कोबे ब्रायंट : कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडूची अकाली एक्झिट
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा (NBA) दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट (Kobe Bryant) याचा रविवारी, २६ जानेवारी 2020 रोजी हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आणि संपूर्ण क्रीडाविश्वाला धक्का बसला. कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडूची वयाच्या ४१ व्या वर्षी अकाली एक्झिट अनेकांना धक्का देऊन गेली… कमी वयात कीर्तिशिखरावर पोहोचलेला कोबे ब्रायंट याच्या यशामागचे काय आहे कारण…
क्रीडाविश्वातील सर्वांत लब्धप्रतिष्ठित नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची (NBA) स्पर्धा म्हंटली, की युरोपमधील प्रेक्षकांसाठी आनंदपर्वणीच. आपल्याकडे जसं आयपीएलचं (IPL) वेड आहे, तसंच तिकडं ‘एनबीए’चं. आयपीएल तर अगदी अलीकडची आहे. किंबहुना तिच्या अस्तित्वामागची प्रेरणा ‘एनबीए’तच दडलेली आहे. एनबीएची स्थापनाच १९४६ पासूनची आहे. व्यावसायिक खेळ आपल्याकडे आता कुठे तरी मूळ धरत आहेत. त्याच्याही आधी एनबीए होती. असो… पण या एनबीएमध्ये खेळणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. राष्ट्रीय संघातील खेळाडू असाल तर त्याला फारशी ‘किंमत’ नाही; पण एनबीएच्या संघात स्थान मिळवणे खूपच प्रतिष्ठेचे मानले जाते.
६० च्या दशकातील लॅरी बर्ड, ७० च्या दशकातील मॅजिक जॉन्सन, ८०-९० च्या दशकातील मायकेल जॉर्डन या काही नावाजलेल्या खेळाडूंनी तर एनबीएचा समृद्ध इतिहास उलगडत जातो. मायकेल जॉर्डन तर एनबीएच्या इतिहासातलं सुवर्णपान मानलं जातं. या स्पर्धेत स्थान मिळवणारा प्रत्येक खेळाडू कोट्यधीश असतो. एकेका खेळाडूला एका मोसमाचेच ६० ते ७० कोटी रुपयांचं मानधन मिळतं. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, अमेरिकेचा आघाडीचा बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट (Kobe Bryant) हा या एनबीएच्या ‘लॉस एंजलिस लॅकर्स’ Los Angeles Lakers | संघाचा माजी खेळाडू. सहा फूट सहा इंच उंचीचा ब्रायंट आणखी ४० वर्षे आरामशीर जगला असता… पण त्याची आयुष्यरेखा तेवढी नव्हती. 26 जानेवारी 2020 रोजी काळाने त्याच्यावर झडप घातली. सोबत 13 वर्षांची मुलगी गियानानेही त्याच्या कुशीतच प्राण सोडला. कोबे बापलेकीसह नऊ जण या अपघातात मृत्युमुखी पडले. या घटनेने क्रीडाविश्व सुन्न झाले.
तो महान खेळाडू होताच, शिवाय कुटुंबवत्सल पिता असलेला कोबे आपल्या लाडक्या मुलीसोबत एका स्पर्धेसाठी जात होता. कोबेच्या चेहऱ्यावर आनंद विलसत असणार. एरवी तो स्वतःच्या स्पर्धेसाठी फिरत असायचा. मात्र, आता ही स्पर्धा कोबेची नव्हती तर त्याच्या मुलीची होती. मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांमध्ये आणखी एका खेळाडूंचं कुटुंब होतं. हा खेळाडू होता ५६ वर्षीय बेसबॉलचा प्रशिक्षक जॉन एल्टोबेली. ‘सीएनएन’ने सांगितले, की एल्टोबेलीची पत्नी केरी आणि त्यांची मुलगी एलिसाही या हेलिकॉप्टरमध्ये होती. त्यांनीही कोबेबरोबरच या जगाचा निरोप घेतला. मात्र, या मृत्युतांडवात लक्षात राहिला तो कोबेच.
