भारतीय फुटबॉलचे जनक-नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांना भारतीय फुटबॉलचे जनक म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी फुटबॉलला पहिली किक मारली. असं म्हणतात, की हा पहिला भारतीय होता, ज्याने फुटबॉलला प्रथमच किक मारली.. असो, नागेंद्र यांना भारतीय फुटबॉलचे जनक का म्हणायचे, तर त्यासाठी त्यांची थक्क करणारी कहाणी समजून घ्यावी लागेल.
ही कहाणी सुरू होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून. त्या वेळी ब्रिटिश वसाहतवादी भारतात आले आणि हळूहळू संपूर्ण देश अंकित केला. या ब्रिटिशांनी भारतात काही खेळ रुजवले. त्यापैकीच एक म्हणजे फुटबॉल. कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बेसारख्या काही निवडक शहरांत फुटबॉलचे सामने होत होते. भारतीयांना यातलं काही कळत नव्हतं. कारण हा खेळ युरोपातील लोकांपुरताच मर्यादित होता. विशेषत: ब्रिटिश सैन्य आणि नाविक सेनेतील अधिकारी फुटबॉलचे सामने खेळायचे. मात्र, 1877 हे वर्ष नवा हर्ष घेऊन आलं.
याच वर्षात कॅलेंडरचे काही महिनेच उलटले होते, त्या वेळी राणी व्हिक्टोरिया यांनी भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली. परवानगी जरी क्रिकेटला मिळाली असली तरी कोलकात्यात मात्र फुटबॉलने कूस बदलली. इथे नागेंद्र यांची भूमिका थेट आहे.
नागेंद्र ‘भद्रलोक’ म्हणजेच अभिजात कुटुंबाचे उत्तराधिकारी. नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी आई हेमलता देवी यांच्यासोबत टांग्यातून गंगेवर जात होते. त्या वेळी नागेंद्र यांचं वय अवघं आठ वर्षांचं होतं. त्यांच्या दिवसाची सुरुवात या पवित्र नदीतील स्नानाने झाली. सप्टेंबरमधला हा दिवस होता. त्या वेळी नागेंद्रला उशीर झाला.
परतीच्या प्रवासात लहानग्या नागेंद्रचं लक्ष एका फुटबॉल सामन्याकडे गेलं. कलकत्ता एफसी मैदानावर ब्रिटिश सैनिकांना खेळताना पाहून नागेंद्रला या खेळाचं विशेष अप्रूप वाटलं. नागेंद्रने हट्टाने गाडी थांबवली. त्यामुळे नागेंद्रला ब्रिटिश सैनिकांचा हा खेळ जवळून न्याहाळता आला. योगायोग पाहा, हा सामना पाहताना फुटबॉल नागेंद्रजवळ आला. त्या वेळी तेथे आलेला एक ब्रिटिश सैनिक नागेंद्रला म्हणाला, “माझ्या दिशेने चेंडूला किक मार बाळा.”
‘बेयरफूट टू बूट्स’ हे नोवी कपाडिया (भारतीय फुटबॉल अभ्यासक आणि इतिहासकार) यांचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात ही घटना नमूद केली आहे. त्यातलं एक वाक्य आहे, की हा पहिलाच प्रसंग होता, की जेव्हा एका भारतीयाने फुटबॉलला किक मारली. आता नागेंद्र सर्वाधिकारी खरोखर फुटबॉलला किक मारणारे पहिले भारतीय होते किंवा नाही हा वादाचा विषय होईलही. मात्र, हे खरं आहे, की भारतीय फुटबॉलच्या इतिहासात ही अधोरेखित करणारी किक होती.
कोलकात्यात हरे स्कूल प्रसिद्ध आहे. या शाळेत नागेंद्र सर्वाधिकारी परतला. आता त्याच्याकडे एक मोठा अनुभव होता, तो म्हणजे चेंडू पाहण्याचा आणि त्याला किक मारण्याचा. त्याच्या डोक्यात फुटबॉल कायमचा फिट्ट बसला. त्याने हा खेळ आपलासा करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं. त्याने आपल्या काही मित्रांसह पैसे गोळा करून फुटबॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अठराव्या शतकात कलकत्त्यात स्पोर्ट्सचं दुकान होतं- मेसर्स मंटो अँड कंपनी. त्या वेळचं बोउ बाजारातील हे प्रसिद्ध स्पोर्ट्स शॉप.
