दशसूत्रीबाबत रोहित शर्माला का आहे आक्षेप?
बीसीसीआयच्या आचारसंहितेबाबत रोहित शर्मा लवकरच चर्चा करण्याची शक्यता असून, भारतीय क्रिकेटपटूंना ही दशसूत्री अजिबात मान्य नाही.

दशसूत्रीबाबत रोहित शर्माला का आहे आक्षेप?
बीसीसीआयच्या आचारसंहितेबाबत रोहित शर्मा लवकरच चर्चा करण्याची शक्यता असून, भारतीय क्रिकेटपटूंना ही दशसूत्री अजिबात मान्य नाही.
19 January 2025
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी दशसूत्री आचारसंहिता तयार केली आहे. ती भारतीय खेळाडूंना मान्य नाही. याबाबत आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे संकेत रोहित शर्माने शनिवारी दिले.
भारतीय बोर्डाने दशसूत्री आचारसंहिता जाहीर केलेली नाही; मात्र त्यात खेळाडूंना कुटुंबीयांसह १४ दिवसच राहता येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांवरही निर्बंध आणले आहेत. एवढेच नव्हे तर याचा भंग केल्यास आयपीएलमध्ये बंदीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू नाराज आहेत.
रोहित शर्माची नाराजी
चॅम्पियन्स करंडक वन-डे स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषद बीसीसीआयच्या मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आपली जागा घेत असतानाच याबाबत रोहितने निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे याबाबतची नाराजी व्यक्त केली. ‘मला त्याबाबत सचिवांसह चर्चा करावीच लागेल. कुटुंबीयांना दौऱ्यावर नेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करावीच लागेल. सर्व मलाच बोलत आहेत,’ अशी टिपणी रोहितने केली. हे पत्रकार परिषदेच्या वेळी घडले नाही; पण ते रेकॉर्ड झाले. रोहित कशाबद्दल बोलत आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज नव्हती.
बीसीसीआयच्या आचारसंहितेबाबत विचारणा झाल्यावर मात्र रोहित चिडला. ‘तुम्हाला या नियमांबाबत कोणी सांगितले. बीसीसीआयने त्याची अधिकृत घोषणा केली. ते जाहीर झाल्यावर बघूया,’ अशी संतप्त विचारणा भारतीय कर्णधाराने केली.
ही काही शाळा नाही!
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मात्र ही आचारसंहिता तयार झाल्याचे मान्य केले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेल्या संघातील खेळाडूंसाठी ही प्रवासी धोरण करण्याची गरज का भासली, अशी विचारणा झाली होती. ‘आपण याबाबत बोलण्यास सुरुवात केली, तर विषय कधीच संपणार नाही. प्रत्येक संघासाठी काही नियम असतात. संघाची कामगिरी उंचावण्यासाठी काय करता येईल, याची सातत्याने चर्चा सुरू होती. संघ म्हणून खेळाडू कसे जास्त जवळ येतील, याकडे लक्ष दिले जात आहे. कोणाला शिक्षा करायला ही काही शाळा नाही,’ असे आगरकर यांनी स्पष्ट केले.
‘प्रत्येक संघासाठी नियम असतात. राष्ट्रीय संघातून खेळताना नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असते. संघातील सर्व खेळाडू अनुभवी आहेत. संघातील अनेक खेळाडूंचा दबदबा आहे; मात्र देशाकडून खेळताना काही नियम आवश्यक असतात. त्यातील काही नियम यापूर्वीही होते. फक्त आता त्याची चर्चा होत आहे,’ असे आगरकर म्हणाले. ही दशसूत्री आचारसंहिता राष्ट्रीय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी तयार केली असल्याचे संकेत मिळत आहेत.
नेमके कोण काय करणार, याची मला आणि गंभीर यांना कल्पना आहे. त्याची चर्चा पत्रकार परिषदेत होत नाही. कर्णधार मैदानात जो काही निर्णय घेईल, त्यावर गंभीर यांचा विश्वास आहे. आमची मूलभूत चर्चा ड्रेसिंग रुममध्ये होत असते. मैदानात सर्व निर्णय मी घेत असतो. दोघांचा एकमेकांच्या क्षमतेवर विश्वास आहे. – रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार