महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा थक्क करणारा जीवनप्रवास
2020 मध्ये महाराष्ट्र केसरी जिंकणारा पहिलवान हर्षवर्धन सदगीर याच्याशी खास संवाद. तो म्हणाला, महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्यापेक्षा वस्तादांचं स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद मोठा आहे. त्यांची इच्छा आहे, की महाराष्ट्र केसरीची गदा आणि ऑलिम्पिकची गदा आपल्याला मिळावी. ऑलिम्पिकची तयारी तर सुरूच आहे, पण महाराष्ट्र केसरीची गदा आल्याने त्यांना खूप आनंद आहे…. 2020 मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणाऱ्या हर्षवर्धन सदगीरची मुलाखत खास ‘खेळियाड’ ब्लॉगच्या वाचकांसाठी…
तुझा कुस्ती प्रवास कसा सुरू झाला?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : माझं गाव अकोले तालुक्यातील कोंभाळणे. माझ्या घरातच कुस्ती होती. आजोबा कुस्ती खेळायचे. गावातच कुस्तीची परंपरा आहे. गावात यात्रेतल्या कुस्त्या असायच्या. तिथं जायचो, पण फारसं जमायचं नाही. गावात कुस्तीची परंपरा असली तरी तालीम नाही. अजूनही तालीम नाही. तब्येत चांगली होती. आजोबासह गावातले सगळे म्हणायचे कुस्ती खेळ. वडील शाळेत लिपीक होते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. सातवीला गेल्यानंतर निर्णय घेतला, की याला पहिलवान बनवायचं. एकदा केळीत त्यांनी कुस्त्या पाहिल्या. तिथं शेणीत गावचा एक मित्र भेटला. तिथं त्याने सांगितलं, की भगूरला बलकवडे व्यायामशाळेत प्रशिक्षण केंद्र आहे. तिथं जाण्याचा सल्ला दिला. या बलकवडे तालमीतून माझ्या कुस्तीला पैलू पडले.
सुरुवातीला गावात कुस्ती खेळायचो तेव्हा बऱ्याचदा हरायचो. जिंकणं माहीतच नव्हतं. मग काही जण म्हणायला लागले, की याच्याकडून काही कुस्ती होणार नाही. हा आता काही पहिलवान होणार नाही. हे वडिलांच्या मनाला लागलं. हर्षवर्धनला कुस्ती होणार नाही, हे कसं काय. त्यांनी मग मनाशी पक्क ठरवलं, की हर्षवर्धनला पहिलवान बनवायचंच. याला शिकवायचंही आणि चांगला पहिलवानही बनवायचं.
दहावी-बारावीपर्यंत नियमित शिक्षण घेतलं. त्याचबरोबर कुस्तीचं शिक्षणही घेतलं आणि कॉलेजलाही जायचो. बारावीनंतर मग सतत बाहेर कुस्त्या खेळत गेलो. यात सरांनीही मदत केली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. पदकं जिंकू लागलो. पहिली ते सातवी गावातच शिक्षण झालं. सातवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण भगूरच्या टी. झेड. हायस्कूलमध्ये, तर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या देवळाली कॅम्पमधील एसव्हीकेटी महाविद्यालयात दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालं. पुढचं बीए, एमएचं शिक्षण करंजाळी महाविद्यालयात झालं.
गेल्या वर्षीही तू महाराष्ट्र केसरी खेळला होता…
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : गेल्या वर्षीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळलो. ती माझी पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती. यात मी सेमिफायनलपर्यंत खेळलो. त्या वेळी गुणांवरून वाद झाले. आमचे वस्ताद काका पवार यांना कळलं, की आपल्या पहिलवानांवर अन्याय होतो. त्यामुळे त्यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. आमच्या वस्तादांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर हे दुसऱ्याच वर्षी या वेळी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. ग्रीको रोमनमध्ये मी चांगली कामगिरी केली आहे. ग्रीको रोमन कंबरेच्या वरची कुस्ती होती. ग्रीको रोमनबरोबरच मी फ्रीस्टाइल कुस्तीचाही सराव केला होता. ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाइललाही मेडल आहे. ग्रीको रोमनमध्ये मला राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड, सिल्व्हर मेडल आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळताना फ्रीस्टाइल कुस्ती खेळताना फारशी अडचण आली नाही. दोन्ही प्रकारांमध्ये माझी चांगली तयारी होती. माझ्या वस्तादांचं मार्गदर्शन होतंच.
