बॅडमिंटन स्टार सिंधूने नैराश्यावर अशी केली मात…
अवघ्या दोन पावलांवर सुवर्ण होतं. सोबतीला तितकाच आत्मविश्वासही होता.. एका सामन्याने सुवर्णपदकाचं स्वप्न भंगतं तेव्हा उरतं नैराश्य. भयंकर आहे हे नैराश्य. विशेष म्हणजे हे निसटलेलं सुवर्ण ऑलिम्पिक सोहळ्यातलं असेल तर…! कल्पना करवत नाही त्या वेळी सिंधूची मनःस्थिती काय झाली असेल? ज्या सुवर्णपदकासाठी ती उगवत्या सूर्याच्या देशात आली, त्या देशात सुवर्णस्वप्न मावळताना सिंधू पाहत होती. ऑलिम्पिक बॅडमिंटन स्टार सिंधू उपांत्य फेरीत हरली तेव्हा निराश झाली होती. कांस्य पदकासाठी लढणाऱ्या सिंधूने या नैराश्यावर कशी मात केली असेल?
पुसरला वेंकटा सिंधू… होय हीच ती बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू जेव्हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना हरली तेव्हा कमालीची अस्वस्थ झाली. तिला वाटलं, आता सगळं काही संपलं. खेळाडूच्या अशा मनःस्थितीत प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. तिचा प्रशिक्षक पार्क तेइ-सांग यांनी ती अतिशय उत्तम निभावली. त्यांनी तिला विश्वास दिला, की अजून सगळं काही संपलेलं नाही. चौथ्या स्थानावर राहण्यापेक्षा कांस्य पदक जिंकून मायदेशी परतली तर त्या आनंदालाही सुवर्णझळाळीच असेल.
ऑलिम्पिक पदक कसंही असो, पिवळं, रुपेरी असो वा गेरू… ही तिन्ही पदकं गुणरत्नेच. पण सिंधूने सुवर्णस्वप्न घेऊनच टोकियो ऑलिम्पिक सोहळ्यात पाऊल ठेवलं होतं. मात्र उपांत्य फेरीत तिचं हे स्वप्न भंगलं. चिनी तैपेईच्या ताइ जू यिंग हिने तिचा 18-21, 12-21 असा पराभव केला. मात्र, ही निराशा झुगारून सिंधूने रविवारी, 1 ऑगस्ट 2021 रोजी कांस्य पदकावर मोहोर उमटवली. चीनच्या आठव्या मानांकित ही बिंगजियाओ हिचे आव्हान तिने 21-13, 21-15 असे मोडीत काढण्यात ती यशस्वी झाली.
रियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी भारतीय बॅडमिंटन स्टार सिंधू जेव्हा उपांत्य फेरीत हरली तेव्हा तिला नैराश्याने घेरलं होतं. का नाही येणार नैराश्य, विश्वविजेती होती ती! या स्थितीवर जेव्हा तिला प्रश्न विचारला, तेव्हा सिंधू म्हणाली, ‘‘उपांत्य फेरीतल्या पराभवाने मी निराश होते. कारण मी सुवर्ण पदकासाठी आव्हान देऊ शकले नाही, याचं शल्य बोचत होतं. प्रशिक्षक पार्क यांनी मला समजावलं, की पुढच्या सामन्यावर लक्ष दे. चौथ्या स्थानावर राहून रिकाम्या हाताने परतण्यापेक्षा कांस्य पदक जिंकून देशाचा लौकिक वाढव.’’
प्रशिक्षक पार्क यांच्या याच शब्दांनी सिंधूला प्रेरणा मिळाली. सिंधूने मग आपलं संपूर्ण लक्ष कांस्य पदकाच्या लढतीवर केंद्रित केलं. सामना जिंकल्यानंतर पाचदहा सेकंद तर सिंधू सगळं काही विसरलीच होती. नंतर तिने स्वतःला सावरलं नि जल्लोषात ती कोर्टवर मोठ्याने ओरडली. सिंधूने रियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर बरेच चढ-उतार पाहिले. जिंकलीही…हरलीही. मात्र, कणखर बनले. सिंधू म्हणते, ‘‘गेल्या पाच वर्षांत संपूर्ण खेळ बदलला. मी काही सामने गमावले, तर काही सामन्यांत विजयही मिळवले. या दरम्यान बरेच अनुभव मिळाले. विश्वविजेतीही बनली.’’
कोरोना महामारीतले अनुभव सांगताना सिंधू म्हणाली, ‘‘गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ कोरोना महामारीमुळे (कोविड-19) स्थिती पूर्णतः बदलली. अनेक जण प्रभावित झाले. बऱ्याच स्पर्धा रद्द झाल्या. मात्र, मला खेळावर अधिक लक्ष देण्याची संधीही मिळाली. स्पर्धांदरम्यान हे शक्यच झालं नसतं. काही नव्या गोष्टी शिकले. याच दरम्यान प्रशिक्षक पार्क यांच्यासोबत रोज सरावही केला.’’
सिंधूने जेव्हा हैदराबादचं गचीबाउली स्टेडियम सोडून लंडनमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बराच वाद झाला होता. जर तुम्हाला चांगला सराव करण्याची संधी मिळत असेल तर त्यात अडचण काय आहे? जगात सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूच्या सरावासाठी लंडन उत्तम संधी होती. लंडनमधील स्टेडियम प्रशस्त आहे. तिथली स्थिती अगदी टोकियोशी मिळतीजुळती होती.म्हणूनच सिंधूने लंडनमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला. त्याचा तिला फायदाच झाला. हैदराबाद सोडून लंडनला सराव करण्याचा सिंधूने निर्णय घेतला तेव्हा भारतीय बॅडमिंटन संघटनेने तिला पाठिंबा दिला. सिंधूला लंडनमध्ये ड्रिफ्टवर सराव करण्याची संधी मिळाली.
रियो ऑलिम्पिक ते टोकियो ऑलिम्पिक या प्रवासात सिंधूला तीन प्रशिक्षकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. प्रत्येक प्रशिक्षाची शैली वेगळी होती. या सर्व प्रशिक्षकांकडून काहीना काही शिकायला मिळालं. सिंधू म्हणते, ‘‘नव्या प्रशिक्षकासोबत जुळवून घ्यायला मला काहीही अडचण नव्हती. कारण मी काही नवखी खेळाडू नव्हते. माझ्याकडे कौशल्य आणि तंत्र होतं. फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज होती. प्रत्येक प्रशिक्षकाची स्वतंत्र शैली असते आणि मी सर्वांकडून काहीना काही शिकले आहे. प्रशिक्षकाचं शिकवणं आणि त्या ज्ञानाचा फायदा करून घेणं एवढाच संबंध असतो.’’
रौप्य, कांस्य अशी दोन्ही पदकं मिळविणारी सिंधू आता 2024 ची पॅरिस ऑलिम्पिक खेळणार का, हा प्रश्न तिला विचारला जात आहे. त्यावर सिंधू म्हणते, ‘‘पॅरिस ऑलिम्पिकला अजून तीन वर्षे आहेत. आता तर मी फक्त विजयाचा आनंद घेणार आहे. पण हो, निश्चितच मी पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्याच इराद्याने उतरेन.’’
पी. गोपिचंद यांच्या तालमीत तयार झालेल्या सिंधूचे प्रशिक्षक आता पार्क आहेत. दक्षिण कोरियातील पार्क यांना सिंधू आधीपासूनच ओळखत होती. म्हणूनच तिला त्यांच्यासोबत काम करताना कोणतीही अडचण आली नाही. दक्षिण कोरियाच्या संघासोबत पार्क असायचे तेव्हापासून सिंधू त्यांना ओळखते. गेल्या दीड वर्षापासून सिंधू पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पुढेही त्यांच्यासोबत हा सराव सुरू ठेवण्यास सिंधू उत्सुक आहे.
दक्षिण कोरियाचे पार्क दीर्घ कालावधीपासून कुटुंबापासून दूर आहेत. त्यांचं कुटुंब दक्षिण कोरियातच आहे. त्यांना कुटुंबाची आठवण येते. विशेषतः त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीची खूपच आठवण येते. आता ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आतुर आहेत. फेब्रुवारी 2021 पासून आतापर्यंत ते केवळ 13 दिवस कुटुंबासोबत राहिले. त्यामुळे त्यांना त्यांच्या तीन वर्षांची मुलीची आठवण अस्वस्थ करते. पार्क यांच्या प्रशिक्षकाच्या कारकिर्दीतलं हे पहिलंच ऑलिम्पिक पदक आहे. सिंधूबरोबरच भारतीयांनी पार्क यांच्यावरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारतीयांच्या या प्रेमाने पार्क कमालीचे भारावले आहेत…
सिंधूला प्रशिक्षण देताना दबाव जाणवत होता…: पार्क
भारताचे विदेशी प्रशिक्षक पार्क तेइ-सांग यांना सिंधूला प्रशिक्षण देताना दबाव जाणवत होता. का नसणार हा दबाव? जागतिक दर्जाची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिक सोहळ्यासाठी अचानक प्रशिक्षणाची जबाबदारी अंगावर येऊन पडल्यावर काय होणार? पार्क तेइ-सांग यांचही असंच झालं. थोडा दबाव जाणवत होता, असं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं. दक्षिण कोरियातील 42 वर्षीय पार्क यांना सुरुवातीला पुरुष एकेरीतील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी निवडलं होतं. मात्र, 2019 मधील जागतिक स्पर्धेत प्रशिक्षक असलेले किम जि ह्युन यांनी अचानक पद सोडल्यानंतर सिंधूची जबाबदारी पार्क यांच्यावर येऊन पडली. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत पार्क खेळले आहेत. त्यानंतर त्यांनी कोरियाच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. सिंधूच्या विजयानंतर पार्क म्हणाले, ‘‘मी खूप खूश आहे. कारण माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतलं हे पहिलंच यश आहे. मी सिंधूला प्रशिक्षण देणे सुरू केले, पण ती आधीच मोठी ऑलिम्पिक स्टार होती. मला थोडा दबाव जाणवला. मात्र, मी प्रयत्न केला. कोरियाचे माझे खेळाडू ऑलिम्पिक पदक जिंकू शकले नाहीत. म्हणून मी विचार केला, की सिंधूला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही अपयशी ठरलो, पण कांस्य पदकही मोठंच पदक आहे.’’
गोपी सरांनी शुभेच्छा दिल्या, पण साईनाने नाही!
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन स्टार सिंधू भारतीयांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. ‘गर्व से कहो हम सिंधू है…’, ‘आम्ही सिंधुस्तानी’ अशा शब्दांत देशभरातील वृत्तपत्रांनी सिंधूच्या कामगिरीचा गौरव केला. या विजयाबद्दल मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनीही तिला शुभेच्छा संदेश पाठवला. मात्र, वरिष्ठ खेळाडू साईना नेहवालने तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. साईना आणि सिंधू या एकाच तालमीत तयार झालेल्या दोन उत्तम बॅडमिंटन स्टार खेळाडू आहेत. मात्र, त्यांच्यात फारसं सख्य नाही. या दोघी एकमेकींपासून अंतर राखून आहेत. सिंधूने नकळतपणे ते एका ओळीत सांगितलं. ती म्हणाली, ‘‘अर्थातच गोपी सरांनी मला शुभेच्छा दिल्या. मी अजून सोशल मीडिया पाहिलेला नाही. हळूहळू मी सर्वांना उत्तर देईन. गोपी सरांनी मला शुभेच्छा संदेश पाठवला. साईनाने नाही दिल्या शुभेच्छा. आम्ही एकमेकींशी फारसं बोलत नाही.’’
आम्ही फारसं बोलत नाही, हे एकच वाक्य दोघींमधलं अंतर अधोरेखित करतं. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीदरम्यान सिंधू लंडनमध्ये तीन महिन्यांच्या सरावासाठी गेली होती. यानंतर तिचे आणि गोपीचंद यांच्यात मतभेद असल्याची चर्चाही होती. मायदेशी परतल्यानंतर सिंधूने गोपीचंद अकादमीऐवजी पार्क तेइ-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली गचीबाउली इंडोअर स्टेडियममध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला. यावरून गोपीचंद यांच्याशी असलेले मतभेद आणखी अधोरेखित झाले. कदाचित याच कारणामुळे मुख्य प्रशिक्षक असूनही गोपीचंद टोकियो ऑलिम्पिकला गेले नसावेत.
ताइ जु म्हणाली, सिंधूने उत्साह वाढवल्यानंतर अश्रू ओघळले
उपांत्य फेरीत चिनी तैपेईची ताइ जु यिंग हिच्याकडून पराभूत झाल्यानंतरही सिंधूने खिलाडू वृत्तीने ताइचं मन जिंकलं. ताइ बॅडमिंटनविश्वातली अव्वल क्रमांकाची बॅडमिंटनपटू. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ताइलाही पराभवाचा सामना करावा लागला. पदक वितरण सोहळ्यात जेव्हा या दोघी सोबत आल्या, तेव्हा सिंधूने तिचा उत्साह वाढवला. तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळणाऱ्या ताइने प्रथमच टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं. तिला अंतिम फेरीत चीनच्या चेन यू फेई हिच्याकडून 18-21, 21-19, 18-21 अशा पराभवास सामोरं जावं लागलं. रियो ऑलिम्पिकमध्ये पाच वर्षांपूर्वी सिंधूलाही स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभवास सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे अंतिम फेरीत पराभव काय असतो, हे सिंधू जाणून होती. त्यामुळे तिने ताइची मनःस्थिती बरोबर हेरली. तिने ताइला आलिंगन देत म्हणाली, मला माहीत आहे तू अस्वस्थ असेल. सिंधूची गळाभेट घेताना ताइला गहिवरून आलं आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ताइ जु हिने इन्स्टाग्रामवर आपल्या या भावना व्यक्त केल्या. त्यात तिने लिहिले आहे, ‘‘सामन्यानंतर मी माझ्या कामगिरीवर समाधानी होते. नंतर सिंधू आली आणि तिने माझी गळाभेट घेतली. सिंधू मला म्हणाली,‘मी जाणून आहे, की तू निराश असेल आणि तू खूप छान खेळलीस. आज तुझा दिवस नव्हता. त्यानंतर तिने मला आलिंगन दिलं आणि म्हणाली, मी तुझ्या भावना समजू शकते.’’ सिंधूने जो उत्साह वाढवला, ते पाहता ताइच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ताइ म्हणते, मी खरोखर दुःखी होते. कारण मी खरोखर खूपच मेहनत घेतली होती. तुझ्या मदतीसाठी, प्रोत्साहनासाठी तुझे खूप खूप आभार. मला साथ देण्यासाठी तुझे आभार.’’
[jnews_block_34 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]
Hello. And Bye.