अवघा ४० वर्षांचा कोबे ब्रायंट याचा जीवनप्रवास छोटासा असला तरी त्याने कारकिर्दीत अशी कामगिरी केली होती, की त्याची बरोबरी करायला कदाचित आपल्यासारख्यांना दोन जन्मही अपुरे पडतील. तो कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडू का होता, यासाठी त्याची कहाणी अथपासून इतिपर्यंत वाचायलाच हवी… स्टारपदाला पोहोचलेल्या कोबेने आयुष्यात अनेक वादळेही झेलली. त्याच्या लखलखत्या कारकिर्दीची एक बाजू मात्र काळवंडलेलीच राहिली…
बास्केटबॉल कुटुंबात जन्म
कोबेचा जन्म फिलाडेल्फियातील पेनिसिल्वानियाचा. 23 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेला ब्रायंट कोबे चार भावंडांपैकी सर्वांत लहान. म्हणजे शेंडेफळ. एनबीएचे माजी खेळाडू जो ब्रायंट Joe Bryant | आणि पामेला कॉक्स ब्रायंट (Pamela Cox Bryant) यांचा तो एकुलता मुलगा. उर्वरित तीन बहिणी. ‘एनबीए’चे माजी खेळाडू जॉन ‘चुबी’ कॉक्स (John ‘Chubby’ Cox) यांची बहीण ही कोबेची आई. म्हणजे त्याचे मामाही एनबीएचे खेळाडू. एक प्रकारे ब्रायंट कुटुंबाचं बास्केटबॉलशी, त्यातल्या त्यात ‘एनबीए’शी घट्ट नातं होतं. कोबेच्या नावातही गंमत आहे. विश्वास बसणार नाही, पण त्याचं ‘कोबे’ हे नाव गोमांसावरून ठेवण्यात आलं आहे. जपानी गायीच्या प्रजातीतील वासराचं जे मांस असतं त्याला ‘वाग्यू’ असं म्हणतात. हे वाग्यू म्हणजेच कोबे बीफ म्हणून ओळखलं जातं. हे कोबे गोमांस जपानमधील तीन आघाडीच्या गोमांसापैकी एक आहे.
जपानमध्ये त्याच्या वडिलांनी एकदा ही डीश पाहिली होती. त्यावरून त्यांनी मुलाचं नाव ‘कोबे’ ठेवलं. असं कोणी नाव ठेवतं का? पण ब्रायंट कुटुंबाने हौशीने हे नाव ठेवलं. कोबे बीन ब्रायंट असं त्याचं पूर्ण नाव. आता तुम्ही म्हणाल, त्याच्या वडिलांचं नाव तर जो आहे. मग हे बीन कुठून आलं? तर त्याच्या वडिलांचं टोपणनाव ‘जेलीबीन’ Jellybean | त्यातलं बीन हे नाव. ब्रायंट कुटुंब कॅथॉलिक पंथाचा पुरस्कार करणारं. प्रचंड श्रद्धाळू. घरातच बास्केटबॉलचं वातावरण असताना कोबे दुसरा खेळ कसा खेळणार? वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच त्याने बास्केटबॉलचे धडे गिरवले. त्याचा आवडता संघ लॅकर्स. कारण त्याचे वडीलही त्याच संघाकडून खेळत होते. कोबेने जेव्हा सहाव्या वर्षात पदार्पण केलं, तेव्हा त्याचे वडील ‘एनबीए’तून (NBA) निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ब्रायंट कुटुंब इटलीत स्थायिक झालं. मध्य इटलीतील रिती शहर (Rieti) या कुटुंबाने निवडलं. हेतू हाच, की कोबे कनिष्ठ स्तरावर व्यावसायिक बास्केटबॉल खेळू शकेल.
रिती शहरात दोन वर्षे काढल्यानंतर ब्रायंट कुटुंबाने नंतर तीन शहरं बदलली. पहिल्यांदा रीगियो कॅलाब्रिया Reggio Calabria |, नंतर पिस्टोइया Pistoia | आणि रीगियो एमिलिया Reggio Emilia | एकूणच या प्रवासाने कोबेची जीवनशैली बदलली आणि त्याची इटालियन भाषा चांगलीच सुधारली. त्याला रीगियो एमिलिया हे शहर खूपच आवडलं. या शहराशी निगडित त्याच्या काही बालपणीच्या आठवणीही आहेत. याच शहरात तो गांभीर्याने बास्केटबॉल खेळू लागला होता. कोबेचे आजोबा त्याला एनबीएचे काही व्हिडीओ पाठवायचे. बास्केटबॉल शिकताना त्याला या व्हिडीओचा फायदा व्हायचा. अॅनिमिटेड युरोपियन फिल्म्सही कोबेला प्रेरणादायी ठरल्या, ज्यामुळे त्याच्या बास्केटबॉल ज्ञानात आणखी भर पडली.
ब्रायंट कोबे फुटबॉलही आवडीने खेळला
पाण्यात राहून माश्याशी वैर करता येत नाही, तसं इटलीत राहून फुटबॉलशी वैर करता येत नाही. बास्केटबॉलशिवाय कोबे फुटबॉलही आवडीने खेळायचा. एसी मिलान हा त्याचा आवडता फुटबॉल संघ. उन्हाळ्यात बास्केटबॉल समर लीगच्या निमित्ताने कोबे मायदेशी अमेरिकेत परतला. त्या वेळी तो अवघ्या 13 वर्षांचा होता. तो आणि त्याचं कुटुंब पुन्हा फिलाडेल्फियातील पेनिसिल्वानियात परतलं. पेनिसिल्वानियातल्याच बाला सिविंड मिडल स्कूलमध्ये (Bala Cywynd Middle School) त्याने आठवीत प्रवेश घेतला. कोबेने पुढचं शिक्षण फिलाडेल्फियातल्याच अर्डमोअर Ardmore | येथील लोवर मेरियन हायस्कूलमध्ये Lower Merion High School | घेतलं. येथेच त्याने स्वत:ची एक राष्ट्रीय ओळख निर्माण केली.
