शाहीद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह!
कराची
आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत राहणारा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आता कोरोना संसर्गामुळे चर्चेत आला आहे. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, Shahid afridi coronavirus | ही माहिती त्यानेच 13 जून 2020 रोजी ट्विटरवर दिली. हाय प्रोफाइल क्रिकेटपटूंमध्ये शाहीद आफ्रिदी पहिलाच खेळाडू आहे, ज्याला करोनाचा संसर्ग झाला आहे.
‘‘मला गुरुवारी अस्वस्थ वाटत होते. अंगदुखीने त्रासलो होतो. मी कोरोना चाचणी केली आणि दुर्दैवाने मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी मला दुवा मागण्याची गरज आहे, इन्शाअल्लाह। ’’ हे त्याचे भावनिक ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडूंनी त्याला धीर दिला.
पाकिस्तान संघाकडून खेळताना आफ्रिदीने 1998 ते 2018 दरम्यान 27 कसोटी सामने (1716 धावा आणि 48 विकेट), 398 वन-डे सामने (8064 धावा आणि 395 विकेट) आणि 99 टी-20 (1416 धावा आणि 98 विकेट) आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. क्रिकेटशी त्याचं नातं घट्ट होतं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये दिसला होता. क्रिकेटबरोबरच सामाजिक कार्यातही तो तितकाच सक्रिय होता. त्याच्या नावाची एक संस्थाही आहे, जिचा तो अध्यक्ष आहे. कोरोना महामारी फैलावल्यानंतर आपल्या संस्थेच्या कामानिमित्त तो अनेक वेळा बाहेर राहायचा.
आफ्रिदी लवकरात लवकर या आजारातून बाहेर येशील, अशा प्रकारचे अनेक संदेश सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पोस्ट केले. आफ्रिदीने भलेही क्रिकेट संन्यास घेतला असला तरी आशिया खंडात त्याच्या लोकप्रियतेवर तसुभरही परिणाम झाला नाही.
पाकिस्तान क्रिकेट संघातील त्याचे सहकारी मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, कामरान अकमल, तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर तो लवकरच बरा होईल, अशी आशा व्यक्त केली.
हाफीजने म्हंटले आहे, की आफ्रिदी लढावू आहे. तो या लढा देईल आणि या आजाराला लवकरच पराभूत करेल.
करोना पॉझिटिव्ह आढळलेला आफ्रिदी एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही. यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तौफिक उमर यालादेखील करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच तो कोरोनामुक्त झाला. पाकिस्तानच्या दोन प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना या आजारामुळे प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी लेग स्पिनर रियाज शेखचा जूनच्या सुरुवातीलाच कराचीत मृत्यू झाला, तर जफर सरफराज (वय 50) यांचा एप्रिलमध्ये पेशावर येथे मृत्यू झाला.
गौतम गंभीर काय म्हणाला…
शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांचं ट्विटरवॉर सर्वश्रुतच आहे. शाहीद आफ्रिदीने गौतम गंभीरला डिवचलं नाही, असा एकही प्रसंग नाही. शाहीद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रातही गौतम गंभीरवर गंभीर टीका केली होती. मात्र, अशा प्रसंगात गौतम गंभीरने परिपक्वता दाखवत, शाहीद आफ्रिदीला लवकरात लवकर बरा होवो, अशी प्रार्थना व्यक्त केली.
माजी क्रिकेटपटू व सध्या भाजपचा खासदार असलेला गौतम गंभीर म्हणाला, आमच्यात भलेही मतभिन्नता असली तरी या जगात कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे.