणे मिळाला आहे, तो म्हणजे प्रत्येक देशाला आपली लढाई स्वत:च लढायची आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण लढलो तर अपयश पदरी पडेल. या युद्धाने हेही सिद्ध केले आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी आपल्या क्षमतेचा विचार केला नाही आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा विचार करीत होते. त्यांना अपेक्षा होती, की नाटो, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांकडून मदत मिळू शकेल. मात्र, झाले काय, हे आपण पाहत आहोत. या युद्धातून आपल्याला एक शिकायला मिळालं, की ‘‘आत्मनिर्भर भारत’’ खूप आवश्यक आहे. सुरक्षेबाबत आपल्याला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण असायला हवी. सर्वांसोबत उत्तम संबंध असणेही आवश्यक आहेत. भारतासाठी ते खूप आवश्यक आहे. कारण भारताचे दोन शेजारी देश चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे पाहता, आपली सैन्यशक्तीही मजबूत असायला हवी. आपल्या आर्थिकबाबतीतही मजबूत व्हायला हवे. सर्वांसोबत मैत्रीही असली पाहिजे.
सध्या मोठ्या प्रमाणावर भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारताने योग्य आकलन न केल्याने ही स्थिती आली आहे काय? या चुकीमुळे आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात विलंब झाला आहे का?
विलंब नक्कीच झाला आहे. मात्र, ती चूक म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण पुतिन काय विचार करीत आहेत, हे कोणालाच माहीत नव्हते. जगातील 90 टक्के लोक तर हाच विचार करीत होते, की युद्ध होणार नाही. भारताने कदाचित विचार केला नसेल, की अशी स्थिती येईल. मात्र, आता अशी स्थिती आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चा करून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित घरवापसीचा प्रयत्न केला आहे. भारतीय नागरिक आता युक्रेनच्या शेजारी देशांमधून मायदेशी परतत आहेत. यातून हे सिद्ध होते, की भारताचा प्रभाव या देशांमध्ये अधिक आहे. मला वाटते, की विद्यार्थ्यांना अशा गंभीर स्थितीतून भारतात आणण्यासाठी उचललेले पाऊल, हीच मोठी गोष्ट आहे.
रशिया – युक्रेन युद्धाची कारणे काय आहेत?
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]