नवोदित खेळाडू म्हणून तो व्हॅर्सिटी बास्केटबॉल संघात varsity basketball team | दाखल झाला. या संघात आपली छाप सोडताना कोबेने कमालच केली. संघाच्या विक्रमी विजयात कोबे आघाडीच्या पाचही जागांवर खेळला. बास्केटबॉलमध्ये पॉइंट गार्ड (पीजी), शूटिंग गार्ड (एसजी), स्मॉल फॉरवर्ड (एसएफ), पॉवर फॉरवर्ड (पीएफ) आणि सेंटर अशा पाच पारंपरिक जागा आहेत. कोबेची अष्टपैलू खेळी मात्र सर्वांच्याच लक्षात राहिली. कोबे पेनिसिल्वानियाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
‘‘लॅकर्स, बास्केटबॉलचा खेळ आणि आमचे शहर कोबेशिवाय आता पूर्वीसारखा दिसणार नाही.’’
– मॅजिक जॉन्सन, लॉस एंजलिस लॅकर्स
सर्वोत्तम शूटिंग गार्डचं कौशल्य
अमेरिकेचा स्टार खेळाडू म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा लौकिक असला तरी शूटिंग गार्डवर त्याचा हात कोणी धरू शकणार नाही. ज्या उंचावर बास्केट असतं, त्याच्याही वर झेप घेऊन चेंडू बास्केट करण्याचं जे कौशल्य असतं त्या जागेला शूटिंग गार्ड पोझिशन म्हणतात. कोबे या जागेवर खुबीने चेंडू बास्केट करायचा. हायस्कूलमधून थेट एनबीएसारख्या व्यावसायिक संघात दाखल होणाऱ्या निवडक खेळाडूंपैकी तो एक होता. बालपणापासून त्याला ज्या संघाने आकृष्ट केले होते, त्याच लॉस एंजलिस लॅकर्स संघाचा तो हुकमी खेळाडू ठरला. याच संघातून त्याच्या वडिलांचीही कारकीर्द बहरली होती. तब्बल 20 सिझन तो ‘एनबीए’च्या लीग स्पर्धा खेळला.
एनबीएत त्याची कारकीर्द अधिक बहरली. एनबीएचा पाच वेळा चॅम्पियन, 18 वेळा ऑल स्टारचा बहुमान, 15 वेळा ऑल एनबीए टीमचा सर्वोत्तम सदस्यपदाचा बहुमान, बारा वेळा ऑल डिफेन्सिव टीमचा बहुमान, 2008 मध्ये एनबीएचा सर्वांत उपयोगी खेळाडू (NBA Most Valuable Player), दोन वेळा एनबीएच्या अंतिम एमव्हीपी विजेता… ही यादी थांबता थांबणार नाही. एकूणच त्याच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला तर तो महान खेळाडूंपैकी एक होता.
“ब्रायंट माझ्यासाठी लहान भावासारखा होता. कोबे आणि गियाना या बापलेकीच्या मृत्यूने मी नि:शब्द झालो आहे. वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. आम्ही किती तरी वेळा एकमेकांशी संवाद साधायचो. आता त्याची उणीव सतत जाणवत राहील’’
– मायकेल जॉर्डन
टोरांटो रॅप्टर्स संघाविरुद्ध अविस्मरणीय खेळी
कोबे ब्रायंटला ‘ब्लॅक माम्बा’ नावानेही ओळखले जात होते. कोबेमुळेच लॅकर्सचा संघ 2000, 2001, 2002, 2009 आणि 2010 मध्ये सलग पाच वेळा एनबीएचा किताब जिंकू शकला. वयाच्या 23 व्या वर्षी हा किताब जिंकणारा कोबे सर्वांत तरुण खेळाडू बनला. ब्रायंटच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या संघाने 2008 ची बीजिंग ऑलिम्पिक आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीमुळेच तो जगातील सर्वांत महान खेळाडू गणला गेला. कोबेच्या अनेक खेळी स्मरणीय आहेत. त्यापैकी 22 जानेवारी 2006 रोजी टोरांटो रॅप्टर्स संघाविरुद्धचा सामना कोणीही विसरू शकणार नाही. या सामन्यात त्याने एकट्याने 81 गुण घेतले होते. ही कामगिरी ऐतिहासिक होती. कारण एवढे गुण घेणारा कोबेच्या पुढे एकमेव खेळाडू विल्ट चँबरलेन होता. त्याने 1962 मध्ये 100 गुण घेतले होते. त्याखालोखाल कोबेची कामगिरी आहे. एवढेच नाही, तर 2016 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी कोबेने एनबीएच्या आपल्या अखेरच्या सामन्यात उटाह संघाविरुद्ध 60 गुण घेतले होते. वयाच्या पस्तिशीनंतरही त्याचं कौशल्य, क्षमता थक्क करणारी होती. कारण बास्केटबॉ़ल खेळणे म्हणजे जीवघेणी दमछाक असते. या सामन्यातील आठवणींना उजाळा देताना एकदा कोबे म्हणाला, ‘‘मला या खेळातील प्रत्येक गोष्ट आवडते. माझ्या आयुष्यातला तो एक भाग बनला आहे.’’ आपल्या लखलखत्या कारकिर्दीत कोबे ब्रायंट याने एकूण 33,643 गुण घेतले आहेत. त्याची 18 वेळा एनबीएचा ऑल स्टार म्हणून निवड झाली आहे. कोबेला 2008 मध्ये एनबीएचा सर्वांत उपयोगी खेळाडू म्हणूनही निवडले होते. व्यावसायिक बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मुलांसाठी अनेक पुस्तकंही लिहिली. त्याने ‘डीअर बास्केटबॉल’ लघु चित्रपटाची स्क्रीप्टही लिहिली होती. या लघु चित्रपटाला २०१९ मधील अॅनिमेशनसाठी वर्षातील सर्वोत्तम लघु चित्रपटाचा अकादमी पुरस्कारही मिळाला.
