आशियाई स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढणार
भारताचा मुष्टियोद्धा अमित पंघाल टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न भारतीयांना पडले असतील.. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतांना ऑलिम्पिक प्रवासाबाबत त्याची भावना काय आहे, याविषयी…
तो त्याच्या 52 किलो वजनगटातील जगातला अव्वल मुष्टियोद्धा. अमित पंघाल त्याचं नाव. मुष्टियोद्धा अमित पंघाल याला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची सल त्याला नक्कीच असेल. मात्र, 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून तो पराभवाचा वचपा काढण्यास आसुसलेला आहे.
मुष्टियोद्धा अमित पंघाल हरियाणाचा
ऑलिम्पिकमध्ये भारताला अमित पंघालकडून पदकाची आशा आहे. तो हरियाणा राज्यातला असून, तो सध्या भारतीय मुष्टियोद्ध्यांसोबत इटलीत सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नुकतीच जागतिक रँकिंग जाहीर केली आहे. त्यात अमित पंघाल 52 किलो वजनगटात अव्वल स्थानावर आहे. अमित 2019 पासूनच एआयबीएच्या (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ) रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. पंघालने इटलीतून पीटीआयशी संवाद साधला. अमित म्हणाला, ‘‘चांगली रँकिंग असेल तर ड्रॉमध्ये चांगला फायदा होतो. त्यामुळे सुरुवातीच्या लढती सोप्या असतात. मात्र, हेही खरं आहे, की ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा कोणताही मुष्टियोद्धा कमजोर नसतो. मात्र, रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.’’
ऑलिम्पिकपूर्वी भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धा गाजवली आहे. या स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी 15 पदके जिंकली. मात्र, अमित पंघालला सुवर्णपदक जिंकू शकला नाही. अंतिम फेरीत त्याला ऑलिम्पिक व विश्वविजेता (2019) उझबेकिस्तानमधील जोइरोव शाखोबिदीन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा परिणाम टोकियो ऑलिम्पिकमध्ये कसा होईल, यावर अमित पंघाल म्हणाला, ‘‘फायनलच्या निकालाने मीही चकित होतो. माझे प्रशिक्षक आणि संघातील इतर सहकाऱ्यांचं मत असं आहे, की मी शाखोबिदीनपेक्षा उत्तम खेळत होतो. मात्र, पंचांचा निर्णय काही वेगळाच होता. आम्ही या निर्णयाविरोधात आक्षेपही घेतला होता. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही.’’
पंचवीस वर्षीय अमित पंघाल म्हणाला, ‘‘ठीक आहे, जे झालं ते झालं. आता माझं लक्ष टोकियोतील कामगिरीवर आहे. जर टोकियोमध्ये आम्ही दोघे पुन्हा आमनेसामने आलो तर मी त्याला पराभूत करीन. शाखोबिदीन रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अशात उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत आमची लढत होऊ शकते. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील पराभवाचा वचपा मी ऑलिम्पिकमध्ये काढीन.’’
2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत 49 किलो वजनगटात रियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता हसनबॉय दुसामातोव याला अमित पंघालने पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले होते. पंघाल सध्या इटलीत फ्रान्सचा बिलाल बेननमा आणि काही इतर मुष्टियोद्ध्यांसोबत सराव करीत आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक विजेता बिलाल आयओसी (ऑलिम्पिक मुक्केबाजी) रँकिंगमध्ये पंघालनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
मुष्टियोद्धा अमित पंघाल सरावात व्यस्त
अमित पंघाल म्हणाला, ‘‘जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावरील फ्रान्सच्या मुष्टियोद्ध्यासोबत स्पायरिंग (बॉक्सिंग सराव) करण्याचा सराव करता येत आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा उंच असलेल्या खेळाडूविरुद्ध लढण्याचा अनुभव मिळत आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास सर्वच मुष्टियोद्ध्यांची उंची माझ्यापेक्षा जास्तच आहे. अशा परिस्थितीत मला त्यांच्या जवळ जाऊन अंक वसूल करावे लागतील. भारतीय पथकासोबत इटलीत इतरही विदेशी मुष्टियोद्धे आहेत. त्यांच्यासोबत माझा सराव उत्तम सुरू आहे.’’
सहा वेळची विश्वविजेती महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ध्वजवाहक बनल्यानेही अमित पंघालचा उत्साह वाढला आहे. तो म्हणाला, ‘‘मेरी कोमने सहा विश्वविजेतेपद मिळविले आहे. तिने ऑलिम्पिमध्येही कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय ऑलिम्पिक पथकातील ती सर्वांत अनुभवी मुष्टियोद्धा आहे. आम्हा सर्वांची ती ‘रोल मॉडेल’ (आदर्श) आहे. ही आनंदाची बाब आहे. यामुळे आम्हा सर्व मुष्टियोद्ध्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.’’
अमित पंघालने सांगितले, की पदकासाठी मला कामगिरीबरोबरच भारतीयांच्या प्रार्थनेचीही गरज आहे. तो म्हणाला, ‘‘ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा मला विश्वास आहेच, पण मला प्रार्थनेचीही गरज आहे. मी 130 कोटी भारतीयांकडे आम्हा मुष्टियोद्ध्यांसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो.’’
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]
One Comment