1975 च्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतील विस्मरणात गेलेले जेते
ही ४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. क्वालालंपूर Kuala Lumpur, Malaysia | येथे १५ मार्च १९७५ रोजी विश्वकरंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतला सामना होता. अर्थातच, त्या वेळी भारतीयांवर हॉकीचं गारूड होतं. फायनलला भारतीय संघ दाखल झाला होता. समोर होता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ. त्या वेळी टीव्ही नव्हतेच. होते ते फक्त रेडिओ. घरोघर रेडिओवर गाणी, बातम्या ऐकण्यापासून सामन्यांचे लाइव्ह समालोचन ऐकण्यापर्यंत दुसरे काही साधन नव्हतेच. भारत-पाकिस्तान सामना म्हंटल्यावर तर संपूर्ण देश रेडिओभोवती जिवाचे कान करून बसला होता. या सामन्याला आणखी एक कंगोरा होता. तो म्हणजे दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 1973 मध्ये भारताला विश्वकरंडक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव भारताला सलत होता. हे शल्य भारतीयांनाही बोचत होते. त्यामुळे आता या पराभवाची परतफेड करण्याचा हाच दिवस योग्य आहे, ही भावना भारतीय संघाबरोबर देशवासीयांच्याही मनात घर करून होती. त्या वेळी पहिल्या स्थानावरील भारतीय संघ आज चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. मात्र, क्वालालंपूर येथे 15 मार्च 1975 रोजी झालेल्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारताने पराभवाचा वचपा काढत पाकिस्तानला 2-1 ने पराभूत केले आणि विश्वकरंडकावर नाव कोरले. संपूर्ण देशात जल्लोष पसरला.
भारताला 1973 मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत यजमान हॉलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्ध विजयामुळे भारताने हॉकीवर आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला. अंतिम फेरीत 1-1 अशी बरोबरी असताना 51 व्या मिनिटाला पाकिस्तानविरुद्ध विजयी गोल नोंदविणारे अशोक कुमार यांनी सांगितले, की ‘‘आम्ही 1973 मध्ये विजयाच्या अगदी जवळ असताना पराभूत झालो होतो. हे शल्य सर्वच खेळाडूंना बोचत होते. दो गोलची आघाडी घेऊनही हॉलंडला बरोबरीची संधी दिली. अवांतर वेळेत माझ्याकडून एक गोल हुकला. अखेर सामना सडन डेथमध्ये गेला. त्यातही एक चूक भोवली. आमच्याकडून पेनल्टी स्ट्रोक हुकला आणि टायब्रेकरमध्ये पराभव स्वीकारावा लागला.’’
अशोक कुमार म्हणाले, ‘‘आता आमच्यासमोर एक संधी होती, जी चूक हॉलंडसोबत केली ती आता पाकिस्तानसोबत करायची नाही. आम्ही चंडीगडमध्ये सराव करायचो, तेव्हा शेकडो नागरिक रोज आमचा सराव पाहण्यासाठी यायचे. त्या वेळी ग्यानी झेलसिंग मुख्यमंत्री होते, तर उमरावसिंग क्रीडामंत्री होते. ते आठवड्यातून दोन वेळा मैदानावर येत होते. आम्हाला प्रोत्साहन मिळायचे.’’
उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध गोल करीत भारताला अंतिम फेरीत दाखल करणारे अस्लम शेर खान म्हणाले, ‘‘आम्ही चंडीगडवरून निश्चयच करून आलो होतो, की आता जिंकूनच परतायचे. हा निर्धारच आमच्या विजयाचं गुपित होतं.’’
‘‘आम्हाला देशासाठी जिंकायचं होतं आणि हाच निर्धार संघातील सदस्यांमध्येही होता.’’
अस्लम शेर खान म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीत जेव्हा मला मैदानावर पाठवलं, तेव्हा माझ्या मागे भारत होता. जेव्हा मी 65 व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केला तेव्हा तो माझ्या आयुष्यातला सर्वांत अनमोल क्षण होता. पराभवाच्या तोंडावर असताना मिळालेला हा विजय आम्हाला प्रोत्साहन देऊन गेला. पाकिस्तान आमच्यापेक्षा ताकदवान संघ असूनही तो आमचा आत्मविश्वासावर विजय मिळवू शकला नाही.’’
अशोक कुमार म्हणाले, ‘‘माझ्यावर अपेक्षांचे ओझे होते. कारण मी मेजर ध्यानचंद यांचा मुलगा होतो आणि टीकाकारांचे लक्षही माझ्यावरच होते. माझी मानसिकता सकारात्मक होती आणि जेव्हा मलेशियातील हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा लॉबीत विश्वकरंडक ठेवलेला होता. तो पाहून मी मनात निश्चय केला, की या वेळी कोणतीही कसूर ठेवायची नाही.’’
विश्वकरंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी संपूर्ण देशाला सुटी देण्यात आली होती आणि रेडिओवर समालोचन ऐकण्यासाठी देशभरातील भारतीय कान लावून बसले होते.
अस्लम म्हणाले, की विजयानंतर मलेशियात भारतीय जल्लोषात न्हाऊन निघाला. प्रत्येक ठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजारो लोक ऑटोग्राफ आणि छायाचित्र घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीने उभे होते. भारतात परतल्यानंतर एखाद्या नायकाचे जसे स्वागत केले जाते तसे स्वागत होत होते.
45 वर्षांनंतर हा ऐतिहासिक विजय आता कुणाच्या लक्षात नसेल. अनेकांना त्याचे विस्मरण झाले. विश्वकरंडक जिंकून परतणारे हे नायकही स्मृतिपटलावरून गायब झाले. अशोक कुमार म्हणाले, ‘‘आपण अद्याप दुसरा विश्वकरंडक जिंकला नाही. मात्र, या विश्वविजेत्या संघाला जे श्रेय मिळायला हवं होतं, ते मिळालं नाही. जल्लोष तर दूरच ना कोणी शुभेच्छा दिल्या, ना कोणी आठवण काढली. क्रिकेटच्या ग्लॅमरशी आम्ही कशी बरोबरी करू शकणार…’’
मेजर ध्यानचंद यांच्यानंतर हॉकीची क्रेझ ७० च्या दशकातही कायम ठेवणारे हे धुरंधर खेळाडू आपल्या हॉकीच्या लौकिकाचे शेवटचे साक्षीदार. त्यांचं शेवटचं वाक्य अस्वस्थ करून जातं- एकमेव विश्वकरंडक जिंकून ४५ वर्षे उलटल्यानंतरही कोणी शुभेच्छा दिल्या नाही, ना कोणी आठवण काढली. ही भयंकर शोकांतिका आहे. आज हे सुवर्णकाळाचे साक्षीदार हयात आहेत म्हणून या आठवणींना उजाळा तरी मिळतोय… कदाचित पुढच्या 45 वर्षांनंतर असं काही घडलं होतं हेही कोणी सांगू शकेल का, हाच मोठा प्रश्न आहे.
One Comment