भारतीय टेनिसची एके ४७

भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) याने वयाच्या 47 व्या वर्षात पदार्पण केलं. म्हणजे एका वर्षाने तो आणखी तरुण झाला. अनेकांच्या आयुष्यात वाढतं वय वृद्धत्वाकडे घेऊन जातं. त्याचं मात्र तसं अजिबातच नाही. जसजसं वय वाढत होतं, तसतसा तो तरुण होत होता. म्हणूनच तो वयाच्या पंचेचाळिशीतही ताशी २५० किलोमीटर वेगाचा चेंडू लीलया परतावून लावायचा… हे सगळंच थक्क करणारं आहे.
70 च्या दशकात क्रिकेट, कबड्डी, हॉकी या खेळांनी भारतावर गारूड केलं होतं. तुम्हाला माहीत नसेल, 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवलं होतं. या हॉकी संघात मिडफिल्डरवर खेळले होते लिएंडरचे वडील वेस पेस. यानंतर आठ वर्षांनी 1980 मध्ये आशियाई बास्केटबॉल लीगमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद जिने भूषविले होते ती जेनिफर पेस लिएंडरची आई होती. हॉकी आणि बास्केटबॉलचे सर्वोत्तम खेळाडू ज्या कुटुंबात होते, त्या कुटुंबातील लिएंडरने खेळ निवडला टेनिस.
क्रिकेट, कबड्डी, हॉकी हेच खेळ ज्या देशात लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेथे एखादा टेनिस स्टार निर्माण होणे कठीणच होतं. मात्र, लिएंडर पेसने यातही आपली वेगळ ओळख निर्माण केली आणि भारतीय टेनिसला एक मिडास टच दिला. त्याच्या टेनिसप्रतिभेने सगळेच अचंबित झाले. वयाच्या बाराव्या वर्षी लिएंडरने ज्युनिअर विम्बल्डन आणि त्याच्या पाच वर्षांनी 1991 मध्ये यूएस ओपन स्पर्धेत चमकदार खेळी केली. वर्षभरानंतर त्याने 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये तर त्याने कमालच केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने धडक मारली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू होता. ही पुढच्या यशाची नांदी होती. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवलं आणि हा टेनिसस्टार जगभर लकाकला. लिएंडर पेस एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने पाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या आहेत.
दुहेरीतला विश्वासू साथीदार
लिएंडर एकेरीतील एक लढाऊ टेनिसपटू होताच, पण दुहेरीतला उत्तम खेळाडू होता. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक खेळाडूंसोबत तो दुहेरीत खेळला आहे. असं असलं तरी तो तो महेश भूपती आणि चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकसोबतच अधिक यशस्वी ठरला. या दोघांसोबत त्याने पुरुष दुहेरीतील ग्रँड स्लॅम जिंकले आहे.
मिश्र दुहेरीत लिएंडर पेसने २० पेक्षा अधिक महिला खेळाडूंसोबत खेळला आहे. दुहेरीत लिएंडर आपला साथीदार असणं हीच प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट होती. कारण तो सोबत असणे म्हणजे किताबाची अर्धी लढाई जिंकल्यातच जमा असल्याचं मानलं जायचं. अमेरिकेची लिसा रेमंड, मार्टिना नवरातिलोवा, झिम्बाब्वेची कारा ब्लॅक आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस अशा दिग्गज महिला खेळाडूंसोबत खेळताना त्याने अनेक प्रतिष्ठित किताबही जिंकले आहेत. वेगवेगळ्या 100 खेळाडूंसोबत जोडी बनविणाऱ्या टेनिसपटूंमध्ये तो 47 व्या स्थानावर आहे. असं असलं तरी कोणीही त्याच्याइतकं दुहेरीत 18 ग्रँडस्लॅम किताब जिंकू शकलेलं नाही.
9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावला पेस
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11 ला झालेला दहशतवादी हल्ला सर्वांत भयंकर होता. यात तीन हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, कुणाला माहीत नसेल, पण या हल्ल्याच्या दहा तासांपूर्वी लिएंडर पेस ट्विन्स टॉवरमध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करीत होता. पेसनेच हा खुलासा केल्यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पेस म्हणाला, “माझ्याकडे अजूनही खरेदीची पावती आहे. मी खाकी पँट खरेदी केली होती. त्या वेळी मी डेव्हिस कपसाठी विन्स्टन-सालेम येथे जाण्याची तयारी करीत होतो. तत्पूर्वी तीन दिवसांसाठी मला घरी वाढदिवस साजरा करायचा होता. त्यासाठी मी भारतात परतणार होतो. खरेदी केल्यानंतर मी भारतात परतलो आणि दहा तासांनी बातमी धडकली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला.”
बॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न
स्वप्न विकणाऱ्या चित्रपटसृष्टीचं आकर्षण लिएंडर पेसलाही होतं. त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या वेळी पेस जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. त्याच वेळी त्याला “राजधानी एक्स्प्रेस” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अशोक कोहली यांच्या दिग्दर्शनाखाली पेसने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात पेसला मुख्य भूमिकेत सादर करण्यात आलं होतं. याच चित्रपटात जिमी शेरगिल, गुलशन ग्रोवर, सायली भगतसोबतच पूजा बोस, प्रियांशू चटर्जी, मुकेश ऋषी, सुधांशू पांडे आणि अनेक प्रमुख कलाकार होते. हा चित्रपट फार काही चालला नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपटी खाल्ली.
रियो ऑलिम्पिकमध्ये पेसला रूमच मिळाली नाही
पेसने टेनिसविश्वात कमाल केली होती. तो असा टेनिसपटू होता, ज्याच्यापुढे वाढत्या वयानेही तारुण्य बहाल केलं होतं. 2016 ची ही गोष्ट आहे. पेस रियो ऑलिम्पिकसाठी रवाना झाला होता. ही त्याची विक्रमी सातवी ऑलिम्पिक स्पर्धा होती. मात्र, ही स्पर्धा त्याच्या आयुष्यात वेगळ्याच कारणाने कायमची लक्षात राहिली. कारण या वेळी तो रोहन बोपण्णासोबत दुहेरीत खेळणार होता. बोपण्णाने त्याच्यासोबत खेळण्यास नकार दिला होता. मात्र, पेसने त्याच्याशी चर्चा केल्यानंतर ही जोडी अखेर ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली. बोपण्णासोबत सराव करण्यासाठी पेसला फारसा वेळ मिळाला नाही. कारण न्यूयॉर्कमध्ये त्या दरम्यानच अनेक टेनिस स्पर्धा होत्या. त्यात पेस व्यस्त राहिला. नंतर हे दोघे ऑलिम्पिकसाठी सज्ज झाले. पेस ऑलिम्पिक सुरू होण्याच्या एक दिवस आधीच रियोला पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर त्याला समजले, की त्याच्यासाठी रूमच बुक केलेली नव्हती. ही धक्कादायक बाब होती. अखेर त्याला भारतीय शेफ राकेश गुप्ता यांच्या रूममध्ये कपडे बदलावे लागले. भारतीय टेनिसस्टारने असेही काही प्रसंग पचवले आहेत.
भूपतीसोबतची जोडी अजरामर
भारतीय टेनिसमध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती ही जोडी सर्वांत हिट जोडी मानली जाते. किंबहुना या दोन्ही खेळाडूंनी भारतात टेनिस खेळ लोकप्रिय केला. हा काळ असा होता, जेथे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी किंवा बॅडमिंटन आवडीने खेळलं जायचं. या खेळांइतकी लोकप्रियता भारतात टेनिसला अजिबातच नव्हती. मात्र, पेस आणि भूपतीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर टेनिसलाही लोकप्रियता मिळवून दिली. या जोडीमध्ये अनेकदा वितुष्ट निर्माण झाले. ही जोडी कधी तुटली, कधी पॅचअप झालं, पण जेव्हा ही जोडी एकत्रित खेळली, तेव्हा त्यांनी किताब जिंकण्याची संधी कधीही सोडली नाही. या जोडीने एकत्र खेळताना 303 विजय मिळवले, तर 103 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोघांनी डेव्हिस कपमध्ये भारताचा दबदबा कायम ठेवला. दुहेरीत सर्वाधिक वेळा डेव्हिस कप जिंकण्याचा विक्रम याच जोडीच्या नावावर आहे. हा विक्रम आजही कोणी मोडू शकलेलं नाही. त्यांनी सलग 24 किताब जिंकले आहेत. थक्क करणारी बाब म्हणजे, या जोडीने 1995 पासून 2010 पर्यंत डेव्हिस कपमधील दुहेरीतला एकही सामना गमावलेला नाही. नंतर ही जोडी काही कारणास्तव दुभंगली.
