भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष
भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध कलात्मक फटकेबाजी करताना षटकारांची केलेली आतषबाजी कोणी विसरू शकणार नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्याच्यावर भलेही कौतुकाचा वर्षाव झाला असेल, पण 2022 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघर्षवाटेवरूनच धावत राहिलं. काही निराशाजनक परिणामही या वर्षात पाहायला मिळाले.
भारतीय क्रिकेटसाठी चांगली बातमी कानावर पडली. ती म्हणजे 48,000 कोटींचे आयपीएल प्रसारणाचे हक्क. यामुळे क्रिकेटच्या परिस्थितीजन्य तंत्रात बाजाराचे महत्त्व समजले. मात्र, मैदानावर भारतीय संघ फार विशेष छाप पाडू शकला नाही.
निराशाजनक कामगिरीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवापासून झाली. त्यामुळेच विराट कोहली याने दीर्घ काळापासून धारण केलेलं नेतृत्वाचं शिवधनुष्य खाली ठेवलं. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) फारसं जमलं नाही. त्यामुळे त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं.
हा सगळा घटनाक्रम जानेवारी 2022 मधला. आणि वर्ष संपेपर्यंत कोहलीचा उत्तराधिकारी रोहित शर्माकडूनही टी 20 संघाचे कर्णधारपद गेलं. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याकडे टी 20 संघाची सूत्रे आली. रोहितला कर्णधारपद का सोडावं लागलं? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टी 20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारतीय संघाचा झालेला पराभव.
भारतीय क्रिकेट संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये उत्तम प्रदर्शन केलं. मात्र, यात सातत्य राहिलं नाही. जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय क्रिकेट संघ कामगिरी उंचावण्यात सपशेल अपयशी ठरला. तसं पाहिलं तर काही द्विपक्षीय मालिकांमध्ये म्हणावी इतकी कामगिरी झाली नाही. याच कारणांमुळे विराट कोहलीची कलात्मक फलंदाजीही झाकोळली गेली. अफगाणिस्तान (टी 20) आणि बांगलादेश (वन डे) संघाविरुद्धचे शतकही क्रिकेटप्रेमींचं फारसं लक्ष वेधू शकलं नाही.
अर्थात, पाकिस्तानविरुद्धचा सामना याला अपवाद म्हणावा लागेल. कोहलीने पाकिस्तानच्या हॅरिस रऊफ याला लगावलेले षटकार मात्र चर्चेत राहिले. एकीकडे विराटच्या फलंदाजीची चर्चा होती, तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल सह आघाडीच्या फलंदाजांची टी20 विश्वकरंडक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीही चर्चेचा विषय बनली. यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या काही निर्णयांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिकेत त्याला खेळवलं गेलं. टी 20 विश्वकरंडक स्पर्धेत युझवेंद्र चहलचा उपयोग न करणं, तसेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीराचा बहुमान मिळविणारा कुलदीप यादव याला पुढच्या कसोटी सामन्यात संघाबाहेर बसविणे… असे काही द्रविडचे आडमुठे निर्णय टीकेचे लक्ष्य बनले. यात द्रविड सिद्धच करू शकले नाहीत, की ते उत्तम हुशार रणनीतीज्ञ आहेत.
रोहित शर्माची खालावलेली कामगिरीही चर्चेचा विषय बनली. मात्र, सर्वाधिक निराश केलं असेल तर ते केएल राहुलने. एक गोष्ट सिद्ध झाली, की चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने जे राहुलमध्ये नेतृत्वाचे गुण पाहिले होते, त्यात तो पास होऊ शकला नाही. हीच कारणे होती, ज्यामुळे टी 20 संघात त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि वन डे संघात हार्दिक पंड्याला उपकर्णधार म्हणून निवडले.
श्रेयस अय्यरचं कसोटी आणि वन डेमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आणि ऋषभ पंतची कसोटी सामन्यांत विजयी कामगिरी असे काही चांगले पैलूही पाहायला मिळाले. शुभमन गिल यानेही आघाडीच्या फळीत आपली क्षमता सिद्ध केली. त्याचबरोबर ईशान किशनने आपल्या कौशल्याची झलकही पेश केली.
2022 वर्षात ईशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. शिखर धवनचीही सातत्याने ढासळत्या कामगिरीनंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. आता त्याच्या परतीची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाची 2022 च्या टी 20 विश्वकप स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीला बीसीसीआयने बरखास्त केले होते.
महिला क्रिकेटमध्ये जवळपास दोन दशकांपर्यंत भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडू असलेल्या मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. मितालीची जागा घेण्यासाठी बऱ्याच फलंदाज आहेत, मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघातील गोलंदाजांना पाहिलं तर वाटतं, की झूलनची जागा भरणे सोपे नाही.
रेणुका सिंह हिचा अपवाद वगळला तर अन्य कोणत्याही वेगवान गोलंदाजाला प्रभाव टाकता आलेला नाही. यामुळेच शिखा पांडेने 15 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
अशातच एका वरिष्ठ खेळाडूशी मतभेदामुळे रमेश पोवार यांना महिला संघाच्या प्रशिक्षक पदावरून हटविण्यात आले होते.
प्रशासकीय स्तरावर माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा बीसीसीआयमधील प्रवास थांबला. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना पुढेही अध्यक्षपदी राहण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, बोर्डाने त्यांच्याजागी माजी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली.