तुझ्या मित्रासोबतच तू फायनल खेळला. त्याबाबत काय सांगशील?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : शैलेश शेळके माझ्याच तालमीतला पहिलवान जेव्हा फायनलला आला त्या वेळी मनात कोणत्याही भावना नव्हत्या. कारण स्पर्धा जिंकण्याचाच अभ्यास करून गेलो होतो. मला त्याची कुस्ती माहिती होती. त्यालाही माझी कुस्ती माहिती होती. आम्ही दोघेही एकाच तालमीत असलो तरी आम्ही जीवतोड कुस्ती केली. दोस्ती असली तरी कुस्तीत दोस्ती नसते. यापूर्वी शैलेशने मला ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारांत हरवलेलं आहे. मात्र, महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी कसून सराव केला होता. त्यासाठी आठ-नऊ महिने कुठेही बाहेर पडलो नाही. मोबाइलही बंद होता. त्याचा मला खूप फायदा झाला.
काका पवार यांच्याच तालमीतले दोघे फायनलला आले. तेव्हा वस्तादांनी तुम्हाला काय टिप्स दिल्या?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : आम्ही दोघेही फायनलला गेलो असलो तरी आमच्या वस्तादांनी आम्हा दोघांना काहीही टिप्स दिल्या नाहीत. ते फक्त एवढंच म्हणाले, तुम्ही कुस्ती चांगली करा. तुम्ही दोघेही माझेच पठ्ठे आहेत. मी काही बोलू शकत नाही. फायनलला येईपर्यंत आम्हा दोघांनाही कसे डावपेच करायचे, काय पवित्रा घ्यायचं यात वस्तादांचं मार्गदर्शन होतं. फायनलला आल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सर्वांत आव्हानात्मक लढत कोणती होती?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : अभिजित कटकेसोबतची कुस्ती थोडी आव्हानात्मक होती. कारण तो अनुभवी पहिलवान आहे. वरिष्ठ गटातल्या कुस्तीचा पदकविजेता आहे. आंतरराष्ट्रीय पहिलवानही आहे. महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी असल्याने त्याच्याशी कुस्ती करताना वेगळ्या योजना आखाव्या लागतील याची जाणीव होती. त्याच्याशी कसे डावपेच करायला पाहिजे याची जोरदार तयारी केली होती. योजनेप्रमाणे सगळे काही घडले आणि मी जिंकलो.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीही बचावात्मक खेळायचा. तूही त्याचासारखाच पवित्र घेतला होता. हे काय तंत्र आहे?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : तसं काही नाही. हेविवेटचा पहिलवान असेल तर ती कुस्ती संथच असते. वेग कमी असतो. मात्र, त्यात मी बदल केला. प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपल्या हालचाली जर वेगवान असतील तर चांगली कुस्ती करता येईल. त्यामुुळे अभिजीतबरोबर या व्यूहरचनेचा मला फायदा झाला. त्याच्या हालचाली संथ होत्या, तर माझ्या वेगात होत्या.
एक तर तू तुझ्या गावात पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची गदा आणलीस, नाशिकमध्ये शिक्षण घेतल्याने नाशिक जिल्ह्यालाही पहिल्यांदाच गदा मिळाली, तर काका पवार यांच्या तालमीतलाही तू पहिलाच मल्ल आहेस. एकप्रकारे ही तिन्ही ठिकाणं तू समृद्ध केली आहेस. काय सांगशील?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : ही किताबी लढत जिंकल्याने गावात अजूनही जल्लोष आहे. गावात पहिल्यांदाच गदा आली. माझ्या अकोले तालुक्यातच ही पहिली गदा आहे. नाशिक जिल्ह्यातही मी आणलेली ही पहिलीच गदा आहे. यापूर्वी जिल्ह्याला उप महाराष्ट्र केसरीचा मान मिळालेला आहे. महाराष्ट्र केसरी जिंकल्याने नाशिक जिल्ह्यातही आनंद आहे. आमचे वस्ताद काका पवार आमच्यावर खूपच खूश होते. कारण आमच्या तालमीत माझ्या रूपाने पहिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्यापेक्षा वस्तादांचं स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद मोठा आहे. त्यांची इच्छा आहे, की महाराष्ट्र केसरीची गदा आणि ऑलिम्पिकची गदा आपल्याला मिळावी. ऑलिम्पिकची तयारी तर सुरूच आहे, पण महाराष्ट्र केसरीची गदा आल्याने त्यांना खूप आनंद आहे.
