All SportsAthleticssports news

ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अर्शद नदीम आणि पाकिस्तानातील श्रेयवादाची भालाफेक

भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकासह नवा ऑलिम्पिक विक्रम साकारला. मात्र या यशानंतर पाकिस्तानात श्रेयवादाची भालाफेक सुरू झाली आहे...

ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अर्शद नदीम आणि पाकिस्तानातील श्रेयवादाची भालाफेक

पंजाब प्रांतातील खानेवाल गावातला 27 वर्षीय अर्शद नदीम याने कमाल केली आणि त्याने 8 ऑगस्ट 2024 रोजी भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकासह नवा ऑलिम्पिक विक्रम साकारला. मात्र या यशानंतर पाकिस्तानात श्रेयवादाची भालाफेक सुरू झाली… त्यावर टीम खेलियाडने टाकलेला प्रकाशझोत.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रीडा मंडळासमोर एक प्रश्न होता, तो म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणाचा खर्च उचलायचा? कारण ऑलिम्पिकसाठी सात खेळाडू जाणार होते. अर्थात, त्यांच्यासमोर दोनच जण त्यासाठी लायक होते. ते म्हणजे भालाफेकपटू अर्शद नदीम आणि त्याचा प्रशिक्षक.

नदीम आणि त्याचे प्रशिक्षक सलमान फय्याज बट भाग्यवानच म्हणावे लागतील. कारण त्यांच्या विमानप्रवासाचा खर्च पीएसबीने (पाकिस्तान स्पोर्टस बोर्ड) उचलला. पॅरिस ऑलिम्पिकच्या भव्य मंचावर अर्शद नदीम पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करीत होता. पंजाब प्रांतातील खानेवाल गावातला 27 वर्षीय अर्शद नदीम याने कमाल केली आणि त्याने 8 ऑगस्ट 2024 रोजी भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकासह नवा ऑलिम्पिक विक्रम साकारला. पाकिस्तानने दाखवलेला विश्वास त्याने योग्य ठरवला.

सहा फूट तीन इंच उंचीच्या मजबूत देहयष्टीचा नदीम याने 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 92.97 मीटर भाला फेकून नवा ऑलिम्पिक विक्रम केला. भारताचा नीरज चोपडा यानेही या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना 89.45 मीटर भाला फेकत रौप्य पदक मिळविले. अर्थात, नीरजला ११ वेळा सामोरा गेलेला अर्शद नदीम याने या वेळी प्रथमच नीरजला मागे टाकले.

नीरज चोपड़ा याने कारकिर्दीत एकदाही 90 मीटर भाला फेकलेला नाही. मात्र, नदीमने यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. नीरजकडे सर्व सुविधा आहेत. याउलट नदीमने असाही काळ पाहिला, की त्याच्याकडे स्वत:चाही भाला खरेदी करण्याइतपत पैसेही नव्हते.

नदीमचे वडील काय म्हणाले…

लोकांना माहीत नाही, की अर्शद इथपर्यंत कसा पोहोचला? सराव करता यावा, स्पर्धा खेळता याव्यात, प्रवासखर्च करता यावा म्हणून त्याचे मित्र, गावातली लोकं आणि नातेवाईक त्याच्यासाठी पैसे गोळा करायचे.

– मोहम्मद अशरफ, नदीमचे वडील

नदीमचे वडील मोहम्मद अशरफ यांनी सांगितले, की लोकांना माहीत नाही, की अर्शद इथपर्यंत कसा पोहोचला? सराव करता यावा, स्पर्धा खेळता याव्यात, प्रवासखर्च करता यावा म्हणून त्याचे मित्र, गावातली लोकं आणि नातेवाईक त्याच्यासाठी पैसे गोळा करायचे.

पाकिस्तानने एकूण सात खेलाडू पॅरिसला पाठवले होते. त्यापैकी सहा खेळाडूंना अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. नदीमने अंतिम फेरी गाठल्यानंतर त्याच्या घरी जल्लोष सुरू झाला, तसेच त्याच्या आईवडिलांनी गावात मिठाईही वाटायला सुरुवात केली होती.

नदीमची कामगिरी मागील काही दिवसांपासून फारशी समाधानकारक नव्हती. त्याने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि 2022 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 90.18 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले होते.