ब्लॅक माम्बाला मिळाली क्वीन माम्बा
कोबे केवळ महान बास्केटबॉलपटूच नव्हता, तर एक उत्तम पती आणि उत्तम पिताही होता. कौटुंबिक पातळीवर तो नेहमीच भावनिक होता. कोबेने वेनेसा (Vanessa) हिच्याशी लग्न केले. अर्थात, यामागेही एक प्रेमकहाणी आहे. एका संगीत व्हिडीओ शूटिंगवेळी कोबेची ओळख वेनेसाशी 1999 मध्ये झाली. त्या वेळी कोबेचं वय होतं 20, तर वेनेसा हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. त्या वेळी ती अवघी 17 वर्षांचीच होती. पाहताक्षणीच बाला, कलेजा खलास झाला… तसं कोबेचं झालं होतं. वेनेसाने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर दोघांचा वाङनिश्चय झाला. त्यानंतर एप्रिल 2001 मध्ये ते विवाहबद्ध झाले. वेनेसाशी झालेल्या भेटीची छायाचित्रे त्याने 2013 मध्ये शेअरही केली होती. कोबेला ब्लॅक माम्बा म्हणून ओळखले जात होते, तर कोबे वेनेसाला क्वीन माम्बा म्हणायचा. वेनेसावर फिदा झालेल्या कोबे ब्रायंट याच्या या प्रेमकहाणीला घरच्यांचा मात्र विरोध होता. कोबेने हा विरोध झुगारून वेनेसाशी कॅलिफोर्नियातील डाना पॉइंट (Dana Point, California) येथे लग्न केले. या लग्नाला त्याचे आईवडील आले नाहीत. त्यांनी कोबेपासून अनेक वर्षे अंतर राखले. त्याला कधी भेटायलाही गेले नाहीत.
वैवाहिक जीवनात वादळ
या वैवाहिक आयुष्यात एक वादळ आलं. कोबेवर २००३ मध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या वेळी कोबे ब्रायंट भयंकर अस्वस्थ झाला. ‘‘मी वेनेसाचा विश्वासघात केला. मात्र, मी बलात्कार केला नाही, तर ते शारीरिक संबंध सहमतीने होते,’’ असे तो वारंवार सांगत होता. अर्थात, नंतर या खटल्यातून कोबे सहिसलामत सुटला. या संपूर्ण घडामोडींमध्ये त्याची पत्नी वेनेसा त्याच्या पाठीशी होती. लॉस एंजलिसमधील स्टेपल्स सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दोघांनी एकमेकांवरील विश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता.
‘‘मी आज तुमच्यासमोर आहे. स्वतःवर संताप होतोय. व्यभिचाराची मोठी चूक केल्याने स्वतःचीच घृणा वाटत आहे. मात्र, माझ्या पत्नीवर माझे मनापासून प्रेम आहे. ती माझा कणा आहे.’’
ब्रायंटला चार मुली आहेत. पहिल्या मुलीचं स्वागत 2003 मध्ये केलं. नतालिया तिचं नाव. आता ती 17 वर्षांची आहे. कोबे आणि वेनेसा या दाम्पत्याला नंतर आणखी तीन मुली झाल्या. गियाना 13 वर्षांची होती. मात्र, कोबेसोबतच तिने या जगाचा निरोप घेतला आहे. तिसरी मुलगी बियांका आता तीन वर्षांची आहे, तर कॅप्री अवघी सात महिन्यांची आहे. कॅप्रीचं दुर्दैव असं, की तिला पितृसुखच नाही. कोबेसाठी या मुलीच सर्वस्व होतं. त्याने आपल्या मुलींचे फोटो अभिमानाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यांच्या हिताचे त्याने नेहमीच समर्थन केले होते. मग त्या बास्केटबॉल खेळो अथवा बॅले नृत्य करो.