महाराष्ट्र केसरीनंतर पुढे काय, असा प्रश्न नेहमीच पडतो. तुझं पुढचं ध्येय काय?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : तसं पाहिलं तर माझी आता कुठे सुरुवात आहे. मी इथंच थांबणार नाही, तर हिंदकेसरी, सीनिअर नॅशनल असेल, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि मग 2024 चं ऑलिम्पिक असं मी लक्ष्य समोर ठेवलं आहे. माझी आता सुरुवात झाल्याने अजून मला भरपूर खेळायचं आहे. सीनिअर नॅशनलला खेळलेलो आहे. मी चौथा आलो. अर्थात, मला ब्राँझ मेडल आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. 23 वर्षांखालील सीनिअर नॅशनलला सिल्व्हर मेडल आहे. खुल्या गटात भरपूर स्पर्धा खेळलो आहे. ऑलिम्पकला मेडल घेणारच.
भगूरच्या व्यायामशाळेविषयी काय सांगशील?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : भगूरला आल्यानंतर वेगळंच वाटायचं. प्रॅक्टिस तर भरपूर व्हायची. पण मला हे सगळं पेलवल का, अशी मनात भीती होती. नंतर इथं रुळल्यानंतर जाणवलं, की इथूनच मी पुढे काही तरी करू शकेन. या तालमीचं वैशिष्ट्य आहे, की आजपर्यंत कोणताही मुलगा अपयशी ठरलेला नाही. कोणी नोकरीला लागलं, कोणी पोलिस झालं, सैनिक झाला, तर कुणी चांगला पहिलवान झाला. इथं मी चांगला अनुभव घेतला, पण इथं सरावासाठी तोडीचे मल्ल भेटत नव्हते. नानांनीच मला काका पवारांच्या तालमीत पाठवलं. ते म्हणाले, की तू काकांकडे थांब. तुझा तिथं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सराव होईल. त्यांनी तिथं पाठवल्यानंतर मला तिथं त्या तोडीचा प्रॅक्टिस मिळाली आणि रिझल्ट एक-दीड वर्षातच यायला सुरुवात झाली. तालमीत गेल्यानंतर तीनच वर्षांत मी महाराष्ट्र केसरी झालो. सकाळ-सायंकाळ सराव सुरू असायचा. काका पवार, त्यांचे बंधू गोविंद पवार या दोघांचंही तालमीकडे चोवीस तास लक्ष आहे. हे करताना आहारही तेवढाच घ्यावा लागतो. अंडी, केळी, फ्रूट ज्यूस, बदाम, रोज तीन लिटर दूध, चिकन-मटण असा माझा दैनंदिन आहार आहे.
सदगीरवर कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : महाराष्ट्र केसरीची किताबी लढत जिंकल्यानंतर हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव झाला. यापूर्वी केवळ उपमहाराष्ट्र केसरीचा मान मिळालेल्या नाशिकला यंदा हर्षवर्धनच्या रूपाने पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला. त्याच्या या कामगिरीची दखल घेत नाशिक महापालिकेतर्फे त्याचा नागरी सत्कार करण्याचा आणि त्याला महापालिकेचा ब्रँड अम्बॅसिडर करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या सत्कार सोहळ्यात हर्षवर्धनला महापालिकेतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेशही दिला जाणार आहे.
घोटीकरांकडून स्विफ्ट कारची भेट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर : हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली तर त्याला स्विफ्ट कार भेट देऊ, असं इगतपुरी तालीम संघाने जाहीर केलं होतं. हर्षवर्धनने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकल्यानंतर इगतपुरी तालुका तालीम संघाने त्याचा घोटीत भव्य सत्कार केला. फुलांनी सजविलेल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तालीम संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, गोरख बोडके, संदीप गुळवे यांनी जाहीर केल्याप्रमाणे स्विफ्ट कारची भेट देऊन त्याला गौरविले. राज्यशास्त्र विषयात एमएपर्यंत शिक्षण झालेल्या हर्षवर्धनची आवड कुस्तीच आहे. कुस्तीतल्या अनेक डावपेचांचं कौशल्य आत्मसात केलेल्या हर्षवर्धनचा साइड थ्रो हा आवडता डाव आहे.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”73,97″]