पेनल्टी चुकल्याने वर्णद्वेषी टिप्पणी!
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेतील सामन्यात ब्रिस्टल सिटीचा स्ट्रायकर फमारा डीदियो (Famara Diedhiou) याला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्याने सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. काही वर्णद्वेषी टिप्पणींचाही सामना करावा लागला.
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड याची हत्या झाल्यानंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलन जोर धरत आहे. वर्णभेदाविरुद्ध उघडपणे मते मांडण्यात आली. क्रीडाविश्वातही ही वर्णभेदाविरुद्धची चळवळ आता जोर धरू लागली आहे. वर्णद्वेषी टिप्पणी करून अनेक कृष्णवर्णीय खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार घडत आहेत. फुटबॉलपटू फमारा डिदियो (Famara Diedhiou) यालाही वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्याच्यावर ट्विटरवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली.
सेनेगलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेला फमाराला (Famara Diedhiou) पेनल्टीवर गोल करण्याची संधी होती. मात्र, प्रत्येक पेनल्टीवर गोल होतोच असे नाही. फमारा गोल करण्यात अपयशी ठरल्याने त्याच्या ब्रिस्टल सिटी संघाला स्वान्सी संघाविरुद्ध 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला. चाहत्यांना हा पराभव मात्र जिव्हारी लागला. कारण या पराभवामुळे ब्रिस्टल सिटीने प्रीमियर लीगसाठीची (इंग्लंडमधील सर्वांत प्रतिष्ठेची लीग) पात्रताही गमावली. डिदियो कृष्णवर्णीय खेळाडू आहे. एका पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विट करीत त्याने विचारले, की ‘‘का??’’ वर्णद्वेषी टिप्पणीवर त्याने विचारलेल्या या प्रश्नावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी या प्रकाराचा निषेधही केला. इंग्लंडच्या पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्यांचा शोधही घेण्याचा प्रयत्न केला.
सायबर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या पोलिसांनी ट्विटरला कृष्णवर्णीय टिप्पणी हटविण्यास सांगितले आहे, तसेच ही पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची माहिती देण्यासही सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले, की ‘‘प्राथमिक तपासणीत असे पुढे आले आहे, की ही पोस्ट करणारा व्यक्ती बाहेरच्या देशातील आहे.’’