वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी उतरली आखाड्यात!
वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी उतरली आखाड्यात!
बाप, काका, आजोबा, भाऊ सगळेच पहिलवान. अशा पहिलवानाच्या घरातली पोरगी आखाड्यात उतरणार नाही तर काय ‘कथक’ करणार व्हय! पण ती जेव्हा आखाड्यात उतरली तेव्हा मात्र तिने भल्या भल्यांना आपल्या तालावर ‘कथक’ करायला लावलं! तिचा वजनगट 57 किलोचा. आखाड्यात उतरून सात वर्षे झाली नाही, तोच पोरीनं नाव काढलं आणि ऑलिम्पिकचा कोटा मिळवला… ही पहिलवान आहे हरियाणातल्या निदानी गावातली अंशू मलिक (Anshu Malik wrestling).
पहिलवानाच्या घरात कुस्ती जिंकणं म्हणजे दिवाळी असते. अंशूने जेव्हा ऑलिम्पिकचा कोटा मिळवला तेव्हा तो घरातला उत्सव काय वर्णावा! बापाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कारण त्यांनीही कधी काळी एक स्वप्न पाहिलं होतं. मात्र, ते अधुरंच राहिलं. मात्र, पोरीच्या रूपाने हे स्वप्न आता साकार झालं…
अंशूने ऑलिम्पिक मल्लाला केले पराभूत
Anshu Malik wrestling | एप्रिल 2021 मध्ये ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत अंशूने कमाल केली. तिच्यासमोर दक्षिण कोरियाची ऑलिम्पिक पहिलवान जिउन उन हिचं आव्हान होतं. मात्र, अंशूने तिला 10-0 असा दणदणीत पराभूत केले. नंतर कजाकिस्तानच्या पहिलवानाचीही तिने तशीच अवस्था केली. एमा तिसिना हिलाही तिने 10-0 असे पराभूत केले. विजयाचा धडाका असा एकहाती सुरू करणाऱ्या अंशूचा पवित्रा धडकी भरवणाराच होता. उपांत्यफेरीत उझबेकिस्तानच्या शोखिदा अखमेदोवा हिला 12-2 असे पराभूत करीत तिने ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. अंतिम फेरीत तिला मंगोलियाची पहिलवान खोगोरजुल बोल्डसाइखान हिच्याकडून 7-4 असा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, फारसा अनुभव गाठीशी नसताना अंशूने फायनलमध्ये धडक मारावी हेच अचंबित करणारं आहे.
अंशू बारा वर्षांची होती तेव्हा ती आजीला म्हणाली, “मला की नै पहिलवान व्हायचंय! मला शुभमसारखं (लहान भाऊ) निदानी शाळेत प्रशिक्षण घ्यायचंय” अंशूलाही मग कुस्ती शिकवायला पाठवलं. वडील धर्मवीर यांना सहा महिन्यांत कळलं, अपनी छोरी किसी छोरे कम नहीं!
खरं तर धर्मवीर यांना शुभमलाच पहिलवान बनवायचं होतं. शुभम अंशूपेक्षा चार वर्षांनी लहान. नंतर त्यांना कळलं, की अंशू सर्वांना भारी आहे! अंशूला आखाड्यात पाठवून अवघे सहा महिने झाले होते. मात्र, सहा महिन्यांत ती एकामागोमाग कुस्त्या जिंकू लागली. तिने अशा पोरींना अस्मान दाखवलं, ज्या तीन-चार वर्षांपासून प्रशिक्षण घेत होत्या! धर्मवीर यांना कळून चुकलं, पोरगी नाव काढणार! नंतर त्यांनी पोरापेक्षा पोरीवरच लक्ष केंद्रित केलं.
Anshu Malik wrestling
वडिलांचं स्वप्न केलं साकार
कधी काळी वडील धर्मवीर यांनीही आंतरराष्ट्रीय कुस्तीत भाग घेतला होता. मात्र, दुखापतीमुळे त्यांची पहिलवानकीची कारकीर्द फारशी उजळली नाही. अंशूचे काका पवन कुमार मात्र ‘हरियाणा केसरी’ होते. पवन कुमार यांनी साउथ एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलही जिंकले आहे. असं हे घरचं वातावरण असेल तर अंशू प्रगती करणार नाही तरच नवल. प्रशिक्षणानंतर चार वर्षांतच अंशूने राज्य आणि राष्ट्रीय किताब जिंकले. तिने 2016 मध्ये आशियाई कॅडेट चॅम्पियनशम्मध्ये रौप्य आणि नंतर जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. आता ऑलिम्पिकचा कोटा मिळवत तिने वडिलांचं स्वप्न साकार केलं.
Anshu Malik wrestling
Anshu Malik wrestling | कॅडेट गटात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अंशूला वरिष्ठ स्तरावर तसा फारसा अनुभव नव्हताच. तरीही ती वरिष्ठ गटातल्या आखाड्यात उतरली. तिने वरिष्ठ गटातील कारकिर्दीत फक्त सहा स्पर्धा खेळल्या होत्या. विशेष म्हणजे त्यात तिने पाच पदके जिंकली. याच दरम्यान ती 57 किलो वजनगटात आशियाई चॅम्पियन झाली. जानेवारी 2020 मध्ये ती वरिष्ठ गटात पहिली स्पर्धा खेळली. तरीही ती अशा चार भारतीय महिला पहिलवानांपैकी एक आहे, ज्यांनी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
Anshu Malik wrestling | अंशू लाजरी मुळीच नाही. आखाड्याच्या बाहेरही ती तेवढीच खुलून राहते. पहिलवान असली तरी ती अभ्यासात कमालीची हुशार आहे… हिंद केसरी मारुती माने म्हणायचे, पहिलवानाला दोन डोकी असतात. एक डोक्यात अन् दुसरी गुडघ्यात! अंशू तशीच होती. ती प्रत्येक बाबतीत अव्वल असायची. म्हणूनच ती शाळेतही पहिला क्रमांक येण्यासाठी धडपडायची. तिने बारावीत 82 टक्के गुण मिळवले आहेत.
कुस्तीत इतक्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या अंशूबाबत थक्क व्हायला होतं. तिच्या यशाचं रहस्य काय असेल? त्याचं एकच कारण म्हणजे, रोजचा सराव. ती रोज सकाळी साडेचारला उठते. कितीही थकवा असला तरी प्रशिक्षणासाठी तिने नकाराच्या कोणत्याही सबबी पुढे केल्या नाहीत. रोज प्रशिक्षणाला जायचं म्हणजे जायचं. त्यात कोणतीही तडजोड नाही. ती मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. नकारात्मक टिपणीवर ती कधीही नाराज होत नाही.
अंशू मलिकमध्ये सकारात्मक ऊर्जा
सकारात्मक ऊर्जा काय असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंशू मलिक (Anshu Malik wrestling). ती म्हणाली, ‘‘माझ्या भवताली सकारात्मक लोक राहतात. प्रत्येक जण माझ्यात हा विश्वास जागतवतो, की मी सगळं काही करण्यास योग्य आहे. माझ्याकडे नकारात्मक विचार करणारा कोणी नाही.’’ जिंकणं-हारणं हा खेळातला एक भाग आहे. मात्र, तुम्ही ते सकारात्मक दृष्टीने कसे घेतात यावर सगळं काही अवलंबून असतं, याची प्रचीती अंशूच्या या शब्दांतून येते. मेहनत आणि चातुर्य या दोन गोष्टी कुस्तीत महत्त्वाच्या आहेत. अंशूला हे चांगलेच ठाऊक आहे. मॅटवरच अभ्यास असतो असं नाही, तर मॅटबाहेरही अनेक कामांतून अंशू बरंच काही शिकली आहे. मॅट-ट्रेनिंग, रिकव्हरी, डायट आणि मसाज या कुस्तीतल्या महत्त्वाच्या बाबी आहेत. अंशूला कुस्तीतलं विदेशी तंत्रज्ञानही शिकायचं आहे. ऑलिम्पिकचा कोटा मिळवल्याने हळूहळू अंशूसाठी कुस्तीज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत.. मलिक घराण्यातला कुस्तीचा दिवा तेजाळण्यासाठी ती आता वात झाली आहे…