ब्रायंट दाम्पत्याचा घटस्फोट होता होता राहिला…
कोबेच्या कठीण काळात त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहणाऱ्या वेनेसाशी त्याचं सगळंच काही आलबेल नव्हतं. एक दशक वैवाहिक आयुष्य काढल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये घटस्फोटाचा अर्ज केला होता. अर्थात 2013 पर्यंत या घटस्फोटावर काहीही निर्णय झाला नाही आणि दोघे पुन्हा एकत्र आले. वेनेसा पुन्हा त्याच्या आयुष्यात परतल्याने कोबेने ठरवलं, की आता कुटुंबासाठीच वेळ द्यायचा. त्यामुळे त्याने नोव्हेंबर 2015 मध्ये एनबीएतून निवृत्ती घेण्याचे संकेत दिेले. तो म्हणाला, ‘‘मी उत्साहित आहे, की देवाने आमच्या कुटुंबासाठी भविष्यात काय लिहून ठेवले आहे. एक अध्याय संपला आहे, तर दुसरा अध्याय सुरू झाला आहे.’’ एकूणच कोबेचं आयुष्य आता पूर्वपदावर आलं होतं. अनेक वादळे झेलल्यानंतर या दोघांमध्ये पहिल्यापेक्षा अधिक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं. कोबेने नोव्हेंबर 2019 मध्ये वीस वर्षांपूर्वीचा थ्रोबॅक करतानाचा त्याचा एक फोटो आणि वेनेसाची मनधरणी करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. वेनेसाप्रती खूपच भावनिक झाला होता. इन्स्टाग्रामवर त्याने एक फोटो शेअर करताना म्हंटले होते, की मी 20 वर्षांपूर्वी माझ्या एका जीवलग मैत्रिणीला भेटलो होतो. आता मी तिला डिस्ने लँडला घेऊन जाणार आहे आणि तेथे मी अगदी शाळकरी मुलांसारखं माझ्या राणीला भेटणार आहे. कोबेला चारही मुली होत्या. आपल्या भारतातच पुरुषी मानसिकता असते असे नाही, तर पाश्चात्त्यांमध्येही ही मानसिकता आहे. कोबेने यावर एक भावना शेअर केली होती. तो म्हणतो, मला माझे मित्र नेहमीच चिडवायचे, की मुलगा बनवण्यासाठी असली मर्द असावं लागतं. पण मला त्यांना सुनवायचंय, की तिला एक राजकुमारी बनवण्यासाठी राजा बनावं लागतं. चल, रांगेत ये…
‘‘माझ्यासाठी हे खूप छान आहे, की त्या एका बापाच्या छोट्या राजकुमारी आहेत…’’
कोबेने गियानाच्या बास्केटबॉलप्रेमाचंही कौतुक केलं. ती एकमेव मुलगी होती, जी बापाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न पाहत होती. आपल्या मुलींच्या खेळाविषयी बोलताना कोबे म्हणतो, ‘‘एकदा गियाना मला म्हणाली, तुम्ही मला बास्केटबॉल शिकवणार का? तिने बास्केटबॉल खेळणं सुरू केलं. नतालिया व्हॉलिबॉलमध्ये, तर गियाना बास्केटबॉल आणि फुटबॉलमध्ये उत्तम खेळाडू आहे.’’ सप्टेंबर २०१९ मध्ये जिमी किमेलच्या कार्यक्रमात कोबे त्याच्या वडिलांना भेटला. त्याने त्यांना सांगितलं, की मला चार मुली आहेत. ‘‘मला माझ्या मुली खूप आवडतात. त्या खूप छान आहेत. गियाना आपला बास्केटबॉलचा वारसा पुढे नेणार आहे..’’ कोबे एक कुटुंबवत्सल पिता होता. तो कौटुंबिक पातळीवर खूपच भावनिक होता, हे त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून, बोलतानाही ते जाणवत होतं. तो जेव्हा गेला, तेव्हा त्याचा मित्र शाकिले ओ नील Shaquille O’Neal | याने एका शब्दात श्रद्धांजली वाहिली…. ‘‘कुटुंबवत्सल.’’ | family man | ज्या दिवशी कोबे आणि त्याची मुलगी गियाना यांचा मृत्यू झाला, त्याच्या तीन दिवसांनी वेनेसाने इन्स्टाग्रामवर अनेक भावनिक पोस्ट शेअर केल्या. कोबे आणि गियाना आमच्यात नसणार हेच हृदयाला भेगा पाडणारं आहे. मात्र, त्याच्या आठवणी कायम आमच्यासोबत असतील. वेनेसाने कोबेसोबतचे काही फोटोही शेअर केले. तो माझा उत्तम मित्र होता, अशा भावनाही तिने व्यक्त केल्या.