कोपर, गुडघा, पाठीच्या त्रासाने एकीकडे डोके वर काढले, तर दुसरीकडे खेळासाठी इतर देशांप्रमाणे चांगल्या सुविधा नसतानाही नदीमने जी कामगिरी केली आहे, ती पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाईल.

नीरज चोपडाविषयी काय म्हणाला अर्शद?

अर्शद नदीम एका बाबतीत खूश आहे, की भारतीय स्टार नीरज चोपडाशी स्पर्धा होत असल्याने त्याची चर्चा होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील तरुण प्रेरित होतील, अशी अर्शद नदीमला आशा आहे. अर्शद नदीम याने गुरुवारी, 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 92.97 मीटर भालाफेक करीत नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करीत सुवर्ण पदक जिंकले. नीरज चोपडा यानेही यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना 89.45 मीटरवर भाला फेकत रौप्य पदकावर मोहोर उमटवली. आतापर्यंतच्या 11 लढतींमध्ये प्रथमच अर्शद नदीम याने नीरजला मागे टाकले.

सत्तावीस वर्षीय नदीम म्हणाला, की “जेव्हा क्रिकेट सामने किंवा इतर खेळांची चर्चा होते, तेव्हा त्यात नक्कीच कडवी लढत असते. मात्र, ही दोन्ही देशांसाठी चांगली गोष्ट आहे, की अनेक जण आमचं किंवा आदर्श खेळाडूंचं अनुकरण करून खेळात येऊ पाहत आहेत, देशाचा नावलौकिक वाढवू पाहत आहेत.”

1988 नंतर पाकिस्तानला वैयक्तिक पदक

1988 मध्ये सिओल ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर हुसैन शाह याने मिडलवेट गटात कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर अर्शद नदीमच्या रूपाने पाकिस्तानला प्रथमच वैयक्तिक प्रकारात पदक मिळाले आहे. अर्शद नदीम आणि नीरज चोपडा यांच्याकडे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात असले तरी मैदानाबाहेर ते चांगले मित्र आहेत. काही महिन्यांपूर्वी जेव्हा नदीमने एक चांगला भाला खरेदी करण्यासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन केले, तेव्हा नीरज चोपडानेही त्याचं समर्थन केलं होतं.

अर्शद नदीम म्हणाला, “मी माझ्या देशाचा आभारी आहे. प्रत्येकाने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला माझ्या चांगल्या कामगिरीवर पूर्ण विश्वास होता. गेल्या काही दिवसांपासून मला गुडघादुखीचा त्रास जाणवत होता. मात्र, यातून बरे झाल्यानंतर मी तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं. मला 92.97 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकण्याची आशा होती. मात्र, अखेरीस माझे प्रयत्न सुवर्णपदक जिंकण्यासाठी पुरेसे ठरले.”

अर्शद नदीम म्हणाला, “मी आणखी मेहनत घेईन आणि भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करीन. माझं लक्ष्य यापेक्षा अधिक अंतरावर भाला फेकण्याचं आहे.”

अर्शद नदीम म्हणाला, की खरं तर मला क्रिकेटपटू व्हायचं होतं. मी टेबल टेनिसही खेळून पाहिलं होतं. ॲथलेटिक्स स्पर्धांतही मी सहभाग घेत होतो. मात्र, माझ्या प्रशिक्षकांनी सांगितलं, की ज्या पद्धतीची माझी शारीरिक बनावट आहे, ते पाहता मी भालाफेक चांगलं करू शकेन. त्यानंतर 2016 पासून मी माझं पूर्ण लक्ष भालाफेकमध्ये केंद्रित केलं.”

नदीम म्हणाला, “मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि जेव्हा मी पदक जिंकतो तेव्हा मी माझा भूतकाळ आठवतो. ज्यातून मला उत्तम कामगिरीची प्रेरणा मिळते. हेच कारण आहे, की मला आता नम्र आणि अधिक यशस्वी व्हायचं आहे.”

मी आणखी मेहनत घेईन आणि भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करीन. माझं लक्ष्य यापेक्षा अधिक अंतरावर भाला फेकण्याचं आहे.

पाकिस्तानमध्ये ईद, कराचीत जल्लोष

ऑलिम्पिक सुवर्ण भालाफेक अर्शद नदीम
ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भालाफेक खेळाडू अर्शद नदीम याच्या खानेवाल गावात जल्लोष करण्यात आला.

