विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल
विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल
नेब्रास्का स्टेडियममध्ये ३० ऑगस्ट २०२३ रोजीचा व्हॉलिबॉल दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल.
त्याचं कारण म्हणजे विद्यापीठ स्तरावरील महिलांच्या व्हॉलिबॉल सामन्याला तब्बल ९२,००३ प्रेक्षकांनी हजेरी लावली. ही विश्वविक्रमी प्रेक्षकसंख्या होती. यापूर्वी कोणत्याही स्पर्धेला प्रेक्षकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला नव्हता. नेब्रास्का कॉर्नहुस्कर्स आणि ओमाहा मावेरिक्स यांच्यात हा सामना झाला. या वेळी कॉर्नहुस्कर्स मेमोरियल स्टेडियममध्ये 92,003 प्रेक्षक दाखल झाले होते. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेले होते. बहुतांश प्रेक्षक नेब्रास्काला समर्थन देणारे होते. त्यामुळे स्टेडियमवर लाल मुंग्यांसारखी गर्दी भासत होती. साधारणपणे पाश्चात्त्य देशांमध्ये फुटबॉल स्पर्धेला अशी गर्दी लाभते. मात्र, तीही पुरुषांच्या स्पर्धांना. मात्र, ही पहिलीच अशी घटना आहे, की विद्यापीठाच्या स्पर्धेत तेही व्हॉलिबॉल स्पर्धेत आणि त्यातही महिलांच्या सामन्याला एवढा उदंड प्रतिसाद लाभला होता. यापूर्वी कोणत्याही राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय महिलांच्या स्पर्धेत अशी गर्दी झाली नव्हती. हे प्रथमच घडलं होतं. विशेष म्हणजे या सामन्यासाठी तिकीट लावलं होतं. फुकट आहे म्हणून एवढी गर्दी झाली असं अजिबातच नव्हतं. प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता, की अनेकांना तिकिटे मिळाली नाहीत. त्यामुळे काही प्रेक्षकांनी काळ्याबाजारात ही तिकिटे खरेदी केली.
मेमोरियल स्टेडियममध्ये एक व्हॉलीबॉल कोर्ट तयार केले होते. मूळ मैदान कॉर्नहुस्कर्स फुटबॉल टीमचे आहे. त्यात व्हॉलिबॉल कोर्टला जागा देण्यात आली होती. या स्टेडियमची क्षमता 85,458 आहे. मात्र, 90,000 पेक्षा अधिक प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था या स्टेडियममध्ये आहे.
अमेरिकेत महिलांच्या स्पर्धेसाठी यापूर्वी 90,185 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. मात्र, हा सामना होता 1999 मधील फिफा वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्याचा. विजेतेपदासाठी अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या या लढतीला गर्दी झाली होती. मात्र, हा गर्दीचा विक्रम नेब्रास्काच्या स्टेडियमने मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. फिफा वर्ल्डकप स्पर्धा कदाचित हा विक्रम मोडीत काढेलही, पण एका राज्यस्तरीय स्पर्धेतील सामन्याला झालेली गर्दी ‘न भूतो न भविष्यति’ राहील एवढे मात्र खरे.
मेमोरियल स्टेडियम भलेही कॉर्नहुस्कर्स फुटबॉल संघाचं असलं तरी स्टेडियमवरील गर्दीचा विक्रम मात्र महिला व्हॉलिबॉल संघाचा आहे. २०१४ मध्ये मियामीवर ४१-३१ असा विजय मिळवल्यानंतर नेब्रास्का फुटबॉल स्टेडियम असेच खचाखच भरलेले होते. मात्र, व्हॉलिबॉल सामन्यासाठी 92,003 लोकांची उसळलेली गर्दी आतापर्यंतची सर्वोच्च ठरली.
या गर्दीने सर्वांनाच अचंबित केले. लॉस एंजिल्स लेकर्सचा दिग्गज बास्केटबॉलपटू अर्विन ‘मॅजिक’ जॉन्सनने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, लाल समर्थकांची संख्या मोठी होती. सर्व हस्कर समर्थकांना सलाम, ज्यांनी महिला खेळाडू आणि नेब्रास्का व्हॉलीबॉल संघासाठी समर्थन दिले.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=dILae6YuP50″ column_width=”4″] [jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]