बलात्कार प्रकरणाने लागला कारकिर्दीला डाग
ब्रायंट कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचला होता. अनेक खेळाडूंचा तो आयडॉल बनला होता. अशातच त्याच्या कारकिर्दीला एक काळा डाग लागला, जो त्याला कधीच पुसता आला नाही. ही घटना जुलै 2003 मध्ये समोर आली, जेव्हा ब्रायंटवर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला. त्या वेळी संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ माजली. ही एक हाय प्रोफाइल केस होती. कॉर्डिलेरा Cordillera | येथील दि लॉज अँड स्पा The Lodge and Spa | हॉटेलमधील फेबर कॅटलीन या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. तरुणीने 1 जुलै 2003 मध्ये ब्रायंटवर आरोप केल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले. तिने पोलिसांत तक्रार केली आणि त्यात मानेवर जखम केल्याचे तिने म्हंटले होते. कोबे ब्रायंटने Kobe Bryant | तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे मान्य केले. मात्र, ते आम्हा दोघांच्या सहमतीने असल्याचा दावाही त्याने केला. नंतर तरुणीने कोर्टात साक्ष देण्यास नकार दिल्याने हे प्रकरण मागे घेण्यात आले. मात्र, पुढे याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्या तरुणीने ब्रायंटविरुद्ध स्वतंत्र दिवाणी खटला दाखल केला. पुढे नाट्यमय घडामोडी घडल्या. हे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटवण्यात आले. कोबेने त्या तरुणीच्या आरोपांचे खंडन केले. मात्र, तिची व तिच्या आईवडिलांची त्याने माफीही मागितली. हे प्रकरण इथेच थांबले नाही. कोबेला आणखी काही घटनांचा सामना करावा लागणार होता. ईगल कौंटी शेरीफच्या तपासनिसांनी या प्रकरणात कोबेची 2 जुलै 2003 रोजी पुन्हा चौकशी केली.
आरोप फेटाळले, पण तपासात दोषी
सुरुवातीला कोबेने या तपासनिसांना बलात्कार केला नसल्याचे सांगितले. मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो, तेथे ही तरुणी काम करीत होती, एवढेच तो सांगत होता. मात्र, जेव्हा त्यांनी तरुणीचा वैद्यकीय अहवाल सादर केला, ज्यात कोबे ब्रायंट याने तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्टपणे पुढे आले. त्यानंतर कोबेने बचाव करताना सांगितले, की मी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते; मात्र ते सहमतीने होते. जेव्हा त्याला विचारले, की त्या तरुणीच्या मानेला जखम कशी काय झाली? तेव्हा कोबे म्हणाला, की जेव्हा आम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित केले तेव्हा तिने माझा गळा पकडला होता. तेव्हा मीही तिच्या गळ्याभोवती माझा हात नेला. ही गळा पकडण्याची कल्पना तिचीच होती. हा गळा कसा पडकला होता, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा कोबे म्हणाला, की माझे हात मजबूत होते. त्यामुळे ते किती घट्ट पकडले हे मी सांगू शकत नाही. कायदेतज्ज्ञांनी कोबेच्या साक्षीचे पुनर्परीक्षण करून अहवाल सादर केला, ज्यात कोबे दोषी ठरला. अखेर 4 जुलै 2003 रोजी कोबेविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. त्या वेळी कोबे लॉस एंजलिसला होता. तेथून तो कोलोरॅडोतील ईगलला आत्मसमर्पणासाठी परतला. त्यानंतर लगेच त्याची २५ हजार डॉलरच्या बाँडवर सुटका झाली. त्यानंतर त्याच्या दोन दिवसांनी ही घटना जगभरात वाऱ्यासारखी पसरली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जगभर चर्चा
18 जुलै 2003 रोजी ईगल कौंटी डिस्ट्रिक्ट अटर्नीच्या कार्यालयाने कोबेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप अधिकृतपणे दाखल केला. हा आरोप दाखल करणे हेच गंभीर होते. कारण यात कोबे ब्रायंट जर दोषी आढळला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकणार होती. आता हे प्रकरण कोबे याच्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. जगभर याची चवीने चर्चा होऊ लागली. त्यामुळे 18 जुलै 2003 रोजी कोबेने एक पत्रकार परिषद घेऊन त्यात तरुणीवर बलात्कार केल्याचे स्पष्टपणे नाकारले. तो म्हणाला, ‘‘शारीरिक संबंध ठेवताना आमच्यात थोडीशी झटापट झाली. मात्र, ते जे काही घडलं त्यात आम्हा दोघांची सहमती होती.’’ डिसेंबर 2003 मध्ये या प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यात ब्रायंटच्या वकिलांनी तरुणीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बलात्काराच्या एक दिवसानंतर तपासणीसाठी तिने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले व त्या वेळी तिने जे अंतर्वस्त्र परिधान केले होते तेच तिने तपासणीसाठी सादर केल्याचे पुढे आले. गुप्तचर खात्याचे डग विंटर्स यांनी सांगितले, की बलात्कार परीक्षणासाठी तिने जे अंतर्वस्त्र सादर केले त्यात दुसऱ्या पुरुषाच्या शुक्राणूचे नमुने आढळले. यावरून कोबेच्या बचाव पक्षाने सांगितले, की कोबेशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तरुणीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित केले असावेत. त्यावर तरुणीने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले, की मी जेव्हा तपासणीसाठी बाहेर पडले त्या वेळी चुकून वेगळेच न धुतलेले अंतर्वस्त्र तपासणीसाठी दिले. ज्या दिवशी तपासणी करण्यात आली त्या वेळी बलात्काराच्या घटनेनंतर सकाळी मी स्नान केलेले नव्हते, असे तिने सांगितले. अखेर बलात्काराचे नमुने सादर करण्यात आल्यानंतर त्यात कोबेच्या शुक्राणूचे नमुने मिळाले. त्यावर कोबेच्या वकिलांनी सांगितले, की दोन दिवसांत अनेकींशी यौनसंबंध होऊ शकतात. पोलिसांनी पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी कोबेचा टी-शर्ट ताब्यात घेतला होता, ज्या वर तरुणीच्या रक्ताचे तीन छोटे डाग आढळले.