भालाफेक खेळाडू अर्शद नदीम याने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यानतंर पाकिस्तानात ईदचा माहोल होता. कराचीतल्या रस्त्यारस्त्यांवर जल्लोष सुरू होता. तब्बल 40 वर्षांनंतर पाकिस्तानने वैयक्तिक प्रकारात पदक जिंकले. पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये हॉकी स्पर्धेत मिळवले होते.

पाकिस्तान क्रिकेट टीमने विश्वकरंडकच जिंकावा असंच काहीसं वातावरण नदीमच्या यशानंतर कराचीत पाहायला मिळत होतं. तरुण जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर कारचे हॉर्न वाजवत होते. रस्त्यावर जल्लोष करणाऱ्या लोकांच्या हातात अर्शद नदीमचे पोस्टर आणि पाकिस्तानचा ध्वज होता.

पंजाब प्रांतातील खानेवालसारख्या ग्रामीण भागातील अर्शद नदीम याने यापूर्वी 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि गेल्या वर्षी 2023 मध्ये जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. नदीमला सुवर्णपदक मिळाल्याची पुष्टी होताच सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. भारताचा गतविजेता नीरज चोपडा याने गेल्या वर्षी 2023 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

नदीमला पाच कोटींचे बक्षीस

कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी सिंध सरकारच्या वतीने नदीमला पाच कोटींचे बक्षीस जाहीर केले. वहाब म्हणाले, की “अर्शद जेव्हा मायदेशी परतेल तेव्हा आम्ही त्याचं कराचीत जोरदार स्वागत सोहळा करू.”

नदीमच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की “नदीमने आम्हालाच नाही, तर देशाचा लौकिक वाढवला आहे. मी त्याच्यासाठी केवळ दुआ मागू शकते.”

नदीम कोपर आणि गुडघ्याच्या दुखापतीला सामोरा गेला होता. मर्यादित प्रशिक्षण सुविधांसह तो पॅरिसला रवाना झाला होता. सरकारकडे त्याने नवा भाला देण्याचेही आवाहन केले होते. कारण त्याचा जुना भाला खराब झाला होता.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राशीद लतीफ याने सांगितले, “मला वाटतं, अर्शदने जे मिळवलं आहे ते पाहता तो सर्व तरुणांसाठी आदर्श ठरेल. नवी पिढी त्याचे अनुकरण करील आणि ट्रॅक अँड फिल्डमध्ये रुची दाखवतील. तरुण आता फक्त क्रिकेटच नाही, तर इतर खेळांकडेही वळत आहेत.

लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तान हॉकी संघाचे सदस्य अयाज महमूद यांनी सांगितले, की मी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसत नाही. ते म्हणाले, “जेथे आमचा हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही, तेथे अर्शदने पाकिस्तानचा झेंडा उंचावत एक पाऊल टाकले आहे.”

जेथे आमचा हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही, तेथे अर्शदने पाकिस्तानचा झेंडा उंचावत एक पाऊल टाकले आहे.

अर्शद नदीम, ऑलिम्पिक सुवर्ण आणि श्रेयवादाची भालाफेक

पाकिस्तानच्या क्रीडाप्रणालीतील अपयश आणि प्रशासकीय उदासीनतेच्या कात्रीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू अर्शद नदीम याला पूर्णपणे जाणीव आहे, की आपण हे यश किती संघर्ष करीत मिळवलं आहे. त्यासाठी त्याला काय काय गमवावं लागलं आहे. ज्या वेळी गरज होती त्या वेळी नदीमला मदत करण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी संस्थांमध्ये आता त्याच्या यशाचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. या श्रेयवादाच्या लढाईत पाकिस्तान स्पोर्टस बोर्ड (पीएसबी), प्रांतीय समन्वय मंत्रालय (क्रीडा) आणि सरकारच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या लोकांनी उडी घेतली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी नदीम नव्या भाल्यासाठी याचना करीत होता. कारण त्याचा जुना भाला बरीच वर्षे वापरल्याने खराब झाला होता. नदीमला त्यासाठी ‘क्राउड फंडिंग’ अर्थात लोकवर्गणी काढावी लागली होती.

भारतीय सुपरस्टार नीरज चोपडासह पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत नदीम आर्थिक स्थितीत कमकुवत होता. त्यामुळेच त्याला सर्वोत्तम प्रशिक्षकाचे मार्गदर्शन, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेण्याची संधी मिळू शकली नाही.