पेस कारचा शौकीन
टेनिसमध्ये लौकिक मिळवत असल्याने लिएंडरचं स्वतःचं एक समृद्ध आयुष्यही होतं. त्याचे स्वतःचेही छंद, शौकही होते. त्यापैकीच एक होता कारचा संग्रह करणे. नवनव्या कारचं त्याला भारी आकर्षण. त्यामुळेच त्याच्या दारासमोर तुम्हाला फोर्ड एंडेवर, पोर्श केयेनसारख्या आलिशान कार दिमाखात उभ्या असलेल्या पाहायला मिळतील.
फिनिक्स भरारी…
एका खेळाडूची मैदानावरील कारकीर्द फार तर वयाच्या पस्तिशीपर्यंत असते. मात्र, पेस एकमेव होता, ज्याला वयाची ही मर्यादा अजिबात मान्य नव्हती. तो चाळिशीनंतरही आपली कामगिरी उंचावत गेला. त्याच्यासोबत जोडी जमवण्याची मनीषा अनेक खेळाडूंना असायची. यातून वलयांकित खेळाडू सानिया मिर्झाही सुटली नाही. लंडन ऑलिम्पिकनंतर सानिया मिर्झाने लिएंडरसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. कारण लिएंडरची कामगिरी त्या वेळी खालावली होती. अर्थात, हा बॅडपॅच लिएंडरसोबत फार काळ राहिला नाही. कारण तीन वर्षांनी तो पुन्हा टेनिस कोर्टवर उतरला. त्या वेळी मार्टिना हिंगीससारखी स्टार खेळाडूही एकेरीतून जवळजवळ बाहेरच पडली होती. अशा वेळी मिश्र दुहेरीत तिने पेससोबत जोडी जमवली. विशेष म्हणजे या जोडीने 2015 ची ऑस्ट्रेलिया ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन आणि 2016 ची फ्रेंच ओपन जिंकून कमालच केली. प्रतिष्ठित किताब आपल्या नावावर करणाऱ्या पेसचं हे पुनरागमन अचंबित करणारं होतं.
भारतीय टेनिसचा इतिहास ज्या ज्या वेळी लिहिला जाईल, तेव्हा त्यातलं एक पान लिएंडर पेसच्या नावाने सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल, यात कोणतीही शंका नाही..
‘लॉकडाउन संपल्यानंतर मी पुन्हा परतेन’
चिरतारुण्याचा वर मिळालेल्या लिएंडर पेसचं आठव्या ऑलिम्पिकचं स्वप्न धूसर होणार आहे. कोरोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिकसह सर्वच टेनिस स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. लिएंडरने आपल्या 47 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा परतण्याचे संकेत दिले आहेत. विक्रमी आठवं ऑलिम्पिक खेळूनच टेनिसला गुडबाय करण्याची त्याची मनीषा होती आणि अजूनही आहे. मात्र, कोरोनामुळे त्याचं हे स्वप्न साकार होण्याची सध्या तरी सूतराम शक्यता नाही. मात्र, व्यावसायिक टेनिस सर्किटमध्ये वापसी करण्याची त्याची इच्छा कायम आहे.
आपल्या 47 व्या वाढदिवसानिमित्त पेसने ‘भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स- यंग लीडर्स फोरम’द्वारे २० जून रोजी झालेल्या एका वेबिनारमध्ये सांगितले, ‘‘मी ऑलिम्पिकबाबत काहीसा चिंतित आहे. मी ‘वन लास्ट रोअर (शेवटची)’ सत्रात होतो, ज्याचा समारोप मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये करणार होतो. पण आता ती 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. जगाची अर्थव्यवस्थाही कमालीची घसरत चालली आहे. अशा परिस्थितीत ऑलिम्पिकसाठी कॉर्पोरेट प्रायोजक मिळणे कठीण आहे.’’
कोरोना महामारीशी लढण्यासाठी लस किंवा व्हॅक्सिन येणे आवश्यक असून, त्याशिवाय ऑलिम्पिक होणे शक्यच नाही, असं पेस ठामपणे म्हणतो. डेव्हिस कपमध्ये 44 सामने जिंकणारा हा विक्रमवीर म्हणाला, ‘‘लॉकडाउन संपल्यानंतर मी पुन्हा व्यावसायिक सर्किटमध्ये पुनरागमन करीन. मी 30 वर्षीय खेळाडूसारखा लिएंडरला उभा करीन’’
४७ वर्षांच्या या तरुण टेनिसपटूला शुभेच्छा.
One Comment