त्याची डीएनए चाचणी केली असता, हे डाग तरुणीच्या मासिक पाळीचे नसल्याचे स्पष्ट झाले. कारण तरुणीने दोन आठवड्यांपूर्वीच मासिक पाळी आल्याचे सांगितले होते. एकूणच या खटल्यातून शारीरिक संबंध कसे प्रस्थापित झाले, याची संपूर्ण कहाणीच समोर आली. हॉटेलमध्ये रात्रपाळीतील ऑडिटर त्रिना मॅके (Trina McKay) म्हणाल्या, की त्या रात्री कोबेला घरी जाताना आरोप करणाऱ्या तरुणीने पाहिले होते. त्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्या तरुणीच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होते. मात्र, त्या तरुणीचा शाळकरी मित्र व हॉटेलचा बेलमन बॉबी पिएट्रॅक (Bobby Pietrack) म्हणाला, की त्या रात्री ती खूप अस्वस्थ जाणवली आणि कोबेने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे तिने मला सांगितले. एकूणच या प्रकरणात दोन्ही बाजू पुढे येत होत्या. खटला सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच तरुणीने गुन्हे शाखेचे अधिकारी गॅरी सँडबर्ग यांना पत्र लिहिले, ज्यांनी तिच्याकडे सुरुवातीला चौकशीवेळी काही तपशील मांडले होते.
या पत्रात ती म्हणते, ‘‘मी गुप्तचर शाखेचे अधिकार विंटर्स यांना सांगितले होते, की त्या दिवशी सकाळी मला कारमध्ये त्रास होत होता. मात्र ते खरे नव्हते. मी त्या दिवशी माझ्या बॉसला उशिरा फोन केला. कारण मला उशिरा यायचे होते. मी फक्त देखरेखीसाठी तेथे होते. मी विंटर्स यांना सांगितले, की कोबेने मला रूममध्ये थांबण्यास सांगितले. त्याने मला चेहरा धुण्यास सांगितले. जेव्हा मी त्या रूमवर माझ्या इच्छेच्या विरोधात असताना त्याने मला चेहरा धुण्यास भाग पाडले नाही. मी चेहरा धुतला नाही. त्याऐवजी मी लिफ्टमधील आरशासमोर उभी राहून चेहरा स्वच्छ केला. मला वाईट वाटते, की मी दिलेल्या माहितीच्या गुंतागुंतीमुळे दिशाभूल झाली. मला जे सांगायचे ते मी सांगितले. मला वाटते, विंटर्स यांना माझ्यासोबत काय घडले, यावर विश्वास नाही.’’
कोबेच्या वकील पामेला मॅके यांनी सांगितले, की तरुणी त्या घटनेच्या वेळी स्किझोफ्रेनियाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी औषध घेत होती. त्या तरुणीसोबत राहणाऱ्या लिंडसे मॅकिनी हिने सांगितले, की शाळेत असताना तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बलात्काराच्या घटनेपूर्वी आरोप करणाऱ्या तरुणीने ‘अमेरिकन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. त्या वेळी तिने रीबेका लिन हॉवर्डचं ‘फरगिव्ह’ Rebecca Lynn Howard | हे गीत सादर केलं होतं, मात्र ती पुढे जाऊ शकली नाही. एकूणच या प्रकरणातील गुंतागुंत वाढत होती. अशातच कोबेच्या वकिलांकडून तरुणीचं चारित्र्यहनन करण्याबरोबरच तिला ठार मारण्याची धमकीही ई-मेलद्वारे देण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात एक संकेत पाळला जातो, तो म्हणजे या प्रकरणात तरुणीची ओळख स्पष्ट केली जात नाही. मात्र, तिची ओळख अनेक वेळा उघड झाली होती. हे एक प्रकारे कोबेच्या वकिलांकडून षडयंत्रच रचलं गेलं होतं. अखेर 1 सप्टेंबर 2004 रोजी ईगल कौंटीचे जिल्हा न्यायाधीश टेरी रुक्रिगल यांनी खटल्याचा निकाल देताना कोबे ब्रायंट याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. कारण त्या तरुणीने न्यायालयात साक्ष देण्यास नकार दिला होता. फौजदारी खटला फेटाळल्यानंतर कोबे ब्रायंट याने वकिलांमार्फत एक स्टेटमेंट जारी केले.