सरत्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडी
उनाडकट- सर्वाधिक कसोटी मुकलेला भारतीय क्रिकेटपटू
22 डिसेंबर 2022 : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी गुरुवारी मैदानात पाऊल ठेवल्या ठेवल्या भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला गेला. तो सर्वाधिक कसोटी मुकलेला (12 वर्षे 2 दिवस) भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सौराष्ट्रच्या या गोलंदाजाने 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2010 मध्ये सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर भारतीय संघ 118 कसोटी खेळला, पण उनाडकटला काही संधी मिळाली नव्हती. अखेर आता गुरुवारी त्याला कारकिर्दीतील दुसरी कसोटी खेळण्याची संधी लाभली अन् तो भारतीय संघात परतला. एवढ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत संघापासून दूर राहणारा तो भारताचा पहिला, तर जागतिक क्रिकेटमधील दुसरा खेळाडू ठरला. जागतिक क्रिकेटमधील विक्रम इंग्लंडच्या गॅरेश बॅटी यांच्या नावे आहे. त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळण्यासाठी 142 कसोटींंची प्रतीक्षा करावी लागली होती. भारतीयांमध्ये दोन कसोटींमधील प्रदीर्घ कालावधीचा विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावे आहे. त्यांच्या दोन कसोटींमधील अंतर 12 वर्षे 129 दिवसांचे आहे. 1934 नंतर ते 1946 मध्ये कसोटी खेळले.
सॅमला विक्रमी 18.25 कोटी
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=Ruhfxf-37X4″ column_width=”4″]23 डिसेंबर : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावाच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्ज संघाने 18.5 कोटी रुपयांत खरेदी केले. यापूर्वीचा सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिसची नोंद होती. त्याला 2021 च्या ‘मिनी’ लिलावात राजस्थान संघाने 16.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. यात कॅमेरून ग्रीन (17.50 कोटी), बेन स्टोक्स (16.25 कोटी) हे खेळाडूही ‘मालामाल’ झाले. भारतीयांमध्ये मयंक अगरवालला हैदराबाद संघाने 8.25 कोटी रुपयांत खरेदी केले.
कुलदीपला वगळण्याचा वादग्रस्त निर्णय
25 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादवला वगळण्याच्या वादग्रस्त निर्णयावरून संघावर टीकेची झोड उठली. सुनील गावस्कर यांनीही या निर्णयाचा समाचार घेतला होता. त्यानंतर केएल राहुलने यावर खुलासा केला. भारताचा बदली कर्णधार केएल राहुलनेही कुलदीप यादवची पोकळी निर्माण झाल्याचे मान्य केले. मात्र, त्याला वगळल्याची खंत नसल्याचेही तो म्हणाला. मिरपूरच्या खेळपट्टीच्या अनुभवावरून आम्ही फिरकी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज निवडण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल म्हणाला.
गावस्कर म्हणाले, विजयाचा शिल्पकारच संघाबाहेर?
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील सलामीच्या कसोटीत भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले! हा निर्णय भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना रुचला नाही. ‘अशा निर्णयावर टीका करताना आपण अधिक कठोर शब्द वापरू शकलो असतो, पण राग आवरता घेत हा प्रकार ‘अविश्वसनीय’ आहे, असा सौम्य शब्द वापरतो आहे,’ अशा शब्दांत गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. 28 वर्षीय डावखुरा स्पिनर कुलदीप यादव याने चितगाव कसोटीतील पहिल्या डावात 40 धावांत निम्मा संघ गारद केला, तर दुसऱ्या डावात तीन फलंदाज टिपले. एवढेच नव्हे,तर त्याने फलंदाजीतूनही योगदान दिले होते. मात्र दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीपला वगळून जयदेव उनाडकट याला अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली. या निर्णयावर गावस्कर यांच्यासह माजी कसोटी गोलंदाज डोड्डा गणेश आणि भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी टीका केली. ‘मला खूप कठोर शब्दांत टीका करायला आवडली असती… अहो, जो खेळाडू गेल्या लढतीतील सामनावीर आहे, त्यालाच पुढील लढतीत वगळता म्हणजे नवलच आहे… ’, अशा शब्दांत गावस्कर यांनी टीका केली. ‘प्रत्येकवेळी असे कुलदीप यादवसोबतच का होते? एकाच खेळाडूला अशी वागणूक देणे योग्य नाही. कुलदीपला वगळण्याचा निर्णय मूर्खपणाचा वाटतो,’ अशा शब्दांत भारताचा माजी क्रिकेटपटू डोड्डा गणेश यांनी नाराजी व्यक्त केली.
निवड समितीसाठी तेंडुलकर, धोनी, सेहवागच्या नावांचे बनावट अर्ज
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन निवड समिती सदस्यांसाठी अर्ज मागविले होते. आलेले अर्ज तपासण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ‘मेल बॉक्स’ उघडला, तेव्हा त्यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांचे अर्ज आले होते. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानच्या इंझमाम उल हक यांचाही अर्ज होता. अर्थात, हे अर्ज बनावट असल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आले. पाच सदस्यीय समितीसाठी बीसीसीआयला एकूण ६०० अर्ज (ई-मेलद्वारे) आले होते. यातील काही अर्ज बनावट नाव वापरून पाठविण्यात आले होते. सरत्या वर्षात (2022) असेही चमत्कार घडले.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]