ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती
ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती
मेलबर्न : बेलारूसच्या अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने 29 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन-2023 टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. अरिना सबालेन्का हिने अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत 24 वर्षीय अरिना सबालेन्का पाचव्या, तर 23 वर्षीय एलेना रिबाकिना 25 व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी या दोघी तीन वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्या तिन्ही लढतींत अरिना सबालेन्का हिनेच जिंकल्या होत्या. या वेळीही अरिनानेच बाजी मारली. एलेनाची सुरुवात तर चांगली होती. पहिल्या सेटमधील तिसऱ्याच गेममध्ये तिने अरिनाची सर्व्हिस भेदत एलेनाने 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र, ही आघाडी तिला टिकवता आली नाही. त्यानंतर सलग दोन गेम जिंकून अरिनाने 4-4 अशी बरोबरी साधली. नवव्या गेममध्ये अरिनाला सर्व्हिस राखता आली नाही. दहाव्या गेममध्ये अरिनाला प्रतिकाराची संधी न देता एलेनाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. आव्हान राखण्यासाठी अरिनाला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. या सेटमध्ये तिने 5-2 अशी आघाडी घेतली. मात्र, यासाठी तिला प्रत्येक पॉइंटसाठी संघर्ष करावा लागला. आठव्या गेममध्येच तिने दोन सेट पॉइंट मिळवले होते. मात्र, एलेनाने झुंज देऊन सर्व्हिस राखली. नवव्या गेममध्ये मात्र सर्व्हिस राखून अरिना सबालेन्का हिने सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हानही राखले.
निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत 3-3 अशी बरोबरी होती. सातव्या गेममध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. या गेममध्ये अरिनाने फोरहँडचे फटके जबरदस्त वेगाने मारले. एलेना रिबाकिना हिने दोन ब्रेक पॉइंट वाचवले. मात्र, तिसरा पॉइंट ती वाचवू शकली नाही. पाठोपाठ आठव्या गेममध्ये अरिना सबालेन्का हिने सर्व्हिस राखली आणि 5-3 अशी आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी एलेना रिबाकिना हिला नववी गेम जिंकणे गरजेचे होते. ही गेम तिने जिंकली. त्यानंतर दहावी गेम रोमहर्षक ठरली. या गेममध्ये अरिना सबालेन्का हिने 40-30 अशा आघाडीसह मॅच पॉइंट मिळवला होता. तो मॅच पॉइंट एलेनाने वाचवला. त्यानंतर तिने आणखी दोन मॅच पॉइंट वाचवले. मात्र, चौथा मॅच पॉइंट वाचवण्यात ती अपयशी ठरली अन् अरिना सबालेन्का हिने कोर्टवर ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा जल्लोष केला.
पहिलेच ग्रँडस्लॅम
- अरिना सबालेन्काने कारकिर्दीतील एकेरीचे पहिलेच ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.
- या जेतेपदामुळे अरिना आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोचेल.
- उपविजेती रिबाकिना जागतिक क्रमवारीत पंचविसाव्या स्थानावरून पहिल्या दहांत येईल.
- १९6८नंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सबालेन्का 2९वी महिला टेनिसपटू ठरली.
- ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी अरिना बेलारूसची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. यापूर्वी, बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने 20१2 आणि 20१3मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=Zz_1D1QBwu4″ column_width=”4″]या यशाचे श्रेय माझ्या संपूर्ण संघाला जाते. गेल्या वर्षी आम्हाला अनेक चढ-उतारांतून जावे लागले. आम्ही खूप मेहनत घेतली. या यशात माझ्या संघाचा मोलाचा वाटा आहे.
– अरिना सबालेन्का, विजेती
अरिनाचं विजेतेपद, चर्चा मात्र गर्भारपणाची!
अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आणि टेनिसविश्वात सोशल मीडियावर वेगळ्याच गमतीदार चर्चांनी रंग भरला. ही चर्चा सुरू होती विजेत्या महिलांच्या गर्भारपणाची. आश्चर्य वाटले ना? झालं काय, की 2016 ते 2022 या दरम्यान जेवढ्या महिलांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले, त्या सर्व सध्या (2023) गर्भवती तरी आहेत किंवा मातृत्वसुख तरी उपभोगत आहेत. “या क्रमाने विचार केला, तर पुढच्या वर्षी कदाचित अरिना गर्भवती असेल… आम्ही वाट पाहतोय…” अशी गमतीदार चर्चा ट्विटरवर रंगली होती. 2016 ची विजेती अँजेलिक कर्बर, 2021 ची विजेती नाओमी ओसाका आणि 2022 ची विजेती ॲश्ले बार्टी या सर्व सध्या गर्भवती आहेत. कॅरोलिन वॉझ्नियाकी आणि सेरेना विल्यम्स या दोघीही सध्या मातृत्वसुखाचा आनंद घेत आहेत. आश्चर्य म्हणजे माजी अव्वल टेनिसपटू जेनिफर कॅप्रियात (Jennifer Capriati) आणि 2020 ची विजेती सोफिया केनिन (Sofia Kenin) या दोन्ही ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेत्या गेल्या 26 वर्षांपासून गर्भवतीही राहिल्या नाहीत आणि त्यांना अद्याप मूलही नाही. या योगायोगाला अधोरेखित करीत चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरही चर्चा सुरू केल्या. या चर्चांनी सबालेन्कालाही हसू आवरले नाही. तिनेही गमतीने म्हंटले, की “मी याबाबत संघाशी आणि माझा बॉयफ्रेंड काँस्टेटिन कोल्टसोव (Konstantin Koltsov) याच्याशी चर्चा करीन.” ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेशी असलेला हा योगायोग अरिना सबालेन्का हिच्याबाबत खरा ठरतो की आणखी काही ट्विस्ट येतात, याचं औत्सुक्य मात्र चाहत्यांना आहे.
2016 पासून ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या महिलांचा असाही योगायोग…
- 2016, अँजेलिक कर्बर : सध्या गर्भवती
- 2017, सेरेना विल्यम्स : गर्भवती असताना विजेती
- 2018, कॅरोलिन वॉझ्नियाकी : दुसऱ्या मुलाचा नुकताच जन्म
- 2019 & 2021, नाओमी ओसाका : सध्या गर्भवती
- 2022, अश्ले बार्टी : नुकतीच गर्भवती
(2023 पर्यंतची ही स्थिती)