या स्टेटमेंटमध्ये कोबे म्हणाला,
पहिल्यांदा मला त्या तरुणीची माफी मागण्याची इच्छा आहे. त्या रात्री माझ्या वागणुकीबद्दल, तसेच तिला गेल्या वर्षात जे भोगावे लागले त्याबद्दल मला तिची माफी मागाविशी वाटते. जरी हे वर्ष माझ्यासाठी कठीण गेले असले तरी त्याचा विचार करण्यापेक्षा तिला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याची कल्पना मला आहे. मी तिच्या कुटुंबाची, मित्रांची, तिच्या आप्तस्वकियांची ईगल, कोलोरॅडोतील नागरिकांप्रती दिलगिरी व्यक्त करतो. मला हेही स्पष्ट करायचे आहे, की त्या तरुणीच्या हेतूंबद्दल मला कोणतीही शंका घ्यायची नाही. त्या तरुणीला मी पैसे दिलेले नाहीत. माझे हे विधान दिवाणी खटल्यात माझ्या विरोधात वापरले जाणार नाही, याबाबत तिने सहमती दर्शविली आहे. जरी आमच्यातील शारीरिक संबंध सहमतीने झाले असले तरी या घटनेकडे ती माझ्या दृष्टीनेच पाहिलेले नव्हते. अनेक महिने तिच्या वकिलांचे म्हणणे, तिची साक्ष ऐकल्यानंतर मला असे वाटते, की तिची या शारीरिक संबंधासाठी सहमती नव्हती. मला माहीत आहे, की माझ्यासाठी एक अध्याय संपला आहे. मात्र, दुसरा अध्याय सुरू झाला आहे. मला समजले आहे, की माझ्याविरुद्ध दिवाणी खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून तथ्य समोर येईल आणि कोलोरॅडो राज्यातील नागरिकांवर आर्थिक आणि भावनिकतेचा कोणताही परिणाम होणार नाही.
वीस कोटींमध्ये तडजोड?
तरुणीने ऑगस्ट 2004 मध्ये कोबे ब्रायंट याच्याविरुद्ध सिव्हिल खटलाही दाखल केला. मार्च 2005 मध्ये हा खटला दोघांनी आपापसांत मिटवला. या दोघांमध्ये नेमकी काय समेट झाला हे लोकांपर्यंत येऊ शकले नाही. मात्र, लॉस एंजलिस टाइम्सच्या मते, कायदेतज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा समेट अडीच मिलियन डॉलरपेक्षा अधिक असावा. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये २० कोटींपेक्षा अधिक होती. जेथे ही घटना घडली होती, त्या कॉर्डिलेरा येथील लॉज अँड स्पाचे आठ महिन्यांनी नूतनीकरण करण्यात आले आणि काही फर्निचरही विकले. अशीही अटकळे बांधण्यात येत होती, की त्यातील काही फर्निचर रूम नंबर 35 मधीलही होते, जेथे कोबे ब्रायंट त्या दिवशी थांबला होता. मात्र, लॉजने या चर्चांचा स्पष्टपणे इन्कार केला. 2019 मध्ये स्पा विकण्यात आले आणि तेथे औषधोपचार सुविधा सुरू करण्यात आली. एकूणच बलात्कार प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर ब्रायंटने अनेक कंपन्यांशी सात वर्षांत 136 मिलियन डॉलरचे सात वर्षांचे करार केले. यात नाइके (Nike), स्पाल्डिंग (Spalding), कोका-कोला (Coca-Cola) ब्रँडचा समावेश होता. मात्र, न्युटेला (Nutella) आणि मॅकडोनाल्ड्स (McDonald’s) या कंपन्यांनी त्याच्यासोबत नवा करार केला नाही. या संपूर्ण प्रकरणात कोबे ब्रायंट खरंच दोषी होता किंवा नाही, याच्या चर्चा यापुढेही सतत झडत राहतील. एक मात्र खरं होतं, की कोबे ब्रायंट या प्रकरणात पोळून निघाला होता. तो कुटुंबवत्सल होता, हळवाही होता. कुटुंब उद्ध्वस्त होईल की काय, अशी भीतीही त्याच्या मनाला शिवली. मात्र, पत्नी त्याच्यामागे खंबीरपणे राहिली. त्यानंतर तो कुटुंबाविषयी खूपच भावनिक झाला. त्यामुळेच मुलीच्या स्पर्धेसाठी तो तिच्यासोबत निघाला. मात्र, त्यांना काय माहीत, की हा आपला हा अखेरचा प्रवास आहे.
गुडबाय कोबे…