चेंडू घेताना फसले…
ही चिमुकली मुलं दुकानात घुसली आणि मालकाकडे पैसे देऊन चेंडू ताब्यात घेतला. लहान वयात कोणता चेंडू कसा असतो, याचं ज्ञान त्या वेळी कुणाकडेही नव्हतं. त्यात ही पोरं बारकी! ही मुले फुटबॉलऐवजी रग्बीचा चेंडू घेऊन आली. ही काय फार मोठी चूक नव्हती. कारण ब्रिटनमध्ये त्या वेळी रग्बी आणि फुटबॉलचा चेंडू जवळपास सारखाच होता. या पोरांना काय नावं ठेवायची… अगदी 1873 मध्ये स्कॉटिश फुटबॉल संघटनेने 1924 मध्ये आपलं नाव बदललं आणि ‘स्कॉटिश रग्बी युनियन’ असं करण्यात आलं. घ्या, आता काय बोलणार?
रग्बी काय नि फुटबॉल काय, चिमुकल्यांना काही फरक पडणार नव्हता. त्यांना किक मारायची होती. या मुलांनी शाळेच्या मैदानावर रग्बी चेंडूवरच फुटबॉल खेळणे सुरू केले. एका किकवर सगळा खेळ आत्मसात होत नसतो, हे या मुलांना कुठे माहीत होतं. या मुलांपैकी एकालाही फुटबॉलचे नियम माहीत नव्हते. तरीही ते रग्बी चेंडूवर फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करीत होते.
त्या काळात ब्रिटिशांना खेळताना जेवढं कुतूहल लोकांमध्ये होतं, तेवढंच कुतूहल या मुलांना खेळताना दाटलं. या मुलांना खेळताना पाहून लोकांची तोबा गर्दी व्हायची. या गर्दीत जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांतील युरोपीयन शिक्षकांचा एक ग्रुपही पाहायला असायचा. हरे स्कूलजवळच प्रेसिडेन्सी महाविद्यालयाचे प्राध्यापक जीए स्टॅक राहत होते. त्यांनी बाल्कनीतून या पोरांना खेळताना पाहिलं. त्यांना या मुलांचं विशेष कौतुक वाटलं. ते झपझप खाली उतरले आणि मुलांना म्हणाले, तुम्ही कोणता खेळ खेळताहात? त्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी स्टॅक यांनी नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी याला नियम शिकवण्यास तयार झाले. एवढेच नाही तर त्यांना खरोखरचा फुटबॉलही गिफ्ट केला.
याच प्रेसिडेन्सी कॉलेजचे आणखी एक प्रोफेसर जेएच गिलीलँड हेदेखील या मुलांच्या मदतीला आले. नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी आणि त्यांच्या मित्रांनी बॉइज क्लबची स्थापना केली. हा भारतातील पहिला संघटित क्लब. यानंतर इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही स्वत:चा फुटबॉल क्लब स्थापन करण्यास प्रेरित केले. प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता मेडिकल कॉलेज, सेंट झेविअर्स कॉलेज अशा विविध मोठ्या संस्थांमध्ये फुटबॉलचे वारे वाहू लागले.
कलकत्त्याच्या चोरबागान क्षेत्रातील शाही कुटुंबाचे सदस्य, काही मित्र आणि शाळकरी मित्र नागेंद्र मुलिक एकत्र आले. त्यांनी राजा राजेंद्र मल्लिक यांच्या शाही कुटुंबाच्या परिसरात फ्रेंड्स क्लबची स्थापना केली. कोलकात्यासाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी हे ऐतिहासिक पाऊल होते. हरे स्कूलमधून उत्तीर्ण झाल्यानंतर नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी याने प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्याच्या मनात ध्यास फुटबॉलचाच होता. कलकत्त्यातील क्लबसाठी त्यांनी पुढाकार घेतला. हा पुढाकार मागच्यापेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी होता.