ऑलिम्पिकपूर्वी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पैसे नसल्याने त्याला नवख्या खेळाडूंसोबत प्रचंड तापमानात पंजाब स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सराव करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशा स्थितीतही सरकार, राज्याशी संलग्न पाकिस्तान स्पोर्टस बोर्ड, पाकिस्तान ऑलिम्पिक संघ (पीओए) आणि एवढेच नाही, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही त्याच्या यशाचं श्रेय घेण्यासाठी धडपडत होते.

पंतप्रधानांनी सर्वांत आधी नदीमला शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या एका वक्तव्याने सर्वांनाच चकित केलं. त्यांनी दावा केला, की “माझ्या दूरदृष्टीमुळेच नदीम या पदकापर्यंत पोहोचला!”

 

भालाफेकच्या अंतिम फेरीनंतर लगेच पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केलेल्या एका व्हिडीओत पंतप्रधान उड्या मारताना, टाळ्या पिटताना दिसत होते आणि पंजाबचे क्रीडामंत्री त्यांना सांगत होते, “सर, हे तुमचं व्हिजन होतं. तुम्ही त्याला संधी दिली.” पंजाबचे क्रीडामंत्री त्या वेळच्या पंजाबमधील एका स्पर्धेचा उल्लेख करीत होते, जेव्हा शाहबाज त्या वेळी मुख्यमंत्री होते.

पीएसबीही श्रेय घेण्यात मागे नव्हती. त्यांनी दावा केला, की आम्ही नदीमला शक्य तेवढी मदत केली आणि रोख बक्षीस देण्याबरोबरच शस्त्रक्रियेवर एक कोटी रुपयेही खर्च केले.

इथे Click करा आणि वाचा… पाकिस्तान महिला क्रिकेटचा थक्क करणारा इतिहास…

सरकार आपल्या वार्षिक बजेटमध्ये राष्ट्रीय संघटनांना जो निधी देतो तो वितरित करण्याची जबाबदारी पीएसबी असते. पीओएच्या एका असंतुष्ट सदस्याने सांगितले, “पीएसबी आणि पाकिस्तान ऑलिम्पिक संघटना कितीही मोठे दावे करोत, मात्र वस्तुस्थिती ही आहे, की देशात क्रिकेटेतर खेळाडूंना समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.”

पाकिस्तानचे महान स्क्वॅश खेळाडू जहांगीर खान यांनी सांगितले, की एक खेळाडू म्हणून मला जाणीव आहे, की वैयक्तिक पदक जिंकण्यासाठी किती मेहनत, बलिदान, घाम, रक्त आणि अश्रू लागतात.

जहांगीर खान म्हणाले, की “वैयक्तिक खेळांमध्ये तुम्ही यशासाठी स्वत:शी संघर्ष करीत असतात. जर आमची क्रीडाप्रणाली योग्य पद्धतीने काम करीत असती तर आतापर्यंत गुणवंत खेळाडूंना जागतिक स्तरावर खेळवू शकलो असतो.”

नदीमला सर्वोच्च सन्मान

पाकिस्तानमध्ये ‘निशान-ए-पाकिस्तान’च्या खालोखाल ‘हिलाल-ए-इम्तियाज’सर्वोच्च पुरस्कार आहे. अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला आता ‘हिलाल-ए-इम्तियाज’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारने 10 ऑगस्ट 2024 रोजी ही घोषणा केली. पाकिस्तानच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘अज्म-ए-इस्तेहकाम’ (स्थैर्यासाठी वचनबद्धता) नावाचे टपाल तिकीटही जारी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाने औपचारिक सन्मानासाठी मंत्रिमंडळाला एक पत्र पाठवले आहे. राष्ट्रपति झरदारी यांनी पत्रात नमूद केले आहे, की ‘अर्शद नदीम याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाचा जागतिक मंचावर गौरव झाला आहे. खेळाडूचे यश हा देशाचा अभिमान आहे.”

नदीमवर टपाल तिकीटही

अर्शद नदीम ऑलिम्पिक सुवर्ण भालाफेक

एका विशेष गौरव सोहळ्यात नदीमला नागरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘अज्म-ए-इस्तेहकाम’ नावाचे एक टपाल तिकीट जारी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

टपाल तिकिटाच्या डिझाइनमध्ये नदीम आणि राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असलेल्या मीनार-ए-पाकिस्तानची छबीही आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!