फुटबॉलमधील भेदभाव, जातीयवादाचा बीमोड
नागेंद्र यांनी ज्या क्लबांचं संरक्षण केलं, त्यात वेलिंग्टन आणि सोवाबाजार क्लब विशेष महत्त्वाचे होते. 1884 मध्ये कॉलेज सोडल्यानंतर नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनी भारतीय फुटबॉलमध्ये व्यापक सामाजिक बदलांना प्राधान्य दिले. त्यापैकी महत्त्वाचे बदल म्हणजे भेदभाव आणि जातिभेद. त्या काळात फुटबॉल ‘उंचे लोग उंची पसंद’ होता. त्यामुळे उच्च जातीचेच लोक हा खेळ खेळू शकतात, अशी क्लबमध्ये धारणा होती. मात्र नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी क्लबमध्ये कुंभाराचा मुलगा मोनी दास याला घेतलं. जातिभेदाविरुद्ध उचललेलं त्यांचं हे पहिलं पाऊल. या निर्णयाने त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. तरीही त्यांनी निर्णय बदलला नाही. तो असा काळ होता, की लोकांमध्ये जातीची उतरंड कमालीची घट्ट होती. अशा काळात नागेंद्र यांच्या निर्णयावर क्लबमध्ये पडसाद उमटणारच. त्यांना बरंच सहन करावं लागलं. आज कदाचित त्या विरोधाची कल्पना करता येणार नाही. हा टोकाचा विरोध डावलत अखेर नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनी वेलिंग्टन क्लबच बरखास्त केला.
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनी फुटबॉलप्रवास पुढे सुरूच ठेवला. त्यांनी 1887 मध्ये सोवाबाजार आणि कूचबिहार शाही परिवारांचं समर्थन घेत सोवाबाजार क्लबची स्थापना केली. हा क्लब सामाजिक प्रगतीचं प्रतीक बनला. कारण या क्लबमध्ये जात, वर्ग, धर्म याला कोणताही थारा नव्हता. सर्वांना या क्लबमध्ये खुलं आवतण होतं. या बदलाचं सेलिब्रेशन म्हणा किंवा आणखी काय, पण मोनी दास या कुंभाराच्या मुलाला सोवाबाजार क्लबमध्ये प्रवेश दिला. हाच खेळाडू पुढे कोलकात्यातील दिग्गज क्लब मोहन बागानच्या पहिल्या सदस्यांपैकी एक बनला. सोवाबाजार क्लबशी नागेंद्र यांचं नातं वेगळं होतं. सोवाबाजार नागेंद्र यांच्या पाठीशी कायम राहिला. याच शाही सोवाबाजार कुटुंबातील आनंद कृष्णा देव यांच्या मुलीशी पुढे नागेंद्र यांचा विवाह झाला.
1889 मध्ये नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनी सर्व क्लबच्या खेळाडूंचा एक संघ बनवला. हा संघ ट्रेड्स कपमध्ये सहभाग घेणारा पहिला भारतीय संघ बनला. सोवाबाजार क्लबने 1892 मध्ये ट्रेड्स कपच्या फायनलमध्ये इस्ट सरे रेजिमेंटचा 2-1 असा पराभव केला. एका ब्रिटिश संघाला पराभूत करीत ट्रेड्स कप जिंकणारा पहिला अखिल भारतीय क्लब बनला. या विजयाने 1911 मध्ये मोहन बागानची ऐतिहासिक आयएफए शील्ड जिंकण्यासाठी एक मंच तयार केला.
1892 मध्ये, त्यानंतर नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनीही 1937 मध्ये भारतात फुटबॉल महासंघाच्या (IFA) स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली. असं असलं तरी संघटनेपूर्वी भारतीय सदस्य झाल्यानंतर सोवाबाजार क्लबचे एक वरिष्ठ सदस्य काली मिटर यांचं नाव सर्वांत पुढे ठेवलं. 1940 मध्ये नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांचं निधन झालं, पण तत्पूर्वी त्यांना भारतीय फुटबॉलचे पिता ही उपाधी मिळाली.
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांच्यावर चित्रपट
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांचं फुटबॉलमधील योगदान आजच्या पिढीला माहीत नसेल. मात्र ही कहाणी ऐकून भारतीय फुटबॉलचा जनक कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं. नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांच्या जीवनावर ‘गोलोंदाज’ (Golondaaj) हा बायोपिक 10 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. ध्रुबो बॅनर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक, तर श्री वेंकटेश फिल्म्स निर्माते होते. बंगालचा सुपस्टार देव यांनी नागेंद्र यांची भूमिका साकारली. ‘दि टाइम्स ऑफ इंडिया’ने या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार दिले होते.
Follow on Facebook Page kheliyad
अवघ्या ३९ व्या वर्षी भारताचे माजी फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे निधन
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]